राजा शत्रुजीत हा विदर्भप्रांतातील अलंकावती नगरीचा राजा होता. तो न्यायी व धर्मपरायण होता. त्यामुळे त्याची किर्ती सर्वदूर पसरली होती. तेथून जवळच असलेल्या विंध्य पर्वताच्या राईत महर्षी गालवांचा आश्रम होता. ते सदैव तपसाधनेत रत असायचे. त्यांना आश्वन व नागसूत असे दोन पुत्र होते.
एकदा काय झाले, आश्वन आणि नागसूत हे दोघे खेळक्रीडा करीत अलंकावतीस पोहचले. तेथे राजा शत्रुजीताने त्यांचे यथोचित स्वागत केले. इकडे गालव मुनी मुलांच्या प्रतिक्षेत होते. तेवढ्यात दोन्ही ऋषीकुमार आश्रमात परतले. त्यांना बघून ऋषींनी विचारले, 'मुलांनो ! कुठे गेला होता तुम्ही ?' दोघांनी इत्यंभूत घटना सांगितली. ती ऐकून महर्षीना फार आनंद झाला.
किती एक दिवसानंतर महर्षी गालव राजा शत्रुजीतास भेटण्यास अलंकवती नगरीस गेले. राजाने त्यांचे भव्य स्वागत केले. 'महाराज ! अहो भाग्य माझे ! मज अभाग्यास आपण दर्शन दिले.' ऋषी म्हणाले, 'राजन् ! समोर धर्मसंकट उभे आहे. ते सांगण्यास मी तुझ्याकडे आलो आहे. तालकेतु नांवाचा राक्षस आमच्या धर्मकार्यामध्ये नियमित अडथळे आणतो आहे. तो वराहाचा वेष घेऊन आमचे यज्ञकुंड, समिधा व पुजाद्रव्याची नासाडी करतो आणि आम्हाला विधीवत धर्मकार्य करू देत नाही.' राजाचा क्रोध अनावर झाला. 'कोण हा तालकेतू आणि कुठे राहतो?' 'राजन् ! येथून जवळच सुतल नांवाच्या विवरात राहतो. माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या महाप्रतापी बलशाली ऋतुध्वजाला या कार्यास पाठवावे.' ऋषीचे वचन ऐकून राजा म्हणाला, धर्मरक्षणार्थ माझा राजकुमार सदैव तत्पर आहे.'
लगेच महर्षी गालवांसोबत राजकुमार ऋतुध्वज मोहिमेवर निघाला. ऋषीने त्यास सुतल विवर दाखविले. बऱ्याच शोधांती त्याला सुतल विवरात दडून असलेला तालकेतु दिसला. ऋतुध्वजाचे व तालकेतुचे जबर युद्ध झाले. अखेर तो क्षण आला. तालकेतुस राजकुमाराने यमसदनी पाठविले. विवरात पुढे जाऊन पाहतो तर एक सुंदर महाल होता. ऋतुध्वजास मोठे आश्चर्य वाटले. पुन्हा समोर गेला तर त्यास ध्यानमग्न सुंदर ललना दिसली. तिच्या जवळ जाऊन राजकुमाराने विचारले, ‘‘देवी ! तू कोण आहेस व इथे काय करते?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी मदलसा. काशी नरेशाची कन्या. तालकेतुने माझे अपहरण केले. आपण माझी मुक्तता केली. मी आभारी आहे.’’ राजकुमाराने मदलसेला विवराबाहेर आणले. समोर महर्षी गालव वाट पहात उभे होते. त्या दोघांना बघून ऋषी म्हणाले, ‘‘आयुष्यमान भव् ! यशस्वी भव !’’
दोघांना घेऊन मुनी गालव अलंकावती नगरीस आले. राजा शत्रुजीताने नगरी श्रृंगारून विजयी राजकुमाराचे व मदलसेचे भव्य स्वागत केले. मुनी म्हणाले, राजन् ! ही एक अमोल घडी आहे. आज राजकुमाराने धर्मरक्षण केले. जीवनाचा हेतु सफल झाला. तुझा मुलगा धार्मिक आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. आणि मदलसा पण धार्मिक आणि तपःशिल आहे. माझी इच्छा आहे की राजकुमार ऋतुध्वज आणि मदलसेचा विवाह व्हावा. तालकेतुने मदलसेला विवाह करण्यासाठी बरीच विनंती केली, परंतु तिच्या भक्तिच्या प्रभावाने तालकेतु तिला काही करू शकला नाही. नियतीचा तो योग नव्हता. तो योग आज आलेला आहे.'
राजा शत्रुजीताला फार आनंद झाला. त्याने लगेच काशी नरेशाला निमंत्रण पाठविले. घडलेल्या घटनांचा आढावा दिला व मुनी गालवांचा मनोदय व्यक्त केला. हे ऐकून काशीराजाला फार आनंद झाला. राजथाटात, धुमधडाक्यात राजकुमार ऋतुध्वज व मदलसेचा विवाह संपन्न झाला.
राजा ऋतुध्वज व राणी मदलसा हे धर्मपरायण, न्यायी व प्रजाहित दक्ष होते. प्रजेच्या सेवेसाठी राज्यपद आहे, हे जाणून त्यांनी राज्यकारभार केवळ कर्तव्य म्हणून सांभाळला. राणी मदलसा तर तपोनिष्ट होती. तिचा सर्वकाळ अध्यात्मिक ध्यानसाधनेत जात असे. एकदा तिला लाखारवनात जगदगरू श्रीदत्तात्रेयप्रभुंचे दर्शन झाले ती श्रीदत्तप्रभुंना अनन्यभावे शरण गेली. तिची एकनिष्ठ भक्ति पाहून श्रीदत्तात्रेय प्रभूंनी तिला ज्ञान प्रदान केले. ती प्रभूने दिलेल्या ज्ञानमार्गाने आपली जीवनाची वाटचाल करू लागली. मदलसेला सात पुत्र होते. तिने आपल्या सहा पुत्रांना जीवनाचा राजमार्ग दाखविला. जीवाला मिळालेला मानव देह अनमोल आहे. त्याचे मोल आपण केले पाहिजे. केवळ राजभोग आणि सांसारिक सुख हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट नव्हे तर, जीवाचा उद्धार हे लक्ष प्रत्येकाने साधले पाहिजे. संसार हा अनित्य, पापमुलक व दुःखरूप आहे. हे जाणून साधकाने परमेश्वराला अनन्यभावे शरण गेले पाहिजे. तोच खरा आधार आहे. हे बिंब मदलसेने आपल्या पुत्रांवर बिंबवले व त्यांना भक्तिमार्गावर चालण्यास उद्युक्त केले.
सातवा पुत्र अर्ळक यास मदलसेने देशसेवेसाठी ठेवले.(वाहिले) त्याने धर्माने राज्य चालवावे व उर्वरित जीवन धर्मकार्यात घालवावे असा मौलिक संदेश देऊन सहाही मुलांसह अरण्यात तपसाधना करण्यास निघून गेली. इकडे अर्ळक हा राज्यकारभारामध्ये लक्ष घालून मातेने दिलेल्या उपदेशानुरूप जीवन व्यतित करीत होता पण झाले काय, द्रव्य अस्तित्वे-सत्ता अस्तित्वे ‘मद' हा निर्माण होत असतो. अर्ळकाचे पण तेच झाले. कालांतराने अर्ळक राजविलासामध्ये रममाण झाला. इंद्रीयजन्य सुखाच्या लालसेने व स्वार्थाने पिडीत झालेल्या अर्ळकाला धर्मा-अधर्माचे भान राहिले नाही. मातेच्या उपदेशाच्या संस्कारावर धुके निर्माण झाले. सर्वत्र काळोख पसरला. अळेक नको तेवढा बदलला. मातेला याची जाण झाली, तिला अळकाची काळजी वाट लागली. सहा मुले तपसाधना व श्रीदत्तप्रभूच्या प्रार्थनेत काळ व्यतीत करित होती. मदळसा आपल्या मुलांना म्हणाली, 'मुलांनो! हे बघा तुमचे जीवन तर प्रभूकृपेने उजळले. परंतु अर्ळक पूर्णतः बदलला आहे. त्याने धर्माचा मार्ग सोडलेला दिसतो. आता त्याला मार्गावर आणणे तुमचे कर्तव्य आहे.' हे माते ! तू आम्हाला आज्ञा कर. आम्ही तुझ्या सेवेत तत्पर आहोत. ‘‘हे बघा! तुम्ही सहाही जज अळकाकडे जा व त्याला सन्मार्ग दाखवा.’’
मातेची आज्ञा घेऊन ते सर्वच निघाले आणि अर्ळकाला म्हणाले, अर्ळका ! तू जाणतोस, जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. जीवनातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, हे समजून तशी वाटचाल करावी. पुरूषार्थ साधावा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही ती चार पुरूषार्थ होत. तू आपले जीवन अर्थ आणि काम यामध्येच व्यतीत करतो आहेस. खऱ्या पुरूषार्थाला तिलांजली देतो आहेस. मला सांग काय साध्य होईल तुला ? तू आईचा उपदेश विसरलास. हे जे तुला दिसते, ते तुझे नाही. पूर्वी कधी ते कुणाचे होते, आज तुझे आहे. उद्या तुझे नसणार. संसार हा अनित्य आहे. दुःखरूप आहे. इथला प्रत्येक क्षण दुःखाने भरलेला आहे. 'दुःख म्हणजे पाप' पापमुलक संसारात तू काय प्राप्त करणार? हे लक्षात ठेव व मातेने सांगितलेल्या उपदेशाचे पालन कर.
सत्तेच्या मदाने ओतप्रोत भरलेल्या अळकाला हे बाळकडू मानवले नाही. ‘‘मला ते जमणार नाही. काय करायचे ते मी ठरवीन’’ असे म्हणून आपल्या बंधना अर्लकाने परत पाठविले. ही वार्ता मातेला कळताच मदलसेचा सात्विक संताप अनावर झाला. तिने आपल्या बंधुराजाकडे म्हणजे काशीराजाकडे सहाही पुत्रांना पाठविले व निरोप दिला की, अर्ळकाशी युद्ध करा आणि त्याला देशोधडीला लावा, नेस्तनाबुत करा.' हा आदेश ऐकून काशी नरेशाने अळकावरती स्वारी केली.
अचानक झालेल्या छुप्या हल्ल्याने अर्ळकाच्या सैन्याची दाणादाण झाली. सर्वत्र हलकल्लोळ झाला. अळकाने निकराचे युद्ध केले. अखेर अधर्माचे वर्तन असलेल्या अळकाचा पराभव झाला. त्याची अवस्था गंभीर झाली. राज्य गेले, सैन्याची त्रिकुटता झाली. अळक एकांगी पडला. त्यामुळे तो त्रयतापाने दग्ध झाला. अधिभौतिक, अध्यात्मिक व अधिदैविक या विवीध तापाने पोळलेला अर्ळक, त्याला मातेच्या शब्दांची आठवण झाली. 'संकट समयी श्रीदत्त प्रभूला शरण जा' तो आपले आराध्य दैवत असलेल्या श्रीदत्तप्रभूच्या दर्शनाला निघाला. दुःखत्रयाने व्यथित झालेला अळक मनोभावे प्रभूची प्रार्थना करीत सैह्यांद्री पर्वतावर आला. अपराधाची जाणीव झाली की मन ढवळून निघत असते. अळकाचे तेच झाले. अळक दुःख करू लागला. त्याचा तो आर्त टाहो ऐकून करूणाघनाला कीव आली. लगेच श्रीदत्तप्रभुंनी त्याला दर्शन दिले. श्री प्रभूच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करून तो प्रभूला प्रार्थना करू लागला. 'शंबोली! शंबोली! शंबोली!' शांत हो ! शांत हो! अशा आशिर्वचन भूत श्रीदत्तप्रभूच्या वाणीने अळकाचे त्रयताप शांत झाले. तो प्रभूला अनन्यभावे शरणागत झाला व एकनिष्ठ भावाने भक्ति. करू लागला.
घडलेला सर्व वृत्तांत मदलसेला कळला. तिला अपार हर्ष झाला. ती आपल्या सहाही पुत्रांसह माहूरगडावर आली. तेथे श्रीदत्तप्रभूचे दर्शन घेतले आणि अळकाची पण भेट घेतली. काशीराजा पण सोबतच आलेला होता. तो म्हणाला, प्रभो ! मी अर्ळकावर स्वारी केली. ती मदलसेच्या विनंतीवरून. तो अनिष्ट प्रवृत्तीला लागला होता. आता त्याला आपल्या कृपाप्रसादाने सन्मार्ग मिळाला. हे फार चांगले झाले. पण मला आता त्याचे राज्य काय करायचे? ते मी श्रीचरणी समर्पण करतो. वस्तुतः ते राज्य अर्ळकाचेच.' अर्ळक म्हणाला, नाही ! नाही ! मला राज्य वैभव नको. मी तर आता सर्वस्व प्रभूचरणी समर्पित झालो आहे. माझे सर्व काही श्रीदत्तप्रभूच आहेत.'
प्रभू म्हणाले, 'हे बघ अर्ळका! तू कर्तव्य म्हणून कर्म कर. आसक्त होऊ नकोस व सदैव मला हृदयात धारण करून मन आणि बुद्धिला माझे ठाई लाव. तू निःसंशय तरून जाशील.
प्रभूची आज्ञा मानून राजा अर्ळक व काशीराजा संन्यस्त मार्गाने प्रेरीत होऊन मार्गक्रमण करू लागला. आणि माता मदळसा आपल्या सहाही पुत्रांसह श्रीदत्तप्रभूच्या सान्निध्यात राहून तप ध्यानधारणा करू लागली.