कोणत्या भावनेने परमेश्वराची भक्ती करावी?
नेमाम्बोदरसंभूतं कानवादनन्तनायकात् ।
प्रभुं नमामि गोविदं जीवा विद्याविभंजकम् ।।
सोपा आहे माझा । स्वामी जगन्नाथ । आपूलेचि चित्त । शुद्ध हवे ।।
दान द्यावया । बैसला तो दानी । परि आर्तवंत । व्हावे जीवे ।।
वज्रपंजरु तो । असे सकळाशी । शरणरिगे जो तया जीवा ।।
असे तो कृपाळु कृपावत माझा कृपेशी भाजन होईल त्या ।।
भावार्थ :- परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करणे अत्यंत सोपे आहे. वेदाभ्यासाने न कळणारा, दर्शनशास्त्रांना अनाकलनीय, आगमादी ग्रंथांना अवर्णनीय. इन्द्रियांना अगोचर असलेला परमेश्वर चित शुद्ध असल्यास सहज प्राप्य आहे, भगवत प्राप्ती विषयी गीतेत म्हटले आहे
"मया प्रसन्नेन तवार्जुनेदं । रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं । यन्मेत्वदन्येन न दृष्टपूर्वम् ।।
"‘‘माझ्या प्रसन्नतेने, योगबलाने, दाखविलेलं हे माझं अत्यंत तेजस्वी, अमर्याद असलेलं विश्वरूप फक्त तुलाच दाखवित आहे. यापूर्वी हे कुणालाही दाखविले नाही.’’ भगवंत म्हणतात ‘‘हा भाग्ययोग फक्त तुझ्यासाठीच आहे.’’
एखादे कलेक्टर साहेब प्रसन्न होऊन जर म्हणाले, "गणपतराव फक्त तुमच्याबद्दलच मला आपुलकी वाटते, तर गणपतराव भेटेल त्या माणसाला सांगत सूटतात, "कलेक्टर साहेबांची आपल्यावर फार मेहरबानी हो, मला फार किंमत देतात ते." गणपतरावांची छाती दोन इंच फुगते तसं मात्र अर्जुनाला झालं नव्हतं. अर्जुनाची बुद्धि स्थिर झाली होती. प्रचंड बुद्धिमनेच्या अर्जुनाने ओळखलं होतं, केवळ विश्वरूप पहाणे म्हणजे मुक्ती नाही, परमेश्वराच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी दाखविलेला तो एक नमुना आहे. आपल्यापूर्वी कुणाला दाखविले नाही म्हणजे आपल्या सारखा हट्टी आतापर्यंत भगवंताला भेटला नाही एवढेच. म्हणून अर्जुन आपल्या सारखा गर्वाने न फुगता तो अधिक लहान झाला. हजारो सूर्यतेजापेक्षा तेजपुंज असलेलं विश्वरूप अर्जुन चर्मचक्षुंनी पाहू शकणार नाही म्हणून भगवंताने अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आणि ते खरेही आहे. आपल्या चर्मचक्षुंनी चक्षुनिकटचे किंवा अतिदुरचे पदार्थ पाहू शकत नाही. सूक्ष्मजंतु पाहू शकत नाही. श्वासोच्छावास करतांना नाकातून ये जा करणारे सूक्ष्म जंतू दिसत नाही, मग ह्या चर्मचक्षुंनी विश्वरूप कसे दिसणार, अहो ! ह्या यंत्रयुगातील दूषित वातावरणामुळे सुक्ष्मजंतु तर सोडाच पण माणसाला माणूस पण दिसत नाही, डॉक्टर फार तर चष्मा देईल. पण त्यामुळे थोडेच विश्वरूप दिसणार आहे. याचा अर्थ आपल्या भाग्यात दिव्य व विश्वरूप दोन्हीचाही योग नाही. आल्या जन्मात आपण एकदाही विश्वरूप पाहू शकलो नाही. म्हणून खंत बाळगण्याचे कारण नाही. विश्वरूपाशिवाय आपलं काहीच नडणार नाही. ऑर्मस्ट्रांग चंद्रावर गेला, आपला चंद्रावर जाण्याचा योग नाही, आपलं आयुष्य व्यर्थ गेलं असं समजून झुरण्यात काही अर्थ आहे काय? आपले जीवन सुखी करण्यासाठी जसे चंद्रावर जाणे आवश्यक नाही तसेच मोक्षप्राप्तीसाठी विश्वरूप पहाणे आवश्यक नाही. अर्जुनापूर्वी ज्या भक्तांचा उद्धार झाला त्यांनी विश्वरूपच पाहिले होते काय? प्रश्न केवळ विश्वरूपाचाच नाही. भक्ती शिवाय परमेश्वराचे स्वरूप कुठल्याच साधनाने कळत नाही हा मुद्दा आहे.
"नाहंवेदैर्नतपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्ट्वानासि मां यथा" ।।
भगवंत म्हणतात, मला जाणण्यासाठी वेद असमर्थ आहेत. खरतर तपश्चर्येने, दानाने, यज्ञाने, म्हणजे कुठल्याही साधनाने माझे दर्शन शक्य नाही. अंधारातील वस्तू सिद्ध करण्यासाठी आपण बॅटरीचा उपयोग करतो. पण अंधारात सूर्याला पाहाण्यासाठी आमच्या जवळ आहे का काही साधन ! सुर्याला कुठल्याच साधनाने आपण प्रकाशित करू शकत नाही, तो स्वत: होऊन उदय पावेल तरच तो दिसतो कारण तो परकाशित नाही. तो स्वयं प्रकाशित आहे, आणि ता सूर्य ही ज्याच्या स्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही असा तो परमेश्वर आहे. म्हणूनच अर्जुन म्हणतो
नहि ते भगवन्व्यक्ति विदुर्देवा न दानवाः ।
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरूषोत्तम ।।
हे परमेश्वरा ! देवदानवाला ओळखल्या न जाणारे तुझ स्वरूप तू स्वतः दाखविशी तर दिसेल.
तुझे सर्व रंगी रूप उदारा कळले सांग कुणाला ।
खेळ तुझा न्यारा ॥धृ॥
पूजावसरकार श्रीचक्रपाणिव्यास म्हणतात -
जो वेदतर्क चतुरागम योग शास्त्रा । षड्दर्शना गिवसीता न कळे परात्मा ।।
तो केवि मी मतिलवाल्पविवेक अंशे । वर्णीन सर्व विषया कुळ कर्मसक्तू ।।
वेद म्हणजे अनेक ऋषींनी मांडलेल्या विचारांचा संग्रह आहे. वेदातील सिद्धांताबद्दल ऋषींचे मतैक्य नाही, त्यामुळे परस्पर विरोधीविचार वेदात आढळून येतात, ज्या ठिकाणी सिद्वांताबद्दल अनेक मते निर्माण झालेली आहेत. त्या मताचे ऋषी सर्वज्ञ थोडेच असणार, ऋषी झाला तरी तो जीवच आणि जीव हा अल्पज्ञ आहे. तो विद्वान झाला तरी सामान्य माणसापेक्षा ज्ञानी, पण परमेश्वरापेक्षा अल्पज्ञच. जीव हा अल्पज्ञ तर परमेश्वर सर्वज्ञ, दोघांमध्ये फार मोठं अंतर आहे. परमेश्वर सर्वदेशी तर जीव एकदेशी आहे, तो समर्थ तर जीव असमर्थ शोच्य, निर्बळ आहे, ता आनंदघन तर जीव निरानंदी आहे. म्हणूनच अल्पज्ञ असलेला हा जीव, एकदेशी असलेला हा जीव सर्वदेशी त्या परमेश्वराचे स्वरूप ओळखू शकेल काय?
भगवंत म्हणतात "जीवच काय देवताही मला ओळखू शकत नाही "
" नमे विदुः सुरगणा: प्रभवं न महर्षयः । अ
हमादिहि देवाना महर्षिणां च सर्वशः ।।
या श्लोकात देवता सुद्धा मला जाणू शकत नाहीत. असेच म्हटले आहे. दर्शनग्रंथ सुद्धा जीवकृतच आहेत. सहा शास्त्राचे सहा विचार आहेत, एकाचे विचार दुसऱ्याला मान्य नाही असे परस्पराचे खंडण करणारे ही शास्त्रे आहेत,
स्वामींनी एक दृष्टांत दिलेला आहे. --
"एका गावात एक हत्ती आला. तो हत्ती पाहाण्यासाठी सहा आंधळे गेले सर्वांनीच त्या हत्तीला स्पर्श केला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. एकाच्या हाताला हत्तीचा पाय लागला तो म्हणाला "अरे मित्रांनो! हत्ती खांबासारखा आहे बरं का. दुसऱ्याच्या हाताला हत्तीचा कान लागला तो म्हणाला "हा काही तरी खोटे बोलतो नाही का? अरे हत्ती सूपासारखा आहे, तिसऱ्याच्या हाताला हत्तीची सोंड लागली तो दोघांवर ही रागावला "अरे हत्ती मुसळासारखा आहे." चवथ्याच्या हाताला हतीचे शेपूट लागले तो म्हणाला “अरे हत्ती झाडु सारखा आहे" अशा प्रकारे त्या सहा आंधळ्यांमध्ये वाद निर्माण झाला शेवटी ते भांडणावर आले तेवढ्यात एक डोळस माणूस तेथे आला तो म्हणाला 'अरे! आंधळ्यांनो भांडता का? तुमचे सगळ्यांचेच खरे आहे कारण ज्याच्या हाताला जो अवयव लागला त्या अवयवाचं वर्णन तो करतो आहे. तसेच सगळ्यांचंच खोट आहे. कारण तुम्हाला केवळ सर्शजन्यच ज्ञान आहे. त्यामुळे दुसरे अवयव तुम्हाला माहीत नाही. प्रत्येक जण आपल्या हातातील अवयवालाच हत्ती समजतो वास्तविक सर्वांच्या हातातील अवयव एकाच हत्तीचे आहेत. सर्व अवयव मिळून एक हत्ती आहे ''त्याप्रमाणे सहाही दर्शनकार आपापल्या विषयाचे समर्थन करतात. प्रत्येक दर्शनकार वेगवेगळ्या देवतांची वर्णने करीत असतात. ते परमेश्वराच्याच शक्तींचे वर्णन करीत आहेत. आंधळे जसे अवयवाला हत्ती समजले, तसे दर्शनकार देवतेला परमेश्वर समजले जयकर्ण बुवा म्हणतात -
जन्मता अंध जे हत्ती पाहु गेले । चाफोनी पाहीला कान एक ।।
दुज्या अंधाने ; चाफीले ते पाय । म्हणे हत्ती आहे खांबापरी ॥
कोणी पाही पोट ; कोणी पाही ओठ । कोणी पाही पाठ ; तोचि हत्ती ।।
तरी अज्ञानाचा र् एसना फरक । सूज्ञ धरा तर्क ; दास म्हणे ।।
म्हणूनच पूजावसरकार श्रीचक्रपाणिव्यासांनी म्हटलेले आहे -
जो वेदतर्क चतुरागमयोगशास्त्रा । षड्दर्शना गिवसीता न परात्मा ।।
वेदांना, आगमग्रंथांना व शास्त्रांनाही न सापडणारी ती वस्तु आहे, कारण ही सगळी शास्त्रे माणसाने निर्माण केलेली आहेत. माणूस हा चुकीचा पुतळा समजला गेला आहे तो पूर्ण शोध कधीच लावू शकत नाही. श्रीभास्करभट्ट कवीश्वरव्यास म्हणतात-
"तु नित्य स्वयं प्रकाशक : तु ते बोलावया देवा कैसा पैसू :
तुझीया माया शक्तीचा डोळे लासू : लागला ब्रम्हादिका ।।
प्रमाणांचा बंबाळ दीवा : न देखे वेदांचा मांदी मेळावा :
आगमा नाही रिगावा : तुझा स्वरूपी ।।
तुझा करावेया प्रकाशु : योग शास्त्रा नाही सौरसू :
सांख्या लागे मोह पाश : तुते निरूपिता ।।
म्हणूनी साधन नाही ऐसे : जेणे तुझे ज्ञानरत्न दिसे :
तु जाण विशी कृपावशे : तैचि जाणिजे ।।
कवीश्वर व्यास म्हणतात, "प्रमाणांचा बंबाळ दीवा" लावूनही परमेश्वर दिसत नाही. वस्तुचे अस्तित्व सिद्ध करण्यामाठी शास्त्रकारांनी सहाप्रमाणे सांगितलेली आहेत, पण ती प्रमाणेही ईश्वरसिद्धीसाठी थिटी पडतात.
हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या माणसाच्या वाक्याला 'शब्द' म्हणतात व सत्य बोलणाऱ्या माणसाला 'आप्त' म्हणतात. म्हणजे आपल्या कल्याणाचा खरा मार्ग सांगणाऱ्या लोकांचे जे बोलणं आहे, त्याला शब्दप्रमाण म्हणतात. पण प्रश्न हा आहे की, आपलं हित करणारा माणूस त्याची जेवढी पात्रता आहे तेवढेच सांगू शकेल. चित्रपट पाहात असतांना आपल्या घरातील वस्तु आपण पाहू शकत नाही. एकाच वेळेला दोन ठिकाणी आपण उपस्थित राहू शकत नाही. म्हणून हा जीव कुठल्याही विषयाची पूर्ण माहिती मिळवू शकत नाही मास्तर मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. डॉक्टर मरेपर्यंत पेशन्टच असतो. मरेपर्यंत अभ्यास केला तरी अभ्यास अपूर्णच रहातो. अल्पज्ञ हा जीव सर्व प्रश्न विचारू शकत नाही व सर्व प्रश्नांची उत्तरेही देऊ शकत नाही. म्हणूनच कितीही विद्वान असलेला आप्त त्याची खोटं बोलण्याची जरी प्रवृत्ती नसली तरी तो पूर्ण सत्य सांगू शकत नसल्यामुळे शब्दप्रमाण ईश्वरसिद्धी करू शकत नाही.
याप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणांनीही परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही, " इन्द्रियार्थ संनिकर्षजन्यं ज्ञानं प्रत्यक्षं" इन्द्रिय आणि पदार्थ यांच्या संयोगाने जे ज्ञान होते त्याला 'प्रत्यक्षप्रमाण' म्हणतात. ज्या इन्द्रियांचा जो विषय आहे. त्याचे ते प्रत्यक्ष आहे. श्रवण करणे हा कर्ण इन्द्रियांचा विषय आहे म्हणून ते कर्ण प्रत्यक्ष, डोळ्यांनी एक म्हटल्यास जमणार नाही. एखाद्या पदार्थाची चवी आपण डोळे किंवा कानांनी सिद्ध करू शकत नाही. तो जिव्हा इन्द्रियांचाच विषय आहे. हवा थंडी आहे की, गरम, पदार्थ कडक आहे की नरम, हा त्वचा इन्द्रियाचा विषय आहे. तात्पर्य ज्या इन्द्रियांनी ज्या विषयांचे अस्तित्व उमजते त्याला प्रत्यक्षप्रमाण म्हणायचं. आता प्रश्न हा आहे की हे इन्द्रिय तरी आपापला विषय पूर्णपणे सिद्ध करू शकतात काय की यांच्या जाणण्याला काही मर्यादा आहेत.
उदा:० दूधवाल्याने दुधात पाणी टाकले की काय हे डोळ्यांना चष्मा लावूनही आपण सांगू शकत नाही. कानाने ज्याचा आवाज ऐकू शकत नाही, हवेतील परमाणू आपल्या शरीराला स्पर्श करून जातात ते आपल्या स्पर्श इंन्द्रियांना कळत नाही. जर भौतिक पदार्थ करू शकत नाही तर अतीन्द्रिये वस्तूची सिद्धी प्रमाणाने होऊ शकेल काय? अनुमानादि प्रमाणे सुद्धा लुळीच पडतात कारण या सगळ्या प्रमाणांना इन्द्रियांचेच माध्यम आहे, पाहून स्पर्शामुळे किंवा ऐकून माणूस अनुमान करीत असतो, अतः ही सगळे प्रमाण भगवंताला पाहू शकत नाहीत. म्हणूनच भास्करभट्ट म्हणतात की या प्रमाणांच्या दिव्याने प्रकाशणारी ती वस्तु आहे, म्हणूनच शेवटी निर्वाळा दिला ‘तु जाणविशी कृपावशे तैचि जाणिजे’ भगवन्त अर्जुनाला म्हणतात-
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
अर्जुना ! वेद हे त्रिगुणात्मक आहेत, तर तू गुणातीत हो, तुला मी हवा आहे ना? तर मी सांगतो त्या प्रमाणे वाग, वेदाभ्यासाने मी तुला मिळणार नाही, संत ज्ञानेश्वर म्हणतात -
अर्जुना जऱ्ही वेदविद जाहाला । माते नेणता वाया गेला ।
कणु सांडुनी उफनला । कोंडा जैसा ।।
म्हणुनी मज एकेविन । हे त्रयी धर्म अकारण ।
आता माते जाणूनी काही नेन । तु सुखीया होसी ।।
भगवंत म्हणतात "अर्जुना ! मला जाणण्याची तुझी ईच्छा आहे ना? तर मग जीव देवता शास्त्रांच्या नादी लागू नको ‘तमेव शरणं गच्छ' जगत्पती परमेश्वरालाच शरण जा. भक्ताला परमेश्वराच्या शोधात पडण्याची आवश्यकता नाही. अनन्यभावाने त्याचे स्मरण करा. तोच तुमच्या शोधात असतो.
त्याचा शोध करण्यासाठी आपुली बद्धि तरी केवढी आहे. अत्यंत अल्प म्हणूनच पूजावसरकार श्रीचक्रपाणिव्यासांनी म्हटले आहे
तो केवी मी मतिलवाल्प विवेक अंशे । वर्णीन सर्व विषया कूळकर्मसक्तु ।
एका ब्राम्हणाला चार मुलं होती, त्याने आपल्या चारही मुलांना वेदांचा अभ्यास करण्यासाठी एका आश्रमात पाठविले होते, वेदाचा अभ्यास पूर्ण करून घेवून ती चारही मुलं आई वडिलांच्या भेटीसाठी घरी आली, भटजी बुवांना फार आनंद झाला, कारण पंचवीस वर्षानंतर ही भेट झाली होती. भट जी बुवांनी मुलांची परीक्षा घेण्याचे ठरविले चारही मुलांना समोर बसविले, मोठ्या मुलाला प्रश्न केला "तू वेदांचा पूर्ण अभ्यास म्हणाला "होय" तुला परमेश्वर समजला तो म्हणाला ‘‘हो’’,
भटजी बुवा म्हणाले "सांग तो कसा आहे?" ; तो म्हणाला "परमेश्वर ब्रम्हांडनायक आहे, सर्वकर्ता आहे," त्याचे बोलणे बंद करून क्रमांक दोनच्या मुलाला विचारले तू सांग परमेश्वर कसा आहे? तो म्हणाला, "परमेश्वर दयाळु आहे मयाळू आहे" त्याचेही बोलणे बंद करून क्रमांक तीनच्या मुलाला विचारले 'तो सांगू लागला परमेश्वर सर्वकर्ता, सर्वसाक्षी, व्यापक, सर्वात्मक, भटजीबुवांनी त्यालाही गप्प केले चवथ्या मुलाला विचारले तु वेदांचा पूर्ण अभ्यास केला काय ? तो म्हणाला "पूर्ण अभ्यास केला आहे;" "तुला परमेश्वर समजला तो म्हणाला" पूर्णपणे मी परमेश्वराला ओळखले आहे," भटजी बबा म्हणाले "सांग तो कसा आहे," त्या मुलाने मौन धरले, "अरे! हा गप्प का बसला सांग ना?" मुलाने एक शब्दही तोंडातुन काढला नाही, भटजी बुवांनी त्या लहान्या मुलाला कडकडुन आलिंगन दिले व म्हणाले खरा परमेश्वर तुलाच समजला आहे, त्याचे वर्णन आपण करू शकत नाही, तो अनिर्वचनीय आहे,
नका विचारू देव कसा । भाव जयाचा असे जसा ।।
निर्गुण कुणी म्हणती देवाला ।
सगुण कुणी म्हणती त्याला ।
विश्वरूप त्या परमेश्वराचे चराचरावर असे ठसा ।।१।।
रंग फुलांचा दिसे लोचना ।
वृत्ती तयाची तोषवी मना ।
दिसेल काहो सांगा कुणाला गंध फुलांचा मोहकसा ॥२॥
कुणी त्याला निर्गुण म्हणतात. कुणी सगुण म्हणतात, अनेक पंथांनी अनेक कल्पना त्याच्याबद्दल केलेल्या आहेत, वास्तविक त्याचे वर्णन करणे म्हणजे त्याला कलंक लावणे होये, त्याला देण्यासारखी उपमा तरी या जगात आहे काय? वर्णनापाठी आपल्या जवळ शब्द नाहीत, एखाद्या प्रतिष्ठितांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याचा प्रसंग आपल्यावर येतो, तेव्हा त्यांची प्रस्तुती करता करता नाकीनऊ येतात, खुप बोलनही, सहकाऱ्यांना वाटतं माझ्याबद्दल फारच थोडे बोलले, माणसाचे वर्णन आपण बरोबर करूच शकत नाही, मग तो परमेश्वर तर निरूपम आहे, त्याच्या एका गुणाचं तरी वर्णन आपण करू शकतो काय आणि जागतिक उपमा त्याला लावणे म्हणजे. सूर्याला बॅटरीची उपमा दिल्यासारखे किंवा हिमालयाला कुतुबमिनारची उपमा दिल्यासारखे होईल, म्हणून मौन धारण करून त्याचं स्मरण करणेच श्रेयस्कर आहे, पूजावसरकार श्रीचक्रपाणिव्यास म्हणतात -
जो सर्व शक्तिनिधी केवळ सौख्य दाता । स्वानंद बोधरत तो भवपाश हंता ॥
चित ब्रम्हमुख्यविबुधा न कळे समस्ता । स्वच्छंद लीळ सकृपा प्रगट स्वभक्ता ।।
ब्रम्हादिकांना अवर्णनीय, अगम्य असलेला परमेश्वर स्वेच्छेने जीव उद्धारासाठी अवतार घेतो, धर्माची स्थापना करून ज्ञान सांगतो. ते ज्ञान ज्या शास्त्रात असतं, त्याच शास्त्राने आपल्याला परमेश्वर समजतो, कारण ते शास्त्र सर्वज्ञाचं असतं, त्यात संशय नसतोच,
त्या परमेश्वराने सांगितलेले जे ज्ञान आहे, जी ब्रम्हविद्या आहे त्या द्वारेच आपण त्याला जाणू शकतो आणि त्या ज्ञानाचरणानेच त्याची प्राप्ती मिळवू शकतो, सर्व संशय जेथे नष्ट होतात, ते ब्रम्हविद्याशास्त्र आहे, वेदादी शास्त्रांचा पूर्ण अभ्यास असलेले बादरायण सूत्रकर्ते, अठरापुराणकर्ते, 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् " असा ज्यांचा लौकिक आहे ते ऋषी व्यास सकळ शास्त्र अभ्यासून निष्कर्ष काढतात, -
एक शास्त्र देवकीपुत्र गीतं । एको देवो देवकीपुत्र एव ।।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
शास्त्र पुष्कळं आहेत पण आत्मकल्याणाचा मार्ग सांगणारे फक्त गीता शास्त्रच आहे, गीता पण अनेक आहेत, पण देवकीच्या पुत्राने गोपालकृष्णाने सांगितलेली गीताच एकमेव परमेश्वराचे शास्त्र आहे, आणि त्या गोपालकृष्णाची सेवा व नामस्मरणाने तो सहज प्राप्त होऊ शकतो, भगवंत गीतेत म्हणतात,
अनन्यचेता : सततं यो मां स्मरति नित्यश: ।
तस्याहं सुलभ : पार्थ नित्ययुक्तस्य योगिन:।।
भगवंत म्हणतात - "सतत अनन्यभावाने स्मरण करणाऱ्या भक्ताला मी सहज मिळतो, आडमार्गाने शोधणाऱ्याला मात्र भगवंत अत्यंत कठीण आहे. शुद्ध अंतःकरणाने भक्ती करणाऱ्या भक्ताला अत्यंत सुलभ आहे. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले आहे,
सोपा आहे माझा । स्वामी जगन्नाथ । आपुलेची चित्त । शुद्ध हवे ।।
अहो! चित्रकाराला चित्र काढण्यासाठी सप्तरंगी कागद दिला तर त्या कागदावर चित्र काढता येणार नाही, चित्र काढण्यासाठी त्याला कोरा कागदच हवा, आपलं हृदय शुद्ध असेल तरच परमेश्वराचे ज्ञान आपल्या हृदयात प्रतिबिंबीत होईल, गढुळ हृदयात परमेश्वराचे ज्ञान टिकूच शकत नाही, ज्ञानाचे दातृत्व परमेश्वर करतो पण आर्तवंताची गरज आहे -
दान द्यावया बैसला तो दानी परि आर्तवंत व्हावे जावे. भगवंताबद्दल जर अशी तळमळ असेल तर भगवताने अशा भक्ताला आश्वासन दिलेले आहे.
भक्त्यात्वनन्ययाशक्य अहमेवं विधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ।।
फक्त भक्तीची गरज आहे, त्या भक्तीच मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते. इन्द्रियांचा स्वैराचार थांबतो, म्हणजेच इन्द्रियांना भगवंताच्या सेवेत लावणे आवश्यक आहे. वाणीने भगवंताचे गुणवर्णन करावे, कानांनी त्याचे पावन चरित्र ऐकावे हाताने भगवताची सेवा करावी, पायाने तीर्थाटन करावे व मनाने प्रभूचे चिंतन करावे, पांडव गीताकार म्हणतात -
कृष्णत्वदीय पदपंकज पंजरान्ते । अद्यैव मे विशतु मानस राजहंस ।।
प्राणःप्रयाण समये कफवातपित्तैः । कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते ।।
कवी श्रीकृष्णभगवंताला विनंतोती करतो आहे की, हा माझा मानसरूपी जो राजहंस आहे, त्याला आताच तुझ्या चरणरूपी पिंजऱ्यात बंद करून टाक, कारण अंतःसमयी शारीरिक वेदना असह्य होतील तेव्हा तुझे स्मरण माझ्याकडून होईल की नाही शंकाच आहे ; तात्पर्य हे मनादी इन्द्रिये भगवंताच्या सांभाळी घातले तर ते आपल्याला उपद्रव देणार नाहीत, माणुस आयुष्यभर कष्ट करता ते कूणासाठी? तर इन्द्रियासाठी, त्यांची लालसा पूर्ण करण्यासाठी, आणि जेव्हा आपण आत्मकल्याणासाठी काही उपाय करतो, तेव्हा इन्द्रिये साधकाला त्रास देतात. त्यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर ते साधकाला कुठल्या थराला नेतील सांगता येत नाही. भानु कवी म्हणतात -
सोडी सोडी मनाची आशा । देहाचा नाही भरवसा ।।५।।
सीतेसाठीच तो रावण । विषयाची बुद्धि कल्पुन ।
अपघाती गेला तो कसा ॥१॥
इन्द्रियांच्या ताब्यात गेलेल्या माणसाची काय अवस्था होते याचे कवीने उत्कृष्ट उदाहरण दिलेलं आहे. रावण हा अत्यंत ऐश्वर्यसंपन्न असा चक्रवर्ती राजा होता. त्याच्या विरोधात ब्र शब्द काढण्याची माणसाची काय पण देवतांची सुद्धा हिमत नव्हती, मोर्चा हा शब्द त्याच्या राज्यात नव्हताच, आपल्या घराला पायऱ्या करण्यासाठी आपल्याला दगडं लवकर मिळत नाहीत, पण रावणाने नवग्रहाच्या पायऱ्या केल्याचा उल्लेख आहे. नळाला पाणी कमी येते अशी ओरड शहरवासियाची नेहमीच असते, पण रावणाने मात्र सडा टाकण्याचे काम वरूणाकडे दिलं होत, पंचमहाभूतांना, सर्व देवतांना रावणाने काम वाटून दिले होते. फार काय पचांग सांगण्याचे काम ब्रह्मदेवाकडे सोपविले हाते, रावणाच्या ऑफीसमध्ये तिथी, वार, नक्षत्र सांगणारा ब्रह्मदेव रावणाची भाग्य रेषा तयार करताना पंचांग सांगण्याची स्वतःची ड्युटी कशी लिहील? विचार करण्यासारखीच बाब आहे. ते काहीही असो देवाकडे काम नेमून देण्याच रावणाचं कौशल्य वाखाणण्यासारखं आहे. ते सगळं अतिरंजीत आहे असं जरी गृहीत धरलं तरीही तो खुप मोठा वैभवशाली राजा होता हे मात्र नाकारता येत नाही. पण देवदानवांवर राज्य करणाऱ्या रावणावर कुणाचं राज्य होतं काय? सगळ्यांना आदेशात ठेवणारा रावण कुणाच्या आदेशाने वागत होता काय? ते आपल्याला सांगता येणार नाही. भगवंत म्हणतात -
"ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषुपजायते ।
सङ्गात् संजायते काम: कामाक्रोधो भिजायते ।।
क्रोधात् भवति संमोहः संमोहात् स्मृति विभ्रमः ।
स्मृतिभ्रंशात्बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति ।।
उपभोगादी पदार्थाचे संयोगाने ‘काम’ विकार निर्माण होतो. कार्यपूर्ती न झाल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे मोह निर्माण होतो. मोहामुळे आपण कुठल्या मार्गाने जात आहोत, आपल्याला समजत नाही, स्मृति भ्रष्ट झाल्यावर बुद्धीचा नाश होतो बुद्धि नष्ट झाल्यावर विनाश ठरलेलाच आहे. बस हेच कारण रावणाच्या बाबतीत झाले अचाट भक्ति करणाऱ्या रावणाला महादेवाने वर दिला, त्याच वैभव वाढलं आणि रागद्वेषादि षड्रिपूने त्याच्या हृदयात वसति केली आणि तेच खरे त्याला शत्रू झाले. स्वर्ग, मृत्यू पाताळावर जरी त्याचा अधिकार होता, पण त्याच्यावर अधिकार होता तो षड्रिपूंचा. कामाने आज्ञा करताच सितेला हरण करण्याची त्याला इच्छा झाली. क्रोधाच्या आदेशामुळे तो रामाशी लढला. म्हणून त्याला रामाने मारले. म्हणण्यापेक्षा षड्रिपूने मारले म्हणणे बरोबर आहे. राम केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहु जाता रावणासारखा श्रेष्ठ भाव नव्हता पण अशा श्रेष्ठ भावामध्ये जेव्हा ‘मी’ निर्माण होतो, तेंव्हा तोच भक्त मी मुळेच देवाचा शत्रु होतो. रावण हा भयंकर क्रुर राक्षस होता असं आपल्याला त्याच्या चरित्रावरून वाटते. मग आता विचार करा ! रावण जर इतका क्रुर होता तर तो ज्या कामक्रोधादींच्या आदेशात वागत होता. ते षड्रिपू किती क्रुर असायला पाहिजेत, किती भयंकर असायला पाहिजेत? रावणासारख्या बलाढ्य राजाला चित करणारे हे काम क्रोध मद मत्सर आपल्या सारख्या मिक्स हायब्रीड धान्य खाऊन दुर्बळ झालेल्या लोकांना मुठमाती देणार नाहीत काय? हे षड्रिपू मोक्ष मार्गाने जाणाऱ्या वाटसरूला लुटणारे डाकु आहेत. बंदुकधारी डाकुंपेक्षाही ते भयानक आहेत. कारण त्याच्यावर सुद्धा त्यांचं साम्राज्य असत. मग हे षड्रिपु जर आपल्यात असतील तर आपणही त्यांच्या इतकेच वाईट असू. जवळ जवळ सगळ्यांवरच कामक्रोधादींचं राज्य असतं, पण त्यांनाही जिंकणारे काही सत्पुरुष आहेत. ते म्हणजे संत, महात्मे.
राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्यावर ज्यांनी विजय मिळविला तोच संन्याशी ह्या संज्ञेला पात्र आहे. आणि भगवंताला शरण जाण्याची पात्रता त्यांच्या ठिकाणी असते व शरण गेल्याशिवाय भगवंत लक्ष देत नाही हा सिद्धांत आहे.
‘वज्रपंजरू तो आहे सकळाशी शरण रिगे जो तया जीवा' भगवंताला शरण जाण्यासाठी सोबत काय न्यायला पाहिजे? खुप कष्ट करून कमवलेलं द्रव्य? की एखाद्या विद्यापीठाची पदवी? की एखादी महंती? यातून काही जरी नेले तरी तो आपल्याला भेटणार नाही, कारण लौकिक श्रेष्ठत्वाला परमेश्वराजवळ स्थान नाही.
एकांक काळात स्वामी भ्रमत भ्रमत लोणारला आले, स्वामींचा अलौकिक किर्ती ऐकून सिंघनाचा राजा कान्हरदेव लष्करासह स्वामींच्या भेटीला आला, स्वामी आसनस्थ होते, राजा आला त्यांने देवाला दंडवत केला व भेट म्हणून समोर सूवर्ण मोहरांचा ढिग केला व स्वामींना ‘‘स्विकार करा’’ अशी विनंती केली. स्वामींनी त्या सुवर्ण ढिगाशेजारीच तेवढ्याच आकाराचा मातीचा ढिग तयार केला व दोन्हीही ढिगाकडे एक वेळ पाहून स्वामी तेथून निघून गेले. राजा अवाक् होऊन पाहात बसला. आपण देवाच्या भेटीला येताना रंक होऊन यावयाला पाहिजे होत. सुवर्णाची रास घालण्याऐवजी भक्ती भावाने नमस्कार करायला पाहिजे होता हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो शिपायांना म्हणाला परते सरा रे सिंघनाचा राजा तो तुम्हा : यासी काई : राजा आणि रंक समानचि की. पण तीच आऊसा स्वामींच्या भेटीला येते भक्तीभावाने दण्डवत करते प्रभु तिचा नमस्कार स्विकारतात. तिच्या जवळ द्रव्याची रास नसते. कुठली उपाधी नसते. केवळ भावनाच स्वामींना अर्पण करते आणि देवालाही तेच हववं आहे. अशा प्रकारे श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्ती करणाऱ्याला भगवंत अत्यंत सोपा आहे.
असे तो कृपाळ कृपावंत माझा । कृपेशी भाजन होईल त्या ।।
म्हणून शुद्ध निर्मळ भावाने परमेश्वराची भक्ति करावी. तरच त्या परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर होईल.
- संकलित