ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथरचना इतिहास

ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथरचना इतिहास

 7-9-2021

 ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथरचना इतिहास 

थोर महानुभाव 

कवि :- श्रीसंतोष मुनिबास

महानुभाव पंथातल्या असंख्य संत महंतांनी गेल्या ८०० वर्षात सुमारे ६००० अपूर्व ग्रंथांची निर्मिती केली. कोण्याही संप्रदायात, धर्मात इतक्या विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती झालेली नाही. आणि या ग्रंथसागरातला प्रत्येक ग्रंथ अमूल्य रत्नासारखा अनर्घ्य आहे. श्रीसंतोष मुनिबास यांचा ऋक्मिणी स्वयंवर हा ३२०० ओव्यांचा महा ग्रंथराज एक अद्वितीय रचना आहे. यात द्वापार युगातल्या भौगोलिक माहिती, त्या काळातले पृथ्वीवर असलेल्या राज्यांची नावे, राजांची नावे, त्यांच्या पराक्रमांचे वर्णन, आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या कथेचा नायक असलेले श्रीकृष्ण भगवंत त्यांच्या श्रीमूर्तिचे वर्णन लीळांचे वर्णन अतिशय रसपूर्ण अलंकारीक शब्दात मांडलेले आहे.

अन्वय स्थळात कविची वंश परपंरा पुढिल प्रमाणे येते. 

श्रीनागदेवाचार्य - श्रीआनेराज पंडित - श्रीनागनाथबास - मालेराजबास - भिवबास लासुरकर - बल्हाळबास - संतोषमुनिबास :।।:

पण काहीं संशोधकांच्या मते त्यांच्या गुरुंचे नाव कृष्णमुनि असे होते. पण कृष्णमुनी हे त्यांचे समकालिन होते. असे वाटते. संतोषबास आणि कृष्णमुनिबास या दोघां श्रीचक्रधरप्रभू लालबदाक्ष किल्ल्यात राज्य करत आहे असे कळले व ते दर्शनाला निघाले. असा वृद्धाचार आहे. पुढे त्यांना दर्शन झाले नाही.  देवाने कृष्णमुनीबासांना हे पंजाब प्रांतात निद्रिस्त अवस्थेत आणून सोडले. व तिथे त्यांच्याकडून महानुभाव पंथाचा प्रचार झाला. व संतोषमुनींना गंगातीर महाराष्ट्रात आणून सोडले. पुढे गंगातीरलाच त्यांनी ऋक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची निर्मिती केली. असा वृद्धाचार परपंरेने सांगण्यात येतो.

 ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथरचना इतिहास

ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथनिर्मिती कशी झाली याचा मौखिक इतिहास असा आहे कि, कवि श्रीसंतोषमुनि कृष्णदास हे अत्यंत ज्ञानी भक्ति आणि वैराग्ययुक्त महान तपस्वी पुरुष होते. त्यांच्याजवळ अनेक शिष्यगण ब्रम्हविद्येचा अभ्यास करत होते. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान् श्रीचक्रधरस्वामींनी त्यांचे पांच मनोरथ पांच वरदान देऊन पूर्ण केले. पण त्यांचे पाच मनोरथ(इच्छा) होत्या.

) रुक्मिणी-स्वयंवर या विषयावर काव्य रचण्याचा मानस आहे. तो सिद्धीस जावा.

२) लोखंडाचे सोने बनवणारा 'परीस' दगड पहायला मिळावा. 

३) देवाचे दर्शन व्हावे 

४) मी रचलेल्या रुक्मिणी-स्वयंवर ग्रंथाचे जे कुणी पारायण व श्रवण करतील त्यांचे दुःख व क्लेश दूर होऊन सर्व मनोरथ पूर्ण व्हावे. 

५) देहांतसमयी मी तुझे स्मरण-चिंतन करीत करीत शरीराचा त्याग करावा. 

    देवाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. परमेश्वरकृपेने रुक्मिणी-स्वयंवर ३२०० वोव्यांचा ग्रंथ पूर्ण झाला. तेव्हां त्या पोथीचे टाचण करीत असता सूईची अणी खुडली. मग ती सुई दगडावर घासून अणी करावी या हेतून ते बाहेर आले, त्यांना समोर एक दगड दिसला त्यांनी तो दगड आणून त्यावर सुई घासण्यास प्रारंभ केला. घासत असताना क्षणभरातच ती सुई वाकली. त्यांनी निरखून पाहिले तर त्या सुईवरची काळिका बाजुला होऊन ती सोन्यासारखी पिवळी होऊन चमकतांना दिसली. लगेच त्यांच्या लक्षात आले कि, हा परिस आहे, देवाने आपला ‘परीस पाषाण’ पाहण्याचा मनोरथ पूर्ण केला. तेवढ्यात त्यांना समोरून आपला शिष्य येतांना दिसला. काही अविधी निषेधाचरणामुळे ते त्याच्यावर रागावलेले होते. त्याच्यावर अप्रसन्नता होती, म्हणून त्यांनी पाहून न पाहिल्यासारखे केले, त्या व्यक्तीने समोर भक्तिभावपूर्वक दंडवत केला. त्या नमस्काराकडे दुर्लक्ष करून पुनः त्याच्याकडे त्यांनी पाहिले देखील नाही. शिष्य गेल्यानंतर त्यांनी तो परिस त्याच वेळी एका विहीरीत फेकून दिला.

संध्याकाळी स्मरण ध्यानात मग्न होऊन कविराज संतोषमुनिबास साश्रुनयनांनी प्रार्थना करू लागले कि, 'हे महाराजा! भगवंता ! ज्या प्रमाणे आपण माझे दोन मनोरथ पूर्ण केले त्याप्रमाणेच आपल्या अमोघ दर्शन व्हावे हा मनोरथही पूर्ण व्हावा. अशी प्रार्थना करीत असताच त्यांना निद्रा आली. आणि पहाटे त्यांना सुचिक(स्वप्न) पडले. स्वप्नात देव दिसत आहेत आणि म्हणतात ‘‘अरे ! काल मी तुझ्या शिष्याच्या रूपाने आलो होतो, तुला नमस्कारही केला, क्षणभर तिथे थांबलोही, पण माझ्याकडे पाहिले देखील नाहीस. तेव्हाच मी तुझा तिसरा मनोरथ पूर्ण केला आहे. आणि इथून पुढे तू रचिलेला रुक्मिणी-स्वयंवर ग्रंथ पंथात प्रसिद्ध होईल, त्यां ग्रंथाचे जो पठन, पाठन, पारायण व श्रवण करतील त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. तापा दुःखा संकटांचे निवारण होईल.’’ असा वर देवाने दिला आणि त्यांची निद्रा भंगली. भल्या पहाटे पश्चात प्रहरी पडलेले हे मंगळ स्वप्न त्यांना जणुकाही प्रत्यक्षच देवाने आपल्याला दर्शन दिले असे आठवू लागले. पण लगेच त्यांना दुःखही वाटले की, स्वप्नात का होईना देवाने दर्शन दिले, पण आपण दृष्टपरच मागून घेतले, देवाला प्रेम मागायला पाहिजे होते. अशी खीती त्यांना देहांतपर्यंत राहिली. ते स्मरणनिष्ठ महापात्र पुरुष होते. त्यांचा भक्तिगुणरस त्यांच्या काव्यात ओथंबून वाहतो.

पुढे त्या अनुशोचानेच त्यांनी परमेश्वराचे चिंतन स्मरण करत त्यांनी देह ठेवले. अशा प्रकारे त्यांचे सर्व मनोरथ परमेश्वराने पुर्ण केले.

    अशा थोर महानुभावांना साष्टांग दंडवत प्रणाम. 

महाकवि श्रीसंतोषमुनिबास हे उच्चकोटीचे विद्वांन पुरुष होते. ऋक्मिणी-स्वयंवर या ग्रंथाच्या तीन हजार दोनशे तीन ओव्या त्यांनी एका महिण्यात रचून ग्रंथ पूर्ण केला. हे समाप्तीच्या ओवीवरून लक्षात येते. ओवी पुढिलप्रमाणे :- 

ऐसा दोनि शत तीने सहस्र ग्रंथु : 

सिद्धी पावला माघ मासा एकांतु :

कवि संतोषमुनी म्हणे श्रीकृष्णनाथु : 

प्रीति पावो स्वामि माझा ॥(ऋ.स्व. प्रसंग २५ ओ. १२७) 

अशी ही अद्भूतकाव्य रचना एका महिण्यात करणे हे परमेश्वराच्या कृपेमुळेच त्यांना शक्य झाले. 

या ग्रंथ निर्मितीच्या वेळी ते तीर्थाटन करत होते. त्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.

कुंकुमठाण ग्राम गंगातीरी : तेथ ग्रंथ आरंभिला गंगेश्वरी :

तो संपूर्ण सिद्धी गेला श्रीनगरी : भिल्लमठी जाणा ।। (ऋ.स्व. प्रसंग २५ ओ. १२५)

अटणक्रमे कुंकुमठाण या स्थानावर आले असता त्यांनी ग्रंथ रचनेला आरंभ केला. आणि श्रीनगर म्ह. आजचे सिन्नर येथे भिलमठात ग्रंथ पूर्ण झाला. अर्थात कुंकुंमठाण तिर्थस्नाने करत, अटन विजन भिक्षा भोजन करत एका महिण्यात ते सिन्नरला पोहचले. आणि तिथे हा वाक्पुष्पांचा हार श्रीचक्रधरप्रभूंच्या श्रीचरणी अर्पण केला.

असा  हा ऋक्मिणी स्वयंवर ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. तो सर्वांनी अवश्य एक वेळा वाचायलाच पाहिजे.

फलश्रुति

हें आइकता ऋक्मिणी स्वयंवर  : सर्वसिद्धी पावती नारी नर :

आणि रोग दोष नासती थोर : जे जोडिले कल्पांतीचे ।। (प्र.१ला क्र.२०)


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post