श्रीमद्भगवद्गीता चिंतन - Shrimad Bhagwat Geeta chintan

श्रीमद्भगवद्गीता चिंतन - Shrimad Bhagwat Geeta chintan

 श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु

      श्रीमद्भगवद्गीता चिंतन - Shrimad Bhagwat Geeta chintan

लेखक :- पूज्य श्री राजधर दादाजी बिडकर

एके दिवशी अशाच कोण्या एका प्रसंगावरुन स्वामी महादाईसास निरोपण करतात की, बाई, गीता ही श्रीकृष्ण भगवंतांच्या मुखारविंदातून निघालेली आहे आणि इतर महाभारत भागवत आदी अठरा पुराणे ते व्यासाचे बोलणे होय. 

महर्षी व्यास लिखीत महाभारत काव्य ग्रंथातील भीष्मपर्व यातील २५व्या अध्यायात श्रीमद्भगवद्गीता अंतर्भूत आहे.  गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते.  गीतेचे वैशिष्ट्य पाहिले तर आरंभ ‘धर्म’ या शब्दाने होतो आणि शेवट ‘मम’ या शब्दाने होतो.  हे दोन शब्द एकत्र आणले तर ‘ममधर्मः’ हे विधान होते.  हाच अर्जुनाचा प्रश्न असल्यामुळे – मम धर्मः कः ? माझा धर्म कोणता ?  या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच संपूर्ण गीता होय. 

येथे धर्म म्हणजे हिंदु, मुसलमान वगैरे हा प्रचलित अर्थ अभिप्रेत नाही.  तर धर्म म्हणजे कर्तव्य हाही एक धर्माचा अर्थ आहे.  या अर्थाने विचार केला  तर, माझे कर्तव्य कोणते ?  हा सतत प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो.  याचे कारण जीवनामध्ये अनेक प्रसंगांच्यामधून जात असताना प्रत्येक प्रसंगांमध्ये आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचा बुद्धीने कितीही साधकबाधक विचार केला तरी निर्णय होत नाही आणि जो निर्णय घेतला जातो तो रागद्वेषांनी प्रेरित होऊन स्वार्थ आणि लोभाने घेतला जातो.त्यामुळे आपला स्वार्थ ज्यामुळे  पूर्ण होतो  तेच आपले कर्तव्य आहे असा विचार आपण करत असतो.  परंतु निर्णय घेऊन सुद्धा मानसिक द्वंद्व राहातेच.  मानसिक संभ्रम राहातोच.  जन्माला आल्यानंतर  – मम धर्मः कः ?  हा प्रश्न स्वत:ला विचारून रागद्वेष, द्वंद्वरहित कर्म कसे करता येईल ?  हे जाणन्यासाठी तरी प्रत्यकाने एकदा तरी गीता अभ्यासावी. 

    श्रीमद्भगवद्गीता चिंतन 

अथ प्रथमोऽध्यायः = अध्याय पहिला

                   धृतराष्ट्र उवाच = धृतराष्ट्र म्हणाला 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥ 

      अर्थ : धृतराष्ट्राने विचारले, “हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पाण्डूच्या पुत्रांनी काय केले?"

विश्लेषण :-- अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय ! अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते. या अज्ञानात मन गुरफटले जाते. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे; परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे, ऐकू शकत आहे. त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा परमेश्वर हेच एकमेव सत्य आहे; परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झालेले आहे.

धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे. जेव्हा हृदयरूपी प्रदेशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते. आणि जेव्हा हृदयरूपी प्रदेशात आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते. 'कुरू' म्हणजे 'करा' हा शब्द आदेशात्मक आहे. 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, "प्रकृतीतून (देह)निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन, मनुष्य कर्म करीत असतो. तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही". हेच त्रिगुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात. तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते. अर्थात हे कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा  एक प्रकारचा आहारच आहे. हे तिन्ही गुण मनुष्याला देवताफळापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात. जोपर्यंत प्रकृती व प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत, तोपर्यंत कुरु म्ह. करा' हे चालूच राहील. म्हणून जन्ममृत्यूचे क्षेत्र, विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमेश्वराच्या स्वरुपामध्ये  प्रवेश करुन देणारे एवं प्रवेशद्वार असे पुण्यशील प्रवृत्तींचे  क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे.

भगवान श्रीकृष्णाने स्वत:च हे युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे - 'इदं शरीर कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।' "हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि जो हे जाणतो, त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ आहे." पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे. त्यात दहा इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, पाच विकार आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे. शरीर हेच क्षेत्र आहे, एक आखाडा आहे. त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या-झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत. एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती. पांडवरुपी सत् प्रवृत्ती व कौरवरुपी असत्-दुष्ट प्रवृत्ती'.

परमेश्वराला अनन्य भावे शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष संपुष्टात येतो. हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे, युद्ध आहे. विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत. परंतु त्या युद्धांत विजयी झालेल्या पक्षालासुद्धा शाश्वत असा विजय मिळू शकला नाही. जय-पराजय हे बदल असतात. प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून,प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या ईश्वर सत्तेचे दर्शन घेणे, ज्ञान मिळवणे व ज्ञानानंतर त्या ईश्वर स्वरुपात  मिसळने हा वास्तविक विजय आहे. हा एक असा विजय आहे की ज्याच्या नंतर कधीही हार नाही - पराजय नाही. हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही. 

या प्रकारे अज्ञानाने प्रभावित असणारे मन हे  संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते. अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला तशी दृष्टी प्राप्त होईल.        

दुर्जनं अस्ति योधनम् यस्मे स: तत् :- ज्याच्याशी युध्दात जय मिळने  कठीन आहे असा जो तो दुर्योधन : अत्यंत कठीन युद्धप्रसंगी ही प्रतीस्पर्ध्यावर मात करणारा असा हा  दुर्योधन अहंकारामुळे स्वत:ला श्रेष्ठ समजुन  व्यूहरचनायुक्त पांडवांचे सैन्याकडे पाहून, कौरव व पांडवांना शस्त्रविद्येमध्ये ज्यांनी प्रवीण केले अशा सर्व शस्त्र विद्या संपन्न गुरु द्रोणाचार्य यांच्या जवळ येतो व आपला हेतु साध्य करण्याकरिता कुटनितीने , उपहासाने आपल्या प्रतिस्पर्धी प्रमुख योध्यांची माहिती व नावे सांगण्यास सुरवात करतो

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्।

व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥

अर्थ : आचार्य, द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूह रचना केलेली ही मोठी पाण्डवसेना पहा.

विश्लेषण :-- आपला जन्म कोणत्या कार्यासाठी झाला आहे त्या कार्यावर शाश्वत व स्थिर श्रद्धा असणारा, दृढ मनोबळ असणारा  धृष्टद्युम्न ! तोच या व्यहरचनात्मक सेनेचा  नेता आहे, प्रमुख आहे. 'साधन कठिन न मन कर टेका' नुसते साधन बळकट असून उपयोग नाही तर मनाची सिध्दताही बळकट असली पाहिजे. मनोनिग्रही असला पाहिजे.

कोणत्याही कार्याची यशस्वीता या गोष्टीवर अवलंबून असते की ती करण्याचा आम्ही दृढ निश्चय केला आहे की नाही. निश्चयाच्या अभावी तर कित्येक कामं सुरू देखील होत नाहीत. निश्चय केल्याशिवायच काम सुरू केलं तर त्याच्या पूर्णतेची खात्रीही नसते किंवा अपेक्षेप्रमाणे ते काम होत नाही. कार्यपूर्ततेसाठी निश्चय ही इंधन म्हणून उपयोगी पडत असते. निश्चयाचा संबंध बुद्धीशी आहे. अन् बुद्धीच जर स्वतःच भ्रमित असेल, संभ्रमित असेल तर निश्चय करणंच मूळात कठीण होऊन बसतं. प्रत्येक वेळी ही भ्रमयुक्त बुद्धी ते काम करण्याच्या विषयी किंवा न करण्याच्या विषयी वेगवेगळे तर्ककुतर्क देत राहते.ज्यामुळे कर्मनाश होण्याची शक्यता अधिक बळावते.

समाजात आपण अशी टंगळमंगळ करणारी माणसं बघतो. जी स्वतः काही काम करत नाही किंवा कोणी करत असेल तर त्याच्या पायात खोडा अडकवतात. ही माणसं स्वतः काही काम करत नाही त्यामुळे ते काम इतरांनी करू नये किंवा इतरांना ते काम जमणार नाही अशीच त्यांची धारणा असते. आपल्याला काम करण्यापासून थोपवण्यासाठी ते मग वेगवेगळी कारणं देतात, उदाहरणं देतात, त्यानंतरही ते काम करायचं आपण सोडलं नाही तर ते आपल्याला भीती घालतात किंवा धमक्या देतात. मोठी माणसं सहसा असं करतात. त्याचा अनुभव आपण आपल्या घरातही घेऊ शकतो. त्याची वेगळी उदाहरणं देण्याची गरज नाही. हे कदाचित काळजीपोटीही होत असेल पण त्यात तुमच्यावरचा अविश्वास ते दाखवतात हेही खरं आहे. सावध करणं आणि भीती घालणं किंवा आत्मविश्वास नाहीसा करणं यात निश्चितच फरक असतो. एखादं काम जितकं महत्त्वाचं असेल, त्यांत तुमचा जेवढा जास्त फायदा होणार असेल, तेवढाच तुम्हाला विरोधही होतो. यात तुमचे हीतशत्रू अर्थातच कायम आघाडीवर असतात. त्यामुळे तुमचीही बुद्धी शेवटी भ्रमित होतेच.

पण अशा अवघड परिस्थितीत आणि कठीण काळात तुमची स्थिर व निश्चित बुद्धी तुमच्या उपयोगी पडते, तुम्हाला उचीत व योग्य मार्ग दाखवते. एका कर्मयोगी कर्मनिष्ठ व्यक्तिची प्रमुख खूण म्हणजे त्याची ही निश्चित बुद्धी होय. जी प्रत्येक संकटातून त्याला योग्य मार्ग दाखवते. नुकसान झालं तरी ते सहन करण्याची शक्ति त्याला देते. अडचणींतूनही काहीतरी त्याला शिकवते. ज्याचा पुढच्या आयुष्यात त्याला फायदाच होतो. निश्चित बुद्धीसाठी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःवरचा पूर्ण विश्वास. तुमच्या स्वधर्माचं सतत स्मरण असणं. तुमच्या कामाच्या प्रती तुमची अचल निष्ठा असणं. या तीन गोष्टी तुमची बुद्धी स्थिर ठेवेल. तुमचं मन ही त्यामुळे स्थिर होईल  या स्थिर बुद्धीमुळे निश्चय करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. ज्यांची बुद्धी, मन स्थिर असते त्यांनाच प्राप्त संधीचा योग्य फायदा घेता येतो. 

दुर्योधनानेही आपल्या कुटनितीचा उपयोग करून आचार्यांना आठवन करुन दिली की धृष्टद्युम्न हा केवळ तुमचा वध करण्यासाठी, तुमचा सुड घेण्यासाठीच या युध्दभुमीवर तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यावर एक शिष्य म्हणून कोनतीही दयामया न दाखवता त्याचा वध करणे हेच तुमचे आद्य कर्तव्य आहे. 

जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अशी धार्मिक, अधार्मिक, धर्मामधील अधार्मिक, अधर्मामधील धार्मिक भावना, परीस्थीती निर्माण होते तेव्हा तेथे आपल्यासाठी श्रीकृष्णाची भूमिका आपलं सजग मन निभावू शकते. निश्चयाच्या बळावर असंभव वाटणारी कामंही संभवात येऊ शकतात. त्याच्या अभावी संभव कामेही असंभाव्य वाटू शकतात. त्यामुळे याचा निश्चय करा की कोणतंही काम तुम्ही अनिश्चित अस्थिर बुद्धीने कधीच करणार नाही.

                  क्रमशः पुढे चालू

धन्यवाद दंडवत प्रणाम

    पु.श्री.राजधरदादा बिडकर

श्री द्वारकाधीश महानुभाव आश्रम, श्री क्षेत्र येळवन ता. जि. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post