मूर्खाची लक्षणे - संस्कृत सुभाषित रसग्रहण
१) अज्ञ: सुखमाराध्य: सुखातरमाराध्यते विशेषज्ञ: । ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति ॥२५-१॥ (नी.श.)
अर्थ - अडाणी मनुष्याचे समाधान करणे सोपे असते. जाणत्या मनुष्याचे समाधान करणे अधिक सोपे असते. थोड्याशा ज्ञानाने गर्विष्ठ झालेल्या मूर्ख बनलेल्या मनुष्याचे समाधान करणे ब्रह्मदेवालही शक्य होत नाही.
२) अज्ञातपण्डित्यरहस्यमुद्रा ये काव्यमार्गे दधतेऽभिधानम् ।
ते गारुडीयाननधित्य मन्त्रान्हलाहलास्वादनमारभान्ते॥२५-२॥
अर्थ - जे अज्ञानी असतात, चेहेर्यावरून पांडित्याचा आव आणतात व साहित्य रचनेच्या बाबतीत अभिमान बाळगतात ते (साप पकडण्याचा) मंत्र न शिकणारे गारुडीच जणु विषाचा आस्वाद घेण्यास सुरवात करतात.
३) अरण्यरुदितं कृतं शवशरीरमुद्वर्तितम् स्थलेऽब्जमवरोपितं सुचिरमूषरे वर्षितम् ।
श्वपुच्छमवमानितं बधिरकर्णजाप: कृतो धृतोधमुखदर्पणो यदबुधो जन: सेवित: ॥२५-३॥
अर्थ - जो मनुष्य मूर्ख माणसाची सेवा करतो तो जणु काही अरण्यातच रडतो, किंवा प्रेतालाच सजवतो, किंवा जमिनीवर कमळ पेरतो, किंवा दीर्घकाळ वाळवंटात बरसतो, किंवा कुत्र्याचे शेपूट खाली वाकवतो, बहिऱ्याच्या कानात ओरडतो किंवा आरसा खाली तोंड करून धरतो.
४) उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।
पय:पानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम् ॥२५-४॥
अर्थ - मूर्खांना केलेला उपदेश हा त्यांना शांत करणारा नसून त्यांचा राग वाढवणाराच असतो. सापांना पाजलेले दूध त्यांच्या विषाचीच वाढ करते.
५) ज्ञानविद्याविहीनस्य विद्याजालं निरर्थकम् ।
कण्ठसूत्रं विना नारी ह्यनेकाभरणैर्युता ॥२५-५॥
अर्थ - अनेक दागिन्यांनी युक्त पण मंगळसूत्र नसलेली स्त्री जशी शोभून दिसत नाही त्याप्रमाणे ज्ञान व विद्या नसेल तर केवळ विद्येचे जंजाळ (पदव्या) निरर्थक आहे.
(६) प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरवक्त्रदंष्ट्राङ्कुरात् समुद्रमपि सन्तरेत्प्रचलदूर्मिमालाकुलम् ।
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥२५-६॥ (नी.श.)
अर्थ - (एखादा मनुष्य) मगरीच्या जबड्यातील दाढेच्या तीक्ष्ण टोकातून रत्न बाहेर काढू शकेल, हलणार्या लाटांच्या मालिकांनी भरलेला (क्षुब्ध झालेला) समुद्र सुद्धा ओलांडू शकेल, रागावलेला साप सुद्धा फुलाच्या माळेप्रमाणे डोक्यावर धारण करू शकेल, परंतु कोणी दुराग्रही मूर्ख मनुष्याचे मन संतुष्ट करू शकणार नाही.
७) लभेत सिकतासु तैलमपि यत्नत: पीडयन् पिबेच्च मृतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित: ।
कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥२५-७॥ (नी. श.)
अर्थ - प्रयत्नपूर्वक भरडून वाळूमधून सुद्धा कोणी तेल मिळवू शकेल, तहानेने व्याकूळ झलेला मनुष्य मृगजळातील पाणी पिऊ शकेल, इकडे तिकडे हिंडून मनुष्य कदाचित सशाचे शिंग सुद्धा मिळवू शकेल, पण कोणी दुराग्रही मूर्ख मनुष्याचे मन संतुष्ट करू शकणार नाही.
८) यदि वाञ्छसि मूर्खत्वं वस ग्रामे दिनत्रयम् ।
अपूर्वस्यागमो नास्ति पूर्वाधीतं विनश्यति ॥२५-८॥
अर्थ - जर तुला मूर्खत्वाची इच्छा असेल तर गावामधे (खेड्यामधे) तीन दिवस रहा. तेथे अपूर्व गोष्टींचा आगम नाही व पूर्वी शिकलेल्या गोष्टीचा नाश होतो.
९) माता शत्रु: पिता वैरी येन बालो न पाठित: ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥२५-९॥
अर्थ - जे आपल्या मुलाला शिकवत नाहीत ती आई व वडील त्या मुलाचे शत्रु आहेत. जसा हंसांमधे बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे तो मुलगा सभेमधे शोभून दिसत नाही.
१०) मूर्खचिह्नानि षडिति गर्वो दुर्वचनं मुखे ।
विरोधी विषवादी च कृत्याकृत्यं न मन्यते॥२५-१०॥
अर्थ - गर्व, मुखात अप्रिय वचन, विरोध करणे, कठोर बोलणे, चांगले वाईट न ओळखणे ही मूर्खाची सहा लक्षणे आहेत.
११) मूर्खत्वं सुलभं भजस्व कुमते मूर्खस्य चाष्टो गुणा: निश्चिन्तो बहुभोजनोऽतिमुखर: रात्रिं दिवं स्वप्नभाक् ।
कार्याकार्यविचारणान्धबधिर: मानापमाने सम: प्रायेणामयवर्जितो दृढवपुर्मूर्खा: सुखं जीवति ॥२५-११॥
अर्थ - हे दुर्बुद्धे, तू सोप्या अशा मूर्खपणाचीच सेवा कर.
मूर्खाचे आठ गुण आहेत. निश्चिंत असणे, पुष्कळ जेवणे, अतिशय बडबड करणे, रात्रंदिवस मनोराज्य करणे, योग्य व अयोग्य काय या बाबतीत डोळे व कान झाकून घेणे, मान व अपमान सारखेच मानणे, प्राय: रोगरहित असणे, शरीराने दणकट असणे असा मूर्ख सुखाने रहातो.
१२) मूर्खोऽपि मूर्खं दृष्ट्वा न चन्दनादपि शीतल: ।
यदि पश्यति विद्वांसं मन्यते पितृघातकम् ॥२५-१२॥
अर्थ - एक मूर्ख दुसर्या मूर्खाला पाहून चंदनापेक्षा शीतल होतो. पण जेव्हा तो विद्वानाला पहातो तेव्हा तो त्याला पित्याचा वध करणार्या माणसासारखा भासतो.
१३) मूर्खो हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाच: शुभाशुभा: ।
अशुभं वाक्यमादत्ते पूरीषमिव शूकर: ॥२५-१३॥
अर्थ - ज्याप्रमाणे डुक्कर विष्ठा खातो त्याप्रमाणे बोलणार्या विद्वानाचे शुभ वा अशुभ बोलणे ऐकून मूर्ख मनुष्य (त्यातील) अशुभ वाक्याचा स्वीकार करतो.
१४) यदा किञ्चिज्ञोऽहं द्विप इव मदान्ध: समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मन: ।
यदा किञ्चिकिंञ्चिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगत: ॥२५-१४॥ (नी. श.)
अर्थ - ज्यावेळी थोडेसे जाणणारा मी मदाने अंध झालेल्या हत्तीप्रमाणे दर्पाने विवेकशून्य झालो त्यावेळी मी सर्व जाणणारा आहे अशा विचाराने माझे मन गर्विष्ठ झाले. (आणि) ज्यावेळी पंडितांकडून थोडे थोडे ज्ञान मला प्राप्त झाले त्यावेळी मी मूर्ख आहे अशा विचाराने माझा गर्व तापाप्रमाणे दूर निघून गेला.
१५) यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् । लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणा: किं करिष्यति ॥२५-१५॥
अर्थ - ज्याला स्वत:ची बुद्धी नाही त्याच्या बाबतीत शास्त्रांचा काय उपयोग ? जो आंधळा आहे त्याला आरशाचा काय उपयोग ?
🖋संकलन
सौ मनीषाताई अभ्यंकर