तृष्णा आणि कृष्णा
संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ sunskrit Subhashit knowledgepandit
श्रीकृष्णभगवंतांच्या अनन्यभक्तीशिवाय
जीव या संसारसागरातून तरून जाणे शक्य नाही. अनन्य भक्ती म्ह. इतर सर्व देवी देवतांची
उपासना सोडून फक्त श्रीकृष्ण देवाची भक्ती करणे. तीच भक्ती संसारमोचक ठरते. इतर मिश्र
व्यभिचारी भक्ती ही संपत्ती विलास देणारी असली तरी ती संसारातून मुक्त करू शकत नाही.
जशी पतिव्रता फक्त आपल्या पतीलाच पती मानते. तसं एका श्रीकृष्णदेवालाच शरण जाणे व त्यांची
भक्ती करणे याला अनन्य अव्यभिचारी भक्ती म्हणतात.
काही संत, संन्यासी, गृहस्थ श्रीकृष्ण
भगवंतांची भक्ती तर करतात पण त्यांच्या भक्तीत मिश्र भक्तीचा व्यभिचार असतो. ते श्रीकृष्ण
भगवंताला विष्णुचा अवतार मानण्याची घोडचुक करतात. किंवा मग राम आणि श्रीकृष्ण एकच आहे.
असे म्हणून अनन्यभक्तीपासून पतन पावतात. श्रीकृष्ण भगवंत हे विष्णुचे अवतार नाहीत.
ब्रम्ह विष्णु महादेव या एक देवता आहेत. आणि या देवतांच्या पलिकडे असणारा परब्रम्ह
परमेश्वर या देवतांपेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराचेच श्रीकृष्णभगवंत
अवतार होत. हे देवानेच गीतेत सांगितले आहे.
पण मिश्र भक्ती करणारी मंडळी गीतेकडेही अद्वैताचा चश्मा लावून बघते. आणि तिथेच सगळा घोळ होतो. जीव आणि ब्रम्ह एकच आहे अशी अज्ञानमुलक समजूत मनात ठसवून गीतेकडे पाहिले जाते आणि अनन्यभक्ती भंगते. जीव आणि ब्रम्ह एक कसे काय असु शकतात? जीव निपट अज्ञान, सकाळी काय खाल्ले ते संध्याकाळी आठवत नाही. आणि परमेश्वर तो सर्वज्ञ आहे. जीव सतत नरक, दुःख भोगतो, परमेश्वर आनंदमय आहे. जीव जन्ममरणाच्या अधिन आहे. परतंत्र आहे. देवता जशा नाचवतात तसा नाचतो आणि परमेश्वर स्वतंत्र आहे. परमेश्वराच्या अधिन सगळे देवताचक्र आहे मग जीव आणि ब्रम्ह एक कधीच असु शकत नाही. पण कुणीही वेदांती हे मान्य करणार नाही. कारण एकदा का अन्यथाज्ञान डोक्यात शिरले तर ते निघणे फार अवघड असते. असो!
तर आपल्या लेखाचा मुख्य विषय तृष्णा आणि कृष्णा हा होए. या दोन टोकाच्या बाजू आहेत. तृष्णा निवडाल तर नरकात पडाल, कृष्णा निवडाल तर मुक्त व्हाल असे पुढील श्लोकात एक भगवतभक्त आपल्या सर्वांना सांगत आहे :-
कृष्णां यो वृणुते भक्तः पदं यायान्निरन्तरम् ।
तृष्णां यो वृणुतेऽभक्तः खेदं यायान्निरन्तरम् ।।५२।।
अर्थ :- स्नान, अवगाहन इ. प्रकारे जो भक्त श्रीकृष्ण
भगवंतांची सेवा करतो तो शाश्वतपदी.. परब्रह्मपदी आरूढ
होईल. पण जो अभक्त तृष्णेमागे धावेल त्याला नित्य
खेद..
असमाधान..
दुःखच प्राप्त होईल.
चिंतन :-
कविंनी "तृष्णा" शब्दाची व्याख्या "आयताशा" अशी करून पुढे
तिच्याबद्दल "तस्याः व्याप्तौ नरकगतिरेव" असं म्हटलंय. तृष्णा म्हणजे तहान.. विषयसुखाची तहान..
हे विषयसुख देहानं व मनानं असं दोघांनीही भोगायचं असतं. तृष्णा म्हणजे आयताशा असं जेव्हा कवि म्हणतात तेव्हा ती आशा त्यांना
अभिप्रेत असते जी लांबलचक, विस्तृत, क्षितिजाप्रमाणे दूरदूर जाणारी असते, जी कधीच समाधान, तृप्ति देत नाही व माणसाला सतत धावायला लावते..
यया बद्धाः प्रधावन्ति अशा
आश्चर्य शृंखलेप्रमाणे.. अशीच आशा माणसाला निरन्तर नरकगती देणारी कर्मं करायला
प्रवृत्त करते! कारण ती भौतिक विषयसुखाबद्दलची असते.. ती
विषयमृगतृष्णेसारखी भ्रमित करणारी व भरकटवणारी असते.. अनेकदिक् असते! अखंड व अनंत प्रवास करायला लावणारी असते! भगवद्दर्शनाची आशा
एकदिक् असते..
भगवत्साक्षात्कार.. भगवन्मीलन या एका
बिंदूवर त्या आशेचा प्रवास थांबतो..
संपतो!
शमिता तृष्णा यया सा शमिततृष्णा.. जिनं भक्तांच्या, साधकांच्या, उपासकांच्या मनातील तृष्णेचा..
विषयमृगतृष्णेचा पूर्णतः उपशम केला आहे ती शमिततृष्णा! तृष्णांचा उपशम झाल्यावाचून नित्य असं जे भगवत्पद आहे तिथे निरंतर वास करताच
येणार नाही..
पण लौकिक, भौतिक विषयांच्या तृष्णेचीच निवड केली व तिच्याच मागे धावण्यात संपूर्ण आयुष्य
खर्ची घातलं तर मात्र नारकीय गतीविना अन्य काहीही हाती लागणं शक्य नाही!
कारण अशी
तृष्णा मनुष्य जीवाला नको नको ती कर्मं करायला प्रवृत्त करून आसक्तीमुळे केलेल्या
कर्मांचं अपेक्षित फळ न मिळाल्यास नैराश्य, वैफल्य, ईर्ष्या, संताप वाट्याला येऊन प्रसंगी पापकर्मांसाठीही प्रवृत्त करील व तिच्या
फलभोगांमुळे दुःखातच ढकलील..
कृष्णा व तृष्णा या प्रकाश
अंधारासारख्या परस्परविरोधी आहेत हेच कविंना या श्लोकातून
सुचवायचं आहे! श्रीकृष्णाचं वरण केल्यास
नित्यपदी निरंतर वास व तृष्णेचं वरण केल्यास नित्य निरंतर नरकगति! यातील काय स्वीकारावं हे विवेकबुद्धीनं ठरवावं.