धन साठवणाऱ्याच्या उपयोग जात नाही - संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashit Sahitya

धन साठवणाऱ्याच्या उपयोग जात नाही - संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashit Sahitya

 22-5-2022

धन साठवणाऱ्याच्या उपयोग जात नाही - 

संस्कृत सुभाषित रसग्रहण  Sunskrit Subhashit Sahitya 

सुभाषित

दातव्यं भोक्तव्यं धनविषये सञ्चयो कर्तव्यः।

पश्येह मधुकरिणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये॥

       - 'मित्र संप्राप्ती', पंचतंत्र, विष्णूशर्मा.

अर्थ :- (प्राप्त केलेले/झालेले) धन एक तर धन दूसऱ्यांना दिले गेले पाहिजे म्हणजेच दान केले पाहिजे अथवा त्याचा स्वतः भोग घेतला गेला पाहिजे. म्हणजेच कोणत्याही प्रकारे धन व्यवहारात फिरवले जायला हवे, परंतु त्याचा नुसता संचय करने योग्य नाही. हेच पहा की मधमाशा मधाचा एवढा संचय करतात पण एकेदिवशी दुसरेच कोणी (माणूस अथवा अस्वल)  त्यांनी साठविलेले हे मधरुपी धन हरुन नेते.

 टीप :- प्रत्येक मनुष्य धनार्जन करतो. वर्तमानात पैसा मिळवणे ही जीवितधारणेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कमी जास्त प्रमाणात प्रत्येक मनुष्य पैसा कमवतो. तो गरजेपेक्षा जास्त झाला की माणसाच्या गरजाही वाढत जातात किंवा बहुतांश लोकांचा कल तो खर्च करता तो साठविण्याकडे असतो. त्याची वाढ कमी काळात अनेक पटींनी व्हावी म्हणून मोहापायी पाणूस आपले धन अविश्वसनीय सूत्रांकडेही गुंतवणूक करतो असे दिसून येते.या सगळ्याचा परिपाक ते नष्ट होण्यातच होतो.

      मूळात भारतीय संस्कृतीने धनाच्या विनियोगाच्या दोनच पद्धती सांगितल्या आहेत. तो स्वतःसाठी कुटुंबासाठी आवश्यक ते भोग घेण्यासाठी खर्च करणे अथवा दान करणे, हेच ते दोन मार्ग होत. म्हणजेच धन व्यवहारात फिरायला हवे जो खर्च करता कंजूषपणे ते साठवत राहातो किंवा ते लोभापायी लवकरात लवकर वाढविण्याचा प्रयत्न करतो त्याचे धन त्याच्या उपयोगास येताच नाहीसे होते. असे नीतीकारांनी सांगितले आहे. महाकवी भर्तृहरीच्या नीतीशतकातही ह्याच अर्थाचा श्लोक आहे.

दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य।

यो ददाति, भुङ्क्ते, तस्य तृतीया गतिर्भवति॥

           - नीतीशतक

       दान देणे, उपभोग घेणे किंवा नष्ट होणे या वित्ताच्या (धनाच्या) तीन गती आहेत. जो देत नाही किंवा उपभोगत नाही, त्याच्याजवळील धन तिसर्या गतीस प्राप्त होते (नष्ट होते).

अगदी हेच सांगताना हिंदी वृन्द कवी लिहितो,

खाय खर्चे सूम धन, चोर सबै ले जाय ।

पीछे ज्यों मधु-मच्छिका, हाथ मले पछताय ।।

       ज्या धनाचा उपभोग वा व्यय (दान किंवा खर्चरुपाने) होत नाही ते चोराचिलटाच्या हाती जाते अगदी तसेच जाते जसे मधमाश्या मधुसंचय तर करतातच पण ते मध दुसरेच (मानव अथवा अस्वलासारखे प्राणी) घेऊ जातात आणि मग मात्र हात हलवत पश्चात्ताप करत बसावं लागतं.

    नीतीशतकातल्या वरील श्लोकाचा वामनपंडितानेही मनोहारीकाव्यानुवाद केला आहे,

द्रव्यास हे गमनमार्ग यथावकाश।

की दान भोग अथवा तिसरा विनाश॥

जो येथ दान अणि भोग करीन देही।

त्याच्या धनासी मग केवळ नाश पाही॥

        अवास्तव धनसंचय करणाऱ्यांचे धन तिसऱ्या गतीला तर जातेच, मात्र तो मनुष्य स्वतःचीही उत्तम गती हरवून बसतो हे सांगणारे शांतीब्रह्म संत एकनाथाचे अभंग पाहू,

कवडी कवडी घाली खांचे नित्य नूतन भिक्षा वाचे ॥१॥

अतिथासी दान तेंतों स्वप्नीं नाहीं जाण ॥२॥

पर्वकळ विधी कळे अभाग्यासी कधीं ॥३॥

ठेवुनी चित्त धनावरी सवेंचि फिरे घरोघरीं ॥४॥

जन्मा येवोनि अघोर एका जनार्दनीं भोगिती पामर ॥५॥

       एकनाथ म्हणतात माणूस कवडीकवडी करून धन वेचतो आणि ते वापरता घराच्या खाचाखोचांमध्ये भरून ठेवतो थोडक्यात त्याचा विनियोग करता साठवतो. कधी दान करत नाही कधी कोणत्या शुभ पर्वात खरेदीसाठी वापरत नाही. दारात आलेल्या अतिथीसाठी तर स्वप्नातही खर्च करत नाही. फक्त धनावर डोळा ठेऊन ते कमविण्यासाठी भटकत राहातो. अशा मनुष्याला मग पुढे घोर भोग भोगणे आलेच.

यासाठी एकनाथ पुढे सांगतात,

गाठीं बांधोनियां धना क्षणाक्षणा पाहे त्यातें ॥१॥

जाय तीर्थयात्रेप्रती धनाशा चित्तीं धरूनी ॥२॥

बैसलासे सर्प दारीं तैशापरी धुसधुसी ॥३॥

नको धनाशा मजशी जाण शरण एका जनार्दन ॥४॥

       माणूस पैसा कमवतो तो साठवतो. मग सारखे सारखे ते मोजत राहातो. साठवलेला पैसा तिर्थयात्रा किंवा इतर विनिमयाकरिता वापरत नाही.  जसा खजिन्याच्या दारवरचा साप सतत फुसफुसत असतो तसा धन साठवणारा माणूस सदैव धुसफुसत राहातो, अस्वस्थ असतो. हे असं होण्या पेक्षा देवा मला ही धनाशा देऊच नको मी तुला शरण आलो आहे मला फक्त  तुझीच प्राप्ती करायची आहे.

      संत तुकाराम धनलोभाची गती सांगताना म्हणतात,

धन मेळवूनी कोटी । सवे येरे लंगोटी ॥

पाने खाशील ऊदंड । अंती जाशिल सुकल्या तोंड ॥

पलंग न्याहाला सुपती । शेवटी गोवरया सांगाती ॥

तुका म्हणे श्याम एक विसरता श्रम ॥

         तुकोबाराय धनाभिलाषा धरूच नये म्हणताना सांगतात कितीही कोट्यावधीने धन मिळवोले तरी शेवटी लंगोटीही सोब येत नाही. पान खाऊन आयुष्यभर तोंड लाल करून रंगेलपणा केला तरी शेवटी जाताना तोंड कोरडेच राहाणार आहे. कितीही पलंग गाद्या गिरद्यांवर लोळलात तरी शेवटी तुझे आपलेच लोक तुला गोवऱ्यांवर झोपवणार आहेत, तुझ्यासाठी कोणी एक गादीही जाळणार नाही. त्यामुळे धनासाठी श्रम करता रामनाम घेण्याचे श्रम कर.

मानवी आयुष्याचा उद्देशच परमेश्वरप्राप्ती आहे. बाकी धन कितीही कमवले आणि साठवले तरी इथे सारे काही नश्वरच. म्हणूनच यतुकोबाराय कळकळीने लिहितात,

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥

उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥

    धन न्याय्य मार्गानेच कमवील. आणि ते आपले नाही असे समजून त्याचा योग्य व्यय करेल तोच एक उत्तम गती पावेल आणि ह्या मनुष्य जन्माला येऊन उत्तम भोग प्राप्त करेल. अन्यथा वेच, योग्यप्रकारे व्यय करता साठवलेले धन त्याच्या तिसऱ्या गतीला जाणारच आहे.

संकलन टीप : अभिजीत काळे,

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post