शिक्षक दिन विशेष - शिक्षक म्हणजे गुरु
आपल्यातील पात्रता ओळखून आपल्या अंगी असलेल्या सद्गुणावर सुसंस्कार रुपी चित्र रेखाटणारा जो कोणी असतो तो गुरु अर्थात शिक्षक आसतो. शिक्षण देणारा हा गुरुच असतो. आपल्या जीवनात महत्त्वाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारा गुरु अज्ञान रुपी अंधकारातून काढून ज्ञान रुपी प्रकाश देणारा तो गुरु.
महानुभाव पंथाचे संस्थापक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी भाजी निसण्याचे ज्ञान ज्यांच्या कडून मिळते त्या सासू ला किंवा आपल्या आईला सुद्धा गुरुच मानावा असे निरोपण केले. गुरु हा व्यापक दृष्टी चा विचाराचा असतो म्हणून त्याला ब्रम्हा म्हटले आहे. तो शिष्याचे ऐहीक आणि पारलौकीक हीतचिंतक ही असून चिंता व्यथा बाधा दूर करणारा आहे म्हणून त्याला विष्णू म्हणून संबोधले आहे.
तो संरक्षण करणारा पालन कर्ता ही आहे. शिष्यासाठी सदैव झटणारा आणि आपल्या शिष्याला परमोच्च ठिकाणी कसे पोहचवता येईवा हा विचार करणारा महेश ही म्हटले आहे. ज्यांच्या कडून आपणास जीवन मूल्य आणि पायलौकीक सुखाचा मार्ग दिसला ते आपले सद्गुरु आहेत शिक्षक आहेत.
गुरु शिष्याला सर्व विषयात ज्ञानात पारंगत करतात. ते आपल्या शिष्याला शिकवताना अगदी मोकळ्या मनाने ज्ञान देतात. तेथे गाईसारखा पान्हा चोरत नाहीत. भगवान गोपालकृष्ण महाराज यांनी सुद्धा श्रीसांदीपानी ऋषी ना गुरु केले. स्वयंपूर्ण स्वतः ज्ञानी असता ना सुद्धा शिष्यत्व स्विकारले. एवढेच नाहीतर गुरु दक्षिणेच्या रुपाने सांदिपानी ऋषी ना त्याचा मृत पूत्र यमलोकातून परत अजून दिला. आज आपण बाजारात गेल्यावर भाजी चांगली गावरान पाहून किंवा कमी औषधी चा खतांचा मारा असलेली भाजी घेतो तद्वत गुरु शिक्षक सुद्धा आजकाल तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. दूषित पाण्याने प्रकृती बिघडते तसे दूषित विचारांनी, ज्ञानाने, जीवन अधोगतीला जाते. तेव्हा पाणी पीना छानके और गुरु करणा पहचानके .!
पूर्वी गुरु हे शिष्याला पारखून, तपासून, सुलाखून मगच शिष्य बनवत असत. आता गुरुंना ही पारखून गुरु मानावा. आज वर्तमान पत्रातून बातम्यातून चॕनेलवर शिक्षक वर्गाबाबत येणाऱ्या वृत्ताकडे आणि शिक्षकांच्या वृत्ती कडे पाहिले तर शरमे लाज खाली घालावी अशा बातम्या येताना दिसल्या की मन खिन्न होते.
पण मित्रानो ते गुरु अथवा शिक्षक असू शकत नाही. हे शिक्षकांची रूपे घेऊन आलेली अतिरेकी मंडळी शिक्षण क्षेत्रात घुसलेले आसावेत. शिक्षक वृत्ती ला तो काळीमा फासण्याचे त्यांचे कार्य चालू आहे. पण मित्रानो काही शिक्षक मात्र यास अपवाद आहेत. काही शिक्षक मात्र गरिब अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांना त्याच्या जीवनात सर्व तोपरी मदत करीत आहेत हेही विसरता कामा नये.
गुरु विषयी तुकोबांनी आपल्या अंभगातून अनेकदा गुरुंचा गौरव केला आहे. गुरु चांगला मिळाला तर अनेक संकटास मात करुन पुढील काळात आपल्या जीवनाचे सोने होते. म्हणून तुकोबा म्हणतात लोह परिसाची न साहे उपमा -सद् गुरु महिमा अगाधची. परिसाची महिमाही अपूरी पडेल. कारण परिस लोखंडाचे सोने बनवते पण परिस बनवीत नाही. पण आमचे गुरु शिष्याला आपल्या सारखेच बनवीतात किंबहूना आपल्यापेक्षा श्रेष्ठ व उच्च पदावर पोहचवीत आहे.
दासबोधात रामदासाने गुरु कसा असावा याविषयी बरेच व्याख्यान केले आहे त्यात एक ओवी अशी की, शिष्यासी न लाविती साधन । न करविती देहदमन । ऐसे गुरू अडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ।। जे गुरु शिष्याला देहदमन मनोदमन इंद्रियदमन करायला लावत नाहीत साधना आचरायला लावत नाहीत असे गुरु अडक्याला तीन जरी मिळाले तरी फुकट घेऊ नये कारण ते स्वतः तर अधोगतीला जातातच पण शिष्यालाही घेऊन जातात.
अशा प्रकारे श्रेष्ठ असलेल्या गुरु विषयी आदरभाव असलेल्या डाॕ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षक वर्गाचा समाजाने गुणगौरव करावा या उदात्त संकल्पनेतून माझी जयंती ही शिक्षक दिन म्हणून साजरी व्हावी. म्हणून शिक्षक दिन आपण पाच सप्टेबरला आपण साजरा करीत आहोत. प्रत्येक धर्मपंथात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. गुरुलाच ब्रम्हा विष्णू महेश ही संकल्पना अव्दैत सिद्धांताला अनुसरुण योग्य आहे. पण श्रीचक्रधर स्वामी म्हणतात की, गुरूशी परमप्रिती करावी परंतू विशिष्ट बुद्धी न करू नये अर्थात गुरुवर श्रद्धा प्रेम करावे परंतू गुरुला परमेश्वर मानू नये. ज्याला सर्व ज्ञान जयाचा ठाई तो सर्वज्ञ .... गुरु हा मार्गदर्शकं वाटाड्या आहे. फरक एवढाच आहे.
अभंग
शिक्षक पवित्र । देशाचे चरित्र
शिक्षक हा मित्र । विश्वासाचा ।।
देशाचे भविष्य । शिक्षकाचे हाती
पिढी घडविती । सुसंस्कारी ।।
क्षमा सत्य सेवा । धैर्य त्याग न्याय
होवोनिया माय । शिकवितो ।।
शिक्षका पायाची । धुळही चंदन
करावे वंदन । ऋषी म्हणे ।।