संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge
अर्थ :- ७) प्रारब्धकर्म जे
उरलं असेल ते इथेच भोगून संपवा ८) मी परब्रम्हाचा दास आहे या विचारानेच रहा.. या भावनेतच
रहा.
चिंतन.......
माणसाचं
क्रियमाण कर्म जोपर्यंत वासनात्मक बुद्धीनं आणि साहंकार वृत्तीनं चालू आहे तो पर्यंत
त्यांचे भोग भोगावेच लागतात.. काही कर्मांचे भोग लगेच व याच देहात भोगायला
मिळतात / लागतात तर काही कर्मांचे भोग ती कर्मं जेव्हा फलोन्मुख होतील तेव्हा लगेचच्या
पुढच्या जन्मात वा पुढच्या अनेक जन्मांनंतरही भोगार्थ वाट्याला येतात. कर्मांच्या फलोन्मुखतेचा नेमका काळ ठरवण्याचं व ते कशा प्रकारे
भोगायला लागेल हे ठरवण्याचं स्वातंत्र्य माणसाला नाही..
म्हणूनच
गीता सांगते गहना कर्मणो गतिः। कर्माचे परिणाम कदाचित लगेच दिसतील.. भोगायला मिळतीलही! No action
is good or bad but the motive behind the action is good or bad हे जसं, तसंच ज्या वासनेतून किंवा ज्या फलासक्तीतून कर्मप्रवृत्ति झाली.
कर्म घडलं तिचं फळ कधी व कोणत्या तऱ्हेनं भोगायला मिळावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य
ईश्वराधीनच असतं. कुणी त्या शक्तीला नियतीही म्हणतात तर कुणी कर्मविपाकवाद म्हणतात. पण त्या त्या भोगांनुसार त्र्याऐंशी लक्ष नव्व्याण्णव हजार नउशे
नव्व्याण्णव योनींमधे फिरत राहून पुन्हा मानव योनीत यावंच लागतं. कारण मनुष्ययोनीतच मर्यादित का होईना कर्माचं स्वातंत्र्य व
ते वापरण्यासाठीची विवेकबुद्धि ठेवली गेली आहे. नर करणी करे तो नरका नारायण बन जाए असं मनुष्ययोनीबद्दलच सांगितलं
जातं.. सांगता येतं! अन्य सर्व योनि
या भोगयोनि असून मनुष्ययोनि मात्र कर्मयोनि आहे.
परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते?
स जातो येन जातेन याति लोकः समुन्नतिम् ।।
नित्य परिवर्तनशील
अशा या सृष्टीत.. संसारात ते एकच परब्रह्म अपरिवर्तनीय आहे व त्याचाच अंश असलेला मनुष्यजीव
आपल्या जन्माचं तेव्हाच सार्थक करू शकतो..
१) जेव्हा
तो स्वतः परब्रह्माशी सायुज्य साधतो व आपल्या बरोबरच्या सर्व लोकाची व लोकांची समुन्नति
घडवून आणतो तेव्हा!
२) जेव्हा..
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। असं भगवंत स्वमुखानं ज्या स्थानाबद्दल गीतेत सांगतात त्या स्थानी विराजमान होऊन
मनुष्य स्वतःची जन्ममृत्युपरंपरा नष्ट करतो तेव्हा!
३) जेव्हा..
जातस्यहि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च। हे लक्षात घेऊन
मनुष्य.. पुनरपि जननं पुनरपि मरणम् .. हे चक्र भेदून संसारचक्राच्या केंद्रबिंदूशी
प्रवर्तकाशी एकरूप होतो तेव्हा! पण यासाठी याच एका जन्मात मागील सर्व संचित, प्रारब्ध भोगून संपवणं व या जन्मातील क्रियमाणापासून पुढील संचित तयार होणार नाही
या बाबत दक्ष. सावध राहणं हे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जैसी स्थिति आहे तैशापरी राहणं व एका जनार्दनी भोग
प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे यावर दृढ विश्वास ठेवून संकल्पावी माया संसाराची
हीच देवाला
आवडणारी थोर भक्ति आचरायला पाहिजे. याचाच अर्थ ठेविले अनंते तैसेचि राहून.. चित्तात समाधान ठेवून.. भगवन्मायेला नीट
ओळखत स्वजीवाला वेढून राहिलेल्या अविद्येचा निरास करणं आणि परा अशा ब्राह्मीस्थितीत
राहणं व नंतर कोणत्याही मोहात सापडून विचलित न होणं. याचाच अर्थ प्रारब्ध इथल्या इथेच भोगून संपवणं. एषणात्रयातून मुक्त होणं. निर्वासन होणं आणि मोहाचा नित्यासाठी
व संपूर्णतः नाश करून आत्मविस्मृतीतून बाहेर पडणं. सर्व द्वंद्वातीत, त्रिगुणातीत, नित्य सत्वस्थ
अशा परब्रह्म परमात्म्यात विरून विरघळून जाणं! हेच गंगेच्या बिंदूनं सिंधु होणं! साधना पंचकाची अखेर करत असताना आचार्यांना साधकांकडून हेच अपेक्षित
आहे!