संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit
वाईट संगामुळे या १२ गोष्टी नष्ट होतात
दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यति: सङ्गात्सुतो लालनात् ।
विप्रोऽनध्ययनात् कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात् ।
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि: स्नेहः प्रवासाश्रयात् ।
मैत्री चाप्रणयात् समृद्धिरनयात्त्यागात्प्रमादाद्धनम् ॥९८॥
-
('नीतीशतक', राजा भर्तृहरी.) वृत्त
:- शार्दूलविक्रीडित.
अर्थ :- वाईट मंत्री मिळाल्याने राजा नष्ट होतो; विषयांशी सङ्ग ठेवल्याने, संन्यासी
भ्रष्ट होतो ; फाजील लाड केल्याने,
मुलगा वाया जातो ; अध्ययन न केल्याने, ब्राह्मण
नष्ट होतो ; कुपुत्रामुळे,
कुळ नष्ट होते ; दुष्टांची सेवा केल्याने, शील नष्ट
होते ; दारू पिण्याने,
लाज नष्ट होते ; देखरेख न ठेवल्याने, शेतीचे
नुकसान होते ; सतत प्रवासात असल्याने,
आपल्यांपासून दूर झाल्याने, स्नेह कमी होतो ; प्रेमभाव
न जपल्याने, मैत्री नष्ट होते ;
अनीतीने व अव्यवस्थापनाने, समृद्धी संपुष्टात येते ; आणि प्रमादाने
वागण्याने, धन नष्ट होते.
टीप - कशाकशाचा नाश कशाकशाने होतो हे या श्लोकात सांगितले आहे.
१. राजाचा नाश वाईट मंत्र्यांमुळे (म्हणजे सल्लागार
मंडळाच्या वाईट सल्ल्यांमुळे) होतो.
२. संन्यस्त व्यक्तीचा नाश संगामुळे होतो. संन्याशांसाठी
अनेक नियम असतात,
जे लोकांमध्ये राहिल्यास पाळणे शक्य होत नाही. इथे संग शब्दाचा अर्थ आसक्ती असा आहे.
३. मुलाचा नाश अतिलाड केल्याने (उलटपक्षी- वाईट
सवयी लागणे इ.) होतो.
४. ब्राह्मणाचा विनाश अनध्ययनामुळे होतो. चातुर्वर्ण्य
पद्धतीत विप्रवर्गाची नियोजित कर्मे - यजन, याजन, अध्ययन, अध्यापन.
त्यातले अध्ययन न केल्यास,
म्हणजे विद्याभ्यास न केल्यास ब्राह्मणाचा विनाश होतो. सद्यकालीन
सामाजिक व शैक्षणिक संरचनेनुसार या श्लोकातील ब्राम्हण या शब्दाच्या जागी विद्यार्थी
म्हटल्यास हाच नियम विद्यार्थ्यासही लागू होतो.
५. जर कुपुत्र जन्माला आला तर संपूर्ण कुलाचा नाश
होतो. जसा दुर्योधनामुळे अख्ख्या कौरव कुळाचा नाश झाला.
६. वाईट माणसाच्या संगतीमुळे चारित्र्याचा नाश होतो.
जसं दुर्योधनाच्या संगतीत कर्णाच्या चारित्र्याचा नाश झाला.
७. मद्यामुळे लज्जेचा (जनलज्जेचा) नाश होतो, माणूस दारूच्या
व्यसनासाठी निर्लज्ज होत जातो.
८. नीट लक्ष न देण्यामुळे मशागती अभावी शेतीचा नाश
होतो,
९. कायम प्रवासात (एकमेकांपासून लांब) असल्याने
दोन व्यक्तींमधले प्रेम नष्ट होते.
१०. प्रेमभावाच्या अभावी मैत्री नाश पावते.
११. अनीतीने वागल्यास समृद्धीचा नाश होतो.
आणि
१२. वारेमाप खर्च केल्याने, अतित्यागाने
किंवा माज (प्रमादा) केल्याने धनाचा नाश होतो.
हिंदीमध्ये कुण्या कवीने लिहिलंय,
तीव्र तपस में लीन, नहिं कर इन्द्रिय विश्वास ।
विश्वामित्र जु मेनका, कण्ठ लगायी हुलास ।।
हे मनुष्या ! तू तीव्र तपात लीन असलास तरी इंद्रियांवर विश्वास करू नको. कारण विश्वामित्रासारखा तापसीही मेनकेच्या संगामुळे तपभ्रष्ट झाला. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे.
लालनात् बहवा दोषः, ताडनात् बहवा गुणाः ।
तस्मात् पुत्रश्च शिष्यश्च, ताडयेत न तु लालयेत ।।
लाड करण्यात अनेक दोष आहेत; ताडन करण्यात
अनेक गुण आहेत. म्हणूनच पुत्र आणि शिष्य यांना प्रसंगी यथावश्यक मारायलाही हवे, लाड करू
नयेत. नीतीशतकातील आजचा श्लोक शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्तामध्ये रचलेला आहे.
गणक्रम : म स ज स त त ग.
लघु गुरू क्रम : गागागा ललगा लगाल
ललगा गागाल गागाल गा. ।।