शक्तिरात्मदमने - ज्यांच्याजवळ आत्मसंयमनाची आत्मदमनाची शक्ति आहे ते वंदनीय - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit mrathi artha

शक्तिरात्मदमने - ज्यांच्याजवळ आत्मसंयमनाची आत्मदमनाची शक्ति आहे ते वंदनीय - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit mrathi artha

 संस्कृत-सुभाषित-रसग्रहण - Sunskrit-Subhashit

शक्तिरात्मदमने

चिंतन...

शक्तिः आत्मदमने म्हणजे ज्यांच्याजवळ आत्मसंयमनाची, आत्मदमनाची शक्ति, बल, सामर्थ्य आहे  ते वंदनीय आहेत. शमदमादि षट्क अशी एक तिसरी पायरी साधनचतुष्टयात सांगितली जाते. विविध विवेक करून एकदा ध्येय निश्चित केलं की तिथपर्यंत जाण्याच्या मार्गात जे विविध मोह येतात... ऐहिक कर्मफलांचे व पारलौकिक कर्मफलांचे.. त्याबद्दल विरक्ति निर्माण व्हावी लागते, न पेक्षा साधक त्यातच अडकून  ध्येय, लक्ष्य बाजूला पडतं.. विस्मरणात जातं!

पण नुसती विरक्ति पुरेशी नसते. देहरथाचे इंद्रियाश्व इतके प्रबळ असतात की मनाचे लगाम झुगारून देहरथाला आपापल्या दिशेनं खेचून नेण्यासाठी जोर लावतात. कोणताच विषय उपभोगासाठी उपलब्ध नसताना इंद्रियनिग्रह खूप सोपा असतो. पण एका पेक्षा एक लोभस, आकर्षक विविध विषय विपुलतेनं उपलब्ध असताना व किमान एकदा तरी त्याची चाखलेली चव जिवंत असताना तिकडे दुर्लक्ष करणं हे खूप कठीण असतं. अशा वेळी इंद्रियांना आवरणं. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही अतिशय कठीण गोष्ट असते. त्यासाठी प्रचंड शक्ति लागते. ते एक युद्धच असतं!

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं संत तुकाराम जे सांगतात ते याच संदर्भात! डोळ्यात तेल घालून, अहोरात्र जागून, प्रतिक्षणी सावध राहून हे युद्ध खेळावं लागतं. कारण इंद्रिये कधी द्रोह करून आपल्याला. विशेषतः विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेल्या साधकाला पथभ्रष्ट करतील. खड्ड्यात घालतील याचा नेम नसतो! त्यासाठी प्रचंड शक्तिसंचय आवश्यक असतो व खर्च होणार्‍या शक्तीची सतत भरपाईसुद्धा करत रहावं लागतं! हे ज्याला जमलं.. जमतं तो सुभाषितकारांच्या दृष्टीनं निश्चितच वंदनीय ठरतो.

प्रवाहाबरोबर वाहवत जाणं सहज घडतं, पण प्रवाहाविरुद्ध पोहणं वा प्रवाहात ठाम, अविचल स्थिर राहणं खूप कठीण व ऊर्जा खर्च करायला लावणारं असतं. शमो दमः....ब्रह्मकर्म स्वभावजम् असं जरी गीतेच्या १८व्या अध्यायात सांगितलं असलं तरी ते केवळ ब्राह्मणवर्णालाच उपयुक्त आहे असं नसून माणूस म्हणून जन्मलेल्या व ज्याला जीवनात काही चांगलं उच्च असं प्राप्त करायचंय त्या प्रत्येकाला उपयुक्त आहे.

ब्राह्मणवर्णीयांना त्यांच्यावर वेदांनी जे दायित्व दिलंय, ज्या कर्तव्याचा भार दिलाय त्यासाठी अत्यंत आवश्यक जर काही असेल तर शमदमच! पण तितकाच तो इतरांनाही आवश्यक व उपयुक्त आहे... जर स्वकर्तव्यात अभिरत राहून संसिद्धि प्राप्त करायची असेल तर! स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः। भग.गीता.. सुभाषितकारांनी जरी प्रत्यक्षतः केवळ दमच उल्लेखला असला तरी त्याच्या पोटात शमदमतितिक्षादि सहा गोष्टी येतात ज्या लौकिक व पारलौकिक व्यवहारात आवश्यक आहेत.

त्या साधल्यानंतर पुढची पायरी चढता येईल! दम हा बाह्येंद्रियांचा निग्रह तर शम हा अंतरिंद्रियांचा निग्रह! शमो मन्निष्ठता बुद्धेर्दमो इंद्रियसंयमः असं स्वतः भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. श्रीमत् भागवत.. स्कं. ११व्या श्लो. २९. ज्या बुद्धीची निष्ठा अन्य अनेक विषयांवर आहे ती तिथून काढून केवळ भगवंताच्याच ठिकाणी ठेवणं हा शम व त्यासाठी सतत बाहेर धावणार्‍या इंद्रियांना आवरणं... त्यांना ज्यावेळी जे हवं ते नाकारून साधनेच्या सातत्यासाठी, प्रगतीसाठी जितकं जेव्हा किमान आवश्यक असेल तितकंच देणं हा दम!

प्राप्त दुःखांचा प्रतिकार न करता निमूटपणे ती सोसणं ही तितिक्षा. सहनं सर्वदुःखानां अप्रतिकारपूर्वकम् अशी आद्य शंकराचार्य तितिक्षेची व्याख्या करतात. एकदा भगवत्प्राप्ती वा व्यवहारातलं बोलायचं झालं तर कला, क्रीडा, शिक्षण इ क्षेत्रातील परमोच्च स्थानप्राप्ती हे ध्येय निश्चित झालं की तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात जी लोभ मोहादि संकटं.. अडथळे येतात त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन  व त्यांच्यावर मात करून पुढे जायचं असेल तर शम दम तितिक्षादि सर्व अत्यावश्यकच असतं... ती पूर्व अट असते!

पण त्यासाठी प्रचंड शक्ति मिळवावी व टिकवून ठेवावी लागते... सतत वाढती ठेवावी लागते. हे ज्यांना जमलं ते सामान्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं उंचावर असतात...  मग त्यांच्यातूनच ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ इ संत, सावरकर टिळक इ देशभक्त, कान्हेरे चाफेकर धिंग्रा इ क्रांतिवीर व गावस्कर तेंडुलकरांसारखे क्रीडापटु किंवा सध्याच्या काळातले अनेक कलाकार घडत असतात.

Not failure butLow aim is crime

there is always a room at the top

असं म्हणतात...

स्वतःमधे अत्यंत उच्च दर्जाच्या क्षमता असतानाही अत्यंत खालच्या दर्जाचं ध्येय ठेवून वागणं हा स्वतःविषयी व समाजाविषयी अपराधच आहे (व कितीही उच्च ध्येय मिळवायचं असलं तरी शमदमादि पाथेय जवळ असेल तर ते सहज गाठता येईल) पण यशकीर्तीचं सर्वोच्च शिखर गाठलं असलं तरी शमदमादि नसतील तर तिथे टिकून राहणं, सुस्थिरपद मिळणं हे खूप कठीण आहे! अत्त्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोध आहे खरा  यातलं इंगित हेच आहे...

विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः वा गर्वाचं घर खाली यातलं रहस्य दुसरंतिसरं काहीही नसून शमदमादींचा अभाव हेच आहे. सध्याच्या लोकशाही राज्यपद्धतीत जो काही घोळ गोंधळ दिसतोय.. सत्तापालटाचा संघर्ष. सत्तासंपादन वा सत्ताभ्रष्टता यांचा जीवघेणा खेळ.. यश पयश इ. अनुभवायला मिळतंय त्याचं कारण शमदमादि गोष्टींचा अभाव व प्रभाव!

तात्पर्य एकच आहे की सुखी, समृद्ध, यशस्वी जीवनासाठी... ऐहिक वा पारलौकिक... प्रापंचिक वा पारमार्थिक/आध्यात्मिक.. आत्मदमनाची शक्ति ही नितांत आवश्यक गोष्ट आहे. ती ज्यांनी मिळवली, वाढवली आणि टिकवली ते सर्वथा सर्वदा सदैव वंदनीयच होत!

लेखन :- श्री. श्रीपाद केळकर कल्याण

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post