06-12-2022
महाभारतातील
१४ सर्वात शक्तीशाली योद्धे -
१)
कुंतीपुत्र अर्जुन :-
महाभारत
युद्धातला सर्वात शक्तीशाली योद्धा असलेल्या अर्जुनाला कोण ओळखत नाही. श्रीकृष्णभगवंतांचा प्रिय भक्त, अनसूय अर्जुन दिव्यास्त्रांनी
संपन्न असा योद्धा होता. अर्जुनाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे
तिन्ही लोकाचा स्वामी असलेल्या भगवंतांची कृपादृष्टी त्याच्यावर होती. भगवंतांची कृपा असणे या पेक्षा मोठे शस्त्र नाही. देवतांना
अजेय असलेला अर्जुन अद्वितीय योद्धा होता. प्रत्यक्ष महादेवासोबत
त्याने युद्ध केले होते. व ते युद्ध अनिर्णित राहिले होते.
२)
बर्बरीक :- भीमाचा
नातु आणि घटोत्कचाचा मुलगा बार्बरीकाकडे तीन बाणा होते. ते दिव्यास्त्र होते. त्या फक्त तीन बाणांमध्ये संपूर्ण
युद्ध संपविण्याची अलौकिक क्षमता असलेला बर्बरीक हा एकमेव योद्धा योद्धा होता. बर्बरीकाच्या
आईने त्याला. विचारले की, तू कोणत्या बाजुने
लढशील? तेव्हा तो उत्तरला ‘जे हरतील त्यांच्या
बाजुने मी युद्ध करीन’ आणि तो महाभारत युद्धात भाग घेण्यासाठी
निघाला. सर्वज्ञ परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत हे सर्व जाणत होते
की, विजय पांडवांचाच होणार, आणि बर्बरीक
हा कौरव सैन्याकडून युद्ध करण्यास उभा राहील आणि निकाल कौरवांच्या बाजुने लागेल.
म्हणून भगवंतांनी एका ब्राम्हणाचे मायावी रुप धारण केले व बर्बरीकाला
रस्त्यात गाठले. व विचारले, वीर तू कोठे
जात आहेस? ‘मी महाभारत युद्धात भाग घेणार आहे’ :
भगवंत विचारतात, ‘मग हे तीनच बाण का?’
बर्बरीक म्हणाला, ‘लोक किती आहे?’
‘तीन लोक आहेत,
स्वर्ग मृत्यू पाताळ’
यावर बर्बरीक म्हणाला ‘मग चौथा बाण कोणासाठी वागवू?’
देवाने आश्चर्याने विचारले, ‘एवढे सामर्थ्य आहे का या बाणात?’
‘हो, तिन्ही लोक मी इथूनच विंधू शकतो’
‘पाताळ लोक विंधून दाखव
बरं का?’
बर्बरीकाने विंधून प्रात्यक्षिक
करून दाखवले. यावर ब्राम्हणरूपी श्रीकृष्णदेव म्हणतात,
‘माग प्रसन्न झालो’
यावर बर्बरीक म्हणाला, ‘मी क्षत्रिय आहे, कोणापुढे हात पसरत नाही, तुम्हीच माझ्याकडून काही मागून घ्या’
भगवंत म्हणाले, ‘ठीक आहे तुझे शीर दे’
बर्बरीकाला धक्का बसला. त्याच्या लक्षात आले. समोरची व्यक्ती ब्राम्हण नाही,
साधारण नाही. तो म्हणाला ‘महाराज, आपण आपल्या मुळ रूपात या’ भगवंत आपल्या मुळ रूपात आले. बर्बरीकाने नमस्कार केला.
व म्हणाला, ‘मी शीर देतो, जशी आपली आज्ञा पण मला महाभारत युद्ध पाहायची इच्छा आहे.’
भगवंत म्हणाले, ‘तुला महाभारत दिसेल. तथास्तु’
आणि त्या शुरवीराने तलवार हातात
घेतली आणि आपल्या मानेवर घाव घातला. आणि शीर भगवंतांच्या
हातात दिले. भगवंतांनी त्याला सूंपर्ण युद्ध दिसावे म्हणून ते
शीर उंच स्थानावर नेऊन चांगल्याप्रकारे व्यवस्थीत ठेवले. तिथून
तो सर्व पाहू लागला. आणि महाभारत युद्ध संपल्यानंतर त्याने प्राण
सोडला. त्याला नित्यमुक्ती प्राप्त झाली, तो भगवत्प्राप्तीला गेला. असा
बर्बरीक एक महान योद्धा होता.
३)
घटोत्कच :- दुसरा
पांडव भीमसेन आणि हिडींबा यांच्यापासून जन्मलेला हा महापराक्रमी
पुत्र याने रात्रीच्या युद्धात द्रोणाचार्य, दुर्योधनासहीत सर्व
कौरव सैन्यांला भयंकर त्रास दिला. कौरवांचे लाखो योद्धे यमसदनी
पाठवले. आणि आपल्या मायावी शक्तीने कर्णावर शिळा वर्षाव केला.
शेवटी दुर्योधनाच्या आग्रहाने कर्णाने त्याच्याजवळ असलेली अमोघ
वासवी शक्ती घटोत्कचावर प्रेरली. ती कर्णाने अर्जुनासाठी राखून
ठेवली होती, ती शक्ती अमोघ होती. त्यामुळे
घटोत्कच वाचू शकला नाही. मरतांनाही घटोत्कचाने विशाल रूप धारण
केले. व कौरवांच्या १ अक्षौहिणी सैन्यावर जाऊन पडला. ती सर्व सेना त्याच्या विशाल देहाखाली दबून मरण पावली. असा भीमपुत्र घटोत्कच एक महान योद्धा होता.
४)
दानवीर कर्ण :- कर्णही
एक महायोद्धा होता. आणि दैवीसंपत्तीचा पुरुष होता.
पण निव्वळ वाईट संगतीमुळे तो वाया गेला. त्या वाईट
संगतीमुळे त्याच्याकडून अनेक वाईट कर्मे घडली. आणि शेवटी अधर्माच्या
बाजुने लढला. काही कादंबरीकारांनी आपल्या कल्पनाविलास वापरून
कर्णाला चांगले साबीत करण्याचा प्रयत्न केला व तो काही अर्थाने यशस्वीही झाला.
पण त्याला महाभारताचा आधार नाही. इतर कुठल्याही
ग्रंथात कर्ण एक उत्कृष्ट व्यक्ती होती असे आढळत नाही. या उलट
तो दुर्योधनाच्या पापाचा भागीदार होता असेच महाभारतात बऱ्याच ठिकाणी आढळून येते.
कर्णाजवळ ब्रम्हास्त्रादिक इतरही अनेक दिव्यास्त्रे होती, पण ते त्याच्या उपयोगी पडले नाहीत. कारण त्याने गुरुचाच
शाप जोडून घेतला होता. कर्ण एक महान योद्धा होता. पण अर्जुनापेक्षा तो महान होता असे म्हणणे तद्दन चुकीचे आहे. अर्जुनासमोर कर्ण कवच कुंडलांचा आश्रय घेऊनही कैक वेळा हरला होता, द्रौपदी स्वयंवर युद्ध, विराट युद्ध, गंधर्वांनी दुर्योधनाला कैद केले तेव्हा कर्ण कवच कुंडले असूनही पळून गेला
होता. शेवटी अर्जुनाने गंधर्वांशी युद्ध केले. व दुर्योधनाची सुटका केली.
५)
कुंतीपुत्र भीमसेन :- कुंती मातेला वायु
देवतेने दिलेल्या वरदानामुळे हा महाशक्तीशाली योद्धा जन्माला आला. सर्व गदाधारी योद्ध्यामध्ये भीम हा सर्वश्रेष्ठ होता. अशी महाभारतात प्रशंसा आलेली आहे. १३ वर्षाच्या वनवास
काळात भीमाने बकासुर, हिडींबा इत्यादि अनेक राक्षसांचा वध केला.
अज्ञातवासात बलशाली अशा किचकाचा व त्याच्या १०० भावांचा वध करून द्रौपदीचे
गुप्तरित्या रक्षण केले. या महाबलीमध्ये दहा हजार हत्तींचे
बळ होते. महाभारत युद्धात असा उल्लेख येतो की मेलेल्या हत्तीचे कलेवर भीमाने उचलून
कर्णावर भिरकावले. हत्ती उचलणे सामान्य गोष्ट नाही. या वरून भीमाच्या बळाची कल्पनाच केलेली बरी. शेवटी हा
महाबली श्रीकृष्ण भगवंतांच्या आज्ञेने श्रीमद्भगवद्गीता शास्त्राप्रमाणे संन्यास घेऊन
इतर पांडवांबरोबर तप करण्यासाठी हिमालयात निघून गेला. व तिकडेच
परमेश्वर ध्यानात मग्न होऊन व संयमाने आपले देह कृश करून देवदर्शनाला गेला.
।।
६)
पितामह भीष्म :- भीष्मांनी आपल्या गुरुला म्हणजेच
विष्णुचा सातवा अवतार असलेल्या परशुराम यांना युद्धात हरवले होते. इतकी त्यांच्यात होती. त्यांना इच्छामृत्यचे वरदान प्राप्त
झालेले होते. सर्व दिव्यास्त्रे त्यांना अवगत होती. भीष्माच्या पराक्रमामुळे
श्रीकृष्ण भगवंतांना शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा भंग करावी लागली होती. पांडव सैन्यातले रोजचे १०.००० हजार सैनिक वध करण्याची
प्रतिज्ञा भिष्माने घेतली होती.
७)
गांधारीपुत्र दुर्योधन :-
दुर्योधनाबद्दल
सर्वांनाच माहिती आहे. अति क्रोध, अहंकार,
मानीपणा, हट्टीपणा इत्यादि सर्व अवगुणांचे आश्रयस्थान
असलेला दुर्योधन संपूर्ण कुरूकुळाचा सर्वनाश करणारा कुलकलंक ठरला.
७)
जयद्रथ :- जयद्रथ हा दुर्योधनाची
बहीन दुःशला तिचा पती. सिंधु देशाचा राजा होता. जयद्रथाची कर्तबगारी काही खास नव्हती, पण अभिमन्युवधावेळी
एकदाच त्याने महादेवाकडून मिळालेल्या वरदानाने भीमासहीत चारही पांडवांना चक्रव्युहात
शिरण्यापासून रोकले होते. आणि अभिमन्युचा यशस्वीरित्या वध
शक्य झाला. एवढाच काय तो त्याचा पुरुषार्थ होता.
९)
अश्वत्थामा :- हा
ब्राम्हण असून क्षत्रिय कर्मांना प्राधान्य देत राहिला. आणि दुर्योधनाकडून पांडवांशी युद्ध केले. अश्वत्थामा
हा कौरव सेनेचा शेवटचा सेनापती होता. पांडवांविषयी अत्यंत द्वेष
मनात ठेवून कुरुक्षेत्रावर शेवटच्या घटका मोजत असलेल्या दुर्योधनाकडुन त्याने स्वतःची
सेनापतिपदी नियुक्ती करवुन घेतली व पुढे पांडव समजून निद्रावस्थेतच द्रौपदीच्या पाच
पुत्रांची आणि धृष्टद्युम्न आणि शिखंडीची हत्या करुन बदला घेतला. याच्याकडे अनेक दिव्यास्त्रे होती. याने महाभारत युद्धात
नारायणास्त्राचा प्रयोग केला होता. सप्त चिरंजीवांमध्येही अश्वत्थाम्याचे
नाव आहे. शेवटी आपण अंधारात पांडव समजून त्यांचे पाच पुत्र मारले
हे कळल्यावर तो अत्यंत निराश झाला. पण पांडवांनी त्याचा पाठलाग
केला. तेव्हा त्याने त्यांच्यावर ब्रम्हास्त्र प्रेरले.
तेव्हा देवाच्या आज्ञेवरून अर्जुनानेही ब्रम्हास्त्र प्रेरले.
तेव्हा व्यासाच्या मध्यस्थीने अर्जुनाने ब्रम्हास्त्र परत घेतले.
पण अश्वत्थाम्याला ते परत घेण्याचे ज्ञान नव्हते. म्हणून त्याने पांडवांचा एकमेव वंशज परिक्षीत जो उत्तरेच्या गर्भात होता त्याच्यावर
प्रेरले. तेव्हा भगवंतांना अतिशय क्रोध आला. व भगवंतांनी अश्वत्थाम्याला शाप दिला की, तू हजारो वर्षे
एकटा भटकशील, तुला जनसहवास लाभणार नाही. असे म्हणतात की, अश्वत्थामा आजही जिवंत आहे.
१०)
धृतराष्ट्र :- धृतराष्ट्राच्या
अंगात काही शे हत्तींचे बळ होते. पण हा अंध असल्याने कधीच युद्धात
गेला नाही. त्याचे अफाट बळ त्याने भीमाची मायुसी म्हणजे लोहप्रतिमा
आपल्या बाहुबळाने फोडली तेव्हा प्रकट झाले.
११)
पांडुराजा :- पांडुराजा हा
पाचही पांडवांचा पिता. याने आपल्या पराक्रमाने हस्तिनापुर व
कुरु राज्याच्या सिमा वाढवल्या. पण ब्राम्हणाच्या शापामुळे राज्य
सोडून जंगलात राहावे लागले. व त्या शापामुळेच यांचा मृत्यू झाला.
१२)
सात्यकी :- सात्यकी याने
श्रीकृष्ण भगवंतांकडून युद्धकला अवगत केली होती. व धनुर्विद्येत
हा अर्जुनाचा शिष्य होता. महाभारत युद्धात हा पांडवांच्या बाजुने
लढला. व याचा पराक्रम अवर्णनिय आहे. द्रोणाचार्याचे
एकापाठी १०० धनुष्य तोडणारा हा एकमेव योद्धा होता. व शेवटी अजेय
राहिला.
१३)
अभिमन्यू :- अर्जुन आणि
सुभद्रेचा पुत्र अभिमन्यूचा पराक्रम सर्वांनाच श्रुत आहे. द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचले तेव्हा आपल्या महापराक्रमाणे ते चक्रव्यूह तोडले.
व राजा युधिष्ठिराला बंदी होण्यापासून वाचवले. त्या युद्धात अभिमन्यूने कौरव सेनेला पार जेरीस आणले. द्रोण, कर्ण, दुर्योधन,
दुःशासन, जयद्रथ व अश्वत्थामा या सर्वांचा त्याने
द्वंद्व युद्धात पराभव केला. शेवटी सर्वांनी मिळून त्याला घेरले
व त्याच्यावर एकदाच हल्ला केला. व अधर्माने त्याचा वध केला.
असा अभिमन्यू कर्णापेक्षाही महान योद्धा होता. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याने कर्णाला पराभूत केले होते.
१४)
धृष्टद्युम्न :- पांचाल राजा द्रुपदाचा तेजस्वी
पूत्र.
हा यज्ञातून जन्मला होता. द्रौपदीचा मोठा भाऊ.
महाभारत युद्धात कौरवांचे भीष्म, द्रोण,
कर्ण, शल्य, अश्वत्थामा असे
अनेक सेनापती मारले गेले. पण संपुर्ण १८ दिवस हा अजेय योद्धा
पांडवांचा सेनापती राहिला. द्रोण वधासाठी याचा जन्म झाला होता
असे म्हणतात.