महानुभाव पंथीय इतिहास श्रृंखला - gurjar shivvyas-Mahanubhav-history
थोर महापात्र श्री गुर्जर शिवबास
महानुभाव पंथाच्या गौरवशाली इतिहासात थोर महापात्र विद्वांस पंडित होऊन गेले ज्यांनी पंथासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून काया झिजवली. श्रीकेशराजव्यासांनी सूत्रपाठाची निर्मिती करून पंथावर फार मोठा उपकार करून ठेवलेला आहे आणि तितकाच मोठा उपकार गुर्जर शिवव्यासांनी आणि सिद्धान्ते हरिव्यासांनी स्थळपोथीची निर्मिती करून आपल्या पंथावर केला. जर त्या काळात स्थळ पोथीची निर्मिती झाली नसती तर आतापर्यंत ब्रह्मविद्या शास्त्रात अन्यथाज्ञानाची घोषणा होऊन पूर्ण शास्त्र भ्रष्टता आली असती.
खूप मतांतरे झाली असती. ज्ञाना-अन्यथाज्ञानाचा निवड करणे अत्यंत कठीण झाले असते. या दोन महानुभावांनी पंथावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. म्हणूनच आज ब्रह्मविद्याशास्त्रात अन्यथा ज्ञानाची घुसळण नाही. कारण सूत्रपाठानंतर “स्थळपोथी” हाच प्रमाण ग्रंथ मानला जातो. पैकी सिद्धांते हरिव्यासांबद्दल फारशी माहिती इतिहासात नमूद नाही. पण श्री गुर्जर शिवव्यासांचा वृद्धाचार आलेला आहे तो पुढील प्रमाणे.
गुजरात देशातील भडोच या शहरात विशाळदेव नावाचा लाड सामवेदी ब्राह्मण होवून गेले. विशाळदेव प्रधानाच्या वंशपरंपरेतील म्हणजेच परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या (हरिपाळ देवाच्या) वंशात पुढे धर्मपाळ नावाचे सद्गृहस्थ जन्मास आले. या धर्मपाळास दोन मुले होती. एक विजयपाळ व दुसरा शिवपाळ. शिवपाल म्हणजेच कवीश्वर शाखेतील सातवे आचार्य होत. शिवपाळाचे वडिल धर्मपाळ हे गर्भश्रीमंत होते. धर्मपाळाच्या पणजोबांच्या वेळी त्यांचे राज्य मुसलमानांच्या ताब्यात गेल्यामुळे त्यांचे वंशज व्यापार करून आपला संसार चालवत असत.
त्यांचा हा वंशपरंपरेचा व्यवसाय असल्याने धर्मपाळदेखील व्यापारच करीत असत. याच निमित्ताने धर्मपाळ महाराष्ट्रात आले व त्यांनी वेरूळ येथे आपले दुकान व घर केले. त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने अपार संपत्ती मिळविली. धर्मपाळ आपल्या वडिल मुलाला वेरूळ येथे ठेवून स्वतः गुजरात देशात जात येत असत.
एकदा सिंहस्थ पर्वणी आली म्हणून धर्मपाळ एक लक्ष लोकांना घेवून त्र्यंबकेश्वरला गेले. तेथील विधी आटोपून ते मेळ्यासहित वेरूळला आले. त्यावेळी विजयपाळास पुत्र झाला. हे संघाचे वेळी जन्मले म्हणून या पुत्राचे नांव संगपाळ ठेवण्यात आले. काही काळानंतर धर्मपाळ हे वेरूळ येथे असतांना रोगग्रस्त झाले. म्हणून ते देवगिरीला जावून राहिले. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या लाख लोकांना त्यांनी आपल्या वडिल मुलाबरोबर मायदेशात पाठविले. त्यानंतर चार दिवसांनी धर्मपाळ आपली सर्व संपत्ती घेवून गुजरात देशास जाण्यास निघाले. परंतु देवगिरीच्या बादशहाने त्यांना आपल्या देशात जावू दिले नाही.
धर्मपाळांना आग्रह करून तेथेच ठेवून घेतले. धर्मपाळाचा हेतू हा की गुजरात ते वेरूळ जाण्या येण्याची दगदग करण्यापेक्षा गुजरातेतील मालमत्ता विकून महाराष्ट्रात स्थिर व्हावे. म्हणून विजयपाळाने आपल्या वडिलांचे आज्ञेनुसार स्थावर मालमत्तेची विक्री केली व द्रव्याचा खजिना घेवून महाराष्ट्राकडे येण्यास निघाले. परंतु रस्त्यात चोरांच्या उपद्रवामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. विजयपाळाच्या मृत्युमुळे धर्मपाळाचे धैर्य त्यामुळे तेही लवकरच दिवंगत झाले. त्यावेळी शिवपाळ तेथेच होते. वडिलांचा व थोरल्या बंधुचा मृत्यू झाल्याने शिवपाळाच्या मनावर आघात झाला. त्यांचे वय केवळ १८ वर्षांचे होते. अल्पवयाच्या शिवपाळावर घरादाराची व व्यापाराची सर्व जबाबदारी अंगावर पडली. परंतु ते थोर धैर्यवान होते. त्यांनी आपले मनोधैर्य खचू न देता आपला व्यवसाय 'चालूच ठेवला.
एकदा शिवपाळ व्यापाराची उधारी वसूली करण्यासाठी माघमासाच्या शिवरात्रीनिमित्त पैठणला गेले. तेथे त्यांचा तीन महिने मुक्काम होता. ते पैठणला - वैशाख महिन्यापर्यंत राहिले. त्यावेळी महानुभाव पंथाचे कवीश्वर आचार्य अचलमुरारीव्यास हे स्वामी चक्रधरांची संबंधित तिर्थस्थाने नमस करण्याच्या हेतूने पैठण येथे आले होते. त्यावेळी शिवपाळांना या सत्पुरूषाचे दर्शन - झाले. या भेटीत याचा व मुरारीव्यासांचा शास्त्रीय संवाद झाला. या संवादात शिवपाळांना पंथाचा बोध झाला व त्यांनी धर्मोपदेश घेतला. यानंतर त्यांची या मार्गावर अत्यंत श्रद्धा जडली. अशा सत्पुरूषाला सोडून कोठेही जावू नये असे त्यांना वाटू लागले.
शिवपाळ हे पंथाचे अनुयायी झाल्यावर त्यांनी मुरारीव्यासांकडून नऊ प्रकरण, दृष्टांत व श्रीचक्रधर स्वामींच्या लीळाचरित्राचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना असे समजले कि, भडोच येथील हरिपाळदेव उर्फ श्रीचक्रधर स्वामी हे आपले पूर्वज असून त्यांनी हा पंथ स्थापन केला आहे व ते अवतारी पुरूष होते असे समजल्यानंतर देवाविषयी ची आवडी आणखीन वाढली. संसाराविषयी तीव्र वैराग्य उत्पन्न झाले. त्यांना वाटले. परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेला संसाराचा त्याग हा महत्वाचा आहे. आपण संसारातील विषयसुख घेत बसलो आहो. ही आपली केवढी मोठी चूक आहे. आपण कैवल्यपदाच्या आनंदासाठी आयुष्य खर्च न करता नाशवान विषयसुखासाठी आयुष्य व्यतीत करीत आहोत. हे करणे इष्ट नाही. असे विचार त्यांच्या मनात येवून ते संसारावर उदास झाले व त्यांना संन्यास घ्यावा असे वाटू लागले. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेले पुष्कळसे द्रव्य त्यांनी अन्नदानात खर्च केले.
३ महिन्यांच्या मुक्कामानंतर शिवव्यास पैठणहून - देवगिरीला गेले आणि आचार्य अचलमुरारीव्यास परभणी - जिल्ह्यातील पाथरी या गावी गेले. शिवव्यास देवगिरीला आल्यानंतर ७-५ दिवस राहिले व संसाराची सर्व - व्यवस्था आपला पुतण्या संगपाळ याच्याकडे सोपविली - आणि पाथरी येथे श्रीगुरूंकडे गेले. तेथे ते शास्त्रअध्ययन करीत श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहू लागले. तेथे असता शास्त्रात नैपूण्य प्राप्त करून त्यांनी सुमारे शके १३१० मध्ये श्रीगुरुंच्या नावे संन्यास घेतला.
संन्यास घेतल्यानंतर ते अचलमुरारीव्यासांचे शिष्य श्रीमालोबास यांच्याबरोबर एकांकी नित्यविधीचा आचार करण्यास गेले. त्यांचे श्री गुरूंवर अत्यंत प्रेम असल्यामुळे ते त्यांची वर्षातून एकदा भेट घेत असत आणि पुन्हा एकांकीस निघून जात असत. अशी त्यांनी तीन तपे केली. यानंतर चौथा चर्येला आरंभ केला, तेव्हा मालोबास त्यांना सोडून एकटेच गुरुंच्या भेटीला आले. तसेच शिवव्यासांचे पुतणे संगपाळ हेही अचलमुरारी व्यासांच्या भेटीला आले, तेव्हा मुरारीव्यास आजारी होते.
आपला अंतसमय जवळ आला असे समजून ते मालोबासांना म्हणाले, तू शिवव्यासांना माझ्याजवळ असलेली सर्व शास्त्रसामुग्री दे. यामध्ये काही वंचकत्व करू नकोस आणि जर करशील तर तूला माझी शपथ आहे. शिवव्यासाला असे सांग की, सर्व शास्त्राचा अन्वय लावावा अशी माझी आज्ञा आहे. यानंतर अचलमुरारीव्यासांचा देहांत झाला. कालांतराने ही बातमी शिवव्यासांना कळली. त्यांना फार दुःख झाले आणि ते परमार्गाच्या भेटीस आले, तेव्हा कवीश्वर मंडळींनी त्यांना आचार्यपद धारण करायला लावले.
त्यांनी आपल्या गुरुजवळील शास्त्रसामुग्री पाहिली. परंतु त्यांनी सगळ्यांची मते एकत्रित केली होती. परंतु शास्त्राचा अन्वय लावण्याचे काम बाकी होते. त्यांनी शास्त्राचा अन्वय लावला. परशुराम व्यासांचे वेळी लीळाचरित्रांचे ६० पाठ तयार झाले होते. ते अचलमुरारीव्यासांजवळ होते, तर त्या सर्व लीळांचा मतीतार्थ घेवून मतमतांतराचा छेद करून एक स्वच्छ निबंध तयार करून एक स्वतंत्र पाठ निर्माण केला, त्याला पिठीपाठ असे म्हणतात आणि कालांतराने पाथरी या गावी त्यांनी आणि सिद्धान्ते हरिव्यास या दोन ज्ञात्यांनी २२ ज्ञानी जनांची मते एकत्रित केली. गुर्जर शिवव्यास व व सिद्धान्ते हरिव्यास २४ पक्षकार मिळून तिन्ही स्थळबांधणी करून शास्त्र विस्ताररूपाने प्रकाशात आणले. असे हे त्यांचे अमूल्य कार्य पंथ कधीच विसरू शकणार नाही. अशा या थोर विभूतिमत्व असलेल्या, खऱ्या अर्थाने महापात्र महानुभाव असलेल्या गुर्जर श्रीशिवव्यासांना शतकोटी दंडवत प्रणाम!