संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit
गेयं गीतानामसहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम् ।
नेयं सज्जनसंगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् ।।
अर्थ :- नित्य
भगवद्गीतेचा मुखानं पाठ व्हावा, श्रीपति भगवान श्रीकृष्णांचं विराटरूप चिंतनात ध्यानात ठेवावं, आपलं मन, चित्त नेहमी सज्जनांच्या
संगतीत लावावं.. सज्जनसंगतीकडेच न्यावं! आणि दीन दुर्बलांना अपंगांना आपल्याकडील
धनवित्त द्यावं.
चिंतन :- आचार्यांनी या श्लोकात काया वाचा मन यांचा
सर्वोत्तम वापर कसा करावा.. चित्तवित्ताची नेमकी व योग्य जागा
कोणती याविषयी मार्गदर्शन केलंय. वाणीनं गीता व स्तुतीस्तोत्र पाठ यांचं गायन करावं असं ते
म्हणतात! गायनक्रियेत मनाचाही मोठा सहभाग असतो.. गायन अत्यधिक आनंदाच्या किंवा
अत्यधिक शोकाच्या वेळी बाहेर पडतं.. त्यात त्यावेळी वाणी आणि मनाचा संगम होणं हे अत्यावश्यक असतं.
गीता
हा आचरणशास्त्राचं Behaviourial Science चं मार्गदर्शन करणारा ग्रंथ असून.. त्यात
सांगितलेल्या भक्ति, ज्ञान, वैराग्य, निष्काम कर्म इत्यादींनी युक्त अशा
आचरणसूत्रांच्या प्रात्यक्षिकांचं वर्णन म्हणजे श्रीमद्भागवत आहे. भगवद्गीता गावी
असं म्हणताना भागवतही त्यात समाविष्ट आहे हे गृहीत धरावं. कारण Theory आणि
Practical या दोहोंना जीवनात समान स्थान आहे.
सिद्धान्तावाचून
आचरण अस्थिविहीन मांसाचा गोळा असून आचरणावाचून सिद्धान्त हा मांसविहीन अस्थींचा
नुसता सांगाडा आहे. गीता वैदिक धर्माच्या सिद्धान्ताची प्रतिपादक असून भागवत त्या
सिद्धान्तानुकूल आचरणाचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा
प्रसंग असं संत तुकाराम म्हणतात.. ते केवळ त्यांच्याच बद्दल नसून
सर्वसामान्यांच्याही आयुष्यात जीवन हा एक संघर्षच असतो... मोह आणि कर्तव्य यामधला!
अशा
संघर्षात कसं वागावं याचं मार्गदर्शन करणार्या सूत्रांचं सतत चिंतन घडावं
म्हणून.. आणि निश्चयात्मिका बुद्धीनं
मिळालेल्या हितकारक सूत्राची जीवनात अंमलबजावणी करण्यासाठी बळ मिळावं, बुद्धि
स्थिर रहावी.. म्हणून आवश्यक असलेली प्रभुकृपा व्हावी.. याकरता स्तुती स्तोत्रे.. अशा द्विविध हेतून आचार्य सांगतात गेयं
गीतानामसहस्रम् !
त्या
सूत्रांचं मनात सतत चिंतन, मनन, निदिध्यासन करीत असतानाच भगवान श्रीकृष्णांच्या नाममंत्राचा जाप
करावा असं सांगण्यामागेही आचार्यांचा एक हेतू असावा.. भगवंताला
त्याच्या रूपावरून, गुणांवरून, पराक्रमांवरून, लीलांवरून, विविध प्रकारच्या
सामर्थ्यावरून जी नावं मिळालेली आहेत त्यांचं नित्य स्मरण घडावं व त्याप्रमाणे
जगण्याची प्रवृत्ति चित्तात निर्माण व्हावी म्हणून भगवंतांच्या स्तुती स्तोत्रांचा
पाठ नित्य करावा हा एक हेतु! भगवन्नाम व नामी यांमधे अभेद
सांगितला गेलाय त्यामुळे...
नामात शक्ति जितुकी अघ ते हराया
पाप्या न शक्ति तितुकी अघ ते कराया ।...
या
वामनपंडितांच्या वचनाप्रमाणे.. तसंच नामसंकीर्तनं
यस्य सर्वपापप्रणाशनम् ... या भागवतोक्त्यनुसार.. मनुष्यजीव पापमुक्त
व्हावा हा दुसरा हेतु! नामसंकीर्तनाचं.. नामजपाचं फळ "नामीचं दर्शन" हे
असल्यानं ते जितकं आत खोलवर रुजेल तितकं भगवद्रूप चित्तावर उमटेल..
मनातला
कामक्रोधादि व तज्जन्य फलासक्तिरूपी मळ नामाच्या साबणानं धुतला जाईल व प्रीयते अमलया भक्त्या या
न्यायानं शुद्ध निर्मळ चित्तात भगवद्दर्शन अधिक सुस्पष्टपणे घडत राहील.. स्वच्छ
वस्त्रावरच अगदि सूक्ष्मसाही डाग ठळकपणे उठून दिसतो या न्यायानं
भगवन्नामस्मरणानं.. नामसंकीर्तनानं चित्त जरी निर्मळ, शुद्ध झालं तरीही.. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्.. या
अर्जुनाच्या सानुभविक मताप्रमाणे त्यावर अन्य विकारांची छायाही पडू नये यासाठी
आचार्य सांगतात
ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम् । श्रीपति
श्रीकांत श्रीवल्लभ म्हणजे केवळ श्रीकृष्ण भगवंत! बाकी तुम्ही आम्ही.. आपण सगळे परमेश्वराचे दास
आहोत भगवंताचं रूपदर्शन
डोळ्यात जडलं, चित्तात ठसलं आणि ओठातून शब्दात उमटलं की साहजिकच अन्य विषयांची व
विषयी जनांची संगत नकोशी वाटेल... उत्तम ध्यान तेच की ज्यात मी परमेश्वराचाच
दास आहे, तो माझा स्वामी आहे. मला तोच पाहिजे. अशी भावना येते.
श्रीकृष्णांचं ध्यान लागलं.. त्या एकाचाच छंद लागला की सर्वत्र तोच दिसतो.. यत्सर्वत्र तदीक्षणम् अशी
सर्वभुतहितेरताः या सर्व जगाला तो व्यापलेला आहे अशी स्थिति येते. मन आनंदानं भरून ओसंडून वाहतं.. कंठी प्रेम दाटे नयनी नीर
लोटे अशी अवस्था होते! स्वामींच्या वचनात.. भिंगरुटी
दृष्टांप्रमाणे आळी जेवी नुरेचि वेगळी अशी वेळ येते. ती स्थिति
नित्य निरंतर तशीच रहावी म्हणून मग चित्तात विचार येतो की गीताभागवत करिती श्रवण, आणिक चिंतन श्रीकृष्णाचे ।
अशा
साधुसंतांची, सज्जनांची हवीहवीशी वाटणारी संगत आपल्याला मिळावी! त्या संगतीची ओढ, तळमळ
लागली व तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा
असं आपल्या मनात येऊन सज्जन संगतीत.. संत साधु भगवज्जन संगतीत आपला वेळ व्यतीत
करावासा वाटला की खुशाल खात्री बाळगावी की हेच आचार्यांना अभिप्रेत आहे!..
भगवद्भक्ति
करत असताना ती जरी देहभान विसरून करायची असली तरी जोपर्यंत मनुष्यजीव संसारात आहे.. देहास्तित्व
आहे तोपर्यंत लोकव्यवहार सोडायचा म्हटलं तरी सुटत नाही.. त्यामुळे पोटापाण्याचा
उद्योग अपरिहार्य असतो! आपल्या व आपल्यावर अवलंबून असणार्यांच्या उदरनिर्वाहाची
जबाबदारी निभावताना उत्तम व्यवहार जोडून मिळवलेल्या धनातील काही भाग हा
ब्रह्मचारी, संन्यासी, भिक्षेकरी, अतिथि, अभ्यागत, हीनदीन दुबळे,
अपंग, निराधार, निराश्रित यांच्यासाठी आवर्जून काढून ठेवावा असं
सनातन धर्म सांगतो..
ती
गृहस्थाश्रमी माणसाची जबाबदारी आहे, ते
त्याचं कर्तव्य आहे! असलेल्या संपत्तीचं आजकाल जे अंगठ्या एवढ्या जाडीच्या
सोन्याच्या माळा, सोन्याच्या तारांनी विणलेले अंगरखे, दाही बोटात सोन्याच्या
जाडजूड अंगठ्या इ. वापरून जे हिडीस.. किळसवाणं.. उद्दाम प्रदर्शन होतंय.. त्याला सनातन वैदिक धर्मात मुळीच स्थान नाही..
अर्चनभक्तीत,
दास्यभक्तीत इष्टापूर्त समाविष्ट आहे ते देवालयं मंदिरं बांधणे, धर्मशाळा फुलबागा अन्नदान यासाठी जवळचा पैसा
द्रव्य धन खर्च करावं यासाठीच! आपल्याकडून भावे साधु संत सेवा अशा
मार्गानं घडली तरच ती त्या भगवंतापर्यंत
पोहोचते हे समजवण्यासाठी!
संत सज्जनांचा पैसा हा नेहमी प्रसिद्धिपराङ्मुख राहून सत्पात्री दानासाठीच वापरला जातो... पण दुष्टांचा, दुर्जनांचा, अयोग्य.. अन्याय्य मार्गानं जाणार्या राजकारण्यांचा पैसा हा आत्मप्रौढी, प्रसिद्धी, सत्तासंपादन करून सामान्य जनांना लाचार अगतिक बनवण्यासाठीच वापरला जातो!
आचार्य सांगतात.. जितुके मालक तितुकी नामे । हृदये तितुकी याची गावे । कुणी न ओळखी तरिही याला दीन, अनाथ, अनाम अशा जनता जनार्दनालाच..
देयं दीनजनाय च वित्तम् । तेही
भज गोविंदम् असं
त्याला प्रेमानं सांगत!
समर्थांना
अभिप्रेत असलेला..
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा घडवायचा असेल तर तो
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा
सदा कृष्णनामे
वदे नित्य वाचा
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा...
असाच
व्हायला हवा त्यासाठी तो आचार्यांनी या श्लोकात दिलेल्या मार्गानेच जायला हवा!