भाग 001 प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह subhashit kahani

भाग 001 प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह subhashit kahani

 भाग 01 प्राचिन संस्कृत कविंच्या गोष्टी  subhashit kahani





कथा क्र. १)

तुझ्याजवळ काही विद्वता आहे काय ?

        कालिदास केव्हा जन्मास आला याबद्दल निश्चित पुरावा नसल्याने त्याच्याबद्दल निश्चित असे विधान करता येत नाही. काही ऐतिहासिक संशोधनकारांच्या मते महाकवि कालिदास ख्रिस्त पूर्व काळात प्रथम शतकात होऊन गेला. शककर्ता विक्रमादित्य याच्या पदरी असलेल्या नवरत्नापैकी एक होता.

        काही संशोधकांच्या मते कालिदास दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्याचे पदरी होता. गुप्त घराण्यातील या राजाने इ.स. ३८० ते इ.स. ४१३ पर्यंत राज्य केले. म्हणजे कालिदासाचा काळ साधारणत: या आसपासचा ठरतो.

        काहींच्या मते कालिदास धारा नगरीच्या भोजराजाच्या पदरी (अकराव्या शतकात) होता. पण हे काही घडत नाही. कारण अकराव्या शतकाच्या कितीतरी आधी भोजराजाचे राज्य होते.

        कालिदासाच्या कृतीतील उल्लेखावरुन कालिदासाचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. तो उज्जयिनी येथे रहात असून राजकवि होता. त्याचे शिक्षण एका गुरुकुलात झाले. श्रुति, स्मृति, इतिहास, पुराणे, वेदांत, ज्योतिशास्त्र, कामशास्त्र, वैद्यक इत्यादींचा त्याला चांगला परिचय होता. ठिकठिकाणच्या रीतीभाति व लोकस्थितींचे त्याचे अवलोकन सूक्ष्म होते. तो राजसंस्थेचा प्रशंसक होता. पण हे सर्व त्याच्या पूर्णत्वास पावलेल्या कलाकृतीवरुन ध्यानी येते. पण या कलाकृतीना जन्म देण्यापूर्वीच्या त्याची स्थिती काय होती? या संबंधी जी दंतकथा प्रचलित आहे ती मोठी रोचक आहे. ती दंतकथा अशी

 

        कालिदास हा ब्राह्मणाचा मुलगा. तो लहान असतानाच त्याचे आईबापाचे देहावसान झाले. ह्या सुस्वरुप, सुदृढ आणि पोरक्या मुलाचा प्रतिपाळ एका गवळ्याने केला. तो गवळ्याच्या संगतीत वाढल्यामुळे त्याच्यावर विद्येचे यत्किंचितही संस्कार झाले नाहीत.

        शेजारच्या राज्यातील राजकन्येचे लग्न त्या राजाच्या प्रधानाने कपटाने या विद्याहीन तरुणाशी लावून दिले. त्या राजकन्येने ‘‘अस्ति कश्चित् वाग्विशेष.' तुझ्याजवळ वाणीचा काही विशेष आहे का? तुला काही शास्त्र येते का?’’ विचारले.

कालिदास काय उत्तर देणार? तो तिच्या चेहऱ्याकडे मूर्खासारखा पहात राहिला.

राजकन्येने त्याची खूप निर्भत्सना केली. काही विद्वत्ता मिळवल्याशिवाय माझे तोंड पाहू नकोस’’ असे म्हणून त्याची हकालपट्टी केली.

        कालिदासाला अत्यंत अपमानीत झाल्यासारखे वाटते. त्यानेही इरेला  पेटून कालिमातेची उपासना करून तिला प्रसन्न करुन घेतले. तिच्या वरदानामुळे त्याला विद्वत्व आणि कवीत्व यांची प्राप्ती झाली. तो परतला तेव्हा राजकन्येने त्याला तोच प्रश्न विचारला. अस्ति कश्चित् वाग्विशेष.'

ते ऐकल्या बरोबर कालिदासाने 'अस्ति' या शब्दाने सुरुवात होणारे कुमार संभव हे महाकाव्य 'कश्चित्' या शब्दाने सुरु होणारे 'मेघदूत' हे खंडकाव्य आणि 'वाक्' या शब्दाने सुरु होणारे 'रघुवंश ' हे महाकाव्य तिच्या तोंडावर फेकले. ती ते महाकाव्य वाचून अत्यंत आश्चर्यचकीत झाली. त्या राजकन्येने कालिदासाची क्षमा मागितली.

===============

कथा क्र. २)

चार विद्वान भोजराजाच्या दरबारात आले

        एका नगरामध्ये चोर विद्वान ब्राह्मण रहात होते. आपण एखादे नवीन काव्य करावे आणि भोजराजाच्या दरबारात ते म्हणून राजाकडून काही धन मिळवावे अशी त्याना इच्छा झाली. पण ते विद्वान असले म्हणून काव्य करता येईल असे थोडेच होते. चौघेही नदीकाठी जाऊन बसले. तेथे एक जांभळाचे झाड होते. झाडावरांची जांभळे पिकली होती. पहिल्या विद्वानाने कवितेचा चरण रचला. जम्बूफलानि पक्कानि = पिकलेली जांभळं

ती पिकलेली जांभळं स्वच्छ पाणी असलेल्या नदीच्या पात्रात पडत होती. ते पाहून दुसऱ्या विद्वानाने कवितेचा दुसरा चरण रचला.

पतन्ति विमले जले । = स्वच्छ पाण्यात पडतात.

तिसऱ्या विद्वानाला जांभळे पाण्यात पडल्यानंतर मासे ती न खाता दूर निघून जात आहेत असे आढळले. त्याने कवितेचा तिसरा चरण रचला.

तानि मत्स्याः न खादन्ति । = मासे जांभळे ती खात नाहीत.

चौथ्या विद्वानापुढे आता प्रश्न उभा राहिला. चौथ्या चरणात काय सांगावयाचे? त्याच्या डोक्यात कल्पना आली. जांभळे पाण्यात पडताना 'डुबुक - डुबुक' असा आवाज होत होता. त्याने चौथा चरण रचला.

कुर्वन्ति डुबुक डुबुक। = डुबुक डुबुक असा आवाज करतात.

चौघेही आपल्या काव्यप्रतिभेवर संतुष्ट होऊन भोजराजाच्या दरबारात हजर झाले. त्यानी आपले काव्य म्हणून दाखविले. भोजराजाने कालिदासाचा अभिप्राय जाणण्यासाठी त्याच्याकडे पाहिले.

कालिदास म्हणाला, ’महाराज, कवितेचा चौथा चरण योग्य नाही.

राजाने विचारले. ‘‘चौथ्या चरणात मासे जांभळाना तोंड का लावत नाहीत, दूर का निघून जातात याचे कारण पाहिजे. मग ते काय असावे ?’’

‘‘जाल गोलकशङ्कया ।’’ कालिदासाने ताबडतोब चौथा चरण पूर्ण केला.

जम्बूफलानि पक्कानि पतन्ति विमले जले।

तानि मत्स्याः न खादन्ति जालगोलकशङ्कया ॥

पिकलेली जांभळं स्वच्छ पाण्यात पडतात. आपल्याला पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यातील ते गोळे आहेत अशा शंकेने मासे ती खात नाहीत.

===============

कथा क्र. ३)

पारध्याची सून आणि भोजराजा

 

        एकदा भोजराजाला एक तरुण स्त्री हातात वाळलेला मांसाचा तुकडा असलेली अशी भेटली.

त्याने सहज विचारले, ‘‘का त्वं पुत्रि ?’’ = मुली तू कोण आहेस?

 

"नरेन्द्र, लुब्धक वधुः " = राजा मी फासेपारध्याची सून आहे. त्या मुलीनेही राजाला काव्यातच उत्तर दिले.

 

राजा :- “हस्ते किमेतत्? = ‘‘तुझ्या हातात काय आहे?’’

स्त्री :- ‘‘ पलम्  मांसाचा तुकडा

राजा :- "क्षामं किं ? "  = तो वाळलेला का आहे?

स्त्री :- ‘‘सहजं ब्रवीमि नृपते यद्यादरात् श्रूयते।’’ = जर तू आदरपूर्वक ऐकणार असशील तर खरं कारण सांगते.’’

राजाने संमती दिल्यानंतर त्याच वृत्तात त्या तरुणीने काव्यमय उत्तर दिले.

गायन्ति त्वदरिप्रियाश्रुतटिनी तीरेषु सिद्धांगनाः ।

गीतान्धा न तृणं चरन्ति हरिणा: तेनामिषं दुर्बलम् ॥  

तुझ्या शत्रूंच्या विधवा स्त्रियांच्या अश्रूंच्या लोटामुळे निर्माण झालेल्या नद्यांच्या तीरावर देवस्त्रिया गायन करीत आहेत. त्या गाण्याने मुग्ध झालेली रिणे गवतसुद्धा खाईनाशी आहेत. अशा पोषणरहित हरिणाना मारल्यामुळे त्यांचे मांससुद्धा कोरडे बनलेले आहे. त्यामुळे माझ्या हातातील हा मांसाचा तुकडा तुला वाळलेला दिसतो आहे.’’

राजा तिच्या चातुर्यावर खूष झाला. त्याने तिला मोठे पारितोषिक दिले.

===================

कथा क्र. ४)

श्रेष्ठ कोण कालिदास, भारवि, माघ की दण्डी ?

        कालिदासाला जाणकारानी कविकुलगुरु अशी सार्थ पदवी देऊन त्याचा गौरव केला. त्या गौरवास तो योग्य होताही. त्याच्या रचनेतून त्याची उज्वल प्रतिभा आणि तरल कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडते. त्याचा अभ्यास, त्याचे अवलोकन आणि मनन यांची जोड त्या कल्पनाशक्तीला मिळाली आहे. त्याचा विलक्षण संयम, रचनेतील प्रमाणबद्धता आणि सूचकता यांची जाणीव त्याच्या कलाकृतीतून वारंवार होत जाते. वेधक प्रसंग आणि संवाद रचनेचा नाट्यपूर्ण आविष्कार त्याच्या केवळ नाट्यकृतीतूनच होत नाही तर त्याच्या काव्यातूनही होतो.

        रामायणातील केवळ नीति आणि महाभारतातील केवळ बुद्धी याना त्याने भौतिकाची जोड दिली. कठोर कर्तव्यनिष्ठा (रामायण) आणि धर्माधर्मविवेक (महाभारत) यांच्या जोडीला भौतिक उपभोगापासून होणारे समाधान असल्याशिवाय मानवी जीवन पूर्ण होत नाही अशी त्याची धारणा होती. बुद्धी आणि नैतिक प्रवृत्ती यांच्या समाधानात जर इंद्रिये भुकी राहिली तर मानवी जीवन अपूर्ण राहील असेच त्याच्या कलाकृती सुचवतात. त्याने विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्र, शाकुंतल ही नाटके लिहिली. कुमारसंभव, रघुवंश ही महाकाव्ये लिहिली तर, मेघदूत हे खण्डकाव्य व ऋतुसंहार हे निसर्गवर्णनपर काव्य लिहिले.

        असे असूनही माघ कवीचे काही चाहते होतेच. त्याना माघकवी थोर वाटे व्याकरण, दण्डनीति, न्याय, वेदान्त, साहित्य इत्यादि शास्त्रांचा त्याचा दांडगा अभ्यास होता. त्याच्याजवळ शब्दांचा आणि शब्दपर्यायांचा भरणा इतका मोठा होता की,

नवसर्गगते माघे नवः शब्दो न विद्यते ।

म्हणजे माघाच्या नऊ सर्गात सर्व शब्दसंपदा येऊन गेल्याने त्याच्या अभ्यासकास नवीन किंवा अपरिचित असा शब्दच उरत नाही. अर्थात ही अतिशयोक्ती आहे.

भारवि या कवीने किरातार्जुनीय' हे महाकाव्य लिहिले.

कालिदासाच्या ललित, मधुर, खेळकर रम्योदात्त व ध्येयवादी कलाकृतीच्या पार्श्वभूमीवर भारवीचे ओजस्वी, भारदस्त, दणकट, विवेकप्रधान व विचारदृष्ट्या वास्तववादी 'किरातार्जुनीय' हे काव्य उठून दिसते. तरीही महाकवी म्हणून त्याची गणना कालिदासा खालोखाल होते. अर्थगौरव, म्हणजे खोल, भारदस्त, गंभीर अर्थ अगदी थोड्या शब्दात व्यक्त करण्याचा गुण भारवीत, असल्याने अर्थ गौरवाने युक्त' अशा संस्कृत भाषाशैलीचा प्रवर्तक म्हणून भारवीची कीर्ति चिरंतन आहे. परंतु माघकवीच्या पक्षपात्याना त्याचे काय? एका माधभक्ताने त्याचे कल्पनाचातुर्य, वृत्तप्रभुत्व, पांडित्य आणि भाषाज्ञान याने दिपून जाऊन एका श्लोकात माघाची स्तुति करतानाच भारवीची निंदाही करुन घेतली आहे.

तावद् भा भारवेर्भाति यावन् माघस्य नोदयः ।

उदिते तु पुनर्माघे भारवेर्भा रखेरिव ॥

श्लोकार्थ :- जोपर्यंत माघकाव्य रसिकांच्या दृष्टीक्षितिजावर उदय पावले नाही भारवीचे तेज पडायचे. एकदा का माघ दिसला की माघ महिन्यातील ' वीची भा' (प्रभा) जशी फिकी पडते तशी भारवीची परिस्थिती होते. ( येथे' माघ शब्दाचे दोन अर्थ व भारवि शब्दाची 'रवि' 'भा' अशी शब्दफोड करुन शब्दश्लेष साधला आहे. )

दुसऱ्या एका माघाच्या पक्षपात्याने

कृत्स्नप्रबोधकृत् वाणी भा रखेरिव भारवे ।

माघेनेव च माघेन कम्पः कस्य न जायते ॥

अर्थ :- सर्वांना जागृत करणाऱ्या भारवीच्या वाणीची प्रभा (भा) सूर्याच्या प्रभेप्रमाणे (रवे: इव) आहे. पण माघ काव्याचा प्रभाव दिसू लागताच माघ महिन्यातील थंडीमुळे माणसांची शरीरे जशी कापू लागतात तसे कोणा कवीला कापरे भरणार नाही.

 खरे पाहता कालिदासाशी स्पर्धा करण्यासाठी त्याने कालिदासाचीच उसनवारी केली. 'शिशुपालवघांतील प्रसंगांच्या निवडीत व काही कल्पना मांडण्यात ही उसनवारी ध्यानात घेऊनही

उपमा कालिदासस्य भारवेरथंगौरव:

दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणः ॥

कालिदासाची चपखल उपमा, भारवीचे थोड्या शब्दात पुष्कळ अर्थ सामावणे, दण्डिचे पदलालित्य हे विशेष गुण आहेत. पण माघ कवीमध्ये ह्या तिन्ही गुणांचे दर्शन घडते.

 

सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ।

ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची ॥

असे जेव्हा मराठी कवी म्हणतो त्यावेळी चौघांचाही मोठेपणा त्याला रसिकापुढे मांडावयाचा असतो. ' माघे सन्ति त्रयो गुणः' असे जेव्हा संस्कृत कवी म्हणतो त्यावेळी इतर तिघाना थोडे बहुत हीनत्त्व देण्याचा (कमी लेखण्याचा) त्याचा हेतू असतो.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post