माहूर देवदेवेश्वर महात्म्य
सैंह्याद्री
पर्वतावर माहूर येथे देवल ऋषींचा आश्रम होता. परात्पर परब्रह्म शक्तीचा
साक्षात्कार व्हावा म्हणून देवल ऋषींनी घोर तपश्चर्येला प्रारंभ केला. गंगेवर
स्नानाला जाऊ न स्नान झाल्यानंतर तेथील मूठभर वाळू आणून त्या वाळूचे लिंग स्थापन
करून त्या लिंगाला रोज तर्पण करणे व पूजा करणे हा देवलांचा नित्यदक्रम होता. अशा
प्रकारे रोज आणलेली मूठभर वाळू लिंगावर स्थापन केल्यामुळे लिंगाची उंची दररोज
साडेतीन हात अशी वाढू लागली. हळूहळू लिंगाची उंची आकाशाला भीडू लागली. देवलांच्या
तप:प्रभावाने त्या लिंगापासून निघालेल्या प्रज्वलित अग्निची दाहकता चहुबाजूंना १२
कोसपर्यत पसरली. त्यामुळे त्या परिसरात कोणी चिटपाखरूही प्रवेश करू शकत नव्हते.
रोज वाढणारी लिंगाची उंची व लिंगाची दाहकता यामुळे देव सुरगण चिंतीत झाले, या सर्वांमुळे देवलांस पण आपल्या तपोबलाचा गर्व झाला होता. या साधनेत
त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. अनेक शक्तींवर त्यांनी प्रभूत्व
मिळविले होते. या सर्वातून त्यांचा परात्पर शक्तीच्या दर्शनाचा शोध चालला होता.
देवल ऋषींचा वाढता प्रभाव, तपोबल पाहून सर्व देवलोक चिंतीत झाले. त्यांनी एक
धर्मसभा आयोजित करून ब्रह्मा,
विष्णु, महेश या तिन्ही देवांसमोर आपली कैफियत मांडली. शेवटी सर्वानुमते
विचार विनिमय करून बद्रीकाश्रमी लीळा क्रिडा करीत असलेल्या साक्षात परात्पर
परब्रह्म परमेश्वर श्रीदत्तात्रेयप्रभूंना सर्वांनी शरण जाऊन देवलांच्या संकटासून
सर्वांची सुटका करण्याची प्रार्थना करण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे सर्व
देवलोकांनी बद्रीकाश्रमी येऊन श्री दत्तात्रेय प्रभूंना संकट निवेदन करून या
संकटातून सुटका करण्याची विनंती केली. यानंतर सर्वांनी प्रभूंची महापूजा केली.
श्रीदत्तात्रेयप्रभू सर्वांना धीर देत म्हणाले, "देवलोकहो
! तुम्ही निश्चिंत असा. देवल आमचा भक्त आहे. त्याला झालेला अहंकार दूर करून त्याचे
कल्याण व्हावे व तुमचेही संकट दूर व्हावे म्हणून आम्ही स्वतः च सैह्यपर्वती
देवलऋषींच्या आश्रमी जाऊ” सुटकेचा निश्वास टाकून सर्व देवलोक श्री
दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा घेऊन स्वस्थळी निघून गेले. रोजच्या प्रमाणे देवल ऋषी
नदीवर स्नानसंध्या आटोपून मूठभर वाळू सोबत घेऊन आपल्या आश्रमाकडे येत होते.
आश्रमाच्या जवळ येताच प्रसन्न सुहास्य वदन, दिव्य कांती व बालसुलभ
मुर्ती असलेला कोणी एक पुरूष लिंगाच्या जवळ आसनावर बसलेला त्यांना दिसला. हे दृष्य
पाहून देवलांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. कारण त्यांना पक्के ठावूक होते की, लिंगापासून १२ कोसाच्या परिसरात देव-दानव किंवा साधे चिटपाखरू सुद्धा
प्रवेश करू शकत नव्हते. निश्चितच हे सुरगणांपेक्षाही श्रेष्ठ असलेले दिव्य विभूती
असावे. कदाचित मी ज्या अत्युच्च शक्तीची उपासना करीत आहे, तिच ही मनुष्यवेष धरण केलेली शक्ती असावी, असे मनोमन देवलांना वाटले. श्रीदत्तात्रेयप्रभूच्या प्रसन्न सुहास्य
वदन मुर्तीचे दर्शन होताच देवलांचा अर्धाअधिक क्रोध-अहंकार गळून पडला होता.
देवलांनी तपोबलाने आपला हात लिंगाच्या उंचीपर्यंत नेऊन मूठीत आणलेली वाळू लिंगावर
टाकली. रोजच्या प्रमाणे लिंग साडेतीन हात वाढले. पूजाद्रव्यांनी लिंगाची पूजा करून
देवलांनी काही पूजा साहित्य आसनावर बसलेल्या दिव्य विभूतीकडे दिले. ही दिव्य
विभूती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. श्रीदत्तात्रेय
प्रभूंनी देवलांनी दिलेले पूजासाहित्य घेऊन देवलांप्रमाणेच बसल्या ठिकाणाहून आपला
हात लिंगाच्या उंचीपर्यंत नेऊन लिंगावर पूजासाहित्य टाकले आणि करांगुळीने लिंग
खाली दाबायला सुरूवात केली. लिंग हळू हळू पाताळात जायला लागले. आश्चर्यचकीत होऊन
देवलऋषी हे सर्व पहात होते. खाली जाणाऱ्या लिंगाला रोखण्यासाठी त्यांनी आपल्या तप:सामर्थ्याचा
उपयोग केला, पण सर्व व्यर्थ ! शेवटी काहीच उपाय शिल्लक नाही
असे पाहून देवलांनी धावत जाऊन श्रीदत्तात्रेयप्रभूंचे श्रीचरण धरले. साष्टांग
दंडवत घालून ते प्रभूंची प्रार्थना करू लागले, हे प्रभो ! तुम्ही या
जगताचे नियंत्रक आहात. तुम्ही सर्वसमर्थ आहात. अहंकाराभिभूत होऊन मी तुम्हाला
ओळखले नांही. तुमचा प्रभाव जाणला नाही. प्रभो, मला क्षमा करा. हे दयाघना !
तुमच्याशिवाय मज आता अन्य कोणीही नाही. हे प्रभो ! आपली आठंवण म्हणून हे लिंग थोडे
तरी शिल्लक राहू द्या." अशा प्रकारे अतिशय नम्रपणे देवलऋषी प्रभुंची प्रार्थना
करू लागले. श्रीदत्तात्रेय प्रभुंनी प्रसन्न होऊन देवलांना शांत केले आणि
लिंगावरील आपला हात काढून घेतला. फक्त साडेतिन हात लिंग पृथ्वीवर शेष राहू दिले.
पुढे देवलांच्या विनंतीवरून श्रीदत्तात्रेयप्रभु आपला निवास बद्रिकाश्रमाहून
सैह्यपर्वतावर करू लागले. श्री दत्तात्रेय प्रभुंच्या कृपेमुळेच जाज्वल्य लिंगाचा
दाह शांत झाला म्हणून सर्व ऋषी-मुनी तसेच देवलोकांना आनंद झाला. देवलांच्या
विनंतीचा स्वीकार करून तेंव्हापासून श्री दत्तात्रेय प्रभू दररोज निद्रेसाठी येथे
अद्यापी येत असतात. अशा प्रकारे देवदेवेश्वर हे श्री दत्तात्रेय प्रभुंचे निद्रास्थान आहे. निद्रास्थानाच्या पाठीमागे नमस्कारी लिंग आहे.
माहूरची ही स्थाने श्री दत्तात्रेय प्रभुंची प्रमुख स्थाने होत. मेरूवाळा
तळे" (श्री दत्तात्रेय प्रभूंचे जलक्रीडा स्थान), येथेच काठावर भोजनता स्थान व पंचदेवळ्या क्रीडास्थान आहे. ही दोन्ही
स्थाने श्री दत्तात्रेय प्रभु व श्रीचक्रपाणीप्रभू अशा दोन्ही अवतारांच्या
संबंधातील आहेत. याठिकाणी दोन्ही अवतारांचे भोजन व्हायचे. तसेच पंचदेवळ्यात
शिंपण्याचा खेळ केला. विंझाळे तळे' हे स्थान देवगड किल्यात
आहे. जमदग्नी व रेणूका यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी परशुरामाने श्री दत्तात्रेय
प्रभुंच्या आज्ञेने येथे भूमीत बाण मारून पाताळगंगेचे पाणी काढले. प्रभुंनी या
पाण्यात आपला श्रीचरण बुडवून ते सर्वतीर्थ केले.(येथील विशेष देवपूजेसाठी आणले
जातात.) सहस्रार्जुन वर प्रदान स्थान, यदुराजा ज्ञान प्रदान स्थान, ऋचीक ऋषी भेटी स्थान, अरळकराजा भेटी स्थान, शंकराचार्य वर प्रदान स्थान, श्री चक्रपाणी अवताराचे
ज्ञानशक्ती स्वीकार स्थान, परशुराम भेटी स्थान ही माहूर येथील पवित्र स्थाने
आहेत. श्रीदत्तात्रेयप्रभु महाराज की जय