धर्माचरण आणि धर्माची व्याख्या
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मं न त्यजामि मा नोऽधर्मो हतोऽवधीत् ।।
विनाश केला गेलेला धर्म विनाश करणार्याचा नाश करते. संरक्षीत असलेला धर्म संरक्षणकर्त्याचे रक्षण करते. म्हणून, आपण धर्माचा त्याग करू नये, तो यासाठीच की अधर्म आमचा विनाश न करो.
माणसाच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या भावना वास करतात त्यालाच धर्म असे म्हणतात. तत्त्वज्ञान अधिक आचरण म्हणजेच धर्म होय. नुसते ज्ञान अभ्यासून घेणे, व त्या प्रमाणे आचरण न करणे तो धर्म नाही. तो पुरुष विद्वान असेल पण तत्त्वविद नसणार. आचरण म्हणजे परमार्थामध्ये ज्याचा उपयोग आहे ती वर्तणूक त्याला शास्त्रीय भाषेत ‘असतिपरी’ असे म्हटलेले आहे. आणि जीवनामध्ये आस्तिक्य भावना असणे म्हणजे धर्म होय. आस्तिक्य भावना आणि शील, चारित्र्य म्हणजे धर्म असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आस्तिक्य भावना असून जर ती चारित्र्यात नसेल म्हणजेच मनुष्य आस्तिक्य भावना युक्त असला तरी त्याचे चारित्र्य ठिक नसेल तर तो धार्मिक नव्हे. म्हणूनच आस्तिक्य भावना,चारित्र्य, आणि सदाचाराने वर्तणे यालाच धर्म म्हणतात.
आपल्यातील 'आस्तिक्य भावना नष्ट होण्याचं एक महत्वाचं कारण अस की, आपली वैज्ञानिक प्रगती. वैज्ञानिक प्रगतीने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल केलेला आढळतो. विज्ञानाने सूख चैन विलास आणला खरा पण त्यामुळे आपण आस्तिक्य भावनेपासून कोसो दूर गेलो आहोत किंवा जात आहोत. १८ व्या शतकामध्ये इंग्लंडने उद्योग क्रांती आदीमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे झाल काय परमेश्वरी शक्तिविषयी मात्र त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. वैज्ञानिक प्रयोगाने प्रत्यक्ष निष्कर्ष निघू लागले परमेश्वर शक्ति मात्र अनुभूतिजन्य असल्यामुळे त्या शक्तिचा निष्कर्ष भौतिक वस्तुने काढता येत नसल्यामुळे त्यांतून शंका निर्माण झाली. जी वस्तु भौतिक साधनानी सिद्ध करता येत नाही ती सत्य कशी? या कारणाने परमेश्वराविषयी संभ्रम निर्माण झाला याचा समाज जीवनावर फार मोठा परिणाम झाला. भोग प्रधान संस्कृती निर्माण झाली. समाजातील आस्तिक्य भावना कमी झाली. सहाजिकच त्याचा परिणाम चारित्र्यावर झाला. भोगप्रधान संस्कृतीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला हे पुढील गोष्टीवरून सहज लक्षात येईल.
एका मन्दिराच्या दरवाजाजवळ एक अपंग वृद्ध मनुष्य कुबड्या टेकवून कसली तरी परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होता. तो इतका दंग झाला होता की त्याच्याजवळ कोण आले, हे देखिल त्याला समजले नाही. त्या ठिकाणी चार तरूण आले, त्यांनी ते दृष्य पाहिले, तो अतिशय तल्लीन झाल्याचे पाहून त्यांनी विचारले ‘‘काय म्हातारे बाबा या वयात परमेश्वराजवळ काय मागता?’’ त्याने मोठे सुन्दर उत्तर दिले ‘‘मी जसा अपघातात सापडून अपंग झालो तसं कुण्या तरुणाला अपंग करू नकोस.’’
आजच्या समाजाची ही स्थिती झाली आहे. कोणी परमेश्वराजवळ निष्काम भावनेने भक्ति जरी करीत असेल तरी लोकांना वाटतं हा परमेश्वराजवळ काहीतरी मागतच असावा. हाच तो भोग प्रधान संस्कृतीचा समाज जीवनावर झालेला परिणाम. यामुळे धर्माचं एक वैशिष्ट्यपूर्ण अंग निष्काम भक्ति ती आम्ही विसरलो. आपल्या पुर्वजांना सत्य गवसलं होतं, आपणास गवसलेल्या सत्याचा साक्षात्कार व जीवनध्येय लोकांना समजावे ही बुद्धी होती. तत्वज्ञानाने साक्षात्कारी स्वरूपाच्या ज्ञानाच्या आस्तिक्य भावनेमध्ये जीवन चांगल्या प्रकारे जगावं या एकमेव हेतूने ते झपाटले होते. त्यातून गुरु-धर्म निर्माण झाले. त्यांना समाजाला शिक्षण द्यायचं होतं. आपली भावना आस्तिक्यवादी नसून त्याउलट स्वार्थासाठी आपले हात बरबटतात. त्यामुळे जीवनात वाईट घडते. दोष निर्माण होतात. बिघाड निर्माण होतो. तेव्हा कुठे आपण परमेश्वराकडे - आस्तिस्य भावनेकडे वळतो. आपल्यामध्ये आस्तिक्य भावना उशीरा निर्माण होते. त्यामुळे जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते.
धर्माचं एक महत्वाचं अंग म्हणजे संस्कृती होय. संस्कृतीची व्याख्या करतांना पं. महादेवशास्त्री म्हणतात की, निसर्ग म्हणजे प्रकृती. ती मध्ये विकृती निर्माण होऊ नये म्हणून जे प्रयत्न करावे लागतात त्यालाच संस्कृती असं म्हणतात. धर्माचा आणि संस्कृतीचा घनिष्ट संबंध आहे. संस्कृती, धर्म आणि आस्तिक्य भावनांचे प्रतिनिधित्व करणारी मन्दिरे आणि गरुकुल आश्रमासारख्या संस्थाच दिवसेंदिवस लोप होत आहेत त्यामुळे आपणास संस्कृतीचा ऱ्हास होतांना दिसतो.
संस्कृतीचे दोन अंग आहेत. एक भौतिक तर दुसरे अध्यात्मिक.
भौतिक :- भौतिक सुधारणा म्हणजेच आजची वैज्ञानिक प्रगति. उदा. माईक,
पंखा, टीव्ही मोबाइल
अध्यात्मिक :- मुख्य विचार संस्कार : भौतिक उन्नती बरोबर आपली अध्यात्मिक उन्नती आपण केली नाही तर आपण प्रवाह पतीत झाल्याशिवाय राहणार नाही. एकिकडे भौतिक उन्नती झपाट्याने होतांना दिसते, तर दुसरीकडे ज्ञानमंदीर व गुरुकुल आश्रम लयाला जात असल्याचं दृश्य दिसत आहे. त्यामुळे अध्यात्मिक पिछेहाट होत आहे. माणसावर अध्यात्मिक संस्कार मंदिर किंवा आश्रमच करू शकतात. एक जुनी गोष्ट आहे.
प्राचीन काळी आश्रम पद्धती होती. त्यावेळी शाळा, कॉलेजे नव्हती. एका गुरूकडे विद्यार्जन करून पाच शिष्य घरी जाण्यासाठी निघाले. ते गुरु जवळ जाऊन गुरूला म्हणाले, "गुरुजी आम्हाला सर्व विद्यांमध्ये पारंगत केलं. संपूर्ण तत्वज्ञान शिकविलं, तेव्हा आम्हाला शेवटचा उपदेश करा आणि घरी जाण्यासाठी आज्ञा द्या.' त्यावर गुरुवर्य म्हणाले, 'मुलांनो तुम्ही सर्व अभ्यास केला खरा परंतु तुमच्या ज्ञानाची मी आतापर्यंत परीक्षा घेतली नाही. तेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे परीक्षा द्या. एक प्रश्न सर्वांना विचारतो तो असा, 'रात्र संपून पहाट झाली हे तुम्ही कसे ओळखाल?' त्यावर पहिला म्हणाला, गुरूजी ज्यावेळी पूर्व दिशा लाल होईल त्यावेळी पहाट झाली असे मी समजेन' दुसरा म्हणाला, गुरुजी ज्यावेळी मंदिरातील घण्टा वाजेल त्यावेळी पहाट झाली असं मी समजेन. तिसरा म्हणाला, गुरूजी ज्यावेळी गावातील स्त्रीया पाणी भरण्यासाठी विहिरीवर येतील त्यावेळी पहाट झाली अस मी समजेन. चौथा म्हणाला, गुरुजी 'ज्यावेळी पक्षी किलबील करू लागतील त्यावेळी पहाट झाली अस मी समजेन.' पाचवा म्हणाला, 'गुरुजी येथून गेल्या नंतर जो जो मनुष्य मला भावाप्रमाणे दिसेल, त्यावेळी रात्र संपून पहाट झाली असं मी समजेन.'
प्रश्नोत्तराच्या दृष्टीकोनातून विचार केला तर कदाचित पहिल्या चार शिष्यानांच जास्त मार्क मिळतील. पाचव्याला मिळणार नाहीत. कारण पहिले चारी दृश्य अंग आहेत. ५ वे धर्माचे अदृश्य अंग आहे. आध्यात्मिक अंग हे केव्हाही अदृश्यच असतं. पृथ्वीच्या अंगात अंधार भरलेला असतो. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजेच आध्यात्माचा स्वीकार होय. भौतिक संस्कृतीमध्ये आपणांस आनंद दिसतो, पण आमच्या अंत:करणातील तीव्र अंधार विज्ञानाच्या प्रकाशाने घालवता येणार नाही. जर आपणास स्व-स्वरूप समजून घ्यायचे असेल तर परमेश्वरी शक्तीला शरण गेल्याशिवाय शक्य नाही. जेथे धर्म तेथेच प्रकाश. आपण फक्त धर्माच्या एका अंगाचाच स्वीकार केला. विज्ञानवादी-भौतिकवादी दृष्टीकोन स्वीकारला म्हणून आपल्याला बाह्यतः आपला विजय वाटत असला तरी सत्यस्थिती मात्र यापेक्षा अगदीच भिन्न आहे. उलट आहे. अध्यात्माची कास धरत्याशिवाय आपण निश्चित या संसाररूपी शत्रुसमोर विजयी होऊ शकत नाही.
धर्मांच्या काही प्रमुख अंगांचा विचार करीत असतांना आणखी दोन अंगाचा या ठिकाणी विचार करायचा आहे. १. उर्ध्व परिमाण २. अधःपरिमाण
१) उर्ध्व परिमाण- वैयक्तिक विकास साध्य करीत असतांना कदाचित साक्षात्कार होईल प्रत्यंतर येईल. हे धर्माचं उर्ध्व परिमाण होय. त्यालाच आपण परमार्थ म्हणतो.
२) अधःपरिमाण- साक्षात परिमाण जे असतं तेच अधःपरिमाण होय. यालाच आपण व्यवहार म्हणतात. अनेक व्यक्ती मिळून समाज बनतो. समाजामध्ये जो आचार चालतो त्यालाच आपण व्यवहार म्हणतो समाजामध्ये आपला अनेक व्यक्तींशी संबंध येतो. त्या समाजामध्ये-व्यवहारामध्ये धर्माचं तत्त्वज्ञान गवसणं त्या प्रकाशामध्ये जीवन जगणं यालाच अधःपरिमाण असं म्हणता येईल. व्यक्ति व्यक्तिमध्ये असलेला संबंध महत्वाचा आहे.
उदा : १ ज्ञानी मनुष्य जर पापाचारी असेल तर समाजामध्ये त्याला कवडी किंमत राहत नाही, मनुष्य जरी ज्ञानी नसला पण शुद्धाचारी असेल तर समाज त्याचा उदो उदो करतो. त्याला महत्वाचं स्थान प्राप्त होतं.
धर्माची मुख्य लक्षणे- दया, क्षमा, शांती, सेवा, शुद्धाचरण ई. बाबींनी जीवन जगणं म्हणजे धर्म यक्त जीवन जगणं असं म्हणता येईल. या धर्म लक्षणांचा आजच्या जीवनामध्ये ऱ्हास होत आहे. धर्म लक्षणांच्या अभावामुळे आपण भौतिकतेकडे वळलो असं म्हणावं लागेल. आजची त्याची सेवा आदी सर्व धर्म लक्षणांच्या विरुद्ध दिसून येते.
उदा० : एका गावामध्ये एक साधु आला त्यांने धर्मावर प्रवचन केलं त्यास एक तरूण म्हणाला, तुम्ही ज्ञानसंपन्न आहात. मला जीवनाचा मार्ग सांगा. मला समाज सेवा करावीसी वाटते. आमच्या गावामध्ये बेरोजगारी, रस्ते दुरुस्ती, वाचनालय चालविणे आदी समाजकार्य करण्यासारखी आहेत. त्यावर साधु म्हणाला 'मी काही प्रश्न विचारतो त्याची योग्य उत्तर दे. साधु म्हणाला हे पहा मी तुला २ लाख रु. दिले तू काय करशील? तो म्हणाला १ लाख रु. मी स्वतः ठेवीन व एक लाख रु. चे सामाजिक कार्य करील. समज मी तुला दोन माड्या बांधून दिल्या तर तू काय करशील? तो म्हणाला १ मी ठेवीन व दुसरी बेघर वाचनालयाला देईन. समज मी तुला दोन गाई दिल्या तर तू त्या काय करशील? त्यावर तो म्हणाला एक मी स्वतः ठेवीन व दुसरी शेजाऱ्याला देईन. समज तुझ्याजवळ २ कोंबड्या आहेत त्या तू काय करशील? त्यानंतर तो काहीच नबोलता गप्प झाला साधु म्हणाला 'आता गप्प बसलास उत्तर देना त्यावर तो म्हणाला, महाराज माझ्याकडे तर दोनच कोंबड्या आहेत त्या कशा देऊ. दुसरा देतो त्यावेळी आपण घ्यायला तयार होतो. मात्र आपल्या जवळील दमडी खर्च करण्यास कोणी तयार नाही. दुसऱ्याने दिलेले अर्धे देण्यास तयार झाला. मात्र स्वत: जवळील अर्धे देखील देण्याची तयारी नाही. आजची समाज सेवा या थराला जाऊन पोहचली आहे. त्यामुळे समाज कल्याणासाठी देखील धर्माचा आश्रय घ्यावाच लागतो.
आस्तिक्य भावनेचा ऱ्हास झाल्यामुळेच आज आपणास धार्मिक चित्र जे पूर्वी होतं. ते दिसत नाही. समाज जरी भौतिक उन्नतीने समर्थ दिसत असला तरी तो खऱ्या अर्थाने उन्नतशील होऊ शकत नाही. आपण ज्यावेळी सर्व विकृतींवर मात करू त्यावेळीच धर्माचा जय झाला असे समजावे. म्हणूनच आज धर्मांचा जय दिसत नाही. आजच्या समाजाचा सर्वार्थाने ऱ्हास झाला आहे. प्रवाह पतित व भ्रष्ट झाला आहे. म्हणून मार्ग दिसत नाही. दीपस्तंभ दिसत नाही. जहाज प्रकाशामुळे योग्य जागी पोहचवतात, त्यांना रस्ता गवसतो. समाज जीवनामध्ये दीपस्तंभ धर्म आहे. परंतु जीवनामध्ये धर्म राहिला नाही. क्षणोक्षणी मोह होतो आहे.
मोहावर एक फार सुंदर दृष्टांत आहे.
एक न्यायाधीश होता. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, कायद्याचे कसोशीने पालन करणारा त्यामुळे त्याने आपल्या जीवनात अनेकांना फासावर लटकविले होते. त्याच्या दुर्दैवाने त्याच्यावर एकदा असा प्रसंग आला. एका खुनाच्या आरोपात त्याच्या पुढे त्याच्या मुलाला सबळ पुराव्यानिशी हजर करण्यात आले. न्याय दानाला ज्यावेळी सुरूवात झाली त्यावेळी मोहाने त्याची न्यायनिष्ठा डगमगली. फाशीच्या शिक्षेवर न्यायाधिशानी भाष्य करण्यास सुरूवात केली. तो म्हणाला, फाशी माणसुकीच्या विरुद्ध आहे. एखाद्या व्यक्तीने क्रोधापोटी जर गैरकृत्य केलं असेल, त्याला फाशीची शिक्षा देणं योग्य नाही. त्यामळे त्यास सुधारण्यास संधी मिळत नाही. असे नाना प्रकारचे युक्तीवाद निर्माण करू लागला. कर्तव्यनिष्ठेला डावलून न्यायधीशाला आपल्या मुलासंबंधी असा मोह निर्माण झाला. ज्यावेळी माणसाला मोह निर्माण होतो, त्यावेळी माणसाची बुद्धी काम करीत नाही. अर्जुनाला स्वकीयांना पाहून असाच मोह निर्माण झाला होता. आज समाज सर्व बाजूनी मोहग्रस्त झाला आहे. कुणाला पैशाचा, कुणाला सत्तेचा, कुणाला पदाचा मोह निर्माण होत आहे. त्याचे पर्यावसान हुंडा, बलात्कार, चोऱ्या, डाके आदिमध्ये झालं आहे. जर मोहाची चौकट फेकून द्यायची असेल तर आपल्यातील विकृती घालविली पाहिजे. आस्तिक्य भावना जागृत केल्याशिवाय मोह नष्ट होणार नाही. यासाठीच मठ, मंदिर, आश्रमाची स्थापना झाली आहे. तेथेच धार्मिक संस्कार होतात. तसे वातावरण निर्माण होते. म्हणूनच त्याची जीवनामध्ये खरी गरज आहे.
आपण जेव्हा धर्माला शरण जाऊ, धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू, आचरण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या ठिकाणी धर्माचा वास होईल, धर्माचा जय म्हणजेच पर्यायाने आपला विजय ठरलेलाच आहे. तेव्हाच जीवनाचं सार्थक साफल्य होणार! नाही तर आपण समाज जीवनामध्ये नेहमीच पराजयी होत राहू हे निश्चित.
आजच्या समाज जीवनातुन धर्म एकदम झपाट्याने लोप पावत आहे. याच प्रात्यक्षिक जर पाहायचं असेल तर खालील गोष्टीवरून सहज लक्षात येईल.
आपल्या सहा वर्षांच्या मुलाला त्याच्या वडीलाने शाळेत घातले. पहिल्या दिवशी काहीच न शिकविता एक गोष्ट सांगितली. गोष्टीचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की, आपण अपंग व्यक्तीवर दया करायला पाहिजे. मुलगा घरी आला. तेव्हा त्याच्या दरवाजाजवळ एक अपंग म्हातारा भीक मागत होता. त्याचे वडील त्याला 'पुढे हो' म्हणून मोठ्याने सांगत होते. मुलाला हा पहिला धक्का-
दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेत गेला त्याही दिवशी शिक्षकाने एक गोष्ट सांगितली व शेवटी भावार्थ सांगितला की, आपण परोपकार करायला पाहिजे. मुलगा घरी आला तेव्हा वडील तिजोरोत पैसे ठेवत होते. त्याचवेळी शेजारचे एक गृहस्थ म्हणाले, काहो? बँकेचा टाईम संपला आहे, मला थोड्या पैशाची गरज आहे. त्यावर वडील म्हणाले 'नाही मी आताच बँकेत पैसे टाकून आलो. थोडं लवकर आला असता तर मी पैसे दिले असते. मुलाला दुसरा धक्का -
तिसऱ्या दिवशी पण गोष्ट सांगून शिक्षकाने भावार्थ सांगितला की, परस्पर स्नेहाने वागायला पाहिजे. भांडणं वगैरे करू नयेत. मुलगा घरी आला तर आई वडील एकमेकाशी जोराने भांडत आहेत. मुलाला तिसरा धक्का. बाल मनाला शाळेतील सांगणं व घरातील आचार यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर दिसलं. मुलगा दुसरे दिवशी शाळेत गेलाच नाही. आई वडीलांनी खूप प्रयत्न केले. त्यावर तो म्हणाला, 'बाबा, गुरुजींना शिकविताच येत नाही.' धर्म आणि जीवन, व्यवहार, आचार, यांची अशी फारकत आज सर्वदूर झालेली दिसते.
म्हणून सांगण्याचे तात्पर्य हे की होईल तेवढा धर्माचरणाकडेच आपला कल असावा.
महाभारतात एक श्लोक आहे युधिष्ठिराचा आळस काढण्याकरीता श्रीकृष्णभगवंत म्हणतात यतः कृष्णस्ततो धर्मो, यतो धर्मस्ततो जयः। विजय हा नेहमी धर्माच्या बाजूनेच असतो आणि जिथे श्रीकृष्ण भगवंत आहेत, किंवा त्यांच्या आज्ञेनुरूप वचन पालन आहे तिथे निश्चित विजय असतोच.