अंगं गलितं पलितं तुंडं दशनविहीनं जातं तुंडम् संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge pandit

अंगं गलितं पलितं तुंडं दशनविहीनं जातं तुंडम् संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge pandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - 

sunskrit-subhashit knowledge pandit

अंगं गलितं पलितं तुंडं दशनविहीनं जातं तुंडम् ।

वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुंचत्याशापिंडम् ।।

अर्थ :- शरीर गलितगात्रं झालं, सगळी इंद्रियं शिथिल झाली, मान लटलटून नन्नाचा पाढा म्हणू लागली,  सगळे दात पडून तोंडाचं बोळकं झालं, स्वतःच्या पायातलं बळ ओसरल्यावर काठीचा आधार घ्यायची वेळ आली तरी अशा स्थितीतल्या वृद्धाच्या देहातील आशापिंड काही केल्या सुटत नाही ना त्याला तो सोडवतोय!

चिंतन...

आचार्य सांगतात की  देहाची इतकी दुरवस्था होऊनही.. जर्जरावस्था होऊनही माणसाच्या मनातली जगण्याची आस.. आशा इतकी प्रबळ असते की ती काही केल्या या देहपिंडाला सोडायला तयार नसते. उलट त्याच्या ठिकाणची भोगासक्ति नित्य वाढतच असते! आणि यात स्त्रीपुरुष असा भेद तिळमात्रही संभवत नाही!

एक सुभाषितकार अशाच एका वृद्धाची मनस्थिति सांगताना म्हणतो..

आपाण्डुरा शिरसिजास्त्रिवली कपोले दन्तावली विगलिता न च मे विषादः।

एणीदृशो युवतयः पथि मां विलोक्य तातेति भाषणपरा खलु वज्रपातः।।

अर्थ :- डोईवरचे केस पिकलेत, गालांवर सुरकुत्या पडल्यात, दातांनी ठाणं सोडलंय अशा आणखी कितीतरी वृद्धत्वाच्या खुणा अंगावर उमटल्या असल्या तरी त्याचा मला विषाद नाही, त्याचं दुःख नाही.. पण तरुण मुली रस्त्यातून जाताना मला पाहून जेव्हा आजोबा, काका असं म्हणतात तेव्हा खरंच एखादा वज्रपात झाल्यासारखं वाटतं! स्त्रीची सुद्धा अशीच मनोऽवस्था हम पाँच नावाच्या एका हिंदी मालिकेतील पात्राच्या तोंडी "आँटी मत कहो ना!" असा पालुपदा सारखा उद्गार देऊन सूचित केली गेली होती.

संत रामदास सुद्धा राघवाकडे कौल मागते वेळी सामान्य माणसाची स्थिति

 "कुरूपी विरूपी कदाही नसावे । नसो वृद्ध काया तरुणी असावे"

अशीच असते असं सांगतात! नानाप्रकारची आणि टोकाची शारीरिक मानसिक आर्थिक दुःस्थिती भोगत असतानाही माणसांच्या अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम भक्ति उदयाला येत नाही याचं आचार्यांना एकप्रकारे आश्चर्यच वाटतं. कारण काल कितीही प्रवाहरूपानं नित्य असला तरी स्थल, वस्तु, पदार्थ, व्यक्ति, स्थिति इ. बाबतीत अनित्यच असतो!

केवळ भगवंतच सर्व निरपेक्ष व नित्य असतो. शंकराचार्य त्या वृद्ध ब्राह्मणाला.. म्हणूनच .. सांगतात की ही देहाबद्दलची.. त्याद्वारे वार्धक्यातही मिळू शकणार्‍या कौतुकाची, प्रसिद्धीची, द्रव्याची आस, मोह सोड.. कारण अंतिम क्षणी त्यातलं काहीच पुढच्या मार्गावर उपयुक्त ठरणार नाही! हितकारक एकच आहे.. भज गोविंदम् !

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post