संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
आ
दिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला
अपारसंसारसमुद्रमध्ये
संमज्जतो मे शरणं किमस्ति !
गुरो कृपालो कृपया वदैतद्विश्वेशपादाम्बुजदीर्घनौका !!
अर्थ..
प्रश्न
: - हे कृपाळू
गुरुदेवा!कृपा करून मला सांगा की या अपार संसार समुद्रात बुडणार्या मला कोणाचा
आधार आहे?
उत्तर
:- जगदीशाच्या.. विश्वनाथाच्या
पदकमलरूप विस्तीर्ण नौकेचा!
चिंतन :- कृमिकीटकांपासून व्याघ्र सिंह हत्तीं सारख्या हिंस्र पशूंपर्यंत,पर्वत, नद्या, वृक्षवल्लीपानंफुलं, मनुष्य देव गंधर्व यक्ष किन्नर आणि अनंत अवकाशात पसरलेले असंख्य ग्रहगोलतारेनक्षत्रमंडळ इतकं सारं ब्रह्मांड जे दिसतं त्याला संसार म्हणतात...
हा संसार
अपार आहे,
अनादि, अनंत आहे. त्याचा आरंभबिंदू वा
अंत्यबिंदू कुणालाच दिसला नाही वा कळला समजला नाही. अशा या संसाराला संत सत्पुरुष
ऋषि मुनि शास्त्री पंडित इत्यादींनी सागराची, निबिड अरण्याची
उपमा दिली आहे.
संसरति
इति संसारः
अशी संसाराची व्याख्या केली जाते. जो सतत, अखंड, अविरत पुढे पुढे सरतो आहे तो संसारात. यात जे निर्माण होतं ते नष्ट होतं पुन्हा निर्माण होतं! प्राणी पशु वनस्पति जन्माला येतात मरतात पुन्हा जन्माला येतात! असं हे सृष्टिचक्र अखंड फिरतंय. या संसारात काही जड निर्जीव अचेतन काही चंचळ सजीव सचेतन काही अल्पप्रकट/अप्रकट चेतन अशी खूप विविधता आहे.
या
सगळ्याचा विचार करण्याची शक्ति फक्त मनुष्यप्राण्याला आहे...त्याला या सर्व
ब्रह्मांडाबद्दल,त्यातील प्रत्येक घटकाबद्दल जशी
प्रचंड जिज्ञासा आहे तशीच स्वतःबद्दल सुद्धा आहे.
मी कोण आहे, कुठून आलो, का आलो, कशासाठी
आलो, इथून कुठे जाणार आहे, कधी कसा
केव्हा किति काळासाठी जाणार आहे अशा अनेक प्रकारची जिज्ञासा आहे. येणार्या
सुखदुःखादि अनुभवांनीही तो विचारप्रवण
होतो.
कितीही प्रचंड प्रमाणात सुख मिळालं तरी ते अत्यल्प वाटतं व कितीही कमी दुःख वाट्याला आलं तरी ते पर्वतप्राय प्रचंड वाटतं... आपल्या सारख्याच अन्य माणसांनाही सुखदुःख भोगायला लागतं व त्यात अकल्पनीय विविधताही आहे... या सार्याचं कारण काय असेल?.. या ब्रह्मांडाचा निर्माता,स्थितिपालक व संहारकर्ता एकच की अनेक?.. हे मुळात निर्माणच का झालं? अशा अनेक प्रश्नांनी माणसाला भंडावून सोडलेलं असतं!
माणसं
जन्माला येतात,काही काळ जगतात व मरतात... देह तर भौतिकच दिसतो तर
मग याला हलवणारा बोलवणारा विविध भावनांमधे बुडवणारा नाचवणारा कोण आहे? त्याचं स्वरूप काय? तो येतो कुठून व जातो कुठे?
अशाही अनेक प्रश्नांनी त्याची मति गुंग होते! या सर्व प्रश्नांची
उत्तरं शोधता शोधता त्याला आतून निश्चित वाटत असतं की मला नाही तरी या सार्याचं
पूर्ण व यथार्थ ज्ञान असणारा कुणी तरी असणारच!
मी नाही तरी या अखिल ब्रह्मांडाचा जो कोणी
कर्ताधर्तासंहर्ता असेल. या ब्रह्मांडाच्या उत्पत्ति स्थिति विनाशाला जो कुणी
जबाबदार असेल त्याला जाणणारा नक्कीच कुणी असला पाहिजे! काळाची ज्या एका बिंदूपासून
प्रवृत्ति झाली तिथपासून ते अत्ताच्या क्षणापर्यंत किति काळ लोटला असेल? अजून किति काळ जायचा आहे? हेही जाणणारा नक्कीच
कुणीतरी असेल असंही त्याला वाटत असतं.
अशा
अशांततेतच विचारकल्पनांच्या आवर्तनातच.. त्या निर्मात्याच्या स्वरूपदर्शनाची तळमळ
लागलेली असतानाच ज्या कुणाकुणाला याचं ज्ञान झालं तेच ऋषि मुनि गुरु ज्ञानी या
संज्ञांनी ओळखले जाऊ लागले. ज्यांची ती जिज्ञासा शमली नाही ते अज्ञानी सामान्य
ठरले व ज्यांना ही जिज्ञासाच नाही, नव्हती, फक्त आलेलं मिळालेलं जीवन जगणं व मरणं एवढंच जमलं ते मूढ ठरले.
यातल्या अस्वस्थ जिज्ञासूंचं प्रतिनिधित्व स्वतःच्या ठिकाणी कल्पून गुरूंना विचारलेले प्रश्न आणि गुरूंनी दिलेली उत्तरं आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या प्रश्नोत्तरी या छोट्याशा प्रकरणग्रंथात दिलेली आहेत, त्यातला हा पहिला प्रश्न आहे..
ग्रंथ निर्विघ्नपणे लिहिला जावा या हेतूनं आचार्यांनी ईश्वरस्मरणानं या ग्रंथाची सुरवात केली असून उत्तरात "विश्वेशपादाम्बुजा" चा उल्लेख केला आहे. श्रीमद्भागवताच्या माहात्म्यातही संसाराला सागराची उपमा दिल्याचं आढळतं...
संसारसागरे
मग्नं दीनं मां करुणानिधे
कर्ममोहगृहीतांगं
मामुद्धर भवार्णवात् ।।..
भगवंताकडे
प्रार्थना करताना असं म्हटलंय.
सागर म्हटला की त्यात लाटा, भोवरे, लहान मोठे मत्स्य कच्छपादि जलचर असणारच... समुद्रात गटांगळ्या खाणार्यांना त्यांच्यापासून प्राणभयही असणार त्याचप्रमाणे या संसारातही हे सर्व आहे! स्वतःच्या कर्तृत्वानं.. प्रयत्नानं जेव्हा स्वतःला वाचवता येत नाही अशी खात्री पटते तेव्हा अन्यांची मदत घेतली जाते..
मदत करणारा समर्थ, निःस्वार्थी असावा अशीही अपेक्षा असते व तशा विश्वासानंच त्याच्याकडे जावं लागतं. असा सर्वसमर्थ व संशयातीत विश्वासार्ह ईश्वर व गुरू वाचून कोणीही असू शकत नाही.. मार्ग दाखवणारा व तारणारा गुरु असला तरी तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही व ईश्वराकडेच जाण्यासाठी प्रश्नकर्त्याला प्रेरित करतो!
सागराला
भरतीओहोटी असते पण संसारसागराला फक्त भरतीच असते...
बोधले बुवा म्हणतात.. संसारसागर सागर भरला जातो पूर। या संसारसागरात उठणार्या लाटा विषयांच्याच असतात.. लाटा उसळती विषयांच्या बहुत प्रपंच्याच्या.. हे
विषय माणसाला इतकं जखडून ठेवतात की प्रपंच्याच्या जन्ममरणरूप भोवर्यात तो गरागरा
फिरत राहतो! प्रपंच भोवरा फिरतसे गरगरा!
विशेषेण
सिनोति नाम बध्नातीति विषयः।
विशेषप्रकारे
बांधून ठेवतो म्हणून त्याला विषय म्हणतात.
विषयांचे
सुख द्वाड येथे आहे बहु गोड ।
पुढे
आहे अवघड यमयातना बा!
असा संत तुकाराम सावधानीचा इषाराही देतात... पण माणूस त्या भोवर्यातच फिरत
राहतो..त्यातून बाहेर पडायचं तर बोधलेमहाराज म्हणतात
सांगड
बांधा रे भक्तीची यदुनाथनामाची
नरहरी
बोधला हरिनामी रंगला!
ही भक्तीची
सांगड म्हणजेच आचार्य म्हणतात ती विश्वेशपादांबुजदीर्घनौका!
त्या नौकेत बसलं की ती सहज अपार संसार सागराच्या पार घेऊन जाईल... ज्यानं हा
संसारसागर निर्माण केला त्याच्या जवळ... नव्हे त्याच्या आत घेऊन जाईल.. ती नौका
मिळावी यासाठी मात्र गुरूचीच कास धरावी लागेल.. विषयभजन सोडून गुरुभजनी रमावं
लागेल!
संत रामदासही
म्हणतात
विषयवीष
पिउनि बळे फुकट का मरावे? ..म्हणून.. हृदयी धरावे श्रीगुरुचे चरणकंज।
गुरुचरणी
शरण जाऊन विनम्रपणे प्रश्न विचारला की ते सांगतील विश्वेशपादांबुजदीर्घनौका पकड.
महता
पुण्यपण्येन क्रीतेयं कायनौस्त्वया ।
पारं
दुःखोदधेर्गन्तुं तर यावन्न भिद्यते।।
पुण्यरूपी पुष्कळ धन खर्चून ही देहरूपी नौका
घेतलीस ना? आता तिचा योग्य वापर कर... विषयभोगातिरेकानं ती फुटण्या
आधीच या दुःखपूर्ण संसारसागराच्या पार पलिकडे जा.. त्यासाठी ही देहरुपीनौका त्या
विश्वेशपादांबुजनौकेतच ठेव"... ठेव! म्हणजेच हा देह विश्वेशाच्या चरणकमलातच
रत राहावा.. तिथेच विलीन व्हावा!
त्यांचा असाही अभिप्राय मानायला हरकत नाही की
विश्वेशपादांबुज ही दीर्घ.. विस्तीर्ण नौका असली तरी देहरूपी नौका इच्छा आकांक्षा वासनादींनी
भरल्यामुळे, राग द्वेष, ईर्ष्या क्रोधांनी
भरल्यामुळे इतकी फुगलेली असेल की ती केव्हाही फुटू शकेल मग त्यावेळी त्यात ही
विश्वेशपादांबुजरूपी नौका सज्ज ठेवली तर ती
एखाद्या जीवननौकेसाठी उपयोगी पडून जीवाला संसार सागराच्या पार नेऊन
सोडील!"
बद्धो हि
को? यो विषयानुरागी ।
का वा
विमुक्तिः? विषये विरक्तिः! ।।
को
वाऽस्ति घोरो नरकः? स्वदेहः ।
तृष्णाक्षयः
स्वर्गपदं किमस्ति? ।।
सुभाषित मराठी
अर्थ :-
प्रश्न :- खरा बद्ध कोण?
उत्तर :- जो विषयांमधे
आसक्त आहे तो!
प्रश्न :- खरी मुक्ति कोणती? कशात आहे?
उत्तर :- विषयांमधे
विरक्ति अनासक्ति असण्यात!
प्रश्न :- भयंकर नरक कोठे आहे?
उत्तर :- आपल्या(च)
शरीरात(च)
प्रश्न :- स्वर्गपद..स्वर्ग
कुठे आहे? स्वर्गप्राप्ति म्हणजे काय?
उत्तर :- तृष्णा(क्षुधाही!)नाश
होणं..वखवख संपणं!
चिंतन :-
मनात जिज्ञासायुक्त प्रश्न निर्माण होणं... कुतुहल
निर्माण होणं... आपल्याला काहीच कळत नाही हे कळणं ही ज्ञानप्राप्तीची पहिली
पायरी.. पूर्वावस्था.. पूर्वअट! ज्याला असं वाटतं की आपल्यालाच सर्वच कळतंच त्याला
काहीच प्रश्न पडत नाहीत.पण काहींना आतून असं वाटतं की
"कालो ह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।"
या न्यायानं
काळाच्या, पृथ्वीच्या, सागरांच्या, अवकाशाच्या
पोटात बरंच काही आहे व आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वापेक्षा अज्ञात विश्व अनंत
पटींनी मोठं.. विशाल आहे.. पण माणसाच्या आयुष्यकाळाला मर्यादा आहेत.. चराचर
विश्वाला जाणून घेण्याची इंद्रियादि साधनं खूप मर्यादित.. तोकडी आहेत!
बुद्धीविचारांची झेपही फार उंच जाऊ शकत नाही! सर्वच्या
सर्व यथार्थतेनं.. जसं जितकं जिथं जेवढं जेव्हाकेव्हा आहे ते साकल्यानं कळून घेणं,
समजणं हे आवाक्या बाहेरचं असलं तरी जिज्ञासा, ज्ञानाची
हाव अमर्याद व अस्वस्थ करणारी असल्यानं कुणा ज्ञान्याला गाठून सादर नमस्कार करून
नम्रपणे विचारावं म्हणून ते आचार्यांना विचारू लागले.
शंकराचार्यांनी प्रथमतःच स्वतःला असलेल्या
ज्ञानाचं प्रमाण दाखवलं. समोरच्या अफाट आक्षितिज पसरलेल्या समुद्रात हातींचा दंड
बुडवून बाहेर काढला व त्याच्या खालच्या टोकाशी लोंबकळणार्या जलबिंदूकडे निर्देश
करून म्हणाले. विस्तीर्ण सागरातील पाण्याचा एक लहानसा थेंब जो या दंडाला चिकटून
आलेला दिसतोय ना, इतकंच माझं ज्ञान आहे!
असे विनम्र व वास्तवाचं ज्ञानभान असलेले आचार्य प्रश्नाचं उत्तर देत आहेत.. बद्ध तेच ज्यांची बुद्धि विविध विषयांमधे अडकली आहे. त्यांचे भोग घेण्याच्या साधनांची जुळवाजुळव करण्यातच अडकली आहे व विषयांकडून दुःखाच्या लाथा खाऊनही तिथून जे परावृत्त होत नाहीत... होऊ शकत नाहीत!
विषयांच्या उपलब्धतेला मर्यादा.. ते विषय उपभोगणार्या इंद्रियांच्या सामर्थ्याला मर्यादा.. विषयभोगाच्या कालाला मर्यादा.. विषयभोग घेणार्यादेहाच्या अस्तित्वाला मर्यादा इतकं सगळं असताना व हे कळूनही त्यात गुंतून राहण्याचं प्रयोजनच ज्यांना कळत नाही ते बद्ध!
वास्तविकतः विषय हे जड असल्यानं ते सुख देऊच शकत
नाहीत.. ते सुख देतात हा जीवाला होणारा भ्रम असून त्यालाच तो सत्य मानून व्यवहार
करतो! भोक्ता जीव हा चेतनरूप सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचाच अंश असल्यानं अंशीचे
सर्वगुण त्याच्या ठिकाणी आहेतच.. त्या गुणांच्या प्रभावामुळे विषय सुख देतात असा
आभास त्याला होतो व तो विषयांमधे अधिकाधिक गुंतत जातो व स्वरूपाची ओळख व स्वरूपाशी
एकरूपता हे साध्य.. ध्येय बाजूला पडतं!
पण विषयांपासून मिळणार्या सुखाचं खरं स्वरूप
पाहिल्यावर आपलं ईप्सित.. ध्येय लक्षात ठेवून जो विषयांना योग्य वेळी योग्य
अंतरावर ठेवतो.. त्यांच्या मोहात अडकत नाही तो विरक्त असं आचार्य सांगतात.
ये हि
संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः
कौन्तेय न तेषु रमते बुधः।। भग.गीता.
जो विचार करील
त्याला निश्चित कळून येईल की इंद्रियं व त्यांचे विषय यांचा जोपर्यंत संबंध आहे
तोपर्यंतच विषयांपासूनचं तथाकथित सुख मिळतं... पण कोणत्याही कारणानं त्यासंबंधात
खंड पडला की दुःखाला सुरवात होते... अतिरेकी सुखही दुःखदच असतं व कमी सुखही
दुःखालाच कारणीभूत होतं... एकाला एके काळी वा वेळी जो विषय सुखद वाटेल तोच दुसर्याला
त्याच काळी वा वेळी दुःखदही ठरेल...शिवाय ज्या एका क्षणी जो विषय ज्याला सुखद
वाटेल त्यालाच तो विषय अन्य काळी दुःखद वाटू शकेल... शिवाय
यत् सुखं साधनाधीनं तद्दुःखमिति गद्यते या न्यायानं सुख जर साधनांवर अवलंबून असेल तर ती साधनं जोपर्यंत उपलब्ध आहेत वा सुख देण्यास समर्थ आहेत तोपर्यंतच सुखाचा अनुभव येईल.. तेव्हा परिणामी दुःखात ढकलणार्या विषयांमधे न अडकणं.. त्यांची उपेक्षा करणं व जेवढ्यास तेवढाच उपभोग घेऊन अन्यथा त्यांच्याकडे उदासीनवृत्तीनं पाहणं हीच विरक्ति होय. जो शहाणा आहे, सुबुद्ध आहे, विवेकी आहे तो या विषयांमधे रमत नाही.. आसक्त होत नाही!
ज्याच्या माध्यमातून सर्व विषय भोगायचे त्या
देहाला मर्यादित भोगक्षमता मिळालेली असते.. विषयांची उपलब्धी कितीही असली तरी
इंद्रियसामर्थ्य मर्यादित असल्यानं भोगाचा अतिरेक शरीरावर अनिष्ट परिणाम दाखवायला
लागतो... अयोग्य भोग्यविषय, भोगाची अयोग्य वेळ व तर्हा/पद्धति
आणि इंद्रियांच्या भोगसामर्थ्याचा मर्यादातिक्रम या सर्वांचा एकत्रित परिणाम विविध
व्याधिरूपानं देहावर व पर्यायतः आधिरूपानं मनावर उमटू लागतो व दुःखाला सुरवात
होते... हाच नरक!
देहाला जडणार्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी
बायकामुलांना.. परिवाराला.. अन्यांना सेवेसाठी वेठीला धरून त्यांच्याकडून होणारा
विरोध, दुर्लक्ष, उपेक्षा, अपमान, असहकार हाही नरकच!
ज्याची विषयतृष्णा
संपली...
अमुक एक विषय मनासारखा, हवा
तेव्हा, हवा त्याप्रकारे, हवा तितका
वेळ मिळावा हा आग्रह ज्यावेळी सुटेल त्यावेळी तिथेच स्वर्गसुख अनुभवायला मिळेल... तृष्णेमधे
क्षुधेचाही अंतर्भाव होतो... तृष्णा क्षुधा मावळल्या... हवं नको संपलं व ज्यावेळी
जे यदृच्छेनं मिळेल त्याच्यात संतुष्ट समाधानी राहिलं की तोच स्वर्ग होय!
मग तिथे लाचारी, अपमानास्पद
वागणूक, भूतकाळात कमी मिळालेल्या सुखाबद्दलचा शोक, वर्तमानकाली उपलब्ध असलेल्या सुखाबद्दलचा मोह व भविष्यात सुख मिळेल किंवा
नाही ही चिंता व हातचं सुख कोणी हिरावून घेईल की काय ही भीति हे सर्व नष्ट होऊन
केवळ आनंदाचा अनुभव मिळेल... तोच खरा स्वर्ग! शंकराचार्यांनी
उत्तरादाखल उच्चारलेल्या सूत्ररूप शब्दांमधून हा आशय त्यांना अभिप्रेत असावा असं
वाटतं!
टीप :- श्रीपाद
केळकर साहेब कल्याण