महानुभावांची तपोभुमी नारायणगड (खोडद)
घळ(कपार)
इतिहास
नारायणगडाची अस्मिता ही जशी ऐतिहासिक, राजनैतीक, पैलूंची आहे. तशीच अध्यात्मिकतेची जोड असलेली ही एक तपोभूमी देखील आहे. या माहिती अभावी हे पुस्तक अपूर्णच आहे. या गडाशी महानुभावांचा संबंध अति बृहत आहे. पूर्वीपासून महानुभावपंथाचे विरक्त साधक या निसर्गरम्य ठिकाणी स्मरणानुष्ठानासाठी येत असत. डोंगराच्या कुशीत बसून तपस्या करत. जवळील वस्त्यांवर, गावात भिक्षा(माधुकरी) मागत. ही आदर्श परंपरा अजूनही पंथिय साधक जोपासत आहे. खोडद गावच्या जवळच दक्षिणेस असलेल्या श्रीदेवदत्त महानुभाव आश्रम जाधववाडी येथील साधक विधीपालट म्हणून १०-२० दिवसांसाठी या ठिकाणी आजही अनुष्ठानासाठी जातात.
या गडाच्या दक्षिणभागात मध्यभागी एक महानुभावांचे महात्म्य द्योतवणारी ऐतिहासीक गुंफा आहे. ह्या कपारीच्या आश्रयाने तपस्वी राहतात. कपार म्ह. नैसर्गिक निर्माण झालेली लेणी वजा गुंफा. गडावर असलेल्या जलकुंडांचे जलपान करतात. निसर्गाचे प्रचुर सौंदर्य, प्रगाढ शांत एकांत, उन्मुक्त मनाला आवर घालणारे, गडावरून दिसणारे नेत्रमोहक दृष्य, या प्रकृतीच्या वाटीकेत मुखावर वस्त्र झाकून बसलेल्या ईश्वराचे ध्यान करणार्या त्या साधकाकडे पाहून नारायणगडाच्या भुतकाळाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
या नारायणगडाच्या संबंधात महानुभावांसाठी एक अविस्मरणीय गोष्ट आहे. गडाच्या परिसरात एक ‘अंकुळनेरकर’ वेलीचे वैराग्यशिळ महानुभाव साधू राहात होते. हा महानुभावांचा वावरता प्रदेश असल्याने या भागात महानुभावांचे बरेच अनुगृहीत झाले होते. सातपुडा वस्तीत कुणी श्री. हरकुशेठ भोर नावाचे महानुभावपंथांचे अनुयायी होते. त्यांच्या घरीही ते भिक्षेला जात.
एक दिवस ते वैरागी बुवा भोर यांच्याकडे भिक्षेला गेले. त्या यजमानांनी एक भाकर आणि त्यावर कालवण वाढलं. पाणी आणलं. भिक्षा वाढल्यावर ते संकल्प देवू लागले. वैरागी बुवांनी विचारलं,
“हा कशाचा संकल्प?”
“बाबा, आपल्याला एक फळ द्यायचं आहे.”
त्यांना वाटलं, असेल एखादं फळ.
यजमान आत गेले. पाच सहा वर्षांच्या एका मुलीला घेऊन बाहेर आले.
“बाबा, हे फळ आपण स्वीकारा.”
बुवा विचारात पडले. त्यांना वाटलं, आपण निरालंब एकटे. कसं सांभाळणार या मुलीला? रजमानांनी तर संकल्प सोडला आहे! कसं करायचं?
यजमान म्हणाले,
“आता आपण हिला सांभाळा.”
वैरागी बुवांनी त्या मुलीला बरोबर घेतलं. आणि या गुंफेत आले. पुढे ते त्यांच्या दिनचर्येप्रमाणे रोज भिक्षेला जायचे. मुलीला गुंफेत बसवून ठेवायचे. ती एकटी बिचारी घाबरतही असेल कदाचित. दिवस मावळायच्या वेळी गडाच्या खाली उतरायचं आणि कुणाच्या तरी ओसरीवर थांबायचं तिच्यासाठी दूध मागून आणायचं. असं चाललं होतं.
असे १५-२० दिवस गेल्यावर त्यांना वाटलं, असं किती काळ चालणार? या मुलीला कुठल्यातरी आश्रमात पोचवायला हवं. म्हणजे तिचा अभ्यास सुरू होईल. आपण असे निरालंबी, एकटे. हिला सांभाळणं जमणार नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की या मुलीला आपण कोण्या आश्रमात शास्त्राभ्यासासाठी ठेवायला पाहिजे. त्या काळी श्रीबीडकर महानुभाव पंथाचे थोर आचार्य होते. ते विदर्भात बेलोरा नावाचे गाव आहे तिथे वास्तव्याला होते. त्यांच्या सान्निध्यात त्या मुलीला ठेवून ते निघून गेले. त्या श्रीबिडकर बाबांची आणि लोकमान्य टीळकांची भेट झाली होती. त्या भेटीत धार्मिक विषयावर चर्चाही झाली. चर्चेत बिडकर बाबांनी गीतेचा अर्थ विषद करताना “ब्रम्हचर्यमहिंसा च शारीरम् तप उच्यते”(गीता. १७/१४) या श्लोकाचा दहाप्रकारे अर्थ केला. ते पाहून टीळक व भांडारकर आश्चर्यचकित झाले. या बैठकीचा समाचार टिळकांनी आपल्या केसरी या समाचार पत्रातून दि. २१ नोव्हेंबर इ.स. १८९९ शके १८२१ रोजी प्रसिद्ध केला.
पुढे ती मुलगी मोठी झाली. तिला संन्यास देण्यात आला. तिचे नाव मनुबाई ठेवण्यात आले. त्यांचीही वेली अंकुळनेरकर होति. शास्त्राभ्यास करून त्या मनुबाई अत्यंत विद्वान, आचरणशिळ थोर तपस्विनी झाल्या. त्या बिडकरबाबांच्या प्रमुख शिष्यापैंकी होत्या. पुढे इ. सं. १९०२ शके १८२४ साली श्रीबिडकर महानुभाव ईश्वरदर्शनाला गेले. आणि मनुआई विदर्भदेश सोडून पुन्हा जुन्नर प्रांतात अनुष्ठानासाठी आल्या. पुढे त्या अधिकरण झाल्या. त्यांच्या जवळ शे पन्नास महिला साधक अभ्यासासाठी राहु लागल्या. त्या त्यांच्या आधार झाल्या. त्या महानुभावांच्या इतिहासातील एक थोर साध्वी होत्या. पुढे त्यांच्या उतारवयात त्या कडुस या गावाच्या गृहस्थांच्या विनंतीवरुन तेथे थांबल्या. तेथेच त्या ईश्वरदर्शनाला गेल्या.
अशा थोर तपस्विनींची स्मृती या नारायणगडाशी संबंधीत आहे. आजही ती गुंफा तेथे आहे. श्रीदेवदत्त आश्रमाचे संस्थापक संचालक महंत प.पु.प.म.आचार्य श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर (जाधववाडी/मांजरवाडी) यांच्या प्रेरणेने आश्रमस्थ साधकांनी ती गुंफा निटनेटकी करून तिचा सांभाळ केला आहे. त्या गुंफेला ‘श्रीदेवदत्त गुंफा’ हे नाव दिले आहे. मनुआईंची स्मृती लिहून तेथे एक पाटी लावली आहे. आजही तेथे आश्रमस्थ भिक्षुक अनुष्ठानासाठी जातात.
=======================================
गुंफेची छायाचित्रे