संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
मराठी श्लोकानुवाद / अर्थ
कालो न ज्ञायते नाना कार्यै: संसार संभवै: ।
सुखदु:खरतो जन्तुर्न वेत्ति हितमात्मना ॥२८॥ (कुलार्णव तंत्र)
शंकर देवी पार्वतीला उपदेश करतात, संसाराच्या अनेक कामात आयुष्याचा वेळ केव्हा निघून जातो, हे मनुष्याला कळत नाही। सुखदु:खात रममाण असलेल्या मनुष्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही. मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, स्वस्वरुपाला ओळखणे हे असून यातच आपले खरे हित आहे, हे न जाणता मनुष्य प्रापंचिक सुखदु:खातच रममाण होतो। त्याचे अमूल्य आयुष्य असेच निघून जाते।
'इह चेदवेदीदथ सत्यमस्ति,
न चेदिहावेदीन्महती विनष्टिः।'
'भूतेषु भूतेषु विचित्य धीराः
प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति''!!
॥ केनोपनिषद-२-५॥
याच मनुष्य जन्मात परमेश्वराला जाणले तरच आपले कल्याण आहे जर हा अमूल्य वेळ, संधी निघून गेली तर मोठा विनाश, अनर्थ होईल. कारण पुन्हा मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे. याच जन्मी घडे देवाचे भजन। आणिक हे ज्ञान नाही कोठे॥१॥
भर्तृहरी वर्णन करतात,
“आयुर्वर्षशतं नृणां परिमितम्, रात्रौ तदर्धं गतं।
तस्यार्धस्य परस्य चार्ध मपरं, बालत्ववृध्दत्वयो:।
शेषं व्याधि वियोग दु:ख सहितं, सेवादिभिर्नीयते।
जीवे वारितरंग बुद्बुदसमे, सौख्य्ं कुत: प्राणिनाम् ॥१॥
मनुष्याला आयुष्य आधीच शंभर वर्षाचे मर्यादित; त्यातले अर्धे रात्रीत जाते. त्या अर्ध्यातले अर्धे बालपण व वार्धक्य, आणि जे उरले सुरले ते सेवा, रोग, वियोगदु:ख या सर्वांमिळून संपून जायचे, जीवन हेच मुळी पाण्याच्या लाटेवरील बुडबुड्यासारखे क्षणभंगुर असल्याने मनुष्याला सुख कोठून मिळणार?
(भर्तृहरि वैराग्यशतक॥१३॥)
यावत् स्वस्थमिदं कलेवरगृहं, यावच्च दुरे जरा।
यावच्चेंद्रिय शक्तिरप्रतिहता, यावत् क्षयो नायुष:।
आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यो प्रयत्नो महान्।
प्रोद्दिप्ते भुवनं च कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:? ॥२८॥
भर्तृहरि वैराग्य शतक॥
देह रुपी घर जो पर्यंत स्वस्थ आहे, वार्धक्य जो पर्यंत दूर आहे, इंद्रिये जोवर नीट काम देत आहेत, आयुष्य जोवर संपले नाही, तोवरच सुज्ञ मनुष्या ने स्वत:ला श्रेयस्कर ते प्राप्त करुन घेंण्याचा महान प्रयत्न करावा, घराला आग लागल्या वर विहीर खणण्यास निघणे याला काय म्हणावे?
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥३- ५ ॥
कोणीही काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील राहू शकत नाही. कारण, प्रकृतीच्या गुणांनी प्रत्येका कडून कर्म करवूनच घेतले जाते. परंतु, जो प्रपंचात व भौतिक सुखातच मग्न आहे, तो आपले आत्महित करु शकत नाही. त्याचे आयुष्य असेच वाया जाते. मनुष्य विचार करतो, आज मी हे केले, ऊद्या असे करीन असा विचार करता करता अचानक काळ त्याच्यावर घाला घालतो, त्याचे मनोरथ तसेच अपूर्ण राहून जाते।
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्। इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ (भगवद्गीता १६-१३)
आज मी हे मिळविले, ऊद्या ते माझे मनोरथ प्राप्त करुन घेईन, इतके द्रव्य माझ्या जवळ आहे, पुन: ते ही माझे होईल असे अनेक मनोरथ करीत असतांना च अचानक मृत्यु येतो व त्याचे सर्व मनोरथ तसेच अपूर्ण राहतात।
दिवसेनैव तत्कुर्याद्येन रात्रौ सुखं वसेत् ।
अष्टमासेन तत्कुर्याद्येन वर्षा: सुखं वसेत् ॥
पूर्वे वयसि तत्कुर्यात् येन वृध्द: सुखं वसेत् ।
यावज्जीवेन तत्कुर्याद्येन प्रेत्य सुखं वसेत् ॥
महाभारत॥ ३-३५:६७-६८॥
दिवसा असे काम करावे कि, रात्री सुखाने झोप येईल वर्षाचे आठ महिने असे काम करावे कि, संपूर्ण वर्ष सुखात जाईल. तरुणपणात असे काम करावे कि, म्हातारपण सुखात जाईल। जीवनभर असे काम करावे कि, ईहलोक व परलोक सुखाचा होईल.
॥- महाभारत॥ विदुर॥
डॉ. गोरखनाथ देवरे नांदगाव