हिंदू धर्मातील ४ प्रकारचे अंत्यसंस्कार - महानुभाव पंथात अंत्यसंस्कार कशाप्रकारे करतात?
Hindu dharmatil 4 prakarche antyasanskar
हिंदू धर्मात 4 प्रकाराने अंत्यसंस्कार केले जातात. ते 4 प्रकारचे अंत्य संस्कार पुढील प्रमाणे आहेत...
1) भूमी डाग : प्रेताला सन्मानपूर्वक जमीनीत पुरून अंतीम संस्कार करणे याला " भूमी डाग" असे म्हणतात. ज्यांची देहामध्ये असक्ती उरली नाही अशांना भूमी डाग दिला जातो. साधू संत ज्ञानीये ईश्वरभक्त यांना नश्वर देहाची आसक्ती उरलेली नसते. मृत्यूनंतर असे जीवात्मे पुन्हा देहाकडे परतून येत नाहीत. म्हणून अशांना भूमि डाग प्रकारचा अंत्यविधी करतात...
2) अग्नी डाग : प्रेताला सन्मानपूर्वक सरणावर ठेऊन त्याचे दहन करणे याला अग्नी डाग असे म्हणतात. ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. ज्यांची देहामध्ये प्रचंड असक्ती आहे. असे जीवात्मे मृत्यूनंतर पुन्हा पुन्हा प्रेताला पाहून दुखी होतात अशांना अग्नी डाग देऊन त्यांचे प्रेत तात्काळ पंचत्वात विलीन केले जाते. हेतू हा की भोगासक्तीने आसक्त जीवात्मे परतून येऊन आपल्या प्रेताला पाहून पुन्हा दुखी होऊ नये. म्हणून अशांना अग्नी डाग देण्याची प्रथा आहे...
3) जल डाग : ज्या प्रदेशात गंगा, भागिरथा, अलकनंदा, यमुना, आदी नद्या बारमाही वाहतात त्या प्रदेशात जलडाग देऊन प्रेताला अंतिम संस्कार करण्याची प्रथा आहे. अयोध्येचा राजा रामाने शरयू नदीत प्रवेश केला होता.
4) वन डाग : अरण्यात ईश्वरचिंतनात देह क्षेपून तेथेच एकाकी देह विसर्जित करणे व ते कृश झालेले देह तिथेच वन्य श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडणे हा वनडाग आहे. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करीत पांडवांनी आपले राज्य परिक्षिताला दिले व वानप्रसस्थी होऊन हिमालयात गेले. व हिमालयात ईश्वर चिंतन करीत त्यांचे कृश देह पडले. ते कृश झालेले देह तेथील श्वापदांच्या व किडा मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. हा वनडाग होय.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या प्रकाराला हाडाची रांगवळी करणे असे म्हणले आहे. असतीपरिचे आचरण करीत ढोऱ्या डोंगरात अनेक साधकांनी अशा प्रकाराने देह पडल्याचे उदाहरणे पाहण्यास मिळतील. महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य देखील भानखेडीच्या डोंगरात असेच देह पाडायला गेले होते. परंतु आद्य कवयित्री महदाईसाने त्यांना परतून आणले हा इतिहास पाहायला मिळतो.
महानुभाव पंथात भूमिडाग व वनडाग या प्रकाराने अंत्यसंस्कार करण्याची प्रथा पूर्वीपासून आहे... पैकी वनडाग संस्कार आज दुर्मिळ आहे परंतु महानुभाव पंथात भूमी डाग देण्याची प्रथा आजही सर्वत्र रूढ आहे. परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी परम भक्त निळभट्ट भांडारेकारांना भूमी डाग दिला होता. तेव्हापासून महानुभाव पंथात भूमिडाग या प्रकारचा अंत्यसंस्कार केला जातो. मृत्यू झाल्यानंतर 3 तास प्रेताला स्पर्श न करता उत्तरेकडे उसे करून झोपवले जाते. पांढऱ्या कोरा कपड्यात प्रेताला पांघरविले जाते. त्यानंतर 3 तास प्रेताला स्पर्श करीत नाहीत.
नामस्मरण करीत परमेश्वराला प्रार्थना करावी की हे परमेश्वरा या जीवाला दुखापासून सोडव. शक्यतो रडून आकांत करण्याऐवजी परमेश्वराचे नामस्मरण करावे. नंतर अंत्यविधीच्या तयारीला लागावे. प्रेताला स्नान घालून त्याला तिरडीवर पद्मासनात बसवावे. मुखात पानाचा विडा द्यावा. साधू असेल तर उजव्या हातात नामस्मरणाची गाठी व डाव्या हातात भिक्षेची झोळी द्यावी. केवळ उपदेशी असेल तर हातात नामस्मरणाची गाठी दिली जाते. शक्यतो कोरी भूमीवर दक्षिण-उत्तर खड्डा करून त्यात विवस्त्र अवस्थेत उत्तरेकडे मुख करून डाव्या कुशीवर पोटाशी दोन्ही गुडघे घेऊन व दोन्ही हात जोडलेल्या अवस्थेत प्रेत ठेवले जाते.
नवद्वारावर खोबऱ्याच्या वाट्या किंवा खाण्याचे पान ठेऊन संपूर्ण प्रेतावर मीठ टाकून प्रेत पुरले जाते. व नंतर मातीने खड्डा बुजविला जातो. कोरी भूमीवर अंत्यविधी असेल तर गीतेतील 15 वा अध्याय म्हणून श्रद्धांजली वाहून दसव्याची तारीख घोषित केली जाते. त्यानंतर घरी येऊन हातपाय धुवून प्रसाद वंदन व देवपूजा करून अन्नोदक घेता येते. 10 दिवस पर्यंत सूतक पाळले जाते. संन्यस्त व्यक्तीचे सूतक पाळल्या जात नाही. त्यानंतर 10 दिवस ज्ञानीये बाळभीक्षुक आचारवंतांना व श्री गुरूच्या ठायी दशक्रीयेनिमित्त पात्र भोजन घातले असता त्या जीवात्म्याला प्रेतदेहाचे नरक चुकतात...
अलिकडे साधूसंत महंताच्या अंतविधीमध्ये प्रेताला गंधाक्षदा व पुष्पहार घालून आरती ओवाळून पूजन करण्याची चुकीची प्रथा रूढ झाली आहे. महानुभाव पंथातील ज्ञानीये ही प्रथा चुकीची व विकल्पजनित असल्याचे मान्य करतात. परंतु संत महंताच्या अंत्यविधीसाठी गेल्यावर प्रेताचे पूजन करायला पुढे होतात. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो.