अन्योक्ति विलास - anyokti vilas

अन्योक्ति विलास - anyokti vilas

सुभाषित रसास्वाद 

अन्योक्ति विलास - anyokti vilas

पंडित जगन्नाथ कृत

अन्योक्ति विलास 

कमलिनि मलिनीकरोषि चेतः

किमिति बकैरवहेलितानभिज्ञैः!

परिणतमकरन्दमार्मिकास्ते

जगति भवन्तु चिरायुषो मिलिन्दाः!!

अन्योक्तिविलास, पंडितराज जगन्नाथ

हे कमलिनि, (नलिनि)  

अनभिज्ञैः ( अन् + अभिज्ञैः = अज्ञानी) 

 बकैः  ( बगळ्यांनी) 

अवहेलिता ( अवहेलना केली म्हणून)  

किम् इति ( का बरं)  

चेतः ( मन) 

मलिनीकरोषि? ( गढूळ करतेस?) 

परिणतमकरन्दमार्मिकाः ( परिणत = परिपक्व, मकरन्द = मध, मार्मिक= मर्म जाणणारे, ज्ञानी)  

ते ( असे ते) 

मिलिन्दाः ( भुंगे)  

जगति ( या जगात) 

चिरायुषः (चिरंजीव) 

भवन्तु ( होवोत). 

कमलिनी म्हणजे कमळांची वेल. तळ्यातल्या कमळाची वेल फुलांनी बहरून आली आहे. परंतु, बगळे मात्र तिच्याकडे फिरकतही नाहीत. तिला वाईट वाटतं. कवी या ठिकाणी तिची समजूत काढतो. अगं, बगळ्यांनी पाठ फिरवली म्हणून का वाईट वाटून घेतेस? ते अज्ञानीच आहेत. भुंगे बघ. कोणत्या ठिकाणी मध तयार झालाय ते त्यांना बरोबर माहित आहे. ते नेहमीच तुझ्याकडे येतील. 

कवीची थोरवी एखाद्या अज्ञ राजाला कळली नाही तर त्यात वाईट काय वाटून घ्यायचं? रसिकांना त्याच्या कवितांमधली सौंदर्यस्थळं माहित आहेत. आणि ते नेहमीच त्याच्या कवितांचा आस्वाद घेत रहातील.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

------------------

अयि दलदरविन्द स्यन्दमानं मरन्दं

तव किमपि लिहन्तो मञ्जु गुञ्जन्तु भृङ्गा:

दिशि दिशि निरपेक्षस्तावकीनं विवृण्वन्

परिमलमयमन्यो बान्धवो गन्धवाहः!!      

अन्योक्तिविलास, पंडितराज जगन्नाथ

  अयि ( अरे)  

दलत् ( उमलणाऱ्या) 

अरविन्द (कमळा), 

तव (तुझा) 

स्यन्दमानं ( पाझरणारा) 

मरन्दं ( मध)  

लिहन्तः ( चाटणारे) 

 भृङ्गाः  (भुंगे) 

किमपि ( काहीही, कितीही) 

मञ्जु ( गोड)  

गुञ्जन्तु ( गुंजारव करू देत) ; ( पण)   

तावकीनं ( तुझा) 

परिमलं ( सुवास) 

दिशि दिशि( सर्व दिशांमध्ये)  

विवृण्वन् ( पसरवणारा)  

अयं ( हा) 

गन्धवाहः ( वारा) 

अन्यः ( दुसरा) 

निरपेक्षः ( कोणतीही अपेक्षा न ठेवणारा)  

बान्धवः ( नातेवाईक आहे). 

एखाद्याच्या अंगच्या गुणांमुळे मिळणाऱ्या फायद्याकडे पाहून गोळा होणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा आपल्या गुणांचा आदर असणाऱ्या व्यक्ती जवळच्या असतात.

वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषणांचा सुरेख उपयोग या श्लोकाचा अर्थ खुलवतं.

 कमळ पूर्णपणे उमललेलं नाही. ते उमलणारं आहे, दलत् आहे. अशा उमलणाऱ्या कमळातून मध पाझरत आहे, ती पाझरण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही तर म्हणून स्यन्दमान 'पाझरणारा' हे वर्तमानकाल सांगणाऱं विशेषण वापरलं आहे. जोपर्यंत मध पाझरत असतो तोपर्यंत भुंगे येत रहातात, ते मध चाटत रहातात. मध पिण्याची त्या भुंग्यांची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून 'लिहन्तः ''चाटणारे' हे भुंग्यांचं विशेषण वापरलं आहे. वारा देखिल सतत त्याचा गंध पसरवतोय. ही क्रियाही पूर्ण झालेली नाही. 

म्हणून ' 'विवृण्वन्' या व.का.धा. वि. चा उपयोग केला आहे. शिवाय, वि + वृ या धातूच्या दोन अर्थांचा खुबीनं उपयोग करून घेतला आहे. वारा कमळाचा गंध पसरवतो तर सन्मित्र आपल्या मित्राचे गुण सतत खुलवून खुलवून सांगतो. पसरवणे आणि विशद करणे हे विवृ या क्रियापदाच्या अनेक अर्थांपैकी दोन अर्थ. गंधवाह हा शब्दही या संदर्भात किती बोलका आहे. वारा कमळाचा सुगंध पसरवतो तर चांगला मित्र कीर्तीचा, सद्गुणांचा सुगंध वाहून नेतो. 

आपल्या व्याकरणातल्या पांडित्याचा उपयोग इतक्या सुंदरपणे करणारा मला वाटतं जगन्नाथ हा एकमेव कवी. कालिदास श्रेष्ठ कवी होता यात शंकाच नाही. पण तो व्याकरणशास्त्र शिकलेला होता का? बहुधा नाही. कारण आज त्याचे जे ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात व्याकरणावरचा एकही ग्रंथ नाही. जगन्नाथानं भट्टोजी दीक्षिताच्या प्रौढमनोरमा या ग्रंथाचं खंडन करणारा ग्रंथ लिहिला. व्याकरणविषयक ज्ञानाचा उपयोग कवितेचं सौंदर्य खुलवण्यासाठी केला. त्याची कविता ऐकून सरस्वतीही वीणावादन विसरते असं तो स्वतः म्हणतो ते खरंच वाटतं.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

================

सुभाषित रसास्वाद 

तटिनि,चिराय, विचारय, विन्ध्यभुवस्तव पवित्रायाः!

शुष्यन्त्या अपि युक्तं किं खलु रथ्योदकादानम्!!

पण्डितराज जगन्नाथ, भामिनीविलास

तटिनि ( अगं नदी,) 

चिराय ( जराशी थांब, जरा वेळ घे) 

विचारय ( आणि विचार कर).  

विन्ध्यभुवः ( विन्ध्य पर्वतामध्ये जन्म घेतलेल्या)  

पवित्रायाः ( पवित्र असलेल्या)  

तव (तुला) 

शुष्यन्त्या अपि ( जरी तू सुकलीस तरी) 

रथ्योदकादानम् ( रथ्या (रस्ता)+ उदक (पाणी)+ 

आदानम् (स्वीकारणं) (रस्त्यावरचं पाणी स्वीकारणं) 

युक्तं किं खलु? ( योग्य आहे का?)

नदीची अन्योक्ती आहे. नदीला उद्देशून रचलेला हा श्लोक श्रेष्ठ घराण्यात जन्मलेल्या पण कठिण परिस्थिती झालेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी आहे.

 नदीचा उगम विन्ध्य पर्वतासारख्या फक्त उंच नाही तर पवित्र ठिकाणी झाला आहे. एके काळी दुथडी भरून वाहणारी नदी आता शुष्क झाली आहे. पाणी हेच नदीचं सर्वस्व, तिचा आत्मा. तोच हरवून बसल्यावर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तिनं रस्त्यावरचं पाणी आपल्यात सामावून घेतलं. कितीही कठिण परिस्थिती आली तरी अशा पवित्र नदीनं रस्त्यावरचं पाणी घेणं योग्य नाही. घरंदाज व्यक्तीनं हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा नीच माणसासमोर हात पसरणं योग्य नाही.

स्थलकाल निरपेक्ष अशी ही अन्योक्ती आहे. यात वर्णन केलेल्या परिस्थितीचा अनुभव कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काळात येऊ शकतो. अशा अनुभवातून जगन्नाथालाही जावं लागलं होतं. शहाजहान सारख्या संपूर्ण उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या सम्राटाचा सन्मानपूर्वक आश्रय उपभोगलेल्या जगन्नाथाला त्याचा वध झाल्यावर बहुधा निराधार व्हावं लागलं होतं. अशावेळी लहानसहान राजे त्याला निमंत्रित करत असणार. अशा राजांची निमंत्रणं स्वीकारावीत की नाहीत असं द्वंद्व त्याच्या मनात सुरू असेल. आत्मसन्मान जपणाऱ्या जगन्नाथाला ' घरंदाज व्यक्तीनं कठिण परिस्थितीतही नीच ( लहान) व्यक्तीकडून काहीही घेऊ नये' हे तात्पर्य असलेली अन्योक्ती सुचणं योग्यच आहे.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे 


पत्रफलपुष्पलक्ष्म्या कदाप्यदृष्टं वृतं च खलु शूकैः!

उपसर्पेम भवन्तं बर्बुर वद कस्य लोभेन!!

अन्योक्तिविलास, पंडितराज जगन्नाथ

हे बर्बुर ( अरे बाभळीच्या झाडा),  

पत्र ( पानं), 

फल ( फळं),

 पुष्प ( फुलं यांच्या) 

लक्ष्म्या ( समृद्धीनं) 

वृतं (तू धरलेला, लहडलेला आहेस)

 ( इति) कदापि अदृष्टं ( असं कधीही पाहिलं नाही). 

वृतं च खलु शूकैः ( आणि तू तर शूकांनी, काट्यांनी भरून गेला आहेस). 

कस्य ( कशाच्या) 

लोभेन( लोभानं, मोहानं)  

भवन्तम् ( तुझ्या) 

उपसर्पेम ( जवळ आम्ही येऊ) 

वद ( सांग बरं?)

बाभळीच्या झाडांकडे सौंदर्य नाही, फळंही बेताचीच, शिवाय काटेच काटे. अशा झाडाजवळ जायची कुणाला इच्छा होईल? सौंदर्य आणि संपत्ती नसेल, शिवाय वाईट लोकांची संगत असेल तर ती व्यक्ती लोकांना आवडत नाही. 

जगन्नाथाच्या मनात बाभळीची अशी नकारात्मक प्रतिमा आहे. संस्कृत साहित्यात बहुधा बाभळीचं वर्णन नाही. आयुर्वेदात त्याचा उपयोग सांगितला आहे, परंतु काव्यग्रंथात या झाडाला स्थान नाही. परंतु, कवी एकाच वस्तूकडे किती भिन्न नजरेनं पाहू शकतो? ज्या झाडाला संस्कृत काव्यविश्वात नगण्य स्थान आहे, ज्याची कुरूपताच संस्कृत साहित्यिकांना दिसली त्या झाडात इंदिरा संतांना ' कुसर कलाकृती' दिसते. वसंत बापटांना वय झालेला, पण शरीरानं आणि मनानं भक्कम कुटुंब प्रमुख दिसतो. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी या अन्योक्तीचं मराठी भाषांतर केलं आहे, पण त्यात देखिल जगन्नाथानं न सांगितलेला बाभळीचा एक उपयोग सांगितल्याशिवाय त्यांना रहावलं नाही. अर्थात तोही त्यांनी नकारात्मक रीतीनंच सांगितला आहे.  त्यांचं भाषांतर आहे -

कांट्यांनी भरले शरीर अवघे छाया नसे दाटही!

नाही वास फुलास भूक न निवे ज्याच्या फळे अल्पही!

नाही एकहि पांथ येत जवळीं तूझ्या असो गोष्टही!

अन्याची न फळे मिळोत म्हणुनी होशी तयाते वही! 

( दुसऱ्या झाडांची फळं मिळू नयेत म्हणून तू कुंपण होतोस. वही = कुंपण, मालवणीत, कोकणीत कुंपणाला 'वंय' ( व चा सानुनासिक उच्चार) म्हणतात.

 तुझ्याजवळ तर स्वतःची पोटभरीची फळं नाहीत, पण दुसऱ्या झाडांची फळंही तू चाखू देत नाहीस. तू मध्ये कुंपण होऊन बसतोस.)

बर्बुर या संस्कृत शब्दापासून बाभुळ, बबुल हे भारतीय आर्य भाषांमधले शब्द तयार झाले आहेत. त्यातल्या रेफाचा लोप झाला. लोप झाला की भरपाई म्हणून पुढचा किंवा मागचा वर्ण दीर्घ होतो. बाबुल. बाबुलला उर्दू आणि हिंदीमध्ये वडील असा अर्थ आहे. ( अनेक हिंदी गाणी आठवा). म्हणून कदाचित् त्या भाषांमध्ये  compensatory lengthening दिसत नसावं. र चा ल होणं यात संस्कृतमध्ये नाविन्य नाही. मुळचा 'अरंकार' अलंकार झाला. श्रीर चे श्लील झाले. पाणिनीच्या परंपरेनं ही ' रलयोः अभेदः' असं एक वार्तिक प्रचलित आहे.  इथेही र चा ल झाला. मराठीत compensatory lengthening दिसतेच, र चा ल ही दिसतो. शिवाय बच्या ठिकाणी भही दिसतो.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)

===========

सुभाषित रसग्रहण 

एकस्त्वं गहनेऽस्मिन्कोकिल न कलं कदाचिदपि कुर्याः!

साजात्यशङ्कयामी न त्वां निघ्नन्ति निर्दयाः काकाः!!

अन्योक्तिविलास, पण्डितराज जगन्नाथ 

हे कोकिल ( अरे कोकिळा) 

अस्मिन् ( या) 

गहने‌ ( घनदाट) 

( वने) ( अरण्यामध्ये) 

त्वम् ( तू) 

एकः एव (एकटाच) आहेस. 

न कदाचित्  अपि कलं कुर्याः ( चुकूनसुद्धा आवाज करू नकोस).! 

अमी ( हे) 

निर्दया ( निर्दय)  

काकाः ( कावळे) 

 त्वां ( तुला) 

साजात्यशङ्कया  (आपल्याच जातीचा आहेस असं समजून) 

त्वां ( तुला)  

न निघ्नन्ति! ( मारणार नाहीत). 

ही अन्योक्ती मूर्खांच्या गराड्यात वावरणाऱ्या विद्वानांना उद्देशून आहे. कावळा आणि कोकिळ यांच्यात आवाजाचाच काय तो फरक. बाकी रूप सारखंच. विद्वान् आणि मूर्ख यांच्यात बोलण्यातच, विचारातच काय तो फरक. घनदाट अरण्यात एखादा कोकिळ असला आणि तो गायला तर कावळ्यांना त्याची ओळख पटेल आणि ते त्याला आपल्यातला नाही म्हणून मारून टाकतील. मूर्खांची संख्या अधिक असलेल्या सभेत एखादाच विद्वान असेल तर त्यानं गप्प बसावं. आपल्याच मताचा म्हणून मूर्ख त्याच्यावर तुटून तरी पडणार नाहीत.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post