परिस्थितीमुळे लहान-मोठेपणा ठरतो नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

परिस्थितीमुळे लहान-मोठेपणा ठरतो नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

 13-4-2022 

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

परिस्थितीमुळे लहान-मोठेपणा ठरत असतो

भर्तृहरी संस्कृत श्लोक 

छंद :- शिखरिणी 

परीक्षीणः कश्चित् स्पृह्यति यवानां प्रसृतये। 

स पश्चात् संपूर्णः कलयति धरित्रीं तृणसमाम्। 

अतश्चानेकान्ता गुरुलघुतयार्थेषु धनिना 

मवस्थावस्तूनि प्रथयति च संकोचयति च ।।


मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

छंद :- द्रुतविलंबित 

दुबलिकेत पसा यव इच्छितो । 

प्रभुपणी धरणी तृण मानितो ॥ 

म्हणुनिया कृपणत्व उदारता 

घडतसे समयोचित तत्वतां ॥


मराठी श्लोकानुवाद :- लं. गो. विंझे -


छंद :- शिखरिणी

पसा धान्या इच्छी अधन असतां जो नरचि तो ।

भरे वित्तानें तैं तृणसम जगालाहि गणितो ॥ 

धनी लोकां कांहीं गुरु लघु असें निश्चित न तें । 

स्थितीसापेक्षत्वें अधिक नि कमी वस्तु ठरते ॥ ७९ ॥

गद्यार्थ– जो मनुष्य निर्धन असतां, एक पसाभर (यव) धान्यासाठींसुद्धां याचना करीत असे, तोच संपत्तीने भरून गेल्यावर साऱ्या जगाला तृणवत् मानतो ! धनिकांना, अमुक मोठे किंवा अमुक लहान, असें संततचें निश्चित नसल्यानें, परिस्थितीच्या सापेक्षत्वानें, कोणतीहि वस्तु लहान किंवा मोठी, कमी वा अधिक ठरत असते.

अर्थ :- गरिबीने ग्रासलेला कोणी (ओंजळभर) धान्याकरिता प्रयास करतो, पण तोच नंतर (वैभवसंपन्न झाला तर) सगळ्या पृथ्वीला कस्पटासमान मानतो. याच कारणाने पदार्थांबाबत परिस्थितीनुसार गुरुलघुत्वाची बदलणारी दृष्टीच वस्तूंना मोठी वा लहान करीत असते.

जगात कोणत्याही पदार्थाला मुळात कोणतीही किंमत नसतेच. किंमत असते ती त्या पदार्थाच्या समोर उभ्या असलेल्याच्या गरजेची. गरजेनुसार पदार्थाचे मूल्य बदलत असते.

जेव्हा व्यक्ती दरिद्री असते, खाण्यापिण्याचे वांधे असतात त्या वेळी ओंजळभर धान्यही महाप्राप्ती वाटते. महाकवी भर्तृहरींनी तर 'यव' शब्द वापरला. यव म्हणजे टरफलास चिकटलेले गहू. अर्थात अपरिपक्व अर्धपक्क ते खायचे तरी टरफलाचाच भाग खाणाऱ्या सस्वीकारणे भाग आहे. अशा धान्याचाही लाभ त्या दशेनुसार खूप मूल्यवान ठरतो.

मात्र काही काळाने दैवयोगाने, नशीबबलाने त्याच्याजवळ धनसंपदा आली तर मग तो अप्रतिम पदार्थांनाही नावे ठेवू लागतो. कारण आता परिस्थिती बदलली. आता मिठाईतदेखील थोडा गोडवा कमीजास्त झाला तर ती फेकून दिली जाते.

याच कारणाने भर्तृहरींनी सिद्धान्त मांडला की, कोणत्याही पदार्थाचे गुरुत्व वा लघुत्व अर्थात मूल्य हे त्याला घेणाऱ्याच्या अवस्थेवर अवलंबून असते. लहान बाळास पाहा, गारगोटीही मौलिक वाटते, पण मोठा माणूस त्या फेकून देतो आणि रत्न गोळा करतो. मात्र, एखाद्या विरागीस कुणी रत्न दिले तर तो तेही फेकून देईल. कारण किंमत घेणार्याच्या गरजेची आहे.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post