सुभाषित रसग्रहण- Sunskrit Subhashit
स्वतःला ओळखणारे क्वचितच संस्कृत सुभाषित रसग्रहण- Sunskrit Subhashit
सुभाषित
नीतिज्ञा नियतिज्ञा वेदज्ञा अपि भवन्ति शास्त्रज्ञाः।
ब्रह्मज्ञा अपि लभ्या स्वाज्ञानज्ञानिनो विरलाः॥
- २६, वैराग्यशतक.
अर्थ :- नीती जाणणारे, नियती (भविष्य, भाग्य) जाणणारे, वेदाचे जाणकार, शास्त्राचे जाणकार, एवढंच काय तर अगदी ब्रह्मज्ञान असणारे, ब्रह्म जाणणारे देखील खूप मिळतील परंतु आपले स्वतःचे अज्ञान जाणणारे विरळच मिळतील.
या जगातील अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात, तरी आपण स्वतःला परमज्ञानी समजतो. हे जाणल्यानंतर भर्तृहरीला संसारविषयक विरक्ती उत्पन्न झाली व त्याने संसार त्यागून संन्यास घेतला. त्यानंतर भर्तृहरीने वैराग्यशतक, शृंगारशतक व नीतीशतक ह्या तीन ग्रंथरचना केल्या ज्या अतिशय प्रसिद्ध आहेत.
ह्या जगात स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान बाळगणारे तसेच स्वतःला नीतीज्ञ, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, सर्वज्ञ, भविष्यवेत्ते म्हणविणार्या अनेक व्यक्ती असतात. एवढंच काय तर ज्यांनी अगदी ब्रह्म जाणलंय असेही ज्ञानी पुरूष आहेत. परंतु स्वतःचं अज्ञान जाणणारे मात्र अतिशय विरळ, जवळजवळ नाहीच म्हटले तरी चालेल इतके नगण्य असतात. वरील श्लोकाचे निरूपण करण्यासाठी आणि याच्या अर्थाचा गाभा उकलून दाखविण्यासाठी जेवढी देता येतील तितकी उदाहरणे कमीच पडतील.
संत तुलसीदास गोस्वामी म्हणतात की,
अग्य अकोविद अंध अभागी।काई विशय मुकुर मन लागी।
लंपट कपटी कुटिल विसेशी।सपनेहुॅ संत सभा नहिं देखी।
अज्ञानी, मूर्ख, अंध आणि अभागी माणसांच्या मनोदृष्टीभोवती (मनाभोवती, नजरेभोवती) विषयरुपी काजळी साठलेली असते. त्यामुळे अश्या लंपट, व्यभिचारी, कपटी, कुटिल माणसांना स्वप्नातदेखील संतांचे सहवास घडत नाही. अज्ञानी असणए हा खूपच मोठा तोटा आहे म्हणून आपण अज्ञानी आहोत हे कळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
संत कबीरदास म्हणतात,
बकता ज्ञानी जगत में, पंडित कवि अंनत।
सत्य पदारथ पारखी, बिरला कोई संत॥
या जगात ज्ञानी असल्याची बडबड करणारे विद्वान, पंडित आणि कवी अगणित आहेत परंतु सत्य पदार्थाची, स्वस्वरूपाची, सद्वस्तुची ओळख असणारा संत विरळाच होय.
त्यामुळेच कबीरदास हे देखील सांगतात,
भक्त मरे क्या रोइये, जो अपने घर जाय।
रोइये साकट बपुरे, हाटों हाट बिकाय॥
कुण्या संताचे, भक्ताचे निधन झाले असे म्हणू नका. तो गेला म्हणून रडू नका. अरे जो न परतण्यासाठीच हे शरीर सोडून आपल्या निजधामाला जातो, अविनाशी पद प्राप्त करतो, त्याच्यावर काय शोक करायचा?
तुम्हाला रडायचंच आहे तर त्या अभक्त अज्ञान्यांच्या मरणावर रडा, जे पुन्हापुन्हा मरून, पुन्हापुन्हा जन्म घेत, ह्या भौतिक संसाराच्या, चौऱ्यांशीच्या फेऱ्यांच्या बाजारात पुन्हापुन्हा कामक्रोधाला विकले जात आहेत.
या संदर्भात मराठी संतांनी तर विपुल प्रमाणात लिहिले आहे. लेखनसीमा जाणून इथे त्या सगळ्याच लेखनाचा उल्लेख शक्य नाही. तरीही एकदोन उदाहरणे आपण पाहूया.
जगद्गुरू संत तुकाराम लिहितात,
अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती। तयाचिये मती बोध कैंचा॥१॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना। तयाचिया ध्याना देव कैंचा॥धृ॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन। निष्काम साधन तया कैंचे॥२॥
अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान। ब्रह्म सनातन तया कैंचे॥३॥
तुका म्हणे जळो ऐसियांचे तोंड। अज्ञानाचें बंड वाढविती॥४॥
तर तुकोबांनी इथे अज्ञानी असण्याचे जे दुष्परिणाम सांगितले आहे ते टाळायचे असतील तर आपल्यातील अज्ञान ओळखणे क्रमप्राप्तच आहे.
संत रामदासांच्या एका अभंगातील दोन ओळी पहा,
दृढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि। जाहलों मी क्रोधी अनावर।
रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान। सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां॥
मात्र खरे ज्ञान काय व अज्ञान म्हणजे काय हे जाणायचे असेल तर 'स्वाज्ञानज्ञानिनो विरलः।' ह्या उक्तीचा आध्यात्मिक दृष्ट्या एक वेगळा अर्थ आपण समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्यांच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो,
ऐक ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान।
पाहावे आपणासि आपण। या नांव ज्ञान॥
तसेच
ज्ञान म्हणिजे जाणणे। अज्ञान म्हणिजे नेणणे।
विपरीतज्ञान म्हणिजे देखणे। येकाचे एक॥ ~ दासबोध.
इथे पहिल्या ओवीमध्ये संत रामदासांनी आत्मज्ञान असण्याला ज्ञान म्हटले आहे. 'आपणच आपले निरिक्षण करून आपल्यातल्या अज्ञानाला ओळखणे म्हणजेच ज्ञान होय.' हे ही सांगितले आहे. मग आत्मज्ञान म्हणजे काय? हे कळण्यासाठी दुसरी ओवी जाणून घेणे आवश्यक आहे.
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। आणि ज्ञान म्हणिजे जाणणे। या दोहोंतून स्वस्वरूपाचे ज्ञान असणे 'म्हणजे मी ब्रह्म आहे' याचे ज्ञान होणे हे जाणून हेच खरे ज्ञान तर, 'मी देह आहे' म्हणणे हेच अज्ञान. 'सस्वरुपाला जाणणे हे ज्ञान आणि सस्वरुपाचे ज्ञान नसणे हे अज्ञान, तर जे जाणायचे आहे ते सोडून, भलतीच गोष्ट खरी मानून जगणे हे विपरित ज्ञान' असे समर्थ इथे सांगतात. यावरूनच 'मी कोण आहे हे? जाणण्याचा प्रयत्न न करता मी देह आहे असे विपरितज्ञानच सार्थ मानणे हेच खरे अज्ञान होय.' ह्या अर्थानेही स्वाज्ञानज्ञानिनो विरलः। उक्तीतील बोध आपणास घेता येईल.
याहीपुढे जाऊन ज्ञानोबा माऊलीं ज्ञानअज्ञानातील खरा भेद आपल्याला सोपा करून सांगतात तो त्यांच्या एका अभंगातून पाहू,
नेणण्याचें रुप तेंचि रे अज्ञान।
जाणते ते ज्ञान दोन्ही मिथ्या॥
पूर्णाची ओळखी मुळीं माया नाहीं।
कोण मी हे पाहीं शोधूनियां॥
बद्धमुक्त शून्य होसी निराकार।
म्हणे ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानी॥
ज्ञानाची ओळख नसणे, काही माहीत नसणे. म्हणजे अज्ञान, आणि माहीत असणे म्हणजे ज्ञान ह्या ज्ञानअज्ञानाच्या साध्यासोप्या व्यख्या पण ह्या दोन्ही गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने मिथ्याच आहेत. कारण ज्या पुर्णत्वाकडे मनुष्याने जाणे अत्यावश्यक आहे. परब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी माया नावांची वस्तुच नाही. जिथे माया तिथे अज्ञान भ्रम तर जिथे मायाच नसून केवळ ब्रह्म ते पूर्ण ज्ञानस्वरूप होय.
इथे माऊली म्हणतात मी कोण आहे? हे शोधणे आणि मग त्या खर्या स्वस्वरूपाची प्रप्ती करून घेणे म्हणजे खरे ज्ञान. संत ज्ञानेश्वर म्हणतात मायेपाशी असणारे ठिकाणी बद्ध मुक्त हे भाव जाऊन निराकार आत्मरुपच प्राप्त होणे हेच तत्त्वज्ञान. म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या ह्या अभंगानुसार आत्मस्वरूपाला प्राप्त न करता मायेच्या ठिकाणी अगाध ज्ञानप्राप्ती करून मी ज्ञानी झालो समजणे हेच अज्ञान होय. म्हणूनच स्वतःच्या अज्ञानाची ओळख असलेला खरा ज्ञानी जगात अगदी विरळ असतो,
स्वाज्ञानज्ञानिनो विरलः। स्वतःला ओळखणारे क्वचितच!!
लेखक :- अभिजीत काळे सर