श्रीकृष्ण भक्ती श्लोक 02 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 02 marathi

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 02 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 02 marathi

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 02  मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 02 marathi

छंद :- पृथ्वी 

तुझ्या बहुत शोधिले अघनिधी पदाच्या रजेः 

न तें अनृत, वर्णिती बुध जनीं सदाचार जे ।। 

असे सतत बोलते शत, न एक ते मीच ते । 

प्रमाण न म्हणों जरी, उचित माझिया नीचते.

अर्थ- हे प्रभो श्रीकृष्ण भगवंता! पापाचे केवळ सागरच असलेले, केवळ पापच करणारे असे कितीतरी दुराचारी दुष्ट तुमच्या श्रीचरणांच्या धूळीकणानें शुद्ध झालेले आहेत, असे श्रीनागदेवाचार्यांसारखे, कवीश्वरव्यासांसारखे, पंडितबासांसारखे शुद्धवर्तनी तत्वविद ज्ञानी भक्त सांगतात, अर्थातच ते अजिबात खोटे नाही. 

शिवाय तुझ्या श्रीचरणांची भक्ती करून अनंत जीव उद्धरले असे नेहमी सांगणारे एक दोन नाहींत, तर मोक्षमार्गात असलेले हजारो ज्ञानी भक्त आहेत, मग अल्पबुद्धी अशा एकट्यानेच त्यांना अप्रमाण बेभरवशीक म्हटले, तर त्याने उलट माझाच हलकेपणा सिद्ध होईल. त्या महान ज्ञानी लोकांना जर मी अप्रमाण मानले तर त्यामुळे माझाच मूर्खपणा सिद्ध होईल. 

तसाचि उरलो कसा ? पतित मी नसें काय? की

कृपाचि सरली ? असेंहि न घडे जगन्नायकी.

नसेन दिसलों कसा ? नयन सर्वसाक्षी रवी.

विषाद धरिला, म्हणों ? न सुरभी विष, क्षीर वी । 

अर्थ- मग अशा प्रकारे मी तुला सतत शरण आलो असतां, आणि महान् महान् पापीही तुझ्या प्रसादाने निष्पाप होऊन परमपद पावले, हे निश्चित असतां,  मात्र पूर्वीप्रमाणेच अद्यापही उपेक्षा केलेला हेळ सांडलेला कसा राहिलो आहे? का, मी मुळी पापीच नाही? असेही शक्य नाही कारण माझ्यासारखा पापी नरकातही शोधून सापडणार नाही. 

किंवा मी पापी असून तुमच्याजवळचा कळवळ्याचा कृपेचा साठाच पतितांचे तारण करितां करितां संपून गेला? पण तसेही शक्य नाही, कारण तुमची कृपा निस्सीम आहे, आणि तुम्ही आपल्या अनन्य भक्तांची काळजी वाहणारे परमेश्वर आहात. तेव्हां हे देवा! तुमच्या कृपेला करुणेला अंत असणे शक्यच नाहीं. 

मग कदाचित मी अद्याप तुमच्या नजरेच्या टप्यांत आलो नसेन, असा तर्क बांधावा तर तोही जुळत नाहीं, कां कीं, तुमची दृष्टी चुकवून काहीच गुप्त राहू शकत नाही, तुम्ही सर्वज्ञ आहात. म्हणून माझ्याकडे आपलं लक्ष आहेच. बरं, तुम्ही मजवर माझ्या असंख्य अपराधांमुळे रोष केला आहे, असे म्हणावे तर गाय वासरावर कितीही चिडली, तरी तिच्या ओटींतून दूधच निघते, विष निघत नाहीं, त्याचप्रमाणे तुमच्या दयामय, कृपामय दृष्टीतूनही रोषाची उत्पत्ति संभवत नाही.

आणि तुमच्यासारख्या कृपाळू परमेश्वराचा जीवांवर रोष असणे शक्यच नाही. कारण जीवाच्या उद्धारासाठीच आपण सगळे कष्ट घेत आहात.

हेही वाचा 👇

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 01 मराठी अर्थसहीत

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post