आचार्यांचा अनुसरण दिन
॥ गुरुकुलाचे व परमार्गाचे आधारस्तंभ ॥
" गुरु : एक अविस्मरणीय भेट"
आदरणीय श्रध्देय प्रातःस्मरणीय आचार्य प्रवर साहित्याचार्य गुरुवर्य
प. पु. म. श्री. मामाजी यांना विनम्र अभिवादन करतो.
दोन दिवसांपुर्वी आचार्य श्री मामाजींचा ६६ वा अनुसरण दिन संप्पन्न झाला त्यावेळी त्यांना कै. आदरणीय प्रात:स्मरणीय संवत्सर येथील मोठे बाबा यांचा २० वर्षापुर्वी काढलेला फोटो भेट देण्याचा योग आला .
कोणत्याही व्यक्तिच्या जन्मापासुन ते तो यशोशिखर गाठेपर्यंतच्या वाटचालीत शिक्षकांचं योगदान नेहमी मोलाचं असतं. अगदी तसचं आमच्या महानुभावांना लाभलेले एक अनमोल सुवर्णमध्य, ज्ञान तेजोमय, ज्ञानरत्न म्हणजे गुरुवर्य श्री मामाजी.
अनेकवेळा श्री मामांच्या भेटीचा योग आला .जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचो तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहर्यावरील तेज पाहुन मला खुप प्रसन्न वाटायचे.अत्यंत प्रेमळ व मधुर हास्य पाहुन जणु काही ईश्वर भेटीचाच आनंद व्हायचा. त्यांच्या भेटीत स्मृतीस्थळातला असाच एक प्रसंग मला सतत आठवतो. आचार्य श्रीनागदेवांच्या चेहर्यावरील तेज पाहुन एक साधक आचार्यांना विचारतो की..!
"भट्टो तुम्ही काई त्रिकाळ स्नान करता का..?"
यावर आचार्य म्हणतात "माझ्या अंतःकरणात जे माझ्या ईश्वरांचं अधिष्ठान आहे त्या ईश्वराचे नामस्मरण मी करत असतो त्या ईश्वराचेच हे तेच माझ्या चेहर्यावर आहे. त्याचंच हे भक्तीचं तेज आहे. अगदी तशीच तेजोमय प्रसन्नता ही मामांच्या चेहर्यावर सतत दिसत असते. नेहमीच सर्व गुरुकुळाला आदर्श वाटावे असे व्यक्तीमत्व म्हणजे आचार्य श्री मामा.
माझ्या मते आदर्श गुरु म्हणजे आपल्या शिष्यांकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना मुक्तपणे ज्ञान देणारे, सर्व शिष्यांना समान वागणुक देणारे व सर्वांचाच धर्म वाढुन प्रगती कशी होईल हे इच्छिणारे आणि त्यासाठी सतत ईश्वरचिंतन करणारे जीव तोडुन शिकवणारे गुरु फार क्वचितच पाहायला मिळतात.असे आदर्श गुरु म्हाणजेच आदरणीय मामाजी.
अभ्यासात मागे पडणाऱ्या शिष्याच्या मनात न्युनगंड निर्माण होऊ न देणारे, स्वतःच्या ज्ञानाचा गर्व होऊ न देता शिष्यांच्या तक्रारी ऐकुन त्यानुसार त्यांच्या जीवनात बदल घडवुन आणणारे आणि प्रसंगानुरुप सोम्य, कठोर वागणारे गुरु म्हणजेच श्रीमामाजी.
कारण.... गुरू एक दिशादर्शक असतात. शिष्याचं भवितव्य जाणुन ज्ञान देऊन ईश्वर व भक्तीमार्गाकडे लावणारे गुरु असतात. खरंतर गुरू म्हणजेच एक प्रकारे आईच असते, शिष्याचं पालनपोषण करणारी.
शिष्याच्या जीवनात गुरू म्हणजे एक चैतन्य एक व ऊर्जा देणारे ज्ञानाचे ऊर्जा स्तोत्रच असतात. शिष्याला धर्म साधनेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवणारे. गुरू एक प्रकाश असतात, शिष्याला अज्ञानाच्या अंधःकारातुन ज्ञानाच्या तेजोमय दिशेने वाटचाल करायला मदत करणारे. यामुळे गुरूचरणी संपुर्ण समर्पण असणं आवश्यक असते. जेणेकरून गुरू शिष्याला सर्वार्थाने ईश्वरीय ज्ञान प्रदान करून त्या ज्ञानाच्या माध्यमातुन धर्मआचाराच्या साधनेवरुन मुक्तीपर्यंत घेऊन जाईल.
पुर्वी एकच गुरू असे आणि तोच सर्व जीवनावश्यक ज्ञान देई. आज मात्र जग प्रगत होताना नवनवीन धर्मसंस्था ऊदयास येत आहेत. म्हणुन अनेक 'व्यक्ती' गुरू म्हणुन आपल्या आयुष्यात येतात. व्यक्ती अनेक असल्या तरी गुरू हा भाव मात्र एकच आहे. एखाद्या गुरुकुळा जवळुन जाताना आपल्याला श्रीगुरुंची आठवण हमखास येतेच आणि मन आपोआप आदराने भरून जातं. या भावना शब्दात सांगणं कठीण आहे.
फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबुन न राहता, अनेक कथा, दृष्टांत, लीळा सांगुन ज्ञान देणारे, शिष्याच्या कलानं घेणारे, त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देणारे, कधी त्यांचे मित्र म्हणुन सल्ला देणारे तर कधी त्यांचे मार्गदर्शक होऊन त्यांना वाट दाखवणारे श्रीगुरु म्हणजे आदर्श शिक्षकच असतात.
गुरु म्हणजे शीलवान, क्षमशील, कर्तृत्ववान. ज्याच्यांमध्ये हे सर्व गुण असतात तेच खरे आदर्श गुरु. आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला सर्व माहिती देऊ शकते. पण या जगात वागायचं कसं याची जाणीव, आयुष्यात यशस्वी कसं व्हावं याबद्दलचे मार्गदर्शन आपले गुरुच करु शकतात. मला लाभलेल्या सर्वच गुरुजणांचं मार्गदर्शन आजपर्यंत मला नेहमीच उपयोगी ठरत आलं आहे.
आजच्या आधुनिक काळात श्रीगुरुंची खरी गरज भासते. काही लोकांच्या मते देव नसतो. पण, मी म्हणेन की देव हा श्रीगुरुंच्या रुपात शिष्यांच्या आयुष्यात येतो. गुरु हा पडद्यामागचा कलाकार असतो.
याच श्रीगुरुंची गरज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भासत असते. सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते.आज शालेय तसंच कॉलेजचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं घेणं शक्य झालंय. त्यामुळे तरुणाईनं तंत्रज्ञानालाच आपला मार्गदर्शक मानलं आहे. पण, तंत्रज्ञान हे तुमच्या चुकांची जाणीव करून देऊ शकणार नाही. त्यासाठी उत्तम मार्गदर्शकच हवा. तंत्रज्ञान विकसित झालं असलं तरी गुरूचं ज्ञान हे कायमच मोलाचं कार्य करत असतं. श्रीगुरू माझ्यावरील संस्कारांचे शिल्पकार आहेत. आयुष्याचे धडे घेत असताना माझ्या श्रीगुरुमाऊलींपासुन अनेक निमित्य,
ऊपकारक गुरूंनी मला शिकवलं, घडवलं आहे. त्यातही "आचार्य प्रवर श्रीगुरुवर्य महंत श्रीगुरुजी" श्रीब्रह्मविद्या पाठशाला, तरडगाव. यांनी मला धर्माचे ज्ञान देऊन परधर्मावर योग्य केलेले आहे. असे अनेक निमित्य गुरुऊपकारक आहेत, ज्यांचा हिशोब मांडता येणार नाही. माझ्या मते आयुष्यातले खरे गुरू म्हणजे आपली इच्छाशक्ती व अनुभव. खरंतर प्रत्येक प्रसंग आपल्याला घडवत असतो, काहीतरी शिकवण देत असतो. ध्येय गाठायचं असेल तर इच्छाशक्ती व अनुभवाची गरज आहे. गुरूनं शिकवलेले धडे आपल्याला आत्मसात करता आले पाहिजेत.
आजचा विद्यार्थी वर्ग हा खुप आधुनिक आहे. पुर्वी गुरूंचा शब्द म्हणजे काळ्या दगडा वरची रेघ! पण आजकाल विद्यार्थ्यांच्या मनातील आपल्या गुरूंविषयीची आदरयुक्त भावना मावळताना दिसतेय. याला अनेक कारण आहेत. कधी गुरुंचे अनुसंधान कमी पडते तर कधी शिष्य कमी पडतो कारण काहीही असो पण त्यांच्यापासुन आपल्याला ईश्वर धर्म व धर्माचे तत्वज्ञान सर्वांनाच मिळत आहे हाच आपला सर्वांचा परमलाभ म्हणायला हवा.
गुरु हा मित्र असावा. पण शिष्याच्या मनातील त्यांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा यांची जागा तेवत ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. 'गुरू' हाच आपल्या यशस्वी आयुष्याचा साथीदार असतो. यासाठी त्यांची जागा ही आयुष्यात अढळ असावी.
गुरु हे मार्गदर्शक होऊन योग्य ती वाट दाखवतात आणि वेळ पडल्यावर आपला जवळचा मित्रही बनतात. अशा या ईश्वरीय धर्मसाधना करणार्या श्रीगुरुंना माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम..! शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं,
"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा"
"आम्ही चालवु हा पुढे वारसा"
माझ्या सर्व गुरुजनांना मी वंदन करून माझ्या भावना व्यक्त करतो. मी त्यांचा सदैव ऋणी आहे.
त्यांच्या या धर्मलेखावरील वर्णन केलेले हे शब्द प्रत्येक गुरु शिष्याचे नाते घट्ट होण्यास नक्कीच फळदायी होतील. व त्यांच्याबद्दल वाटणारा आदर दुणावेल. प्रत्येक साधकांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान असेच असो हि भावना व्यक्त करुन श्रीगुरु चरणी नतमस्तक होऊन हि सेवा ईश्वरार्पण करतो.
आदरणीय मामांना त्यांच्या अनुसरणदिनी शतश नमन करतो.
दंडवत प्रणाम..!
शब्दलेखन.
ई. श्री. अमृतराज { अभिदादा }
महानुभाव पंजाबी.
सांगवी, पुणे.
धर्म प्रचार शाखा:-
"कृपासिंधु महानुभाव आश्रम, विठ्ठलवाडी."
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻