Charpat Panjarika Stotra (चर्पट पंजरिका स्तोत्रम्)
मराठी श्लोकार्थ knowledgepandit
वयसि गते कः कामविकारः, शुष्के नीरे कः कासारः।
नष्टे द्रव्ये कः परिवारो, ज्ञाते तत्त्वे कः संसारः ।।
अर्थ.. एकदा वय उलटून गेलं की
चित्तात कामविकार कितीही प्रबळ झाला तरी काय उपयोग? सगळं पाणीच आटून गेल्यावर
तळ्याची तरी काय किंमत? जवळचं धन संपुष्टात आल्यावर परिवार तरी कसा जवळ उभा
राहणार? आणि एकदा का तत्त्वज्ञान झालं की संसार तरी कुठला अनुभवायला येणार?
चिंतन...
संत रामदासांनी एके ठिकाणी म्हटलंय..
घटका गेली पळे गेली तास वाजे घणाणा ।
आयुष्याचा नाश होतो कृष्ण का रे म्हणा ना !!
क्षणाक्षणानं
सरकणार्या आयुष्याची जाणीव ठेवा, काळ सावध करतोय ते लक्षात घ्या आणि आता तरी श्रीकृष्ण
भगवंतांचं नाव घ्या! लहानपणी माझ्या आजीकडून दोन ओळी ऐकलेल्या
आठवतात..
नरतनू व्यर्थ जाणार, काळ खाणार ।
अरे जीवा सांग तू मला, आपुले स्वहित कधी करणार?
चौऱ्यांशी लक्ष हे फेरे, फिरता श्रम झाले बा रे ।
आता तरी सावध हो रे, आपुले स्वहित कधी करणार?
आजी
हे गाणं म्हणत आम्हाला सांगायची.. जेवतानाही प्रत्येक घासाच्या वेळी श्रीगोविंद म्हणा,
वायफळ बडबड नको! तिचाही उद्देश हाच असायचा की भगवन्नामस्मरणावाचून आपली नातवंडं
रिकामी राहू नयेत. आचार्य वरील श्लोकात तीच सावधगिरी घ्यायला सांगतात.. व्यक्तिगत
जीवन असो, सामाजिक जीवन असो, आर्थिक आघाडी असो वा जीवनाची पारमार्थिक सांगता असो..
प्रत्येक
विषयी नितांत सावधगिरी हवी... व्यक्तीच्या आयुष्यातली बलसंवर्धन, शिक्षण, अर्थार्जन,
विवाह, संतती, अपत्य-प्राप्ति, परिवारातील आपल्यावर अवलंबून असलेल्यांची व आपलीही
भविष्यकाळातील तरतूद,जीवनात आकस्मिकपणे येणार्या संकटांना तोंड देण्याची सज्जता
यातील प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेतच व्हायला हवी..
अन्यथा कालः पिबति तद्रसम् ! त्यातील
स्वारस्य संपतंच पण आयुष्यच नीरस होतं. आचार्य म्हणतात... योग्य वय उलटल्यावर
होणार्या विवाहापासून स्त्रीपुरुषांना काय सुख मिळणार.. काय आनंद मिळणार? त्याहीपेक्षा
होणाऱ्या संततीवर योग्य संस्कार करायला उमेद, उत्साह तरी कशी मिळणार? पण यासाठी
अंगात धमक असेपर्यंत..
मनगटात
दम असेपर्यंत.. लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं बळ असे पर्यंत क्षणशः कणशश्चैव
विद्यामर्थं च साधयेत् या न्यायानं किमान आवश्यक
व पुरेसा पैसा मिळवायला हवा व तो न्याय्य मार्गानं मिळवण्यासाठी आळस झटकून
शिक्षणही पुरेसं घेतलं पाहिजे! प्रथमे नार्जिता
विद्या, द्वितीये नार्जितं धनम्
असं जर झालं तर आयुष्यच व्यर्थ ठरेल.. किंमतशून्य ठरेल!
जीवनावश्यक
पाणी जर तळ्यातून आटून सुकून गेलं तर कोणीही तिकडे फिरकत नाही! तळ्यातलं पाणी.. अयोग्य
प्रकारे वापरून किंवा उन्हामुळे आटून विनावापरच.. नष्ट होऊ देणं यापासून वेळीच
थांबवलं गेलं तरच त्या तळ्याची काही किंमत राहील. जीवनातला एक सर्वसामान्य
अनुभव खाली दिलेल्या विविध वचनांवरून लक्षात येईल..
द्रव्येण सर्वे वशाः ।..
अर्थस्य पुरुषो दासः ।..
दाम करी काम ।..
रुपयाभवती दुनिया फिरते ।
खिशात
जोपर्यंत भरपूर पैसा खुळखुळतोय तोपर्यंतच व्यवहारी जगतात तुम्हाला लोक विचारतात.. किंमत
देतात! आहार निद्रा भय व मैथुन या सर्वसाधारण देहधर्मासाठी पहिली गरज द्रव्याची
भासते. अन्न, वस्त्र, निवारा
या मूलभूत गरजांसाठी प्रथम पैसाच हवा असतो! पैसा असेल तर सत्ता मिळते व सत्ता असेल
तर पैसा हवा तितका मिळवता येतो! आणि पैशाशिवाय राजकारणात एक पाऊलही पुढे टाकता
येत नाही..
हे
तर स्वातंत्र्योत्तर भारतातलं अगदि अलिकडील काळापर्यंतचं. तथाकथित लोकशाही
समाजवादी राजकीय व्यवस्थेचं मूलभूत सूत्र असल्याचं नग्नसत्य आहे! आचार्य
सांगतात म्हणून ते ऐकायचं नसलं तरी त्यांनी सांगितलेलं त्रिकालाबाधित व्यावहारिक सत्य
अपरिहार्यपणे व अनिवार्यपणे स्वीकारावंच लागेल..
नष्टे द्रव्ये कः परिवारः! एकदा
का जवळचा पैसा संपला की कसलं आलंय कौटुंबिक.. पारिवारिक.. सामाजिक.. राजकीय जीवन? इतकंच
काय.. अर्थ व काम हेच दोन पुरुषार्थ महत्त्वाचे ठरलेल्या या काळात तथाकथित
धार्मिक, आध्यात्मिक व पारमार्थिक जीवनासाठीही पैसा हा घटक अत्यावश्यक मानला
गेलाय!
सर्वात
शेवटी कवि तत्त्वज्ञानावर येतात! ज्याला यथार्थज्ञान झाले.... ज्याला संपूर्ण ब्रह्मांड मायेचा खेळ असल्याचं सानुभूतिक ज्ञान
झालं.. स्वप्नवत् असलेल्या, अध्यासरूप असलेल्या जगाचं सत्यस्वरूप कळलं त्याच्या
दृष्टीनं हा संसार तरी कसा उरेल? पण हे घडायला अखंड व अविरत भगवद्भक्ति, भगवन्नामस्मरण ही पूर्वअट आहे. जीवनाचं साफल्य या तत्त्वज्ञानात आहे. अनादि
असलेला संसार व्यक्तीपुरता सांत घडवण्याचं सामर्थ्य या तत्त्वज्ञानात आहे.
पण
भक्ति ज्ञानाची माऊली या न्यायानं व नारदभक्तिसूत्रात उल्लेखलेल्या "अन्यस्मात्
सौलभ्यं भक्तौ" या सूत्राप्रमाणे.. इतर
सर्व मार्गांहून सुलभ असलेल्या भक्तीचा नित्य उपलब्ध व सोपा प्रकार म्हणजे "भज गोविंदम्। " तेच
तर आचार्य या श्लोकाच्या पालुपदात सांगतायत!!