Charpat Panjarika Stotra (चर्पट पंजरिका स्तोत्रम्)
मराठी श्लोकार्थ
पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः।
पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुंचत्याशामर्षम् ।।
अर्थ :- रात्र,
दिवस, पंधरवडा, महिना, अयन आणि वर्ष पुनःपुन्हा येतात व पुनः पुन्हा जातात! (अशा
रीतीनं माणसाचं आयुष्य सरत असतं!) तरीही मनुष्य आशा, क्रोध, क्षोभ,
ईर्ष्या, लोभ, मोह, द्वेष, मत्सर इत्यादींना काही सोडत नाही!
चिंतन...... श्रीमद्भागवताच्या स्कं. ३
मधील अ. ११ मधे कालाच्या सूक्ष्मतम परिमाणापासून ते स्थूलतम परिमाणापर्यंतची चर्चा
/ व्याख्या आली असून त्याची कल्पना अत्याधुनिक पदार्थ विज्ञानालाही अजून आलेली
नसेल.. त्यांच्या बुद्धीची आकलन कक्षाच तिथपर्यंत गेली नसेल! सूर्यप्रकाशाच्या
कवडशात जे असंख्य कण दिसतात त्यापैकी एकाला ओलांडून जायला प्रकाशाला जितका वेळ
लागतो..
त्याला
परमाणु म्हणतात. इतकं काळाचं सूक्ष्मतम परिमाण आहे. कृत, त्रेता, द्वापर व कलि अशा
एका चतुर्युगीची ४३ लाख २० हजार सौरवर्षं भरतात. अशा ४ चतुर्युगी मिळून एक महायुग
होतं आणि ७१ महायुगांचा एक दिवस.. तितकीच रात्र! म्हणजे १४२x४३ लाख २० हजार
सौरवर्षं मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस भरतो! त्याला ३६५x१०० इतकी वर्षं त्याचं
आयुष्य आहे. हे एक कल्प.. मन्वंतर म्हणवलं जातं.
अशी
चौदा मन्वंतर होतात... इतका काल व्यापक आहे.. त्यापुढे माणूस कितीही दीर्घायुषी
असला तरी ते जीवन क्षणिकच म्हणायला हवं. हा काल चक्रवत् गतिमान असल्याचंही
म्हटलंय. काल प्रवाहरूपानं जरी नित्य असला तरी मानवी व्यक्ति जीवनापुरताच विचार
करायचा झाला तर तो अनित्य, क्षणिक व परिवर्तनशील असल्याचंच आढळून येईल. या विषयी
राष्ट्रसंत तुकडोजीचं एक सुप्रसिद्ध पद आहे..
कोण
दिवस येइ कसा, कोण जाणतो ।।धृ०।।
एक
दिवस हत्तिवरी, मिरविति त्या नवऱ्यापरि ।
एक
दिवस मिठ-भाकरि, दारि मागतो ।।१।।
एक
दिविस वस्त्र जरी, क्रिडताति महालांतरि ।
एक
दिवस चिंधि घरी नाहि सांगतो ।।२।।
एक
दिवस मान जनी, चवरी डुलतील तनी ।
एक
दिवस न पुसे कुणि, सोडि प्राण तो ।।३।।
ऐसा हा
विधि-लिखीत, जीवांना त्रास देत ।
तुकड्याची
मात नव्हे, शास्त्र बोध तो ।।४।।
अशा
या अल्पकालिक जगात अहंकारग्रस्त होऊन कामक्रोधादि षड्रिपूंनी आपलं आयुष्य कालचक्र
ज्यानं प्रवर्तित केलं त्या भगवंताकडे पाठ करून.. त्याची उपेक्षा करून.. हेतुतः दुर्लक्ष
करून आणि अज्ञानवश त्याला धुत्कारून, नाकारून केवळ देहभोगांसाठी व्यर्थ घालवणं हा
शहाणपणा नव्हे हेच आचार्यांना इथे अधोरेखित करायचं आहे. वीर धुरंधर आले गेले पायी
माझ्या इथे झोपले,
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी ।।
असं
कुंभाराला खडसावून सांगणारी मातीही कालाधीनच असते.. कारण पृथ्वीसकट अखिल
ब्रह्मांडाचा आदि व अंत काळाच्या मोजपट्टीतच सामावतो. श्रीमद्भागवताच्या पहिल्या
स्कंधाच्या अखेरीस जेव्हा महापराक्रमी परीक्षितानं शुक महामुनींना प्रश्न विचारला
की... अतः पृच्छामि...
पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा ।
म्हणून मी विचारतो
की मरणाऱ्या माणसानं इथे.. या लोकी सर्वथा काय करावं? तेव्हा
महर्षि व्यासांनी शुकदेवांच्या मुखानं उत्तरादाखल इतकंच सांगितलं की..
तस्मात् भारत सर्वात्मा भगवानीश्वरो हरिः ।
श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छताभयम् ।।
म्हणून
(याच्या अलिकडे शुकदेवांनी राजाला बरंच काही समजावलंय.. म्हणून!) हे
भारता, ज्याला अभयाची (मृत्यूपासूनच्या!) इच्छा, कामना आहे त्यानं सर्वात्मा, भगवान,
ईश्वर अशा हरीचंच गुणगान करावं, तेच ऐकावं, त्याचंच स्मरणचिंतन करावं! तेव्हा या काळाचं चंचलत्व, व्यापकत्व, त्याचा प्रभाव आणि त्या तुलनेत
मानवी जीवनाची क्षणभंगुरता व अनित्यता लक्षात घेऊन निदान उत्तरायुष्यात तरी
माणसानं बोध घ्यावा की, भज गोविंदम् !