संस्कृत सुभाषित रसग्रहण
वैराग्य शतकम्
आजची लोकोक्ती - बोद्धारो मत्सरग्रस्ताः।
खालिल सुभाषिताचे रसग्रहण करा
बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदूषिताः।
अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गेसुभाषितम्॥ - वैराग्यशतकम्
मराठी श्लोकानुवाद वामनपंडित :-
अभिज्ञास तो ग्रासिले मत्सराने ।
धनाढ्या प्रभू व्यापिले दुर्मदाने ।
शिरी थोर मुर्खास अज्ञान ओझे ।
जिराले निजांगीच पांडित्य माझे ।।
अर्थ :- (सुभाषितांना जाणण्याची व ते इतरांना सागण्याची समज असणारे) विद्वान लोक एकमेकांचा मत्सर करतात, (त्याच सुभाषितांप्रमाणे वागण्याची क्षमता असणारे) सामर्थ्यवंत राजेही (प्रभू) स्वतःच्या सामर्थ्याच्या अहंकाराने उन्मत्त होतात आणि अन्य (इतर सामान्य लोक) अज्ञानी असतात ते सुवचनांचे ज्ञान घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सुभाषितांचा कोणालाही उपयोग न होता ती स्वतःच्या ठिकाणीच गलीतगात्र होत चालली आहेत. सुभाषितांचे अंगप्रत्यंग जीर्ण होत चालले आहे.
***********************************
कवी भर्तृहरीच्या वैराग्यशतकामधील या श्लोकापासून बोद्धारो मत्सरग्रस्ताः। ही लोकोक्ती संस्कृत भाषेत प्रचलित झालेली आहे. ज्ञानाच्या व शक्तीच्या अभिमानाने माणसं गर्विष्ठ होऊन एकमेकांचा द्वेषमत्सर करू लागतात अशाप्रसंगी _बोद्धारो मत्सरग्रस्ताः।_ ह्या लोकोक्तीचा उदाहरण देण्यासाठी उल्लेख केला जातो, जेणेकरून परस्थितीचे सहज सकारण स्पष्टीकरण होते. प्रत्येक काळात अशी काही लोकं असतातच, अशा विद्वान परंतु मत्सरग्रस्त व अहंकारी सत्ताधार्यांमुळे सामान्यलोक मात्र अज्ञानात खितपत पडतात व त्याने राष्ट्र दुर्बळ होते.
जे विद्वान् आहेत, ज्ञानी, पंडित आहेत, जे सारसार विचार करू शकतात, जे जाणकार आहेत अश्या माणसांना आपल्या विद्वत्तेचा अभिमान झाल्यावर ते दुसर्या चांगल्या, गुणी व्यक्तींमधेही दोष शोधत बसतात, जेणेकरून त्यांच्याहून आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करता येईल. यालाच ते पांडित्य समजतात. त्यामुळे त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग सामन्यांना शहाणे करण्यासाठी होण्याऐवजी एकमेकांत श्रेष्ठ कोण?'॥ या स्पर्धेसाठीच होतो. अशा वेळी कळणार्यांनाही वळत नसेल तर काय होणार? ज्ञान, सुभाषिते दुर्लक्षित होऊन नष्टच होणार की!हिंदीत याच अर्थाने एक कुण्डलिया काव्यरचनादेखील आहे,
पण्डित मत्सरता भरे, भूप भरे अभिमान।
और जीव या जगत के, मूरख महाअजान।।
मूरख महाअजान, देख के संकट सहिये।
छन्द प्रबन्ध कवित्त, काव्यरस कासों कहिये।।
वृद्धा भई मनमांहि, मधुर बाणी मुखमण्डित।
अपने मन को मार, मौन घर बैठत पण्डित।।
या श्लोकाचा हिंदी समश्लोकी काव्यानुवाद,
जानकार ईर्ष्यालु हैं दम्भी सबल महान।
शेष ज्ञान से हीन अब जीर्ण सुभाषित जान॥
मराठीभाषेत एक म्हण आहे, ऐट राजाची अन् वागणूक खेकड्याची. खेकडे मत्सरग्रस्त असतात. आपल्या पुढे जाणार्या बांधवांना ते सदैव मागे ओढत असतात, असा एक समज आहे जो या म्हणीतून मांडला गेला आहे.
मुळात बुद्धी हे जगाच्या निर्मात्या परमेश्वराने मनुष्याला दिलेलं एक वरदान आहे. मात्र ज्ञान प्राप्त करून सद्बुद्धीने वागायचे सोडून ज्ञानाच्या अहंगडाने काहींना दुर्बुद्धी सुचते त्यातू ते इतरांना कमी लेखायला लागतात, इतरांचा मत्सत करू लागतात. मुळात मत्सर, निंदा करण्यास बुद्धीची गरजच पडत नाही त्यासाठी तुमच्याजवळ द्वेषभावना असली म्हणजे झाले.
अहो आपण सर्वां ठाई जगन्नियंत्या परमेश्वराला पाहातो. सर्वांकडे समानतेने पाहाणे हाच आमचा धर्म आहे. म्हणून मात्सर्यबुद्धीने भेदभाव करू नका. ते आपल्या दृष्टीने वाईट, अमंगळ कर्म आहे. आपण जे कराल ते सकळाच्या हितासाठी खरेपणाने, सत्याने, न्यायाने करा. कोणाचाही मत्सर करू नका. कारण ईश्वर सर्वांठायी वसलेला आहे. हे सगळं तुकोबाराय सांगू शकतात कारण कर्ता करविता भगवंत आहे हे सत्य त्यांना ठाऊक आहे, हे सत्य स्वीकारण्यची विनम्रता त्यांच्या हृदयात आणि बुद्धीत आहे.
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची॥
करितो कवित्व म्हणाल हे कोणी। नव्हें माझी वाणी पदरीची॥
माझिये युक्तीचा नव्हें हा प्रकार। मज विश्वंभर बोलवितो॥
तुमच्या कडे जी बुद्धी किंवा ज्ञान आहे ते देखील ईश्वरानेच दिलेलं देणं आहे. तुम्ही जे काही करता असं तुम्हाला वाटतं ते ही तुमच्याकरवी करवून घेणारा परमेश्वरच असतो, तुम्ही फक्त एक माध्यम असता. हेच तुकोबाराय सांगतात. सगळं काही परमेश्वराचं देणं आहे. त्यामुळे मत्सर द्वेषाचं कारणंच काय? तुकोबाराय म्हणतात,
फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
मी तो हमाल भारवाही॥
माझ्या मुखें मज बोलवितों हरि ।
सकळा अंतरी चक्रपाणि ॥
वर उल्लेखिलेला मूळ श्लोक जरी, "सुभाषिते, सुवचने, योग्य ज्ञान हे ज्ञानाने अहंकारभारित झालेल्या, मात्सर्यग्रस्त विद्वानांमुळे सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सुभाषिते गलितगात्र, जीर्ण, हतबद्ध झाली आहेत, रंजली आहेत, गांजली आहेत." अशा अर्थाने लिहिला गेला असला, तरी ह्या श्लोकातले बोद्धारो मत्सरग्रस्ताः। हे पहिले चरण मात्र ज्ञानाने मत्त व गर्विष्ठ झालेल्या अहंमन्य वृत्तींबद्दल बोलताना लोकोक्ती म्हणून वापरला जातो.
लेखक :- अभिजीत काळे,