मराठी सुभाषित काव्य रसग्रहण - marathi kavita knowledge
शीर्षक :- काही न करता
नुसती वायपट बडबड करू नये -
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१०८।।
श्लोकार्थ:- हे
मना, संत सज्जनांच्या सहवासाने आपल्या आचरणात बदल होत असतो. आपले मन परमेश्वर
भक्तीमध्ये रंगू लागते. याचा अनुभव स्वतः घेतल्याशिवाय वायफळ बडबड करु नये.
वितंडवाद संपून जेव्हा संवाद म्हणजेच एकमताचे बोलणे सुरू होते तेव्हा ते हितकारक
असते. काही
न करता नुसती वायपट बडबड करू नये
विवेचन
:-
"सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो।
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो।" - मोरोपंत
वरील दोन ओळीत जीवनाचे तत्व सांगितले गेले आहे. सर्व
संत सुद्धा हेच सांगत आले आहेत. ज्याचा संग आपण करू, त्याचे गुण आपल्याला आपसूक येऊन
चिकटतात, असे आपण दैनंदिन व्यवहारात अनुभवतो. गोंदवलेकर बुवा एक उदा. सांगत असत. पूर्वी वकिलाच्या पत्नीला वकिलीण बाई असे म्हटले
म्हटले जाई. (मग ती वकील असो की नसो! ) थोडक्यात "जसा
संग, तसे अंग''. कोळशाला चुकून जरी हात लागला तर हात काळे होतातच, तसे थोडा
वेळ जरी पारिजातकाची किंवा बकुळफुलें ओंजळीत धरली तरी आपले हात आपसूक सुगंधी होऊन जातात.
संत मंडळी सतत समाजाच्या कल्याणार्थ आपले जीवन कारणी लावत असतात. सकृत दर्शनी त्यांचे जीवन सामान्य मनुष्यास विक्षिप्त वाटू शकते, परंतु अंतिमतः ते समाजाच्या कल्याणच साधत असतात. कोणतेही कार्य / कर्म करताना त्याचे कार्याचे मूल्य हे 'भावा'वर अवलंबून असते. सुरवातीला एखादे कार्य मनुष्याच्या हातून चोख पार पडेलच असे नाही, परंतु सरावाने मात्र त्यात निपुणता येऊ शकते. मनुष्य नाम घ्यायला लागला की त्याच्यात नकळत बदल होत जातात. नामस्मरण करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या संगतीत रहाणे.
जर घटकाभर झालेल्या सुगंधी फुलांच्या संगाने मनुष्याचे हात सुगंधित होत असतील, तर भागवतांच्या नामाच्या अखंड संगाने मनुष्याचे अवघे जीवन उजळून निघेल, हे सांगायला कोणता ज्योतिषी हवा..? मनुष्याने एखादी वाईट गोष्ट केली अथवा अनावधानाने त्याच्याकडून घडली तर मनुष्य पटकन ती मी केली असे मान्य करीत नाही, हा मनुष्य स्वभाव आहे, परंतु एखादे सत्कार्य नकळत जरी त्याच्याकडून घडले तरी तो मी केले, मी केलं असे जगाला सांगू लागतो.
"कोंबड झाकून ठेवलं, म्हणून तांबडं फुटायचं काही रहात नाही", अशी आपल्याकडे एक म्हण आहे. चांगले कार्य केले
तर ते आपल्या सद्गुरुंच्या कृपेने घडले असे मानून ज्याचे त्याला अर्पण करावे, परंतु
मनुष्य देहबुद्धिमुळे कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि स्वतःचा घात करून घेतो. मी किती चांगला
मी किती नाम घेतो याची जाहिरात करत फिरू लागतो, मग त्याची प्रगती न होता, अधोगती मात्र
नक्की सुरू होते. साधना करताना वादविवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून
साधन करीत राहावे.
आपल्याकडे
प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की
असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. पण आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे
वागतो ? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात ? हे सर्व पाहून देवाला
आपल्या घरात राहावेसे वाटेल का ? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर,
आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे
वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.
आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी. किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. "बोले तैसा चाले...." असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का ? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.