संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya
यावद्वित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो रक्तः ।
पश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे ।।
अर्थ :- (भल्या गृहस्था!), जोपर्यंत तू पैसे मिळवण्यासाठी पात्र आहेस.. सक्षम आहेस तोपर्यंतच तुझ्या परिवारातली माणसं (आप्तस्वकीय, मित्रादि) तुझ्यावर प्रेम करतील.. (तुझी विचारपूस करतील.. तुला आपला म्हणतील!) तुझ्या मागे मागे धावतील (तुझ्याकडून काही अर्थलाभ, द्रव्यलाभ होईल या आशेने!) पण एकदा का तुझा देह वार्धक्यानं जर्जर झाला..... दुबळा झाला.... (तुझी द्रव्यसंपादन क्षमता संपली) की तुझी (स्वतःच्या घरातही.. बाहेर तर सोडूनच दे!) एका अक्षरानंही कोणीही चौकशी करणार नाहीत!
चिंतन :- आचार्य या चर्पटपंजरीतून सामान्य लोकव्यवहार काय असतो.. कसा चालतो याचं त्या वृद्ध ब्राह्मणाच्या निमित्तानं सर्वांसाठीच दिग्दर्शन करीत आहेत! जोवरी पैसा तोवरी बैसा, असतील शिते तर जमतील भुते,
अर्थस्य पुरुषो दासः, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति इ. इ. जी वचनं आहेत ती जीवन व्यवहारातील पैशाचं.. द्रव्याचं.. धनाचं
पूर्वीपासूनचं सर्वश्रेष्ठत्व.. सर्वाधिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच आहेत! वैयक्तिक व सामाजिक, राजकीय वा अन्य कोणत्याही
जीवनात आजकालही पैसा प्रथम पाहिला जातो.
यस्यास्ति वित्तं स नर कुलीनः, पंडितः, श्रुतवान् , गुणज्ञः, वक्ता, दर्शनीयः इ इ गुण त्याच्यात नसले तरी त्याला चिकटवले जातात!का? तर त्याच्याकडून काही भरघोस आर्थिक लाभ, देणगी, साह्य मिळेल या आशेनं! लग्नाच्या बाजारात माता "वित्तं" (आजकाल वधूही secured life हवं म्हणून!)पाहते. एतान् गुणान् सप्त विचिन्त्य देया कन्या बुधैः असा सल्ला देताना वधू आणि वर यांच्या परिस्थितीची तुलना करण्याच्या सात मुद्द्यांमधे कुल शील सनाथता विद्या वपु आणि वय यांच्या जोडीला वित्त हाही मुद्दा आवर्जून समाविष्ट केलाय!
पति व पत्नी यापैकी ज्याचा कुणाचा पक्ष आर्थिक दृष्ट्या सबळ असतो.. वरचढ असतो तो दुसर्याला नेहमीच खाली दाबतो, खातो, अन्यायाखाली भरडतो. चिरडतो याची पूर्वीच्या काळी तसंच आजच्या तथाकथित उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत, प्रगत, अतिप्रगत, पुरोगामी समाजातही अनेक उदाहरणं सापडतील, सापडतातच! लोकशाहीत निवडणुका लढवताना सर्वात आधी उमेदवाराच्या पैशाचाच विचार केला जातो.. नंतर त्याची जात, शिक्षण, सामाजिक कार्य इ. गोष्टी क्रमानं येतात हे नागडं सत्य आहे!
कलियुगात माणसं अर्थ आणि काम असे दोनच
पुरुषार्थ मानतील हे कलिधर्माला धरूनच आहे. आजकाल तर शेण राख भाताचा तूस या एरव्ही मूल्यहीन
असलेल्या गोष्टी तर विकल्या जातातच पण अतिथीचं.. पाहुण्यांच किमान स्वागत व्हावं
म्हणून पुढे केलं जाणारं.. प्रवासात अडीअडचणीला अत्यावश्यक असणारं पाणीसुद्धा
विकलं जातं.. अर्थप्राप्तीचं साधन बनवलं गेलंय. असा हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला
पैसा कमवण्याची घरातल्या कर्त्या पुरुषाकडे जोपर्यंत क्षमता आहे, धमक आहे तोपर्यंतच त्याला किंमत मिळते, मान.. आदर मिळतो, त्याचा
वचक.. दरारा राहतो.
पण एकदा का ही पैशाची
आवक त्याच्याकडून होईनाशी झाली की तो मातीमोल ठरतो.. उपेक्षेनं कोपर्यात ढकलला
जातो.. त्याची अवहेलना, अवमानना सुरू होते. पण असं जरी असलं तरी इथून पुढच्या
प्रवासाला जाताना.. इहलोकाची यात्रा संपवून परलोकाची वाट धरताना पैशाची पुरचुंडी
जवळ येत नाही! साधी सुई वा टाचणीही माणसाला बरोबर नेता येत नाही! त्या प्रवासातली
त्याची शिदोरी.. त्याचं पाथेय एकच..
कर्मानुगो गच्छति जीव एकः!
या द्रव्यार्जनासाठी, अर्थार्जनासाठी कर्तृत्व भोक्तृत्वादि अहंकारानं.. फलासक्तीनं प्रेरित होऊन जी पापपुण्यात्मक कर्म केली वा घडली असतील त्यांचे ठसे, संस्कार हीच शिदोरी बरोबर येते. "डुकृय् करणे" हे केवळ शिक्षणाचंच प्रतिनिधित्व करतं असं समजण्याची काहीच आवश्यकता नाही. तर इथे लक्षणेनं अर्थप्राप्तिसकट सर्वच कर्मांमधे.. भगवद्भक्ति सोडून.. माणसाची उतारवयातही.. वार्धक्यातही जीव अडकवण्याची जी वृत्ति आहे तीही आचार्यांना अभिप्रेत असावी असं वाटतं!
यावत्स्वस्थमिदं कलेवरगृहं यावच्च दूरे जरा
यावच्चेंद्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषः।।
आत्मश्रेयसि तावदेव मनुजा कार्यः प्रयत्नो महान्
संदीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः।।
या
भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोकाचाही आचार्यांच्या या श्लोकाशी छान समन्वय बसतो. तात्पर्य
एकच.. की बाकी जीवनव्यवहार जितके आवश्यक, अपरिहार्य, अनिवार्य वाटतात.. किमानपक्षी
तितकं तरी भगवन्नामस्मरण.. भगवद्भक्ति.. भगवत्सेवा (खरं तर त्याहून अधिकच.. नव्हे
नव्हे हेच!) यांना महत्त्व मिळायला हवं! म्हणूनच आचार्य त्या वृद्ध ब्राह्मणाला
सांगतात.. भज गोविंदम् .. भज गोविंदम् !
लेखक :- श्रीपादजी केळकर