अभंगवाणी - महानुभाव-पंथिय-कविता-रसग्रहण - abhang - Mahanubhav panth kavita

अभंगवाणी - महानुभाव-पंथिय-कविता-रसग्रहण - abhang - Mahanubhav panth kavita

 अभंग वाणी - महानुभाव-पंथिय-कविता-रसग्रहण


काय मागावे मागणे । दिले सुखाचे चांदणे ।।

कनाशीच्या ब्राह्मणाला । रंक होता राव केला ।।

साधा किती साधी सुधी । मोक्ष मागते सुगंधी ।।

ऐका मागणी सुदेवा । ऋषी म्हणे तूचि व्हावा ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रीतीचे विधान । सांगे कृपावंत

वैर खळ अंत । सहजेची ।।

बाईसा प्रक्षाळी । लुखाईचे पाय

प्रसन्न वो माय । देव जाले ।।

परब्रम्हें दिली । नीळभट्टा मांडी

आघवे ब्रम्हांडी । गर्जे घोष ।।

ऋषी म्हणे आम्हा । लाभावे ते सुख

हृदयीं विसेख । ठेवा देवां ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

ज्याचे जिभेवर भाला । दुरावते जग त्याला ।।

बोलण्यात यावी गोडी । त्याची अनंता आवडी ।।

भाषा मधाळ रसाळ ।  तो या जगी लडिवाळ ।।

ऋषी म्हणे त्याची सत्ता ।  जो महात्मा प्रियवक्ता ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

अंधश्रद्धेवर । पहिला प्रहार

स्वामी चक्रधर । करीतसे ।।

महिला मुक्तीचा । पहिला विचार

देव चक्रधर । सांगतसे ।।

माय मराठीचा । पहिला जागर

एक चक्रधर । मांडीतसे ।।

ऋषी म्हणे आद्य । गद्याचे माहेर

प्रभू चक्रधर । आन नाही ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

परस्परे परमप्रीती । हाती ये कैवल्यपती ।।

ज्याचे शुद्ध अंतःकरण । तेथे नांदे भगवान ।।

भटालागी चिंतावश । धाडी शिदोरी परेश ।।

ऋषी म्हणे श्रुती स्मृती । अंगी ल्याले परमप्रीती ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

शिक्षक पवित्र । देशाचे चरित्र

शिक्षक हा मित्र । विश्वासाचा ।।

देशाचे भविष्य । शिक्षकाचे हाती

पिढी घडविती । सुसंस्कारी ।।

क्षमा सत्य सेवा । धैर्य त्याग न्याय 

होवोनिया माय । शिकवितो ।।

शिक्षका पायाची । धुळही चंदन

करावे वंदन । ऋषी म्हणे ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

मौन हेचि अस्त्र । मौन हेचि शस्त्र

मौनाचेचि वस्त्र । पांगुरावे ।।

मौनाने बोलावे । मौनाशी बोलावे

मौनाने जिंकावे । औघेयासी ।।

झणी वोळखावे । मौन हीच युक्ती

मौनातली भक्ती । शक्तीयुक्त ।।

गोविंद प्रभूंचे । मौन ते अगम्य

अद्भुत रहस्य । ऋषी म्हणे ।।

मायही राऊळ । बापही राऊळ

प्रेमाचे राऊळ । प्रभू बाबा ।।

प्रबोधनकार । धर्मसुधारक

बुद्धी प्रकाशक । प्रभू बाबा ।।

अबोल राहुनी । जन्म उजळणे

शिकवी जगणे । प्रभू बाबा ।।

ऋषी म्हणे स्मरा । लोकविलक्षण

आनंद भुवन । प्रभू बाबा ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

चहू वर्णामाजी । स्वैर विचरतो

भेदभाव जातो । अग्निमुखी ।।

गावागावातले । वैर संपविले

मन जुळविले । एकमेकां ।।

राऊळांचा एक । स्त्रियांना आधार

भेटले माहेर । रिद्धपुर ।।

ऋषी म्हणे केली । लोक सुधारणा

लागा श्रीचरणा । सर्वभावें ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

गुरू सागर सागर । शुद्ध सुखाचे आगर ।।

गुरू माहेर माहेर । इथे नांदतो ईश्वर ।।

गुरू अत्तर अत्तर । सुगंधीत झाले घर ।।

गुरू मंदिर मंदिर । ऋषी म्हणे पै सुंदर ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

कुणी ना कुणाचे । ना याचे ना त्याचे

केवळ स्वार्थाचे । गणगोत ।।

त्यागावा स्वदेश । त्यागावे स्वग्राम

गावे हरिनाम । दिनराती ।।

संबंधीयांचा हा । विशेषतः संग

त्यागावा प्रसंग । विषेशत्वे ।।

ऋषी म्हणे त्यागीं । अनंत शांतता

गोपाळ ये हाता । सहजेची ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

स्वभावासी नाश । आजन्म पावेना

पहा विंचू श्वाना । जैसे तैसे ।।

उपाय एकाने । नासेल स्वभाव

हव्यासाचे गाव । भस्म व्हावे ।।

गुणिजन करी । मातीसही सोने

गुणहीन उणे । करी धन ।।

ऋषी म्हणे ठेवा । उत्तम उद्दिष्ट

जरी काही कष्ट । पडताती ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

घेतो नाम अभिमान । धावे स्वतः भगवान ।।

मनीं आठवावा देव । मनीं साठवावा देव ।।

सिद्धी सर्वही पावतो । जो जो हरिनाम घेतो ।।

ऋषी म्हणे पाप जळे । आले महाविघ्न टळे ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️

महिमा नामाचा । नकळे अगाध

सर्व अपराध । शून्य होय ।।

बहू भक्तजन । नामाने तरले

प्राप्तीसी पातले । प्रभूपदीं ।।

जयाचे हृदयीं । नाम निशीदिनी

अखंड स्मरणी । भाग्याथिला ।।

ऋषी म्हणे नाम । जपा बहुबळें

मुक्तीचे सोहळे । सावेयाचि ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रभू अंगिकारी नाम । तेचि जीवाचे विश्राम ।।

सहेतुक चेतनासी । संत म्हणे लीळा यासी ।।

वय रूप गुण धर्म । मूर्ती स्मरणाचे वर्म ।।

निर्हेतुक जे जडासी । ऋषी म्हणे चेष्टा त्यासी ।।

ईश्वर नामाचे । उमलता फुल

पडे जीवा भूल । सृष्टीचीया ।।

अमृताची गोडी । चक्रधर नामी

कैवल्याचा स्वामी ।  तेजःपुंज।।

नामें पेटविल्या । दोषाचीया राशी

जळे दिननिशी । पाप ताप ।।

ऋषि म्हणे आता । फिटलीसे चिंता

शरण रिगता । श्रीचक्रधरां ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

कस्तुरी सुगंधें । वेधती इंद्रिय

नामें वेध होय । तैसा जीवां।।

चतुः साधनाची । आवडी वेधाने

भवाची बंधने । गळो लागे ।।

पाडसा आईशी । जैसा जीव लागे

भ्रमरां परागें । वेध जैसा ।।

ऋषि म्हणे जीवा । ईश्वरी आवडी

नाव ने पैलाडी । नामें वेध ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

संन्यास धर्माचे । बीज नाम आहे 

प्ररोहाते पाहे । पुढा पावे ।।

अनुसरणाते । नामचि कारण

अनन्य शरण । सर्वभावें ।।

अनुसरणाने । सर्व समर्पण

त्याग प्रकरण । तयांतूचि ।।

ऋषि म्हणे करा । योग्य या जिवासी

अनुसरणासी । विश्वात्मका ।।

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एक विचार -

भगीरथाची अभंगवाणी

         अभंग

प्रिय वासनिक बंधू भगिनींनो ।

प्रिय सज्जनानो दंडवत ।।१।।

सर्व मतभेद विसरून जावे ।

एकनिष्ठ व्हावे पंथासाठी ।।२।।

गावात संस्कार शिबिरे ठेवावे ।

धर्मज्ञान घ्यावे सकळांनी ।।३।।

महानुभावाचा आचार करावे ।

मुलांना शिकावे पूर्ण पणे ।।४।।

तन मन धन अर्पण करावे ।

प्रसन्न  करावे  ईश्वराला  ।।५।।

भगीरथ म्हणे पंथ हा टिकावा ।

जीव उद्धरावा म्हणुनिया ।।६।।

भगीरथ अंधानेरकर

 श्रीचक्रधर वंदे

।। कोटी दंडवत सर्वेश्वरा ।।

कोटी दंडवत हे, आमुचे सर्वेश्वरा ।

आमुची चिंता तुला , तू माता पिता खरा ।।ध्रु ।।

स्रुष्टीमध्ये आणिले , हे जीवन दिधले ।

जन्म मरण घडे , आमुच्या कर्मामुळे ।।१।।

धरणीवर आम्हा , सर्व सुविधा मिळे ।

आमुचा श्वास चाले , तुझ्याच कृपेमुळे ।।२।।

अनंत ऋण देवा , तुझी आम्हा न कळे ।

स्रुष्टीचक्र चालते , केवळ तुझ्या मुळे ।।३।।

मुक्तीमार्ग दाविला , तू सकळ जीवांना ।

भगीरथ शरण , प्रभू तुझ्या चरणा ।।४।।

भगीरथ अंधानेरकर 



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post