पिशुन - पैशुन्य म्ह. काय? संस्कृत सुभाषित रसग्रहण - paishunya sunskrit-subhashit knowledge pandit

पिशुन - पैशुन्य म्ह. काय? संस्कृत सुभाषित रसग्रहण - paishunya sunskrit-subhashit knowledge pandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण -  sunskrit-subhashit 

पिशुन - पैशुन्य म्ह. काय?

लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:।

सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।

सौजन्यं यदि किं गुणै: सुमहिमा यद्यस्ति किं मन्डनै:।

सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥

या श्लोकात पिशुनता शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय? ते आपण पाहुया 

    पिशुन म्हणजे चहाडखोर, एकाची वाईट गोष्ट.. न्यून.. च्छिद्रं दुसर्‍याला सांगून दोघांमधे लावालावी करणारा, भांडणं लावणारा, द्वंद्व - वैर निर्माण करणारा, परस्मै पररन्ध्रप्रकटीकरणं पिशुनता । पिशुनता हा कठोरपणाचाच प्रकार आहे.. पण ही कठोरता दुसर्‍याला त्रास देण्यासाठी असते! दुसर्‍याला कोणत्याही प्रकारे त्रास देणं हे पापच आहे.

    अपैशुन हा गीतेच्या सोळाव्या अध्यायातील दैवी संपत्तीतला सत्तावीस गुणांमधला एक गुण सांगितला आहे.. जो विमुक्तिदायक आहे व पैशुन हे जीवाला बांधणारं आहे!... बंधनकारक आसुरी संपत्तीत तिथे त्याचा स्वतंत्र उल्लेख नसला तरी त्याची वंशपरंपरा अभिमानापर्यंत पोहोचणारी असून पारुष्य.. कठोरता असल्याशिवाय पैशून्य घडतच नाही!

    समर्थ रामदासांनी पैशून्याला पिसुणे हा मराठी कपडा चढवलाय.. पिसुणे वाटती सर्व कोणीही मजला नसे! आप्तमित्र, गोत्रज, बांधव हे जर भगवंतापासून आपल्याला दूर करणारे असतील तर ते आपले नव्हेत, ते परकेच.. त्यांच्यापासून दूर राहणंच इष्ट.. गमू पंथ आनंत या माधवाचा हे मनानं निश्चित केलं असेल तर! म्हणूनच त्यांना टाळण्यासाठी बुद्धि दे रघुनायका अशी त्यांची प्रार्थना आहे!

    पैशून्य हे एक पाप जर अंगी ठासून भरलेलं असेल तर अन्य पापांची आवश्यकताच काय? असं सुभाषितकारानं विचारलंय... अभिप्राय हा की त्या पैशून्यातूनच मानसिक हिंसा प्रकट होते जे सर्वात मोठं पाप आहे... असत्याला धरूनही पिशुनता चित्तात येते.. आपण कधीही दांभिक असू नये, पण दुसर्‍यांची दांभिकता तिसर्‍यांसमोर उघड करण्याची जबाबदारीही आपल्यावर नाही ..

    ती योग्य काळवेळ पाहून आपोआप प्रकट होईल हे मनाशी पक्कं बांधून ठेवलेलं असेल तर पिशुनता काही प्रमाणात कमीही होऊ शकेल.. टाळता तरी येईल. कारण दुसर्‍यांना दांभिक ठरवणं हा आपल्या अज्ञानाचा परिणाम वा असत्याधारित प्रकार ठरू शकतो! आपल्या साधनेच्या काळाचा अपव्यय त्यामुळे होतोच पण अपैशून्यामुळे मिळवलेलं सर्व नष्ट होऊन पुनश्च जय श्रीकृष्ण म्हणत साधना नव्यानं सुरू करावी लागते!

    आपण आपल्यावर लक्ष केंद्रित केलं.. आपलं जीवनध्येय निश्चित केलं, चरमसाध्य.. इतिकर्तव्य ठरवलं की ते लौकिक किंवा पारलौकिक कोणतंही असलं तरी पैशून्य हा त्यातला मोठा अडसर ठरू शकतो एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं.. ध्येयपथावरच्या निर्विघ्न वाटचालीसाठी! सत्याचा विचार पुढच्या चिंतनासाठी!

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post