श्रीकृष्ण भक्ती श्लोक 03 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 03 marathi

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 03 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 03 marathi

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 03  मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 03 marathi

केकावली 

छंद :- पृथ्वी 

अगा प्रणतवत्सला ! म्हणति त्या जनां पावलां,

म्हणून तुमच्याच मी स्मरतसें सदा पावलां;

'“करूं बरि कृपा, हरूं व्यसन, दीन हा तापला” 

असें मनिं धरा; खरा भरंवसा मला आपला ।। 

अर्थ :- हे प्र + नत = पुर्ण अनन्यभावे शरण आलेल्या भक्तांना तारणाऱ्या भक्तवत्सल प्रभो! हे भगवंता! त्या मागें उल्लेखिलेल्या जनांचा (पुतना, कंस, चाणुर विदुरथ, अघासुर, इ.) वध करून तुम्हीं दुःखापासून तारिलें, असें तुमचे चरित्र गाणारे, ऐकणारे, सांगणारे ज्ञानी भक्तजन, महात्मे सांगतात, म्हणून मोठ्या विश्वासानें व आशेने मी आपल्या श्रीचरणांचे निरन्तर ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. 

कारण मीही त्याच्यासारखाच अधम पापी आहे, तेव्हां आपल्यालाही अशी प्रवृत्ती उत्पन्न व्हावी की, 'हा शोच्य जीव संसार दुःखाने खरोखरच फार गांजला आहे. म्हणून याच्यावर आम्ही कृपाप्रसाद करूच व याचे संकट निवारूंच. याला आपली जवळीक देऊच" अशी प्रवृत्ती आपणास उत्पन्न होवो. कारण माझा सर्व आधार खरोखर तुम्हीच आहात. हे परमेश्वरा! आपल्याशिवाय माझे या जगात कुणी नाही. 

सदैव नमितां, जरी पद ललाट केलें किणें, 

नसे इतर तारिता मज भवत्पदाब्जाविणें.

नता करुने मुक्तही म्हणसि, ' मी बुडालों रिणें; ' 

अशा तुज न जो भजे मनुज, धिक् तयाचें जिणें !

अर्थ : - हे प्रभो! मी आतापर्यंत अनंता सृष्टी इतर देवी देवतांना भजत राहिलो. सर्व देवी देवतांना नमस्कार करुन करून माझ्या कपाळावर गट्टे पडलेले आहेत. त्या घट्ट्यांनीं माझ्या कपाळावर आपले कायमचे ठाणे केलें आहे. पण माझा उद्धार झाल्याचे कांहींच लक्षण अनुभवास येत नाहीं. माझा उद्धार अनंतसृष्टी कधी झालाच नाही. देवी देवतांनी फक्त तात्पुरते सुख मला दिले. व पुण्य संपल्यावर फळातून ढकलून दिले. 

त्रेतायुगात अन्य देवता मुचकुंदराजाला म्हणाल्या “आम्हीच मुक्त नाहीत तुला काय मुक्ती देऊ?” मग मुचकुंद राजाने उपाय विचारला तेव्हा त्यांनी आपल्या श्रीचरणांकडे दाखवून म्हटले की श्रीकृष्ण भगवंतच तुला या संसार सागरातून मुक्त करतील. तेव्हा तो भाग्यवंत राजा आपल्याला शरण आला. म्हणून हे मेघःश्यामा! तुमच्या श्रीचरणकमलाशिवाय दुसरे कोणीही माझे तारण करणारें नाहीं. म्हणून मी आपल्याच श्रीचरणांना नेहमी आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

हे परमेश्वरा! शरणागत झालेल्या दासाला संसार बंधनातून मुक्त करून आपले सुख देऊन उलट मीच भक्तांच्या भक्तीच्या ऋणांत बुडालों आहे, त्याची फेड कशी होईल ती होवो ! असे तुम्ही म्हणत असता. आणि सुदाम्याचे पोहे न्याये अल्पच भक्तीने तोष पावता. मग अशा आपणासारख्या भक्तवत्सलाला जो भजणार नाहीं, त्याच्या अभागी जीवाच्या जगण्याला धिक्कार असो ! मनुष्य देहात येऊनही जो तुझे स्मरण करत नाही त्याच्या जगण्याला धिक्कार असो! 

नतावनधृतव्रता ! ज्वलन तूंचि बा धावनीं, 

पदप्रणतसंकटीं प्रजव तूंचि बा धावनीं; 

दया प्रकट दाखवी कवण, सांग, त्या ऋक्मिणी ।

सतीव्यसनवारणीं, जयजयार्थ त्या वा रणीं ?

अर्थ :- कलियुगात शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करण्याचे ब्रीद ज्याने स्वीकारले आहे, अशा श्रीचक्रधर प्रभो, तुच या संसार दुःखरूपी अरण्याला जाळून भस्म करणारा वणवा आहेस. तुझ्याशिवाय आम्हा जीवांचे दोष कोणीही जाळू शकत नाही. किंवा तुझ्या ज्ञानाशिवाय कोणीही आमचे दोष नासू शकत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्येच म्हटलेले आहे ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।। गीता 4.37 ।। 

तुझ्या श्रीचरणापाशी शरण आलेल्यांच्या संकटकाळीं सहाय्यार्थ धावणे करण्यांत तुम्हीच अत्यंत वेगवान् आहात. रुक्मिणीमातेच्या पत्राला वाचून द्वारावतिहून दीड दिवसात तिच्या ठायावर येऊन शिशुपालापासून तिचे रक्षण केले. व आपले अर्धांगिनीपद दिले. असा वेगाने धावणारा तूच एक आहेस. इतर देवता कर्मात जोडलेले असेल तरच साह्य करतात तुम्ही मात्र निर्हेतुक साह्य करता.

 त्या सती द्रौपदीवरील संकटाचे निवारण करण्याकरिता, व तिला वस्त्र पुरवण्यासाठी तात्काळ तिथे प्रकट झाले. किंवा त्या महाभारत युद्धांत अर्जुनाच्या विजयाकरिता हे परमेश्वरा, तुम्हीच संपूर्ण दया दाखविली. व पांडवांना विजय मिळवून दिला. नाहीतर कौरवांच्या विशाल अशा सैन्यसागरासमोर पांडवांचा निभाव लागणे कसे शक्य होते!

हेही वाचा 👇 खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा 👇

भीक्षा स्तोत्र महानुभाव पंथिय

आणि हेही वाचा 👇

महानुभाव पंथ प्रश्नोत्तरी

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 04 मराठी अर्थसहीत

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post