श्रीकृष्ण भक्ती श्लोक 04 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 04 marathi
केकावली
छंद :- पृथ्वी
पटुत्व सकलेन्द्रियीं, मनुजता, सुवंशीं जनी,
द्विजत्वहि दिलें भलें, बहु अलभ्य जें कीं जनीं;
यशः श्रवणकीर्तनीं रुचि दिली, तरी हा, ' वरा '
म्हणे, ' अधिक द्याच कीं,' अखिल याचकीं हावरा !”
अर्थ :- हे श्रीकृष्ण भगवंता ! हे प्रभो ! कदाचित् तुम्हीं आपल्या मनांत म्हणाल की, “याला इतके उत्तम देह दिले, सर्व इंद्रियांच्या ठायी पटुत्व दिले म्ह. सर्व इंद्रिये व्यवस्थित दिली, ('पटुत्व' म्हणजे चलाखपणा, तीक्ष्णता.) उत्तम मनुष्यत्वी संपादले, धडधाकट याला जन्मही उत्तम कुळात दिला. आणि या सृष्टीचक्रात अतिशय दुर्लभ असे ज्ञानदेहही मी याला दिले ; शिवाय, माझीं पवित्र चरित्रे, माझे पवाडे, लीळा ऐकण्याची व स्वतः गाण्याची गोडी, इतरांनाही सांगण्याची आवड हा सर्वोत्तम गुणही दिला.
इतक्या मोठमोठ्या देणग्या एका मागून एक बहाल केल्या, पण तरीही ' मला आणखी काहीतरी देणगी द्याच, हो !' अशी याची टकळी चालूच आहे. याचे मागणे संपतच नाही! तेव्हां एकंदर मागणाऱ्यांमध्ये हा बिलंदर लोभट आहे खरा ! हा जास्तच लोभी आहे”
परमेश्वरविहीत आचाराने वागून, ज्ञान संपादून व ईश्वरभक्ति करून, जीवात्म्याचा उद्धार करण्याकरितां जी सामग्री जो देहाधिकार लागतो, तिचा उल्लेख या श्लोकात कवीने केला आहे. परंतु ही सर्व सामग्री सिद्ध असतांही, ज्ञानाचा अनुभव मनाला प्रत्यक्ष आल्यावांचून खरी कार्यसिद्धि या नुसत्या सामग्रीने होऊं शकत नाही खरी मोक्षप्राप्ती होण्यासाठी अन्तःकरणाची तळमळ आणि वैराग्य, अनन्यभक्ती हेही आवश्यक आहे हे मुख्य तत्त्व येथे सुचविलें आहे.
छंद :- पृथ्वी
असे न म्हणशील तूं, वरद, वत्सल, श्रीधरा !
परंतु मज भासलें, म्हणुनि जोडितों मी करां; ।।
दिलें बहु बरें खरें, परि गमे कृपा व्यंग ती ।
अलंकृतिमती सती मनिं झुरे, न जों संगती ।।
अर्थ :– वरच्या सारखे उद्गार कदाचित् आपणआपल्या मनांत काढत असाल, असें मला क्षणमात्र भासले, पण ते माझे अज्ञान आहे, असा विचार करणे ही माझी चुक आहे. कारण हे श्रीधरा! चैतन्यनाथा! तुम्ही उदार व कनवाळू आहात, जीवांना अनंता सृष्टी वरद आहात. ('वर+द' = वर देणारा, उदार, 'वत्सल' प्रेमळ.) त्यामुळे आपण असें कधींही म्हणणार नाहीत;
परंतु, तरीही आपण असें म्हणाल, 'असें क्षणमात्रच का होईना, पण मला भासलें, हा मोठाच अपराध माझ्या हातून घडला म्हणून मी हात जोडून तुमची क्षमा याचितो. हे देवाधिदेवा! महाराजा ! आपण मला पुष्कळ देणग्या दिल्या आहेत, अनंता सृष्टी माझ्यावर थोर कृपा केलेली आहे हे अगदीं खरें आहे, सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे परंतु हा एवढा प्रसादही मला उणाच वाटतो ;
कारण, जसे एखादी पतिव्रता दागदागिन्यांनी कितीही नटविली, तरी जोपर्यंत तिला पतीचा सहवास सान्निध्य, निकटपणा लाभला नाहीं, तोपर्यंत ती आपल्या मनात झुरतच राहणार. तसं जोपर्यंत मला आपले सन्निधान, प्रेम कायमचे मिळत नाही तोपर्यंत माझे मागणे संपणार नाही. म्हणून मला आपण लवकरात लवकर आपले पवित्रकर सान्निध्य सर्वोत्तम प्रेम द्यावे ही प्रार्थना मी वारंवार आपल्या श्रीचरणांना करीत आहे.
हेही वाचा 👇 खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा