एक श्रीकृष्णभक्ती सत्य कथा - लाज राख श्रीकृष्णा तुज मी शरण आले.... shreekrishnabhakti katha

एक श्रीकृष्णभक्ती सत्य कथा - लाज राख श्रीकृष्णा तुज मी शरण आले.... shreekrishnabhakti katha

 एक सत्य कथा - लाज राख श्रीकृष्णा तुज मी शरण आले....

    ही गोष्ट आहे १९४०-४५ सालची फार फार वर्षापुर्वीचीही नाही व अगदी अलीकडची पण नाही. गोष्ट आहे तरी आधुनिक, पण पुराणातील वाटावी अशी. ऐतिहासिक गोष्ट आहे. पण सत्य घटनेवर आधारलेली, अध्यात्माची जोड असलेली. गोष्ट आहे धर्म संस्थापनेची. घडली आहे हैद्राबाद संस्थानात निजामशाहीच्या शेवटी. एक होता निजाम. तख्तनशाह उस्मान पाशा शेवटचा निजाम गादीवर आहे. आपण आज त्याच्या काळात जाणार आहोत.

आज दरबारी आम सभा भरणार आहे सकाळी ठीक ९ वाजता सोळा जाहागिरीचे जहागिरदार, वतनदार व इतर दरबारी यांना आमंत्रित केले गेलेले आहे. निजामाला आपल्या वतनदारांकडून सविस्तर माहिती घ्यायची आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. सवेरे सवेरे उस्मानपाशा सैर सपाटयाला जाण्यास तयार होतो आहे. प्रसन्न चित्ताने तो गाणे गुणगुणतो आहे. त्यापुर्वी त्याने घेतलेली प्रथमच आलेली कोरी करकरीत नविन चकचकीत शेवरोले गाडी छप्पर उघडून दाराशी वाट बघत उभी आहे. जुन्या बग्गीच्या ऐवजी आत नवी कार फिरायला जायला निजामाला लागते. मात्र चार घोडेस्वार पुढे व आठ मागे असा शाही लवाजमा हवाच हवा. आस्ते कदम निजाम पायऱ्या उतरून गाडीत बसतो आहे. त्याचा डावा पाय सीटच्या खाली सोडलेला व उजव्या पायाचा गुडघा वाकवून हनुवटी पाशी आणून त्यावर आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट रोवून आता बसलेला दिसतो आहे. त्याने ही पोझ घेतल्या बरोबर कारवाँ हळूहळू महालाच्या बाहेर पडतो आहे. पुढचे व मागचे घोडेस्वार शाही इतमामाला साजेसे कारच्या स्पीडशी तारतम्य राखून धावताहेत. हवेतला गारवा आता हळूहळू सकाळच्या कोवळ्या किरणांनी उबदार होतो आहे.

राजसवारी हैद्राबादच्या मुख्य रस्त्यांवरून पुढे जाऊन गावाच्या जुन्या वस्तीत शिरते आहे. लोक प्रातर्विधी उरकून परताहेत. राजसवारी दिसताच रस्त्याच्या कडेला उभे राहून रस्ता मोकळा करून देताहेत. निजाम दृष्टीपथात येताच 'सलाम वाले कुम' करताहेत. खुशीत निजाम त्यांना 'वाले कुम सलाम' करण्यासाठी आपल्या उजव्या गुडघ्यावर घट्ट बांधून ठेवलेली मुठ सैल करून फक्त तर्जनीला वर उचलून गुडघ्यावर आपटतो आहे. गुर्मीत नजर इकडे तिकडे भटकते आहे. निघाला आहे तो शहराचा फेर फटका मारायला, प्रजेकडे लक्ष द्यायला, कुणाचे काय चालले आहे ते बघायला व जमल्यास क्षेमकुशल विचारायला, अडचणी समजावून घ्यायला व प्रजेचे मन जिंकायला. पण नियतीने वेगळेच योजलेले आहे.

सवारी घरं, रस्ते, मिनार बघत बघत पुढे चालली आहे. निजामाचे लक्षण कांही औरच दिसते आहे. राहगिराने, रस्त्याने चालतांना वास्तवावर नजर ठेवायला हवी पण याची नजर उंच हवेल्यांवर, माड्यांवर व खिडक्यावर. एका तीन मंझिली छतावर त्याची मेहरेनजर गेलेली आहे. 

    सकाळच्या कोवळ्या किरणात एक शोडषवर्षीय नवी नवेली अनुपम सौदर्यवती नववधु आपले नुकतेच धुतलेले काळे कुरळे केस सुकविण्यास बसलेली आहे. शिकेकाई, नागरमोथा, कव्हला व कचरीचा मंद सुवास अवती भोवती दरवळतो आहे. तिची स्वच्छ, सुंदर, गव्हाळी कांती सकाळच्या कोवळ्या किरणात जास्तच रसरशीत दिसते आहे. तिचे मृदु मुलायम केश तिच्या चेहऱ्याभोवती केवडयाच्या बनात वेढून बसलेल्या सार्पिणी सारखे दिसताहेत. पौषाचे उन सुखद, आल्हादकारक उब देते आहे. मंद सूरातले तिचे गुणगुणने तिला विलोभनीय शोभा आणते आहे. असे सौदर्यं निजामाने ना कभी देखा ना कभी सुना ! घारीच्या नजरेने हे दृश्य टिपले आणि फर्मान सुटले, ‘‘शोफर गाडी रोको ! यह किसकी हवेली है पुछो. पूछताछ करके मालिक का पता करके हमे महल मे जानकारी दो.’’ झालं ! पुढच्या घोडेस्वारांनी लगाम खेचलेत. मागच्यांची गती मंदावली. शोफर ने खाली उतरून मागच्या घोडेस्वाराला निजामाचा हुकूम सांगितला. कारवाँ भर रस्त्यात ठप्प. घोडेस्वार अवती भवती चौकशीसाठी पळत सुटे पर्यंत राजसवारी शहराची रपेट लावून परत महालाकडे वळली आहे.

सात यवनी व नऊ हिंदू जहागिरदार आता थोडयाच वेळात सभेसाठी हजर होतील. पण उस्मान पाशाचे चित्त विचलित, अधीर आहे. कधी आपल्याला माहिती मिळते असे त्याला झाले आहे. लालसेने अस्वस्थ आहे. कधी त्या खूबसूरत मुलीला बघेन असे झाले आहे. दरबार भरायला सुरूवात झाली आहे. एक एक सरदार, जहागिरदार, दरबारी स्थानापन्न होताहेत. पण निजाम आपल्याच तंद्रीत ‘‘कौन है अधर ! पूछो घुडसवारने जानकारी लायी? कौन है हवेली का मालिक?’’ कौन है व छत पर बैठी हुई झनाना ? निजामाचे उतावीळ प्रश्नावर प्रश्न. ‘‘हुजूर, धनी देशपांडे की नई दुल्हन बहू है। घोडेस्वाराने माहिती दिली.

‘‘जाओ ! हमारा फरमान लेकर ! उसे तुरंत बुलाकर लावो. बहू हमारे सामने हाजिर हो. अगर कोई बहाना बनाया तो अंजाम बूरा होगा।’’ उलट्या पावली घोडेस्वार धावत पळत श्रीमंत देशपांडे यांच्या हवेलीत दाखल. कणखर आवाज निजामाने फरमान देवून तो दाराशी उभा आहे. हा वज्राघाती निरोप ऐकून हतबल, बेचैन श्रीमंत देशपांडे हात चोळत बसलेत. अशुभाची पाल चुकचुक करत इकडून तिकडे फिरते आहे. काय करावे? आपली श्रीमंती या उतरत्या वयात कांहीच उपयोगाची नाही. आपल्या कोवळ्या मुलाला ते मरगळलेल्या आवाजात निजामाचे फरमान सांगताहेत तोच ‘‘काय झाले, कोण आले आहे?’’ सासूबाई बोलत बोलत बाहेर येताच त्यांना आपल्या म्हाताऱ्या पतीच्या व पुत्राच्या चेहऱ्यावर मृत्यु छायेचे सांवट दिसताच त्यांचाही चेहरा चिंतातूर. पतीचा व मुलाचा हताशपणा बघून संतापाने अंग कांपते आहे. नुकतेच त्यांच्या मुलाने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपल्या पत्नीचे रक्षण करण्याचे वचन दिलेले आहे. ते इतक्या लवकर सिद्ध करावे लागणार आहे. त्याच्या कोवळया चेहऱ्यावर नुकत्याच मिश्या फुटू लागल्यात. त्यात त्याची खिन्नता लपली आहे. त्याच्या पांढऱ्या फटक चेहऱ्यावर निजामाला टक्कर देण्याची हिम्मत नसल्याचे दर्शविते आहे.

त्याची खिन्नता, सासऱ्यांची हतबलता हे बघून त्या उद्वीग्न झाल्यात. ‘‘सूनबाई, खाली ये बघू ! तू काय करते आहेस? कोठे गेली होतीस या सकाळच्या प्रहरी? कुलीन स्त्रिया अवेळी बाहेर जात नाहीत मग तु कां गेलीस? तुला कां अवदशा आठवली? कुणाची नजर कशी ते सांगता येत नाही. एकटे बाहेर जावू नये. भोग आता आपल्या कर्माची फळे. कर स्वतःचे रक्षण ! जा निजाम पाशांकडेसासूबाई गर्जत बरसत आपला रोश व्यक्त करताहेत.

डोक्यावरचा पदर ढळू न देता वधूबाला सासरे, नवरा व सासूबाई समोर कोपऱ्यात पायाच्या नखाकडे बघत गप्प उभी आहे. अशा वेळी मोठ्याच्या समोर मान वर न करने व न बोलणे आहे. आपला दोष काय हे मात्र तिला कळलेले नाही. डोळ्यातून अश्रुधारांचा धबधबा जमीनीवर पाण्याचे थारोळया, लुगडं ओलेचिंब हिम्मत गोळा करून कसे बसे तिने आपले तोंड उघडले, ‘‘सासूबाई, मी तुम्हाला विचारून छतावर तेवढी गेले. मी अजाण आहे. निष्पाप आहे. माझे काही चुकले असल्यास क्षमा करा, पण निराधार सोडू नका. मला तुम्ही आपल्या मुली प्रमाणे वागविता, आता अशी असहाय्य सोडून राजमहालात जाण्याची आज्ञा करू नका. मामंजी ! आपण तरी माझ्या पाठीशी कणखर उभे रहा. आपण वतनदार, आपला सरकारी, दरबारी मान नमरातब आहे. आपण पाठीशी असल्यावर वाकडी नजर माझ्यावर पडणार नाही.सासूबाई व मामंजी तिच्या नजरेला नजर देवू शकत नाहीत. वडिलधाऱ्या पुढे पतीशी बोलू नये परंतु प्रसंग बांका आहे. ‘‘तुम्ही मला या घरात सहधर्मचारिणी म्हणून आणलेत. तुम्ही जर पाठ फिरवलीत तर कोण रक्षण करेल माझे? श्रीमंत देशपांडे यांच्या घराची अब्रु चव्हाट्यावर येणार कां? मी या घरात व प्रांतात नवखी, माझे कुणीही नाही, अशावेळी वाऱ्यावर सोडून देणार कां? तुम्हीच मला यातून सोडवू शकाल.निरूत्तर पतीला बघून वधुचे चित्त थरारले आहे. काय करावे ? कुणाकडे धाव घ्यावी ? विचारांचे थैमान सुरू झाले आहे.

‘‘चालिये ! जल्दी किजीये. हमे जल्दी जाना होंगा’’ पहारेकऱ्याचे जरबेचे शब्द कानांत घुमू लागतात. काय करावे? लावण्या विचार करत बसली. जेंव्हा मनुष्य पूर्णपणे निराधार होतो तेव्हा देवाकडे आधारासाठी धावतो. अशा कठिण प्रसंगी तर देवालाच शरण जावे. लगेच सूनबाई देवपूजेसमोर गेली. देव्हाऱ्यातील देव श्रीगोपाल श्रीकृष्णा पुढे लोटांगण घातले.

देवा ! करूणागरा, तारणहार, माझे रक्षण करा. गोकुलात तू बाल गोपालांचे रक्षण केलेस. द्रौपदीचे भर सभेत चारित्र्य रक्षणासाठी तू वस्त्र पुरविलेस. भगिनीचा धावा ऐकून बंधूराया तू धावून आलास तसा आज मला वाचव. मी तुला आळविते आहे. मला मदत कर. मला सद्बुद्धी दे. आज तुझी दासी होवून तुला शरणागत आले आहे. तू माझा नाथ आहेस. मी अनाथ आहे. माझे चित्त, वित्त, काया तुला अर्पण करते आहे कारण हे शारिरिक बंध कोणत्याच कामाचे नाहीत. तूच माझा पिता, माता, बंधू व सखा. तुझ्या शिवाय कोण तारील मला? माझी दृढ श्रद्धा तुझ्यावर आहे. तू दयाघन, पालनहारा आहेस. माझे रक्षण कर. तू म्हटले आहेस की, मला शरण आलेल्याला मरण नाही. माझ्या निष्ठेला तडा जावू देवू नकोस. संकटाला सामोरे जाण्याचे मला धैर्य दे. माझी मती स्थिर राहू दे. मला सन्मती दे. गोपाला, नंदलाल माझी लाज राख. मला वाचव !
देव्हाऱ्यातील देवाचे पाय अश्रूंनी स्वच्छ धुवून निघालेत. वातावरण ‘‘करूणेने ओतप्रोत भरून उरलेले. सगळा धीर एकवटून, डोक्यावरचा पदर थोडा पुढे ओढून ती दाराशी आली व शांत गंभीर आवाजात पहारेकऱ्यास म्हणाली, ‘‘भाऊ ! माझी आलम्पन्हाला एक विनंती करण्याचे करावे ! जल्दी बोलीये, क्या है ?’’

‘‘निजामांचा हुकूम मला सर आंखो पर ! पण माझी तयारी करायला अजुन पंधरा मिनिंट तरी लागतील मी श्रीमंत देशपांडे यांची नववधू आहे, अशी रस्त्याने कां चालत येणार, तुमच्या सोबत? असे करणे कुणालाच शोभणार नाही. माझ्यासाठी पडदानशीन पालखी पाठवावी तोवर मी तयारी करून ठेवते. ’’

‘‘जी हुजूर !’’ पहारेकऱ्याच्या आवाजात बदल जाणवण्या सारखा व पळतच तो राजमहालाकडे रवाना.

‘‘आलम्पन्हा बीबीजी आनेके लिये तैयार है, लेकीन बनसंवरने मे पंधरा मिनीटो की मुहलत मांगी है. और इल्तजा की है की पडदेवाले डोली मे वे बैठके आना चाहेंगी.’’

‘‘ठीक है ! बेगम साहिबा की पालखी उनके खिदमत मे भेजी जाय - ! ज्यादा समय नही लगना चाहिये !निजामाचा उतावीळ स्वभाव बोलता आहे. अस्वस्थ झाला आहे. लावण्यवती इतक्या चट्कन यायला राजी झाली याने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.

दरबार भरायला सुरवात झाली आहे. एक एक सरदार, वतनदार, स्थानापन्न व्हायला लागलेत. ‘‘काय करावे या योगाला?" पण तेवढ्यात पहारेकरी येवून सांगतो आहे. "बीबीजी आपको दरबार मे ही मिलना चाहती है. "‘‘ठीक है !’’ दरबारातून कोठीवर जायला काय अवकाश लागणार? या विचाराने निजाम सुखावला आहे. बेगमसाहेबांची राजपालखी भोयांच्या चालीवर रिकामी असल्याने भराभर रस्ता कापते आहे. देशपांडे यांच्या हवेली जवळ आली आहे.

‘‘मला आता जाणे भाग आहे,’’ गंभीर आवाजात लावण्या सासू सासऱ्यांना सांगते आहे. तिची अवस्था एखाद्या गाईला कसायाकडे पाठवितांना होते तशी झाली आहे. ‘‘माझा देव माझी लाज राखायला समर्थ आहे. तो नेहमीच आपल्या उपरण्याची दशी पुढे करून वाट बघत असतो. एखाद्याने हात वर केला तर त्याला वर काढतो. आज त्याच दशीला धरून मी पुढे जाणार आहे. या अग्नी परीक्षेतून मी शुद्ध, पवित्र बाहेर पडणार आहे पण तुम्हाला माझ्या पवित्रपणाची खात्री वाटेल कां? अजुन पंधरा मिनिटात मला दरबारात हजर व्हावे लागेल. तेथून दोन तासाचा अवधी मला हवा. मीन परमेश्वर कृपेने सुखरूपणे या संकटातून बाहेर पडेल कारण माझी त्याच्यावर अढळ श्रद्धा आहे व तो माझ्या पाठीशी आहे. आपण सुद्धा मला आशीर्वाद व द्यावा. मी त्याच श्रद्धेने आपल्या चरणावर माथा ठेवते आहे. वृद्ध, हताश, हलके आशीर्वादाचे चार हात बालवधूच्या डोक्यावरून फिरले.

ती माजघरात गेली आहे. कांपऱ्या हाताने एक एक सौभाग्य अलंकार चढविते आहे. प्रथम तिने आपल्या भरघोस केसांचा आंबाडा बांधला. थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवून, पुसून कपाळावर मोठा कुंकूवाचा मळवत भरला. गर्भ रेशमी, हिरवे कंच पातळ नेसली. नुकत्याच निघालेल्या हळदीच्या पिवळया हातात तिने पाटल्या, बांगड्या व हिरवा चुडा भरला. दागिन्यांचा कोरेपणा हाताच्या कांतीला अधीकच उजाळा आणतो आहे. दोन्ही खांद्यावरून शील रक्षणासाठी शेला पांघरला. नाकात नथ घातली व डोक्यावरचा पदर ढळू नये याची काळजी घेतली. देवघरात येऊन तिने देवापुढे सुपारी ठेवली व हात जोडून, डोळे मिटून, जीव एकवटून त्याची करूणा भाकली. त्याच्यावर सर्व भार सोपवून संथ पावलांनी ती देवडीच्या दाराशी येऊन उभी राहिली. अगदीच कांही विपरीत घडले तर? शंकेची पाल चुकचुकू लागली. टोपल्यात ठेवलेली सूरी तिने उचलून हळूच ओच्यात टाकली.

‘‘श्रीकृष्णा नंदलाल की जय !’’ म्हणत तिने दार उघडले. राजपालखी दाराशी नुकतीच येऊन सज्ज आहे. तिने मागे वळून बघितले. प्रेमळ दृष्टिने न बोलता निरोप घेतला. तिच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्यात नाही, त्यांनी खाली घातलेली मान सर्व कांही सांगते आहे. पहारेकऱ्यांनी पालखीचे पडदे बाजूला सारले. तिला बसण्याची विनंती केली. ती मेण्यात बसली. रडून व विचार करून शिणलेली. मनात सारखी घालमेल चाललेली, बुद्धीची साथ नाही. सुटकेचा मार्ग सापडत नाही. कारण आज लाज लज्जा मान मर्यादा यांनी तिला नकोसे केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी माझ्या देखणेपणाचा मला कोण अभियान वाटला होता. आज तेच लावण्य नकोसे झाले आहे. मी कुरूप असते तर? ही नसती बला ओढवली नसती. विचारांचे तूफान थैमान घालते आहे. थकून तिने आपली हनुवटी गुडघ्यावर टेकवली. ‘‘काय करू मी अशा परिस्थितीत? देवा मला तू तार नाहीतर मार. ओच्यातला सूरीचा उपयोग करू कां ? नाहीतर उडी मारून पळून जावे कां? नाही, नाही ! मी मोठ्याची सून व सुकन्या असतां असे भेकडपणे वागावे? आपल्या आई वडिलांनी हेच संस्कार कां केलेत? आत्मघातासारखे दुसरे पाप नाही मग आपण आपल्या आई वडिलांना बदनाम करणार का? असे विचार सुद्धा मनात येता कामा नये. आपला नित्यपती परमेश्वर आपल्या पाठीशी असतांना आपण भिणे चांगले नाही. त्यांनी म्हटले आहेच, ‘‘माझ्या ही हांकेला तो धावून येईल. माझी लज्जा राखेल.अशा आत्मविश्वासात तिने मान वर केली. पालखी राजदरबारा समोर उभी आहे. पुन्हा एकदा तीच्या पोटात गोळा उभा. डोळयासमोर श्रीकृष्णाची मुर्ती आणून नाम लीळा व स्मरण सुरू केले. देवाचा धावा सुरू केला. मनाशी दृढनिश्चय करून आपले पक्के पाऊल पालखीतुन रस्त्यावर तिने ठेवले. खंभीरपणे व श्रद्धेने ती उभी राहीली. 

निरंतर श्रीकृष्ण नामाचा जप ओठाने सुरू ठेवला. अंगावरचा शेला नीट अंगभर सावरला. डोईचा पदर थोडा जास्तच पुढे ओढला जणू आपल्या सौदर्याला पदराच्या कोंदणात पक्के ठेवण्याचा प्रयत्न. म्हणतात ना, दरबारी शिलेदार त्वरेने येऊन तिला कुर्निसात करतो आहे. दोन्ही हाताने दर्शवित वर चलण्याची विनंती करतोय. भालदाराने भाला सज्ज करून तिला वाट मोकळी करून दिली आहे. चोपदार बा! आदब बा ! मुलाहिजा, हो ! शियार वतनदार देशपांडे की छोटी बीबीजान-साहिबा पधार रही है अशी ललकारी देतो आहे. दरबारातील जहागिरदार व सरदार यांची भरलेली सभा एकदम ठप्प. स्तब्ध होवून, तठस्थपणे, आश्चर्यचकीत होवून हे काय घडते आहे हे बघताहेत. वतनाची चर्चा मागे पडली आहे. पण निजामाच्या अंगावर रोमांच उठलेत. बघितलेले स्वप्न समोर साकार उभे आहे. प्रजेचे मन जिंकण्यासाठी सकाळी गेलेला निजाम स्वतःचे मन हरवून बसला आहे. हुरळून गेला आहे. प्रजेची खुशाली बघता बघता स्वतः बेखुशाल झाला आहे. निजामाने तर परस्त्री प्रत्यक्ष लालसेने बघितली आहे तेंव्हा त्याला माज आला तर नवल कसले? दरबारी मात्र या लावण्यवतीला येथे येण्याचे काय प्रयोजन असेल याचे नवल वाटून आश्चर्याने तोंडे उघडी टाकून, डोळे विस्फारून बघताहेत. आपली मुलगी शोभेल अशी स्त्री निजामाने भर दरबारात का पाचारण केली असेल ?

श्रीकृष्ण नामाने विलग होणारे विलोभनीय ओठाने जप करून, इकडे तिकडे न बघता, पाऊल न डगमगता, लावण्या भर सभेत मध्यभागी उभी धडपडत्या अंतःकरणाचा बाहेरून एवढाही मागमूस नाही. मनात देवाचा धावा सुरू तिला स्फुरले की, आता काय करायचे? आणि तिचे डोळे चमकले. बस्स! हाच शेवटचा आधार! असा विचार करून निजामाकडे न बघता, मान वर करून न केल्यासारखी, शब्दात मृदु मुलायमपणा खणखणत्या आवाजात ती म्हणाली ‘‘तख्तनशाह अब्बा ! हुजूर ! आपने मुझे याद किया? आपकी सेवा मे आपकी लाडकी बेटी आपकी क्या खिदमत कर सकती है? फरमाईये अब्बाजान ! प्रजापिता, आपको बेटी कैसी याद आयी? मै खुशनसिब हूँ की आपके समान पिता पाया. सबके आप पालनकर्ता हो, हम सब आपके बच्चे है, हमे सब तरह से संभालते हो हूजूर!’’ या अनपेक्षित वाराने निजामशाह हबकलेला. 

मोठाच बांका पेच उभा केला या पोरीने ! आता या बिकट प्रसंगातून कशी सुटका करावी आपली? ही छोटीशी मुलगी नुसती सुंदरच नव्हे तर अतिशय हुशार ही आहे. आपल्यावरच हिने डांव उलटविला आहे ! काश ! आपल्याला ही अशी हुशार बेटी असती तर! आणि निजामाची बुद्धी पालटली. बेटी ! जान ! आपकी शादी होने के बाद आपसे मिलने की बडी तमन्ना थी. परवर दीगार ने आप जैसी बेटी इस गरीब को देकर हमे ऐहसानमंद किया है. उसका मै लाख शुक्रगुजार हुँ.देवाने धावा ऐकला. असंभव ते संभव झाले आहे. त्याची लीलाच न्यारी. निजामाला उपरती झाली, भगिनीला सुमती दिली व नित्यपतीने अबलेचे रक्षण केले.

आनंदाच्या डोहात दरबारी बुडलेत. पण पुढे काय? एवढ्यात ‘‘आप सब अल्लाताला का रूप लेकर यहाँ बैठे हो. हमारी प्यारी बेटी पीयर आयी है. उसे देखने की एक अर्सेसे खाईश थी आज पूरी हो गई. हमारी तमन्ना बेटीने पूरी की, अब उसे बिदाई देनी है. आप बताईये ऐसे वक्त कैसी रस्म अदा की जाती है.’’ निजाम दरबाऱ्यांना मान देऊन विचारतो आहे.

‘‘प्रजापिता तख्तनशाह ! उस भगवान के आप शुक्रगुजार हो की आपको ऐसी बेटी मिली तो आपका फर्ज बनता है की पीयर से लौटने वाले बिटिया को नजराना दे. उनके शौहर को जहागिर देकर नवाजा जाय और दुल्हे राजाका अनमोल रतन शानोशौकत के साथ अपने घर वापिस भेजा जाय.दरबाऱ्यांनी आपली दरख्वास्त पेश केली. लगेच हुकूम निघाला आहे, "बेटी ससूराल जा रही है. बेगम के पालखी मे बिठाकर जेवरात, कपडे, - मिठाई के साथ, हमारी बिटीया रानी को ढोल ताशे बजाकर साथ ले जाईये और उनके घरवालों को सौंप दिजीये! हमारी बेटी थक गई है, उसे फुलो की तरह ले जाकर घर पोहोचाईये. उसे कोई तकलीफ न होने पाये" 

देशपांडे यांची हवेली चिंतेने चूर चूर. एक एक क्षणाचे मरण मुलगा, सासू व सासरे मरताहेत. म्हणतात ना, 'चिता जलाये एक बार, चिंता जलाये बार बार' मुलीवर काय प्रसंग ओढवला असेल? तिने काय केले असेल? आपण एकटे कोकरू वाघाच्या दाढेत कां पाठविले? हे पाप कुठे फेडावे ? आपणच आपल्या घराण्याची अब्रु आपल्या हाताने चव्हाटयावर टांगली. या पुढे लोक उजळ माथ्याने जगू देतील? आत्मघात करावा कां? मन चिंती ते वैरी न चिंती. आपल्यात तेवढी तरी हिंम्मत आहे कां? देवा कसली परिक्षा बघतोस? सूनबाईला जाऊन तास लोटला. काय विपरीत घडले असेल? तिने कसे सहन केले असेल? कुविचारांचे काळे सर्प भेसूरपणे मनाला विळखे घालून भेडसावताहेत. क्षणाक्षणाने मणामणाचे ओझे वाढते आहे. नागाचे विष तसे तसे चढते आहे. 

पण काळ कुणासाठी थांबला आहे ! दयाघना ! संपव ही वेळ ! किती ही हतबलता. तेवढ्यात ... मंगल सनईचे सूर ऐकायला येताहेत. ताषांचा आवाज, बेगमची पालखी व शाही ताफा दारासमोर उभा. देवा ! काय बघावे लागणार आहे? दोन नाजूक थकलेली पाऊले पालखीतून बाहेर पडताहेत. चट्कन घरात शिरून, आई बाबांच्या पायावर डोके टेकवून आयापर्यंत धरलेला संयमाचा बांध सुटलेला आहे. ती धाय मोकलून रडते आहे. मामंजी, सासूबाई ! माझा दीनबंधू पाठीराखा श्रीकृष्ण माझ्या उपयोगी पडला. त्याने निजामाच्या कुबुद्धीचा पालट करून त्याला सुबुद्धी दिली. पितृप्रेमाच्या ओलाव्याने प्रजापित्याने मला भर सभेत बेटीचा सन्मान दिला. मी नविन माहेर जोडून आले. मला नवे अब्बाजान व अम्मीजान मिळाली. माहेरून माझ्यासह आपणांस नजराणा पेश केला आहे. आपण मला आपली मानता नं ? तसे वचन आपण दिलेत. मी तुमची होते व तुमचीच राहणार. तुमची लेक म्हणूनच मला जगायचे आहे. मी आंत देवाचे आभार मानायला जावू कां? त्यांनी मला सन्मती दिली. मी कायेने, वाचेने व मनाने देवाची आहे. तो माझ्या प्रकृतीत सामावलेला आहे. त्याला हांक घातली की तो धावत येतो. असे चार माहेर मला आहेत. मी भाग्यवान आहे. या उत्कट आनंदाच्या सोहळयात लेकीच्या कर्तृत्वाने भारावून हंसू व आसूंच्या मिश्र भावनेत देशपांडे परिवार श्रीकृष्णाच्या मुर्तीसमोर देवपूजेसमोर कृतकृत्यपणे साष्टांग दंडवत प्रणाम करताहेत. नंदलाल प्रसन्न स्मित करत आहेत.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post