21-5-2022
संस्कृत सुभाषित रसग्रहण
Sunskrit Subhashit Sahitya
आजची लोकोक्ती - मरणं प्रकृतिः शरीरिणां।
मरणं प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः।
क्षणमप्यवतिष्ठते श्वसन्यदि जन्तुर्ननु लाभवानसौ॥ (रघुवंश ८.८७)
अर्थ
:- मरण ही शरीरधारकांची प्रवृत्ती आणि जीवन ही विकृति आहे असे ज्ञानी म्हणतात.
एखादा जीव (जन्तु) जन्माला येऊन एक क्षणभर जरी श्वास घेत जगला तरी तो त्याचा लाभच
होय.
टीप:-
रघुवंश' या
महाकाव्यामध्ये रघुवंशातील एक ज्येष्ठ राजा 'अज' (राजा
दशरथाचा पिता) याची कथा येते. राजा अज आणि त्याची पत्नी राणी इंदुमती उपवनात विहार
करत असताना, आकाशमार्गे
जात असणाऱ्या नारदमुनींच्या वीणेवरील फुलांचा हार जोराच्या वाऱ्यामुळे निसटतो.
तो खाली असलेल्या इंदुमतीच्या अंगावर पडतो आणि त्यामुळे राणी इंदुमतीचा मृत्यू
होतो. अशी कथा महाकवी कालिदासरचित रघुवंश महाकाव्याच्या आठव्या सर्गामध्ये आहे.
राणी इंदुमतीच्या अकाली मृत्यूमुळे एकपत्नी असणाऱ्या राजा अजाला असह्य शोक होतो.
पत्नीवियोगाने अतिशय दुःखी झालेल्या राजा अजाला रघुवंशाचे कुलगुरु वसिष्ठ ऋषी आपल्या शिष्याकरवी संदेश पाठवितात. त्या संदेशात
वरील श्लोक येतो.
ह्या संसारात शरीराचा मृत्यू होणे हे
शरीरधारकाचे अंतिम सत्य आहे. मरणं प्रकृतिः शरीरिणां। ही लोकोक्ती वरील श्लोकापासून प्रचलित झाली
आहे. जीव जन्माला येतो तो मृत्यूला बरोबर घेऊनच त्यामुळे जन्माबरोबरच मृत्यू ही
देखील जीवाची प्राकृतिकताच आहे. मुळात जन्म-मृत्यू या सृष्टीने धारण केलेल्या
प्रकृतीचे नश्वरता वैशिष्ट्य अधोरेखित करणाऱ्या घटना आहेत. जीव त्या दोन्हींच्या
मधलं जीवन प्रकृतीस्थानी असलेल्यस विकारांच्या सोबतीने जगत असतो, असे
या श्लोकातून कालिदासाने मांडले आहे.
महाभारताच्या शांतीपर्वामधे युधिष्ठिर व
भीष्म संवादात भीष्म युधिष्ठिराला पिता आणि पुत्र यांमधील जीवनविषयक संवाद
सांगतात. ज्याला पुढे 'पुत्रगीता' असेही
म्हटले गेले. त्यातील एक श्लोक असा,
अमॄतं चैव मॄत्युश्च द्वयं
देहप्रतिष्ठितम्।
मोहादापद्यते मॄत्यु:
सत्येनापद्यतेऽमॄतम्॥
-शांतीपर्व
(१२.१७४.३०)
अमरता
आणि मृत्यू एकाच शरिरात वास करतात. मोहातून मृत्यू येतो तर सत्याचरणारतून अमरता. इथे मृत्यू व
अमरता म्हणजे काय? तर
मोहवश होऊन स्वार्थपर जगलेलेली व्यक्ती मृत्यूपश्चात कोणाच्याही स्मरणात राहात
नाही, हे
मर्त्यपणाचे लक्षण होय. तर सत्य व सदाचरणरत व्यक्ती कायम आठवत राहाते, ही
'अमरता' होय.
अगदी भीष्मांनादेखील पिता शांतनूकडून
इच्छामृत्यूचा वर लाभलेला होता तरी त्यांनाही मरण अटळच होतं. श्रीकृष्णस्वारीने
गीतेमधे अर्जुनाला सांगतले आहेच की,
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥ (२.२७, श्रीमद्भगवद्गीता.)
जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू अटळ आसतो तर
मरण पावलेल्याला जन्मही अटळ होय. हे (जन्म-मृत्यू) अपरिहार्य आहेत. त्यामुळे
याविषयी शोक (दुःख) करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून तू (युद्धात सगळे मरणार)
याचा शोक करू नकोस.
परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते? सतत बदलणाऱ्या (परिवर्तनीय)अशा या संसारात (जगात) कोण मरत नाही? युधिष्ठिराला वनवासामधे यक्षाने विचारलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न होता "ह्या जगात सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट कोणती?" तेव्हा युधिष्ठिराचे उत्तर होते,
अहन्यहनि भूतानि गच्छन्ति
यमालयम्
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम्॥
इथे
(या पृथ्वीतलावर) दररोज माणसे (अहनिअहनि)
मरण पावत असतात (यमपुरीला जात असतात). तरीही उरलेले (जिवंत असलेले) सगळे मी कधी
मरणारच नाही अशा थाटात जगत इथेच राहू इच्छितात, याहून मोठं
आाश्चर्य कोणतं असणार?
(हेच मोठं आश्चर्य होय.)
संत कबीरदास म्हणतात,
जो उगै सो आथवै, फूले सो कुम्हिलाय।
जो चुने सो ढ़हि पड़ै, जनमें सो मरि जाय॥
उगवणारा (सूर्य, चंद्र)
मावळतो, फुलणारे
(फूलही) सुकून जाते, घडवलेली
(प्रत्येक गोष्ट) बिघडते,
जन्माला येणारा (प्रत्येक जीव) मरतो.
हेच
सत्य आहे.
उर्दूमधे एक शेर आहे,
मौत से किस को रुस्तगारी है
आज वो कल हमारी बारी है
मृत्यूपासून कोणाला सुटका मिळाली आहे. आज तो गेला उद्या आपली पाळी (बारी, क्रम) आहे. माझ्या एका गझलेचा मतला (पहिला शेर) असा आहे, मी म्हणणारे संपुन गेले बघतो आहे । रांगेत उभे अन् उरलेले बघतो आहे.।।
कालपरवा कोरोनामुळे मृत्यूच्या भीतीने
सर्व जग चिंताग्रस्त होते पण जो कधीतरी येणारच आहे त्याची काळजी करत बसण्यात काय
अर्थ आहे? तो
त्याची वेळ आली की येणारच आणि तो कधी येईल?
हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या हातात
आपल्या आरोग्याची काळजी घेणे आहे.
मरणं प्रकृतिः शरीरिणां।
संकलन
व टीप : अभिजीत काळे सर
----------------
एका क्वाली मध्ये उर्दु गीतकाराने
म्हटले आहे, मौत सबको आनी हैं, कौन इससे छुटा हैं । तु
फना नहीं हो गा ये खयाल झुठा हैं । मृत्यू हा येणारच. या जगात अमरपट्टा
घेऊन कोणीही आलेला नाही. म्हणून मृत्यू येण्याच्या आधी आपले जीवन परमेश्वरभक्ती योजणे
हाच जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्याचा एकमेव उपाय आहे. परमेश्वराच्या अनन्य भक्तीने
मृत्यूनंतरचा मार्ग सुखकर होतो. आणि पुन्हा जन्मावे-मरावे लागत नाही.