भामिनी विलास संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashits

भामिनी विलास संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

Sunskrit Subhashits 


छंद :- उपजाती

गीर्भिर्गुरूणां परुषाक्षराभिस्तिरस्कृता यान्ति नरा महत्त्वम्!

अलब्धशाणोत्कषणा नृपाणां न जातु मौलौ मणयो वसन्ति!!

कवि :- जगन्नाथ पंडित

गुरूणां  ( मोठ्यांच्या) 

परुषाक्षराभिः ( पुरुष= कठोर, अक्षराभिः= वर्णांनी युक्त) 

गीर्भिः ( वाणीनं) 

तिरस्कृताः ( झिडकारलेले, तिरस्कारलेले) 

नराः ( लोक) 

महत्त्वं यान्ति (मोठे होतात, मोठेपणा मिळवतात). 

अलब्धशाणोत्कषणा (अ-लब्ध न मिळालेले; शाण = कसोटीचा दगड,  उत्+ कषणा = घासणे 

(जे कसोटीच्या दगडावर घासले गेले नाहीत) 

मणयः ( मणी)   

नृपाणां ( राजांच्या)  

मौलौ ( मस्तकावर)  

न जातु ( कधीच) 

वसन्ति ( रहात नाहीत).

हा श्लोक जगन्नाथ पंडितांच्या भामिनीविलासामधून निवडला आहे.

 कोणतीही व्यक्ती लहान असताना आजूबाजूच्या वडिलधाऱ्या मंडळींकडून, गुरूंकडून अनेक गोष्टी शिकत असते. ही मंडळीही मुलाला शिस्त लावायचा प्रयत्न करतात. वागण्यातल्या, अध्ययनातल्या त्याच्या चुका दाखवून देतात. त्याच्यावर रागावतात. प्रसंगी लागेल असं बोलतात. लहान मुलाच्या चुका दाखवून दिल्या नाहीत तर मोठेपणी त्या चुका त्यांच्याकडून सतत होत रहातात, तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जातो आणि त्याचं व्यक्तिमत्त्व खुंटतं. लहानपणीच जर नीट विसरत लावली, कधी आंजारून गोंजारून,  कधी कठोर बोलून तर त्या मुलाच्या वर्तणुकीतले दोष नाहिसे होतात. 

जर फक्त लाड करून चुकांवर पांघरूण घातलं तर ते मूल मोठेपणी दुर्गुणांमुळे मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलू शकत नाही. जसं रत्न घासून पुसून, पैलू पाडून प्रकाशमान करावं लागतं तसंच मुलांचाही. ज्या मुलांना शिस्तीची शिकवण मिळाली नाही, त्यासाठी त्यांना मोठी माणसं रागावली नाहीत तर  मोठेपणी ती मुलं मोठी होत नाहीत. कसोटीच्या दगडावर घासलेलं रत्न जसं राजाच्या मुकुटात विराजमान होतं तसंच लहानपणी शिस्तीत वाढलेली व्यक्ती समाजातली मानाची जागा मिळवणे. हा अगदी साधा विचार जगन्नाथानं आपल्या स्वतंत्र आणि आकर्षक शब्दरचनेत व्यक्त केला आहे.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

***************************

किं तीर्थं? हरिपादपद्मभजनम्!

किं रत्नमच्छामतिः!

किं शास्त्रम्? श्रवणेन यस्य गलति द्वैतान्धकारोदयः!

किं मित्रम्? सततोपकाररसिकस्तत्त्वावबोधस्सखे!

कः शत्रुर्वद खेददानकुशलो दुर्वासनासञ्चयः!!

- पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

किं तीर्थम्? पवित्र स्थान कोणतं? 

हरिपादपद्मभजनम्! ( विष्णूच्या चरणकमलांचं पूजन).

किं रत्नम्?( सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती?)  

अच्छामतिः ( सन्मति). 

किं शास्त्रम्? ( शास्त्र कशाला म्हणावं?) 

यस्य ( जे) 

श्रवणेन (ऐकल्यानं) 

द्वैतान्धकारोदयः ( द्वैतरूपी अंधाराचा उदय ) 

गलति ( नष्ट होतो). 

सखे, किं मित्रम्? अरे मित्रा, मित्र कुणाला म्हणावं? 

सतत (नेहमी) 

उपकार (मदत करण्याची) 

रसिकः ( आवड असलेला), 

तत्त्व ( सत्याची) 

अवबोधः ( जाणीव करून देणारा)

कः शत्रुः वद ? शत्रू कोण ते सांग. 

खेद ( दुःख) 

दानकुशलः ( देण्यात पटाईत), 

दुर् ( वाईट) 

वासना ( इच्छा) 

सञ्चयः ( भरलेला) 

महत्त्वाच्या संकल्पनांच्या नेमक्या शब्दात व्याख्या देणं हे अत्यंत कौशल्याचं काम जगन्नाथ पंडितांनी त्यांच्या स्पष्ट आणि आकर्षक शैलीमध्ये प्रस्तुत श्लोकात दिलेल्या आहेत. तीर्थक्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर परमेश्वराचं चिंतन, यापेक्षा पवित्र गोष्ट असूच शकत नाही. सद्बुद्धीहून श्रेष्ठ आणि मौल्यवान् गोष्ट असूच शकत नाही. अच्छ/ अच्छा हा शब्द वेदकालीन संस्कृतमध्ये विशेष वापरला जायचा. त्याचा प्रस्तुत संदर्भातला अर्थ सत्य असा आहे. 

सत्याची निवड करणारी बुद्धीच अमूल्य रत्न आहे. ज्यामुळे आपपरभाव गळून पडतो, मी आणि इतर वेगळे आहोत हा विचार मनात येतायेताच जे दर्शन तो विचार घालवून टाकते तेच शास्त्र. जो नेहमी मदत करतो तो मित्र. पण फक्त मदत करणारा नाही तर  योग्य सल्ला देणारा, आपण चुकत असलो तर त्या चुकीचीही जाणीव करून देणारा. जो सतत दुःख देतो, वाईट इच्छा बाळगतो तो शत्रू.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

*********************

तोयैरल्पैरतिकरुणया भीमभानौ निदाघे 

मालाकार व्यरचि भवता या तरोरस्यपुष्टिः!

सा किं शक्या जनयितुमिह प्रावृषेण्येन वारां

धारासारानपि विकिरता विश्वतो वारिदेन!! 

पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

हे मालाकार, ( अरे माळ्या), 

भीमभानौ ( भीम= भयंकर, भानु= सूर्य) ( भयंकर सूर्य असलेल्या) 

निदाघे ( उन्हाळ्यात) 

अतिकरुणया ( अत्यंत दयेने) 

भवता ( आपण) 

अल्पैः तोयैः ( थोड्याशा पाण्यानं) 

अस्य ( त्या) 

तरोः (तरु= झाड, मालवणी भाषेत भाताच्या रोपांना तरवो म्हणतात. झाडाची, झाडाला) 

 पुष्टिः  व्यरचि ( पुष्टीची रचना केलीस) 

सा (ती) 

किम् (काय) 

इह (इथे) 

धारासारान्वारां ( पाण्याच्या मोठ्या धारा ) 

विश्वतः (सर्व बाजूंनी)  

विकिरता अपि ( ओतणाऱ्या, ओतूनही)  

प्रावृषेण्येन(पावसाळ्यातल्या) वारिदेन ( ढगाला)  

जनयितुं ( निर्माण करणं) 

शक्या?  ( शक्य आहे काय?)

भामिनीविलासचे चार भाग आहेत- 

१) प्रास्तविकविलास 

२) शृङ्गारविलास 

३) करुणाविलास 

४) शांतविलास. 

प्रास्ताविकविलासामध्ये अनेक अन्योक्ति असल्यामुळे त्याला अन्योक्तिविलास असंही नाव आहे. अन्योक्ति म्हणजे निसर्गातील घटकांच्या , व्यक्तीच्या वर्णनाच्या मिषानं एखादी व्यक्ती किंवा मनुष्यस्वभावाचं वर्णन करणं. प्रस्तुत श्लोकात एका माळ्यानं अत्यंत प्रेमानं कठिण परिस्थितीत झाड कसं वाढवलं ते सांगितलं आहे. 

जगन्नाथाची शब्दरचना नेहमीच नवीन आणि नेमकी असते. आग ओकणारा उन्हाळ्यातला भयंकर सूर्य. उन्हाळ्यात पाणी ते कितीसं मिळणार? अशा परिस्थितीत एका वाळणाऱ्या रोपट्याची माळ्याला दया आली. त्यानं तुटपुंज्या पाण्यातलं थोडं थोडं पाणी घालून ते रोपटं, जगवलं, वाढवलं. त्या कुडचाभर पाण्यानं त्या झाडाला जीवदान मिळालं. त्या पाण्याची सर पावसाळ्यातल्या पाण्याच्या वर्षावाला कशी येईल? 

जगन्नाथाचं पूर्ण चरित्र उपलब्ध नाही. परंतु, त्याचा तंजावरच्या राजानं अपमान केला.त्यानंतर त्याला शहाजहाननं आश्रय दिला. अशी एक कथा प्रसिद्ध आहे. या काळात त्यानं अनेक ग्रंथ रचले. त्याच्या पांडित्याची ख्याती ऐकून त्याला अनेक राजसभांमध्ये निमंत्रणं येऊ लागली. तथापि, शहाजहानने त्याच्या कठिण परिस्थितीत त्याला दिलेलं प्रेम आणि आधार तो विसरला नाही. हा त्याच्या चरित्राचा भाग या श्लोकात सूचित केला असावा. 

कठिण परिस्थितीत मनापासून केलेली मदत नेहमी श्रेष्ठ असते हे माळ्याच्या वर्णनाच्या मिषानं सांगतलं.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

=========

निष्णातोऽपि च वेदान्ते साधुत्वं नैति दुर्जनः!

चिरं जलनिधौ मग्नो मैनाक इव मार्द्दवम्!!

--पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

वेदान्ते ( वेदान्तशास्त्रामध्ये) 

निष्णातः ( कितीही तरबेज असला)  

अपि ( तरी)

  दुर्जनः ( दुष्ट व्यक्ती) 

साधुत्वं ( सज्जन )

 न  एति ( होत नाही).  

जलनिधौ  ( समुद्रामध्ये) 

चिरं ( बराच काळ) 

 मग्नः ( बुडालेला) 

मैनाकः ( मैनाक पर्वत) 

मार्द्द्वम् नैति  ( ज्याप्रमाणे  

मऊ होत नाही त्याप्रमाणे). 

दुष्ट व्यक्ती कितीही शिकली, शास्त्रपारंगत झाली तरी तिचा दुष्टपणा जात नाही. आपपरभाव नाहीसा करणं ही वेदांत शास्त्राची मुख्य शिकवण आहे. परंतु, या शास्त्राच्या परिभाषेत एखादा दुष्ट माणूस कितीही तरबेज असला तरी त्याच्या मनाचा दुष्टपणा कमी होत नाही. दुष्टपणा म्हणजे काय? वाईट वागणं, दुसऱ्याला त्रास देणं.  ती दुसरी व्यक्ती माझ्याहून वेगळी आहे ही भावना जागृत असल्याखेरीज त्रास दिला जात नाही. त्यामुळे दुष्ट माणूस वेदांतामध्ये कितीही निष्णात असला तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. 

यासाठी जगन्नाथानं मैनाक पर्वताचं उदाहरण दिलं आहे. मैनाक पर्वत असंख्य वर्ष समुद्रात बुडालेला असला तरी ठिसूळ होईल का? 

मैनाक हा संस्कृत पुराणांमधला एक काल्पनिक पर्वत. तो हिमालय आणि त्याची पत्नी मेना यांचा पुत्र, पार्वतीचा भाऊ. पूर्वी पर्वतांना पंख होते. ते इंद्रानं छाटून टाकले. आपलेही पंख इंद्र कापेल म्हणून‌ मैनाक समुद्रात‌ दडी मारून बसला अशी एक पुराणकथा आहे. याचा सुरेख उपयोग उपमेसाठी केला आहे. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

___________________

नीरान्निर्मलतो जनिर्मधुरता रामामुखस्पर्धिनी!

वासो यस्य हरेः करे परिमलः गीर्वाणचेतोहरः!

सर्वस्वं तदहो महाकविगिरां कामस्य चाम्भोरुह!

त्वं चेत्प्रीतिमुरीकरोषि मधुपे किं त्वां तथा चक्ष्महे?

…...पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

हे अम्भोरुह ( अम्भस्= पाणी, रुह = वाढणारे, पाण्यात वाढणारे कमळ) , 

निर्मलतः ( स्वच्छ) 

नीरात् ( पाण्यातून)  

जनिः  ( जन्म), 

रामामुखस्पर्धिनी ( रामा= आनंददायक स्त्री,  

मुखस्पर्धिनी= मुखाशी स्पर्धा करणारा)  

मधुरता ( गोडवा) , 

यस्य ( ज्याचा)  

वासः  ( निवास) 

हरेः ( विष्णूच्या)  

करे ( हातात),  

गीर्वाणचेतोहरः ( गीर्वाण = देवता, चेतोहरः = मनाला मोहित करणारा)

 परिमल ( सुगंध) ,  

तदहो ( शिवाय) 

महाकविगिरां ( महाकवींच्या वाणीचं)  

कामस्य च सर्वस्वं ( आणि मदनाचे सर्वस्व असलेला )  

त्वं ( तू)  

चेत् ( जर) 

मधुपे ( मधु = मध; प= पिणारा, भुंगा, भुंग्याचं)  

प्रीतिम् ( प्रेम) 

उरीकरोषि( स्वीकारलंस)  

किं तथा त्वां चक्ष्महे ( मग आम्ही तुझ्याबद्दल काय बोलणार?)

सर्वगुणसंपन्न व्यक्तीची लहान व्यक्तीशी मैत्री पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. तेच आश्चर्य या श्लोकात कमळ आणि भुंगा यांच्या रूपकातून चित्रित केलं आहे.

 कमळ स्वच्छ पाण्यातून उगवतं. नेहमी कमळाला पंकज ( चिखलात जन्मणारे) म्हणत असले तरी 

कमळाची भारतीय विशेषतः वैदिक मनातली प्रतिमा वेगळी आहे. 

संपूर्ण सृष्टी ज्या पाण्यापासून निर्माण झाली त्याला सलिल (premordial water) म्हणतात. कमळ हे याच पाण्याचं रूप आहे ही वैदिक वाङ्मयातली धारणा आहे.

जगन्नाथ पंडित हा फक्त शास्त्री नसावा. तो वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण असावा. त्याखेरीज ' मल नसलेल्या पाण्यापासून उत्पत्ती' हे शब्दच त्यानं वापरले नसते. जसं कमळाचा जन्म जगदुत्पत्ती करणाऱ्या पाण्यापासून तसा श्रेष्ठ व्यक्तीचा जन्मही श्रीमंत आणि घरंदाज घराण्यातला. रूपही सुंदर स्त्रीशी स्पर्धा करणारं. विष्णूसारख्या श्रेष्ठ देवाचा सतत सहवास. मनमोहक सुवास. प्रतिभाशाली कवी आणि कामीजन यांचं तर कमळ हे सर्वस्व. असं असतानाही भुंग्यासारख्या क्षुद्र किड्याचं प्रेमही ते स्वीकारतं. काही गुणी व्यक्तीचंही तसंच आहे. अगदी गरीब घराण्यातल्या मित्रांचं प्रेम आणि मैत्रीही ते मनापासुन स्वीकारतात. इतर लोक मात्र अशा मैत्रीबाबत आश्चर्यचकित होतात. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

___________________

दवदहनजटालज्वालजालाहतानां

परिगलितलतानां म्लायतां भूरुहाणाम्!

अयि जलधर, शैलश्रेणिशृङ्गेषु तोयं

वितरसि बहु कोऽयं श्रीमदस्तावकीन:!!

…….पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

दवदहनजटालज्वालजालाहतानां 

(दवदहन= दावाग्नि, वणव्यामधील अग्निरूपी 

जटाल (लांबलचक) 

ज्वालजाल( ज्वाळांच्या जाळ्यामुळे) 

आहत (आघात झालेल्या) 

परिगलितलतानां (ज्यांच्यावरच्या वेली पूर्णपणे गळून गेलेल्या आहेत अशा) 

म्लायतां ( म्लान झालेले) 

भूरुहाणां ( भू= जमीन, रुह= वाढणारे = वृक्ष असताना) 

अयि ( अरे ) 

जलधर ( मेघा), 

शैलश्रेणिशृङ्गेषु ( शैल = पर्वत, श्रेणि = रांग, शृङ्ग = शिखर, पर्वतरांगांच्या शिखरांवर) 

बहु ( खूप)  

तोयं ( पाणी) 

वितरसि ( वि+ तृ = वाटणे, देणे, वाटतोस) . 

कोऽयं ( हा कोणता) 

तावकीनः ( तुझा) 

श्रीमदः?( श्रीमंतीचा गर्व?)

सत्पात्री दान करणं योग्य. वणव्यात होरपळून गेलेल्या झाडांना पाण्याची गरज असते. पर्वतशिखरांना पाण्याचा उपयोग नाही. असं असतानाही ढग शिखरांवर पाण्याचा वर्षाव करतात. ढगांना जणु, श्रीमंतीची मस्तीच चढली आहे अशी कल्पना करून मदोन्मत्त धनिकाला उद्देशून कदाचित् एखाद्या राजाला उद्देशून लिहिलेली ही अन्योक्ति आहे.

सुरवातीच्या दोन ओळींमध्ये वृक्षांचं अत्यंत करुण वर्णन अनुप्रास अलंकार वापरून केलं आहे.

 ज आणि ल या वर्णांची पुनरावृत्ती पहिल्या ओळीत दिसते. ल वर्णाची पुनरावृत्ती दुसऱ्या ओळीच्या सुरवातीला तर श् वर्णाची पुनरावृत्ती तिसऱ्या ओळीतल्या समासात.

 संस्कृत भाषेत ' असे असताना' हा अर्थ व्यक्त करण्यासाठी षष्ठी आणि सप्तमीचा उपयोग करतात. यांना अनुक्रमे सतः षष्ठी आणि सति सप्तमी म्हटले जाते.  षष्ठीचा उपयोग मात्र 'अनादर' दाखवण्यासाठी करतात.

 झाडं वणव्यात होरपळलेली असताना ढगानं पर्वत शिखरांवर पाण्याचा वर्षाव केला. वृक्षांच्या अनादर करून पाण्याचा वर्षाव केला  हा अर्थ व्यक्त करण्यासाठी भूरुह आणि त्याची इतर विशेषणे यांची षष्ठी वापरली आहे. सतः षष्ठीचा हा वापर ढगांची बेपर्वाई सांगण्यासाठी अत्यंत पोषक आहे.

ढग पाण्यानं भरलेला असला तरच त्याची तुलना धनिक व्यक्तीशी केली जाऊ शकते. म्हणून जलधर या योग्य शब्दाचा प्रयोग केला आहे. ' वृथा वृष्टिः समुद्रेषु…..' या श्लोकाचा तात्पर्यार्थ अत्यंत आकर्षक शब्दात मांडला आहे. वणव्यातल्या झाडांचे इतके करुण शब्दचित्र जगन्नाथच रेखाटू जाणे. श्रीमंत ढगाच्या मिषानं  धनिक व्यक्तीला खडसावणही जगन्नाथाच्याच व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग होता.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

====

नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कदापि कृथा:!

अत्यंतसरसहृदयो यतः परेषां गुणगृहीतासि!!

          पंडितराजजगन्नाथ, भामिनीविलास

हे कूप ( विहिरी), 

अहं ( मी)  

नितरां ( खूप) 

नीचः ( नीच = खोल) 

अस्मि ( आहे)  

इति ( असे)  

खेदं ( दुःख) 

त्वं ( तू)  

कदा ( कधी) 

अपि ( च) 

मा  कृथाः ( करू नकोस);! 

यतः ( कारण) 

त्वम् ( तू) 

अत्यंतसरसहृदयः (तुझ्या अंतःकरणात पाणी असून तू) 

परेषां (दुसऱ्याची) 

गुणगृहीता ( दोरी धरणारी )

असि ( आहेस).

ही कूपान्योक्ति  ( विहिरीला उद्देशून लिहिलेली अन्योक्ति) सद्गुणी पण लहान जातीच्या भूपाला ( राजाला) उद्देशून आहे. श्लेषालंकार असल्यामुळे या श्लोकाचे दोन अर्थ होतात, एक विहिरीच्या संदर्भातला आणि दुसरा राजाच्या संदर्भातला.*

कूप हा शब्द संस्कृत भाषेत पुंलिगी असल्यामुळे भूप या पुंलिंगी शब्दाशी जुळतो आणि कूपाची सर्व विशेषणे भूप शब्दाला लावली जातात. मराठी भाषेत मात्र कूप या अर्थाचा विहिर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे, मराठी भाषांतरामध्ये लिंगव्यत्ययाचा दोष येतो. 

 'मी खूप खोल आहे' असा निराशाजनक विचार मनात येऊन विहिरीला दुःख होतं. त्यावर कवी तिची समजूत काढतो,' तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तुझ्या हृदयात पाणी आहे. ते पाणी काढण्यासाठी लोक गुण=दोरी वापरतात. तात्पर्य, तुझ्या पाण्याचा उपयोग इतरांना होतो.

अन्योक्ति असल्यामुळे हा श्लोक खरंतर राजाचंच वर्णन करणारा आहे. राजा ( कदाचित् शहाजहान किंवा जगन्नाथाचा मित्र दारा शिकोह ) म्लेच्छ, नीच जातीचा. कवी राजाला म्हणतो, ' मी नीच जातीचा आहे' असं दुःख अजिबात करू नकोस. कारण तू रसिक आहेस आणि दुसऱ्यांचे गुण तू ओळखतोस. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

===============

जनकः सानुविशेषो जातिः काष्ठं भुजङ्गमैः सङ्गः!

स्वगुणैरेव पटीरज यातोऽसि तथापि महिमानम्!!

पंडितराज जगन्नाथ, भामिनीविलास

जनक: (पिता) 

सानुविशेषः ( एक विशिष्ट पर्वत),

 जातिः (जात) 

काष्ठम् ( लाकूड),

भुजङ्गमैः ( सापांशी) 

सङ्गः ( संगत). 

तथापि, (तरीही) 

हे पटीरज ( हे चंदना), 

स्वगुणैः एव ( अंगच्या गुणांमुळेच) 

महिमानम् ( मोठेपणाला) 

यातः ( गेला) 

असि ( आहेस). 

जन्म कोणत्या कुळात झाला याला महत्त्व नसून अंगच्या गुणांमुळेच मोठेपणा मिळतो हे  पटीरज म्हणजे चंदनाच्या अन्योक्तिद्वारे सांगितलं आहे.

चंदनाचं झाड उगवतं ते मलयपर्वतावर. ते झाड असल्यामुळे त्याचं स्वरूप, जातकुळी लाकडाचीच. पर्वत आणि लाकूड दोन्हीही अचेतन. शिवाय, चंदनाच्या झाडाला भुजंगम  म्हणजे साप कवटाळून बसतात. अचेतन वस्तूंपासून जन्म आणि दुष्टांचा सहवास असला तरी अंगच्या सुवासामुळे चंदनाची कीर्ती जगभर पसरते. त्यामुळे गुण महत्त्वाचे, आई-वडील, मित्र-मैत्रिणी यावर मोठेपणा किंवा कीर्ती अवलंबून नसते. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

===========

तीरे तरुण्या वदनं सहासम्

नीरे सरोजं च मिलद्विकासम्!

आलोक्य धावत्युभयत्र मुग्धा

मरन्दलुब्धालिकिशोरमाला!!

शृंगारविलास, पंडितराज जगन्नाथ

तीरे ( नदीकाठी)

 तरुण्याः ( तरुणीचं) 

सहासं ( हास्यासहित असलेलं) 

वदनं ( मुख) 

च नीरे ( पाण्यात) 

मिलद्विकासं ( मिलत् = मिटलेलं, विकासम् = विकसित झालेलं,  अर्धवट उमललेलं)  

सरोजम् ( सरः = तलाव, ज = जन्मलेलं कमळ) 

आलोक्य ( पाहून) 

मुग्धा ( वेडी) 

मरन्द ( मध ) 

लुब्धा ( लालचावलेली) 

अलि ( भुंग्यांच्या) 

किशोर ( तरुणांची) 

माला ( रांग) 

उभयत्र ( दोन्हीकडे) 

धावति ( धावते).

शृंगारविलास हा भामिनीविलासाचा दुसरा अध्याय. यातही प्रास्ताविकविलासाप्रमाणेच स्फुट श्लोक आहेत. नादमाधुर्याच्या बरोबरीनेच नवीन कल्पना या श्लोकांमध्ये दिसतात.

 प्रस्तुत श्लोकात तलावाच्या काठावर बसलेली  सस्मिता तरुणी आणि तलावातलं कमळ यांची तुलना कवीनं पठडीतल्या पद्धतीनं न करता वेगळीच कल्पना मांडून केला आहे. तरुणीच्या मुखाला कमलाची उपमा संस्कृत साहित्यात नवीन नाही. नदीकाठी तरुणीचं मंद स्मित करणारं मुखकमल आहे तर पाण्यामध्ये अर्धवट उमललेलं कमळ आहे. 

हे दोन्ही पाहून मध प्यायला लालचावलेली बालभृंगांची रांग दोन्हीकडे धाव घेते आहे. हे भुंगे अनुभवी नाहीत. त्यामुळे त्यांना मुखकमल आणि खरं कमळ यातला फरक कळत नाही. म्हणून त्यांना मुग्ध ( वेडे) हे विशेषण वापरलं आहे. अतिशय सोपी शब्दरचना आणि नवीन कल्पना यामुळे हा श्लोक लक्षात रहातो.

============

संस्कृत सुभाषित रसास्वाद

निर्दूषणा गुणवती रसभावपूर्णा

सालंकृतिः श्रवणकोमलवर्णराजिः!

सा मामकीनकवितेव मनोऽभिरामा

रामा कदापि हृदयान्मम नापयाति!!

करुणाविलास, पंडितराज जगन्नाथ

निर्दूषणा ( निर्दोष) 

गुणवती ( गुणी) 

रसभावपूर्णा ( रस आणि भाव यांनी संपृक्त) 

सालंकृतिः ( अलंकारयुक्त) 

श्रवणकोमलवर्णराजिः ( श्रवणीय असा कोमल वर्ण असलेली, गोड बोलणारी) 

सा (अशी ती) 

मामकीनकवितेव ( मामकीन = माझ्या, कविता + इव =  कवितेप्रमाणे मनोभिरामा ( मनाला आनंद देणारी) 

रामा ( सुंदर स्त्री) 

कदापि ( कधीही)

 मम ( माझ्या) 

हृदयात् ( मनातून)

 न अपयाति ( दूर जात नाही.)

करुणाविलास हा भामिनीविलासाचा तिसरा अध्याय. जगन्नाथाचं चरित्र संपूर्ण उपलब्ध नाही. साधारणतः १५९० ते १६६० हा त्याचा काळ असावा. त्यानं सुरुवातीचं शिक्षण स्वतःच्या वडिलांकडे, पेरुभट्टांकडे घेतलं. हा काळ त्याकाळच्या अत्यंत वैभवशाली विजयनगर साम्राज्याचा अस्तकाल होता. त्यामुळे कवींना आणि शास्त्रींना राजाश्रय मिळण्याची शक्यता नसल्यामुळे जगन्नाथ जयपूरला आला आणि तिथं त्यानं स्वतःची  शास्त्रपाठशाला स्थापन केली. जयपूरमध्ये त्याची गाठ फारसी जाणणाऱ्या एका मौलवीशी पडली. मुळातच बुद्धिमान असणाऱ्या जगन्नाथानं फारसी भाषा आणि साहित्य आत्मसात केलं. 

याच मौलवीनं जगन्नाथाला शहाजहानला भेटण्याचा सल्ला दिला. दिल्लीला गेल्यावर तो लवंगी नावाच्या शहाजहानच्या हिंदू पत्नीपासून झालेल्या मुलीच्या प्रेमात पडला अशी कथा सांगितली जाते. लवंगी आणि भामिनी एकच की भिन्न् हे निश्चित सांगता येत नाही. भामिनी हे विशेषण होतं की विशेषनाम हे देखिल ठामपणे सांगता येत नाही. पण जगन्नाथानं भामिनीवर समरसून प्रेम केलं हे शृंगारविलासामधून स्पष्ट होतं. पुढे राजाश्रय गेल्यावर जगन्नाथ वाराणसीला आला. तिथल्या पंडितांनी त्याला वाळीत टाकलं. त्यातच त्यांची प्रिय पत्नी निवर्तली. त्याचा शोक करुणाविलासाच्या प्रत्येक श्लोकातून व्यक्त झाला आहे.

गन्नाथाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे थोडासा उद्धटपणाकडे झुकणारा अहंकार आणि स्वतःच्या कवितेबद्दलचा सार्थ अभिमान. कविता आणि पत्नी या दोघींनाही शोभतील अशा द्व्यर्थी विशेषणांचा समर्पक उपयोग करून श्लेष अलंकार साधला आहे. आपली स्वतःची कविता निर्दोष आहे, काव्यगुणांनी परिपूर्ण आहे,  रस आणि भाव युक्त आहे याचा जगन्नाथाला अभिमान आहे. शोभतील अशा अलंकारांचा सुयोग्य उपयोग त्याच्या कवितेत दिसतो हे ही त्याला माहित आहे. ती लोकांना आवडते, रसिकांच्या मनात रुंजी घालत असते याची त्याला जाणीवही आहे. जशी त्याची कविता तशीच त्याची पत्नी. ती त्याच्या मनातून कधीच गेली नाही. 

पत्नीचा विरह आणि वाराणसीतला विजनवास त्याला सहन झाला नाही. गंगेच्या पायऱ्यांवर बसून गंगेची आर्त आळवणी करत त्यानं गंगालहरी काव्य रचलं. एकेका श्लोकाबरोबर गंगेचा प्रवाहदेखिल एकेक पायरी चढत वर आला आणि त्यातच जगन्नाथानं जलसमाधी घेतली अशीही कथा प्रचलित आहे. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे) 

=

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post