महानुभावांचा-इतिहास-Mahanubhav-panth-history
क्षेपणशिल पूर्वजांचा पवित्र इतिहास
संत शिरोमणी, वैराग्यनिष्ठ महान आदर्श अधिकरण
आचार्य श्री दंते गोपाळबास!
महानुभाव
पंथातील संत परंपरा अतिशय उच्च कोटीची तथा वैराग्यनिष्ठ असलेली पाहावयास मिळते. सर्वज्ञ
श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेली, आचार परंपरा महानुभाव
पूर्व सूरींनी अतिशय तंतोतंत जोपासलेली स्मृतीस्थळ या ग्रंथात पाहावयास
मिळते. असेच एक महान आदर्श उतुंग तपोनिष्ठ ज्ञान भक्ती वैराग्याने युक्त
स्मृतीस्थळातील व्यक्तीमत्व आचार्य श्री दंते गोपाळबास!
अशा या महापात्राचे नाव उच्चारल्या बरोबर
त्यांच्या जीवनातील आचाराचे विचारांचे आदर्श जीवनदर्शन आजच्या वर्तमान काळातील
अनेक जीवांना ऊजळतीला आणणारे आहे. आचार्य श्री दंते गोपाळबासांची परमेश्वरावर
असलेली अनन्यनिष्ठा, तसेच त्यांच्या ठिकाणी असलेला सेवाभाव
वृतीचे दर्शन, आचारनिष्ठता, धर्माला
आधार देणारी प्रेरणा, अशा विविध उच्चपैलूंचे दर्शन
स्मृतीस्थळ या ग्रंथात घडते.
एक वेळ कविश्वरबास आणि श्री दंते गोपाळबास अटनाला गेले होते,अटन करत
असतांनी कविश्वरबास फार अशक्त झाले. एवं आजारी पडले. अशा प्रसंगी श्री
दंतेगोपाळबासांनी कविश्वरांसाठी पालखी केली, कविश्वरबासांना
कोण्या गावाला घेऊन जात होते, या संदर्भातील उल्लेख आढळत
नाही. साडेगावाला देवळाच्या पूर्वेला पायऱ्यापासी
पालखी उतरवली. दंते गोपाळबासांनी आवघे देऊळ नमस्करीले, कविश्वरबासांनी पालखीत बसून माथा टेकवून, गोसावियांचेया
सेवासंबधासी दंडवत, असे म्हणून दोन्ही हात जोडून जय केले.
मग दंते गोपाळबास कविश्वरबासांना म्हणाले, आपल्याला
एक पायरी नमस्कार करता येईल का? यावर कविश्वरबास म्हणाले,
‘‘हो करता येईल’’ मग कविश्वरबास हळूच पालखीतून
खाली उतरले, पहिली पायरी नमस केली, मग
सगळ्या पायऱ्या नमस केल्या, तसेच
चौकात दंडवत घातले, यावर कविश्वरबासांनी श्री दंतेगोपाळबासांच्या
संदर्भात अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढतांना म्हणाले,
‘‘भले केले गोपाळा तुवाः माझे
आव्हेरण चुकविले’’ (फार छान केले गोपाळा, तु माझे स्थानाविषयीचे अव्हेरण चुकवले.)
असे म्हणून दंते गोपाळबासासी हात जोडूनी दंडवत केले. महान आचार्य कविश्वरबास तोषले, अशी सेवेच्या
संदर्भातील प्रेरणा पाहावयास मिळते.
असाच प्रसंग एक वेळ कविश्वरबास आणि दंतेगोपाळबास अटना निघालेः
अटना मधे कविश्वरबासांचे देह फार तुटले. कविश्वरबास म्हणतात, ‘‘गोपाळा ! आपण फांकणी करु गाः’’ (आता एकटे, एकाकी अटन करू)
दंते गोपाळबासांनी मान्यता दिली. मग वेगवेगळे अटन करणे आरंभ केले, मग कविश्वरबासांनी अत्यंत संयम केला, त्यामुळे शरीर
अतिशय कृश झाले. शरीराचे चलण-वलण थांबले. एका काटेरी
बाभळीच्या झाडाखाली विसावले.
तेव्हा दंते गोपाळबास हिंडत हिंडत तेथ आले, गावात
भिक्षा केली, विजनासाठी त्याच कांटीएकडे जात होते. तेव्हा
कोणीतरी गोपाळबासांच्या पुढे सांगितले, तुमचे एक महात्मे
पलिकडे काटेतळी पडलेले आहेत. मग गोपाळबास त्या ठिकाणी जाऊन पाहातात तर कविश्वरबास
मुर्च्छीत होऊन पडलेले होते. भक्ताला देवाच्या भेटीची तळमळ होती. पण देवाची
प्रवृत्ती काही वेगळीच होती. अजून कवीश्वरबासांकडून पंथसेवा करवून घ्यायची होती.
म्हणून गोपाळबासांची भेट झाली. गोपाळाबासांना फार भरून आले. मग दंते
गोपाळबासांनी कवीश्वरबासांच्या मुखात उदकाचा बोळा तोंडात
पिळला, आणि कविश्वरबास थोडे सावध झाले. नंतर चांगले सावध
झाल्यावर कविश्वरबासांचे डोळे अश्रूंनी पूर्ण भरले व म्हणतात. ‘‘हे काय केले गोपाळा? मला देव भेटणारच होता’’
दंते
गोपाळबास म्हणतात, "गोसावींयांची प्रवृत्ती नाही. ऐसे तुम्ही
जाणा पां ऐसिएची समइ मजसी भेटी केलीः तुम्ही आम्हा बहुतांसी धर्म रक्षेक किः"
( कवीश्वर हो! देवाची प्रवृत्ती नाही तुम्हाला नेण्याची : तुम्हीच
विचार कर बरं, नेमक्या अशाच वेळेला माझी आणि तुमची भेट का व्हावी. ही देवाचीच
प्रवृत्ती आहे. तुम्ही बहुतांना धर्मरक्षक आहात.)
मग पाठिवर घेऊन गावात आले.एके देवळात चांगल्या ठिकाणी आथरूण
टाकले.त्या ठिकाणी निजविले, मग गावातील लोकांना विचारले, येथे
कोणी वैद्य आहे का? तितक्यात वैद्य घोड्यावरून जात होता. मग
धावत पळत वैद्याजवळ गेले, आणि वैद्याला दंतेगोपाळबास म्हणतात.
"दुष्टे गांजीलेः रायापासी जाईजेः आणि रोगे
आडिले तरी वैद्यापूढे सांगीजेः म्हणौनी तया पूढा सांगितले." (दुष्ट लोकांनी त्रास
दिला तर प्राण रक्षणासाठी राजाजवळ जावे लागते. आणि रोगाने शरीर ग्रस्त झाले तर
वैद्याजवळ जावे लागते. म्हणून तुमच्याकडे आलो आहोत. आमचे गुरुबंधू आजारी आहेत.
त्यांना जर पाहून घ्या.)
वैद्यराज म्हणतात. ते कोठे आहेत? ते पलिकडच्या देवळात आहे. मग
तेथे आले, कविश्वरबासांच्या हाताचे निरीक्षण केले,
नाडीपरिक्षण केले. आणि वैद्य दंते गोपाळबासांना म्हणतात. ‘‘यांना रोग नाही. धातुसाम्य आहे. यांनी शरीराचे शोषण केले आहे. कोणासाठी
केले ते हेच जाणतात. अन्न ग्रहण न केल्यामुळे देह पिडले आहे.
आता यांना तांदळाचा भात आणि दूध जेवनात द्या.’’ (कविश्वरबास उच्चकोटीचे
महान योगी पुरुष होते. देवाच्या विरहात त्यांनी शरीर सुकविले होते. कडक तपश्चर्या
केली होती. म्हणून धातुसाम्य होते. काहीही आजार नव्हता फक्त अशक्तपणा होता.) दंते गोपाळबास म्हणतात, ‘‘तेही तुम्हीच द्या.
माझ्याकडे संभावना नाही.’’
मग वैद्याने तीन दिवस दूधभात साखर असे पथ्य दिले. मग
कविश्वरबास सावध झाले. मग दंते गोपाळबास म्हणतात, ‘‘तुमच्या
ज्ञानाविषयी आणि तुमच्या तपस्वीत्वाची ओळख मी यांना करून दिली आहे. तुम्ही यांना काही निरोपण करावे.’’ मग कवीश्वरव्यासांनी गीतार्थाची धर्मवार्ता
केली, वैद्य त्यांची विद्वत्ता पाहून फार भाळला. व नम्रतेने म्हणाला, ‘‘तुम्ही आपल्या मार्गाचा उपदेश द्यावा’’ मग त्यांना
व्यासांना साष्टांग दंडवत घातले, तेव्हा
कविश्वरबास म्हणतात, ‘‘उठा उठा आम्ही आताच थोडे चाललो आहे.’’
मग त्यांना उठविले. मग एक दिवस पहाटेच त्याला
न सांगता निघून गेले. अशाप्रकारे श्री दंते गोपाळबासांनी
कविश्वरबासांचा शुश्रुषा विधी केलेला पाहावयास मिळतो.
तसेच
स्वतःची आचारावर असलेली प्रखर निष्ठा ठळकपणे पाहावयास मिळते. श्री दंते गोपाळ
बासांचे वैशिष्ट्ये असे की, शेवटच्या श्वासापर्यंत त्यानी
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी सांगितलेला आचार किती बिकट प्रसंग आला तरी सोडला नाही,
असाच एक हृदयाला हेलावून टाकणारा प्रसंग आहे. एक वेळ फार दुष्काळ
पडलेला होता. श्रीकवीश्वरबास सगळ्या भिक्षुकांना घेऊन पूरंदर
भागात आले, श्री दंते गोपाळबासांचे शरीर फार कृश झाले होते.
तेव्हा दंतेगोपाळबास कविश्वर बासांना म्हणतात. मला वेगळे आचरण
करण्यासाठी परवानगी द्या, कविश्वरबास म्हणतात. ईश्वराचे
साह्य नाही, अतिशय आग्रहाने परवानगी दिली. ते अटन करीत करीत
चंनवदंनाकडे गेले. तेथील एका राजाने दुष्काळ पडला म्हणून अन्नछत्र चालू केले होते.
दंते गोपाळबास अन्नछत्राच्या ठिकाणी भिक्षेला जात. अन्नछत्राचे कर्मचारी दंते
गोपाळबासांना म्हणतात येथे बसून जेवत असाल तर भिक्षा देऊ, दंते
गोपाळबास कर्मचाऱ्यांना म्हणतात. आम्ही गंगेवर जाऊन जेऊ, कर्मचारी
दंते गोपाळबासांना म्हणतात. आम्ही येथेच पाणी देतो. दंतेगोपाळबास म्हणतात, आम्ही येथे जेवणार नाही, ते क्षणभर उभे राहात. अन्
निघून जात.
असे दंते गोपाळबासांचे देह फार तुटले,एक दिवस
गावच्या अलिकडच्या डोंगराच्या दोन्ही दगडाच्या मध्ये देह ठेवले, आणि छिन्नस्थळीचा विशेष दगडाखाली ठेवला, आणि दगडावर
लिहून ठेवले येथे छिन्नस्थळी आहे. त्या दिवशी नगराचा राजा (अधिकारी ) रात्रीच्या
वेळी गच्चीवर उभा होता. तेव्हा त्याने डोगराच्याखाली दंते गोपाळबासांचे देह
जातेवेळी प्रकाश पडला. तो प्रकाश त्याने पाहिला. स्वतःच आपण मशाल लावून पाहावयास
आला. जसा जवळजवळ येत होता. तसा तसा प्रकाश कमी होऊ लागला. जवळ येऊन पाहातो. तर
अन्न न मिळाल्याने देह गेलेले दिसले. मी येथे अन्नछत्र चालू केले. अन्नावीन
देह कसे गेले? मग राजाने अन्नछात्र
चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांला बोलाविले.
राजाने विचारले, ‘‘हे अन्नछत्रात आले होते का?’’
कर्मचाऱ्याने पाहिले. ओळखून म्हणाले, ‘‘हो आले
होते.’’
‘‘मग त्यांना अन्न वाढले?’’ राजाने
विचारले.
कर्मचारी म्हणाला, ‘‘ते म्हणायचे ‘आमच्या झोळीत अन्न वाढा, आम्ही
गंगेवर जाऊन जेऊ’, आणि आम्ही म्हणालो, ‘येथे जेवन करा, येथेच पिण्यासाठी पाणी देऊ’, पण
ते क्षणभर थांबून न बोलता निघून जायचे. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला बरोबर यायचे. असे त्यांना आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहात होतो.’’
मग राजा गहीवरत म्हणाला, ‘‘आरे
पाप्यांनो, किती वाईट केले "जीया
पात्राकारणे मीया छत्र घातले : ते पात्र चुकले : आता एणे छत्रे काइ काज? (ज्या पात्रासाठी मी हे अन्नछत्र उघडले होते.
नेमके तेच पात्र जेवायचे राहून गेले. आता या अन्नाछत्राचा काय उपयोग?) मग छत्र बंद केले.
काही दिवसांनी कवीश्वरबास शोधीत शोधीत तेथे आले. तो सर्व
वृतांत लोकांकडून ऐकला, आणि ठिकाण पाहिले.
छिन्नस्थळी लिहिली होती ती घेतली. आणि त्या त्या ठिकाणाकडे पाहत पाहत श्री दंते
गोपाळबासांचा सहवास आठवत आठवत जड अंतःकरणाने निघाले.
पुढे कवीश्वरव्यास वाल्हा या गावी गुरुबहीण उपाध्य आम्नायाची प्रवर्तक महान
तपस्वीनी कमळाईसांना भेटण्यासाठी आले. ती छिन्नस्थळी त्यांना अर्पण केली. ती दंते
गोपाळबासांची छिन्नस्थळी आताही म. पाथरीकर बाबांकडे आहे.
अशा संत शिरोमणी, वैराग्यनिष्ठ महानपात्र असलेल्या
आदर्श अधिकरणाला सहृदय अंतकरण पूर्वक फार फार दंडवत!
महंत
श्री जयराज शास्त्री तळेगावकर [साळवाडी]
पूर्वजांचा पवित्र इतिहास -
हेही वाचा 👇
- पविते पर्व - महानुभावपंथ सण माहिती
- श्रीकेशवव्यास सूरी का आदर्श जीवन
- थोर महापात्र श्री गुर्जर शिवबास
- मुस्लिम महानुभाव संत - शहामुनी
- महानुभाव साधूंचे वस्त्र काळे, गुलाबी, निळे का?
- श्रीमुरारिमल्ल विद्वांस महानुभाव
- पंडित श्रीआनेराजव्यास
- पंडित श्रीनरेंद्रव्यास
- तपोनिधी श्रीलुखाइसे बाबुळगावकर
- श्रीकवीश्वरव्यास महानुभाव
- श्रीबाइदेवव्यास महानुभाव
- महानुभावांची तपोभुमी नारायणगड (खोडद)