बुलढाणा जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित तीर्थस्थाने महानुभावांचा इतिहास - Mahanubhavpanth history

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित तीर्थस्थाने महानुभावांचा इतिहास - Mahanubhavpanth history

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित तिर्थस्थाने



१ ) श्री क्षेत्र जाळीचा देव:

 "जीवनाचे ध्येय सांगण्या, उंच सैह्यांद्रीच्या शिखराप्रती ।

पिले वाघाचे तेंव्हा खेळऊनी बहु आनंद दिधला तयांप्रती" !!

परब्रह्म परमेश्वर अवतार जीवांना आनंद देण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात. जीवांना ज्ञानामृत पाजतात परंतू ज्याला पचले ते आनंदात रममाण झाले मात्र जे राहिले त्यांच्यासाठी माऊलीचेनी गुणे आपली कृपा वर्षवितात त्यातुनही समाजात जेव्हा या ज्ञानाचा ओघ कमी होतो व जीव आसूरी वृत्तीकडे वळतो सज्जनांचे जीवनमान धोक्यात येते. अशावेळी पुन्हा ईश्वराला जीवाची कणव निर्माण होते व ते अवतार धारण करतात. 

गुजरात प्रांतीचे राजे विशालदेव व राणी माल्हनीदेवी यांचे घरी राजघराण्यात शके ११४३ मध्ये परब्रह्म परमेश्वराने अवतार स्वीकारला. रामयात्रेच्या निमीत्ताने महाराष्ट्रात येऊन श्री गोविंद प्रभू पासून शक्ती स्वीकार केला स्वत:च्या आचरणातून उत्कृष्ट वैराग्याचा आदर्श सालबर्डी प्रांती घालून दिला आणि जिवोद्धारासाठी भ्रमण करीत मराठवाडा व विदर्भ या द्वय राज्यांच्या सिमेवर निसर्गरम्य सैह्याद्रीच्या शिखरावर स्वामीची दृष्टी खिळली. त्या भाग्यवंत व्याघ्र पिलांना जवळ घेऊन वात्सल्याने त्यांचे पाठीवरून हात फिरविला. तेथील स्थानाला संबंध देऊन पवित्र बनविले. ते जागृत देवस्थान म्हणजेच श्री क्षेत्र जाळीचा देव होय.   

२ ) श्री क्षेत्र मासरूळ :-

 "साईदेवाची विनंती ऐकूनी तपोवनी ।  

 मासरूळासी गेले स्वामी पालखीत बैसोनी ।

  सन्निधान एक महिना आनंद देऊनी ।

 स्मृती सहा स्थानी , शक्ती निक्षेप करुनी" !!

'साईदेव म्हणजे मासरूळ गावातील एक गर्भश्रीमंत मान्यवर व्यक्ती, दास, दासी, घोडे, पालखी असे वैभव युक्त जिवन होते. कुटुंबात भक्तीचा सुगंध दरवळत होता, तपोवनाला आल्यानंतर स्वामींची व साईदेवाची प्रथम भेट झाली. भेटीसरसे वेध संचरला. घरी चालण्याची विनंती केली. ती स्वामींनी मान्य केल्यानंतर स्वामींना पालखीत बसवून आपण पायी चालायला लागले. स्वामी शिष्याचा हा एक उत्कृष्ट आदर्श होता. परंतु स्वामींनी सांगितले की आपण ही घोड्यावर बसा, नाहीतर आम्ही खाली उतरु, मग साईदेव घोड्यावर बसले. मासरूळ येथे स्वामीनी साईदेवाच्या आवारात वास्तव्य केले. विजनासाठी स्वामी गावाच्या पुर्वेला असलेल्या आंब्याच्या झाडाकडे जात असत, श्री क्षेत्र मासरुळ येथे श्री स्वामी चरणांकीत सहा (६) स्थाने आहेत.

३ ) डोडविहिरा ( डोढ्रा ):-

'डोढ्रा येथे राघवदेव भागवत नावाचे वैष्णव राहत होते. त्यांना स्वामींनी पूर्वी पैठण येथे भोगनारायणाच्या मंदीरात दर्शन दिले होते. आपल्या परीसरात स्वामींचे वास्तव्य आहे असे कळताच राघवदेवांना ईश्वरदर्शनाची ओढ लागली. संपूर्ण गावात सडा संमार्जन करविली. रांगोळ्या भरल्या. घरोघरी गुढ्या तोरणे उभारली आणि नाचत, गात वाद्यांच्या गजरात पिंपळवृक्षाखाली आसनस्थ असलेल्या स्वामींच्या दर्शनासाठी ते सामोरे गेले. दंडवते घातली. 

श्रीचरणी लागले जी जी बरवे केले. आपल्या लेकराला पाहण्यासाठी आपण इथपर्यंत आलात, असे म्हणून हृदय भरून आले. घरी येण्याविषयी विनंती केली. मंगलवाद्यांच्या गजरात स्वामींना आवारी नेले. रस्त्याने लोक विचारीत' राघवदेव हो हे कवण' राघवदेव सर्वांना सांगत, “अरे बाबांनो, हे गोमटदेव. देवघरात स्वामींना आसन झाले. मर्दना झाली. स्नान घातले. सहपरिवार आरोगणा दिधली. स्वामींचे डोढ्रा येथे दोन दिवस वास्तव्य होते.

४ ) शेंदुर्जन :-

शेंदुर्जन प्रांती स्वामींचे १२ वर्षे वास्तव्य होते. येथील नारायणाच्या मंदीरातील मासोपवासींनी ला तसेच शेंदुर्जन प्रांतातील एका ब्राह्मणाला स्वामींनी स्थित्यानंद दिला. तो ब्राह्मण स्वामींची चांपेगौर मूर्ती नित्य समोर पाहत असे. शेंदुर्जन येथील स्थाने ४५ आहेत.

५ ) लोणार :-

'सोमवती पर्वा निमीत्त देवगीरी सम्राट राजा कान्हरदेवराय आपल्या सेवकांसह कुंडाच्या स्नानासाठी आला होता. स्नानानंतर दान दयावे म्हणून राजा कान्हर देवाने कमळजेच्या बडव्याला विचारले,' येथे कोणी सिद्ध साधक आहेत का ? "

कमळजैच्या बडव्याने सांगितले,  ‘‘भैरवाच्या देवळात एक पुरुष आहेत., काय सांगावे त्यांचे सौंदर्य, काय सांगावे त्यांचे ईश्वरत्व. ’’ हे ऐकताच कान्हरदेव यादवाला भेटीचा वेध निर्माण झाला. भैरवाच्या देवळाकडे वडाखाली स्वामींची भेट झाली सश्रद्ध अंत:करणाने राजाने सेवकांकडून सुवर्णांच्या आसुंची थैली मागवून स्वामींना अर्पण केली. अनंत ब्रह्मांडाचे नायक अशा स्वामींना सुवर्णांच्या आसूंची काय आवश्यकता होती ?

 त्यांनी सुवर्णाच्या आसूकडे पाहिले. नंतर मातीकडे बघून आम्हाला सोने आणि माती समान असल्याचे भासविले.

लोखंडाला परिस लागावा गती दैवाची ही न्यारी ।  

भेटीत तत्व दिले कान्हरदेवा  राव रंक ते समान सारी ।।

स्वामी द्रव्य घेत नाहीत हे पाहून एक सेवक म्हणाला ' देव हो घ्या , सिंघणाचा कान्हू तुमच्यावर प्रसन्न झाला आहे.

राजाने आपल्या सेवकांना म्हटले'सरा रे सिंघणचा कान्हु तो तुम्हासी की, यासी काई 'रावो तैसा रंक : सोने तैसी माती:द्रव्य तेथेच सोडून स्वामी निघून गेले. सैनिकांनी ते द्रव्य राज्यास आणून दिले, दान दिलेले द्रव्य पुनश्च राजभांडारात न घालता, त्या द्रव्यातून राजाने कुमारेश्वराची पौळी बांधली, धारेचा घाट बांधला, कमळजयैसी रंगरंगोटी केली.

एकांकात व पुर्वार्धात असे दोन वेळा स्वामींचे लोणारला आगमन झाले. लोणारला स्वामी चरणांकीत एकूण १३ स्थाने आहेत परंतु पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत हा पवित्र परिसर असल्याने स्थान ओट्यांची निर्मिती पंथीय या ठिकाणी करु शकले नाही. पण स्थानिक पंथीयांच्या सहकार्याने आपण येथील स्थान दर्शन करु शकता.

६ ) शारा :-

'लोणारहुन मेहकरला जातांना स्वामींना या ठिकाणी आसन झाले. बोणेबाईंनी श्री चरणक्षालन करुन स्वामींना विडा दिला.

७ ) वेणी :-

लोणारहून मेहकरला जातांना स्वामींना येथे आसन झाले होते.

८ ) मेहकर :-

सालबर्डीच्या जंगलातील मौन्यावस्थेनंतर स्वामींनी मेहकर येथील बोणेबाईंना दर्शन दिले .. बोणेबाईंच्या गुंफेत स्वामींचे वास्तव्य असतांना एके रात्री चोर गुंफेत शिरले. ' बा मौन्यदेव हो , धावा चोर चोर म्हणून हाका मारणाऱ्या बोणेबाईंना स्वामींनी अभय दिले. आपली श्रीमुर्ती अतिशय विशाल अशी बनविली. ते रूप पाहून चोर घाबरुन निघून गेले. 

गोकुळाष्टमीच्या सणाचे दिवशी बोणेबाईंनी पुजेसाठी मातीचा कृष्ण बनविला मातीचेच नंद. यशोदा बनविले. ते पाहून स्वामी म्हणतात , " बाई कृष्ण काय मातीचा होता ? नंद यशोदा काय मातीचे होते ? " असे म्हणून स्वामींनी बोणेबाईंना साक्षात बाल श्रीकृष्णाचे रुप दाखविले. मेहकर येथे असतांना स्वामी गावाबाहेर तळ्याकडे विजनासाठी जात असत. तेथे ब्राह्मण पत्नीला तिच्या विनंतीवरुन स्वामींनी सप्तघटा उचलून दिल्या.

९ ) अंजनी :-

अंजनी येथे स्वामींचे एक रात्र वास्तव्य होते.

१० ) इसवी :-

आलेगावहून इसवीला येतांना स्वामींचे तळ्याकाठी आसन झाले. याचठिकाणी वडनेर भुजंग जिल्हा अमरावती येथील विद्वान भक्त रामदेव उर्फ दादोस यांना स्वामींचे दर्शन झाले. तळ्यात वाढलेल्या सुंदर कमल पुष्पांनी रामदेवांनी स्वामींची पुजा केली.

' इसवी चे ते भाग्य उजळले श्री चक्रधरांनी ।

 पवित्र केले रामदेवाला साक्षात भेट देऊनी ।

 कमळ पुष्पी पुजन स्वीकारीले मोन्य देवांनी ।।

११) चिंचाळे:-

सर्वज्ञांच्या एकांकि परिभ्रमण काळात आलेगाव वरुन ईसवी दिशेने जातांना या ठिकाणी तळ्याच्या पौळीवर स्वामींना आसन झाले.

१२) घटाळी:-

मेहकर व पातूर तालुका सीमेवरील हे स्थान चिंचाळे स्थानापासून २ कि.मी अंतरावर डोंगर माथ्यावरील घनदाट जंगलात आहे. एकांकात आलेगाव वरून ईसवी दिशेने जातांना या ठिकाणी स्वामींना आसन झाले. दादोसांची (रामदेव) या ठिकाणी स्वामींशी भेट झाली. दादोसांनी स्वामींना पाने-सुपारी अर्पण केली.

 

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post