संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit
अहरहर्गर्वः परित्यज्यताम् ।
अर्थ :- गर्व, अहंकार समूळ व कायमचाच टाळा.. टाका
चिंतन..
सदैव गर्वरहित रहावं.. अहंकारमुक्त आचरण ठेवावं.. निरभिमानवृत्तीनं
राहावं असं आचार्य सांगतात. आपल्या जवळ काही आहे म्हणून वा काही नाही म्हणूनही माणसाला
गर्व चढतो.. कारण अभावही भावरूपच असतो.. अहंकार येतो! त्या
ताठ्यातच समोरच्याचं वय, अधिकार, पात्रता, नातं गोतं, संबंध
इत्यादींची दखल न घेता अपमान केला जातो!
कुलं शीलं श्रुतं शौर्यं विद्या दानं धनस्तथा ।
सामान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवः ।।
या
सातही गोष्टी उपलब्ध देहाच्या माध्यमातूनच मनुष्य मिळवत असतो.. देहाप्रमाणे
त्याही गोष्टींना वय असतं आणि ते देहाच्या वयाच्या तुलनेत कमीअधिकही असू शकतं! तरीही वय साधारणतः शरीराचंच मोजलं जातं!
शीर्यते इति शरीरम् .. या व्याख्येप्रमाणे ते जीर्णशीर्ण जरी होत असलं तरी.. माणसं त्या शरीराचाही अभिमान बाळगतात... बघा इतकं वय झालंय पण शरीर कसं सुंदर, ताकतवान ठेवलंय.. दातांनी दगडही फोडू शकतो.. कानडोळे अजून शाबूत आहेत.. उच्चार अजूनही शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट आहेत किंवा याच्या उलटही.. तरीही अभिमान असतोच! एखाद्या रूपगर्वितेलाही सांगावं लागतं... मानिनी सोड तुझा अभिमान।
रूपसंपदा दो दिवसांची। यौवनासवे सरावयाची ।
जिने होउनी धुंद करिसी का। प्रणयाचा अपमान ।।
तात्पर्य
काय तर.. देह आणि या सातही गोष्टींमुळे माणसाला अहंकार, गर्व, ताठा येत असतो! गर्व,
अभिमान, अहंकार, ताठा जितका अधिक, तीव्र, कांटेरी.. टोकेरी तितका मनुष्य
इतरांपासून दूर जातो! ज्या देहाला साधन बनवून वर सांगितलेल्या इतर सात गोष्टी मनुष्य मिळवतो आणि तद्विषयक
गर्वात बुडून जातो तो देह तरी स्वतःच्या कर्तृत्वानं कुठे मिळतो?
देह पराधीन नाशिवंत जाण।
वाया अभिमान वाहसी का?
तुकारामही
विचारतात.. कुणाचे हे घर हा देह कोणाचा? हे सांगण्याचा उद्देश एवढाच
की देहाबद्दलही अभिमान बाळगू नये! जगात वरील सातही गोष्टींच्या
क्षेत्रात शेरास सव्वाशेर यथाकाल निर्माण होत असतोच! म्हणूनच गर्वाचं घर नेहमी
खालीच येतं.. असतं! There is always a room at the top असं जे म्हणतात त्यातलं हेच
वर्म असतं की शिखरावर पोहोचणं एकवेळ जमलं तरी दीर्घकाळ तिथे टिकणं अशक्य असतं ..
कारण गर्वाच्या वजनानं मनुष्य स्वतःच त्या भुसभुशीत टोकावरून घसरतो किंवा गर्वानं इतका फुगतो की ते वाढलेलं आकारमान त्या निमुळत्या जागी डळमळून तो खाली येतो. किंवा दुसरा तिथं अधिक मोठ्या कर्तृत्वानं येऊन अपुर्या जागेमुळे पहिल्याला सहज ढकलतो.. कालांतरानं तोही पडतो.. त्यामुळे तिथली जागा रिकामीच असते! ऐहिक, लौकिक विषयांमधे, प्रापंचिक व्यवहारात तर गर्व, अभिमान, अहंकार, ताठा हे बाधक आहेतच पण परमार्थ, अध्यात्म यात तो त्याहूनही अधिक बाधक आणि घातकसुद्धा आहे! म्हणून तर देवर्षि नारदांनी भक्तिसूत्रात एक धोक्याची सूचना सांगणारं सूत्र घातलंय...
ईश्वरस्य अभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वात् च ।...
अभिमानदंभादिकं त्याज्यम् ।
भगवद्गीताही सोळाव्या अध्यायात आसुरी संपत्तीत अभिमानाचा समावेश करते... दंभो दर्पोऽभिमानश्च... आणि निबंधायासुरी मता.. ती बंधक आहे असं तिचं वैशिष्ट्यही सांगते! उपासना.. भक्तीचाही माणसाच्या मनात अभिमान, गर्व, ताठा निर्माण होऊ शकतो, होतो! गुरुत्वाकर्षणाचा भौतिक शास्त्रांमध्ये ही अर्थ हाच आहे इतरांना आपल्या जवळ बांधून ठेवणं, आपल्या आकर्षणशक्तीत राखणं.. जसजसा हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मूळ गोष्टीपासून दूर गेल्यामुळे किंवा उंचावर गेल्यामुळे कमी होतो तसतसा जाणारा पदार्थ हलका वजनरहित होत जातो!
आपण स्वतः बद्दल गर्व,
अभिमान बाळगणं म्हणजे ईश्वरासकट सर्वांना दुय्यम गौण, तुच्छ ठरवण्यासारखंच आहे... मग
भक्ति उपासना साधना हवीच कशाला! आपल्याला जर दुसरा कुणी आपल्याहून वरचढ झालेला श्रेष्ठ
झालेला चालत नाही.. खपत नाही तर ईश्वराला तरी ते कसं खपेल.. सहन होईल?
ईशितुं नियमितुं शीलं यस्य स ईश्वरः।
म्हणून
सर्वसत्ताधीश तो एकच हे स्वीकारून आणि आपल्या
स्थलकालपरिस्थितीच्या मर्यादा मान्य करून निरभिमान निरहंकार निगर्वी राहणं व त्याचबरोबर
विनम्रता,विनयशीलता अंगी बाणवून साधना करीत राहणं हेच साधकाचं कर्तव्य आहे.