संस्कृत सुभाषित रसग्रहण
(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra
एतन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारम् ।।
अर्थ :- स्त्रीच्या देहाकडे.. तिच्या मुखाकडे वा अन्य अवयवांकडे पाहून
उगाच मोहात पडू नकोस, वृथा आकर्षणानं
वाहवत जाऊ नकोस! अरे हे शरीर तर
मांस रक्त अस्थि इत्यादींच्या विकारातून तयार
झालंय.. (या विकारांकडे
लक्ष न देता) मनात त्या अविकारी तत्त्वाचा वारंवार.. पुनःपुन्हा विचार कर!
चिंतन
:- अनादि कालापासून स्त्रीपुरुषांना
निसर्गतः परस्परांच्या देहाविषयी आकर्षण वाटत आलं आहे..
आजकाल त्याला basic/natural
instict असं म्हणतात. पण त्याबरोबर वाहवत जाणं ही मानवी
नव्हे तर पशुवृत्ति होय! त्या आकर्षणाला नंतरच्या..
अगदी अलिकडच्या काळातहि तथाकथित सुशिक्षित माणसं कधी अज्ञानानं वा कधी त्याचं समर्थन
करण्यासाठी प्रेम असं गोंडस नावही देतात..
कधी त्या
आकर्षणाला उदात्तीकरणाच्या मिषानं platonic love असं खोटं नाव दिलं जातं! कधी त्यात विकृति शिरून अनाचारापर्यंत व अत्याचारा पर्यंत मजल
मारली जाते.. इतकी की माणूसपण विसरलं जातं! पशुता लज्जित होते! आर्य सनातन वैदिक
हिंदू धर्मामधे असलेल्या आश्रमव्यवस्थेप्रमाणे गृहस्थाश्रम हा स्त्रीपुरुषांमधील नैसर्गिक
आकर्षणाला एक शिस्तबद्धता, नियमबद्धता आणण्यासाठी व माणसाला पशुत्वाहून वरच्या पातळीवर
नेण्यासाठी उपयुक्त व आवश्यक असा एक मार्ग आहे.
विवाह हा माणूस जन्माला आल्यानंतर करावयाच्या
सोळा संस्कारांपैकी एक अतिशय महत्त्वाचा संस्कार असून दोन कुळांमधे त्यानिमित्त एक
चांगला संबध प्रस्थापित होऊन चांगल्या एकसंध समाजाची निर्मिति होऊ शकते. राष्ट्रीय, सामाजिक व पारिवारिक
स्थैर्यासाठी उत्तम वंशातून व औरसपद्धतीनं वंशसातत्य राखणं आवश्यक असतं. उत्तम प्रजाप्राप्तिसाठी, निर्दोष अपत्यजननार्थ.. पतिपत्नींचीही शारीरिक, मानसिक, बौद्धिक अवस्था अनुकूल असायला
हवी!
त्यादृष्टीनं
आवश्यक संस्कार वधूवरांच्या ठिकाणी असायला हवेत.. विवाहानंतर त्यांचं वैवाहिक जीवन..
दांपत्यजीवन.. कौटुंबिक जीवन.. पारिवारिक जीवन सुखानंदपूर्ण तसंच शांति समाधानाचं रहावं...
यासाठी विवाहप्रसंगी देव, अग्नि यांच्या
बरोबरच आईवडिलांचे व कुळातील वडीलधार्यांचे आशीर्वाद जसे घ्यायला हवेत तसेच वर-वधू निश्चिती पूर्वी उभय पक्षांनी एकमेकांची परीक्षा करताना कुलं
च शीलं च सनाथता च विद्या च वित्तं च वपुर्वयश्च.. ।। १) कुलं २) शीलं ३) सनाथता ४) विद्या ५) वित्तं ६) वपु ७) वय.. या सात गोष्टींचा विचार करायला हवा.
तसं झालं
तर भविष्यात डोकावू शकणार्या संकटांची. कायिक मानसिक समस्यांची संख्या. पूर्णतः शून्यावर आणता आली नाही तरी. किमान पातळीवर
आणून ठेवता येईल. तसंच त्या दोन कुळांच्या तुलनेच्या अंतर्गत वधूवरांच्या गणगोत्रनाडी, विवाहयोग्य काल, लाभदायक मुहूर्त इत्यादींचा विचारही उपयुक्त ठरेल. गृहस्थाश्रमात पदार्पण करून माणसानं देव पितृ ऋषि ऋणाची अंशतः
का होईना परतफेड करावी या दृष्टीनंही हा विवाह संस्कार आवश्यक असून परमात्मप्राप्ति
हे मुख्य जीवनध्येय ठेवण्यासाठी आवश्यक असलेला आत्मसंयम देहामनात बाणवण्यासाठी आणि
समाजविघातक अनौरस संततीची, कुप्रजेची निर्मिति
टाळण्यासाठी वैयक्तिक जीवन जगत असताना जो संस्कार आवश्यक आहे तो या श्लोकातून आचार्य
देत आहेत.
पण आजकाल
एकंदरच सर्वसामान्यांची देवधर्मनीति याकडे प्रवृत्ति कमी असली स्त्रीपुरुषांकडे विद्यमान
ललितवाङ्मय, नाटक चित्रपट, दूरदर्शनवरील धारावाहिक मालिका, विज्ञापनं इत्यादींच्या प्रभावामुळे संयमाचा अभाव असला. तरी ज्याला आपलं जीवन ईशसेवेत व्यतीत व्हावंसं वाटतं त्याच्या
मार्गदर्शनार्थ आचार्य सांगतात की दृश्यमान देह हा अस्थि मांस रक्त श्लेष्म इत्यादींचा
विकार आहे.. कृमि विष्ठा मूत्रांचं भांडार आहे.. त्यामध्ये आसक्त न होता शरीर हे तो परमार्थ
प्राप्ती चे प्रबल साधन हे ध्यानात घ्यावं!
इदं शरीरं कृमिजालसंयुतं स्वभावदुर्गन्धमशौचमध्रुवम् ।
रुजायुतं मूत्रपुरीषभाजनम् रमन्ति मूढाः न रमन्ति पंडिताः ।।
हे मनुष्य शरीर
कृमीकिटकांनी भरलेले आहे. यात स्वाभाविक दुर्गंध अपवित्रता असून हे शरीर अनित्य आहे.
या शरीररूप मलमुत्राच्या नगरीत नानाप्रकारचे रोग, आजार, व्याधी वास करतात. अशा या स्त्री/पुरुष
देहात मुर्ख लोक रमतात. पंडित ज्ञानीजन मात्र या देहाविषयी अनासक्त
असतात. ही सत्यस्थिती ध्यानात घेतली तरी तिथं आसक्ति जडणार नाही.
दह्यते इति देहः = जाळला जातो म्हणून
देह :।: शीर्यते इति शरीरम्
= जे सतत
झिजणारं आहे ते शरीर :।:
अशी आपल्या देहाशरीराची स्थिति असताना त्यावरच्या
आसक्तिपोटी किति काळ घालवावा याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा! अनित्यानि शरीराणि
। शरीरं व्याधिमंदिरम् । भोगे रोगभयम् । हीही वस्तुस्थिति लक्षात घ्यावी.
आणि नित्य, अविकारी, निरवयव, शुद्ध बुद्ध, मुक्त अशा, निर्भयपद असलेल्या
भगवंताचं गोविंदाचं भजन करावं! तेच हिताचं आहे!!
एखादी असत्य
वा स्वप्नतुल्य गोष्ट सुद्धा जर कानामनावर तिचे वारंवार, सतत आघात झाले तर सत्य, वास्तव वाटू शकते तर जो नित्य सत्य वास्तव त्रिकालाबाधित आहे अशा भगवन्नामाच्या
भजनकीर्तनाचा गजर जर अखंड अविरत मुखातून झाला तर त्या परमसत्यात विरघळून जायला फारसा
विलंब लागणार नाही व त्रासही पडणार नाही!
म्हणूनच अहर्निशी भज गोविंदम् !