प्रायश्चित - प्रार्थना अर्थसहीत
"हे प्रभो मी राजसी तामसी विकारी"-
हे परमेश्वरा श्री चक्रधरा मी राजस स्वभावाचा आहे, मी तामस स्वभावाचा आहे.
"विकल्पि अन हिंसकु मीच भारी"-
मी विकाराने ओथंबुन नख शीखांत भरलेला आहे , वरकरणी मी कितीही सात्विकपणाचा आव आणला तरी ही मी अंतरी मात्र विकाराने भरलेला आहे कारण ह्याला प्रमाण स्वामींच वचनच आहे की " जीव विकारा वेगळा केव्हेळा ही झालाची नाही".
हिंसेच्या बाबत तर काय बोलाव, मी भरपुर हिंसा केली जाणता अजाणता आणी तो दोष अजुन ही चालुच आहे आणी त्यात मोठ्ठी हिंसा म्हणजे जाणुन बुझुन अगदी परमार्गात राहुन सुद्धा ही वरील प्रार्थना यंत्रावत पाठ केलेली बोलतो पण अंतरी मात्र फरक नाही आणी दुस-याचे अंतकरण अगदी सहज दुखवण्यात खुसपट काढुन कुसकट जिवघेण बोलण्यात हावभाव करण्यात वागण्यात त्या
व्यक्तिकडे पाहून शास्त्र चर्चा चालत असताना कुत्सित हास्य करून सोबतच्याला त्यात शामील करून घ्यायचे.त्याचे दोष चारचौघात ऊघडपणे सांगुन त्याची खच्ची करायची इत्यादी.
"भुता देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला,
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा"-
भुतक्षोभ देवता क्षोभ गुरू क्षोभ ऊपकार निमीत्ताचा क्षोभ मार्गक्षोभ देहाभीमानिनीचा क्षोभ अशा अनेक पात्रांचे मी मन दुःखावले आहे आणी त्यांच्या अंतरी माझ्याबद्धल रोष निर्माण केले हे सर्व दोष हे माझ्या स्वामीराया श्रीचक्रधरा मी कुठे आणी कधी फेडेन ? माझे अश्या प्रकारचे ह्या देहीचे तसेच अनंता सृष्टीचे माझे दोष मी कसे नासु शकेन? ह्या विना मी आपल्या श्रीचरणी आश्रयाला कूपात्र ठरेन देवा. हे सर्व आठवुन माझ काळीज दुःखाने जरजर झाल आहे आणी एकच विनंती स्वामीया तुमच्या श्रीचरणी करीतो की मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
"भके पात्र वैरागी मी ज्ञानीयाला"
"करी मार्ग द्रोहो गुरू ईश्वराला""
"परतारकु अंतरी ना जिव्हाळा ,
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ."
"मी परमार्गातिल वैराग्य ज्या आचारवंतानी प्राधान्यत्वे आचरून हाता पायाच्या काड्या केल्या, प्रपंच व द्रव्य संपत्तिवरच ममत्व शुन्य केल व झाकुन आचार केला, त्याचे प्रदर्शन नाही केले, तसेच ज्यांनी परमेश्वराच ज्ञान संपादन करून कठोर आचार केला, निर्वेद सवंगडी केला अशा थोर पात्रांना मी काही बाही बोलुन त्यांचे अंतकरण दुखावले, मी पर मार्गाचा द्रोह केला, ज्या गुरूने ज्ञान मार्गाचे मार्गदर्शन केले त्यांचाच मी प्रतारक होऊन द्रोह केला, ईतकच नव्हे तर ऐहीक सुखासाठी ईश्वराचा सुद्धा द्रोह केला, जीवांचे पर तारण करणा-र्यांच्या बाबतीत पण माझ्या अंतरी जिव्हाळा म्हणून नाही, अशा सर्व दोषांचा मी गुन्हेगार आहे आणी माझे सर्व गुन्हे आपण माफ करावे, हे दयाघना हिच मी कळकळीची विनंती/प्रार्थना करीतो.
जे अधिकरण ज्ञानीये निमित्त आपले भले करण्या आपल्याला परमार्गाचे मार्गदर्शन तथा घडवण्या कारण होतात, त्या करिता स्वःतच्या पदरचे द्रव्य तथा वेळ ऊपयोगात आणतात आणी नंतर मात्र आम्ही त्यांचे ते थोर ऊपकार विसरून त्यांचाच अवमान करतो, प्रतारणा करतो, द्वेष करतो जेणे करून ईश्वराच्या खंतीला कारण होतो व आमच्यावर मार्गाभिमानीनीचा कोप होऊन अधोगतीला जातो असा मी म्हणजे "परतारकु "
"महानिष्ठुरा लाज ही ना कृराचा ,
"सदा भ्रष्ट रे वंचकु तस्कराचा ,
"महा दुर्गुणी वेल वाढीस गेला ,
"क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा
'जो अंतःकरणाने महानिष्ठुर असतो, त्याला त्याच्या कृर वर्तनाची लाज सूद्धा वाटत नाही, वंचकत्व स्वभाव व चोरीची आवड अशा दोषांनी मी भ्रष्ठ झालेलो आहे, आणी माझी ही दुर्गुणाची वेल/चाल वाढत वाढत गेली, मला क्षमा कर दयाघना. मला क्षमा कर.
" दयाळू कृपाळू तू औदार्यवंता
"आभाळाहुनी थोर या दोषवंता
" नको अव्हेरू तू जरी क्रोध आला
"क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा
पण हे परमेश्वरा तु दयाळु मायाळु कृपाळु आहेस, तु औदार्याचा धनी आहेस आणी मी मात्र आभाळा पेक्षा ही मोठ्या दोषांना आपजवणारा आहे.
नक्कीच माझ्या ह्या कुकृत्त्यांनी मलिनत्व आलेल्या माझ्या सारख्या अधमाचा जरी तुला विट आला असला, कंटाळा आला असला तरीही तूझ्या दयाळु कृपाळु गुणांच्या अंगिकारामुळे तु माझ्यावर दया कर, कृपा कर, माझे अनंता सृष्टीचे अनंता जन्मात जे सर्व अपराध पोटात घालुन माझ्यावर दयाकर हे दयेच्या सागरा, माझा ऊद्धार करून, मला ह्या भवसागरातुन पार करून मला आपल्या श्री चरणी ठाव दे! माझ्या स्वामीराया, जगन्नाथ! मला तुझ्या चरणी ठाव दे!
कारण कैवल्याचा डांगोरा न पिटवे कव्हणे अवतारा एका श्री चक्रधरा विण!