श्रीकृष्ण भगवंतांचा प्रतिज्ञाभंग आणि भीष्मप्रतिज्ञापूर्ति

श्रीकृष्ण भगवंतांचा प्रतिज्ञाभंग आणि भीष्मप्रतिज्ञापूर्ति

 30-10-2021

भीष्मप्रतिज्ञापूर्ति  



    महाभारताचे युद्ध सुरू असताना दुर्योधनाच्या चिथावणीने आवेशात येऊन पितामह भीष्मांनी उद्या मी निपांडवी पृथ्वी करीन किंवा श्रीकृष्ण भगवंताला हाती शस्त्र घेण्यास भाग पाडले अशी प्रतिज्ञा घेतली. त्याचे वर्णन वामनपंडितांनी छंदबद्ध काव्यात फार सुंदर केलेले आहे. त्या काव्याला भीष्मप्रतिज्ञा पुरती असे नाव दिलेले आहे काव्य वामनपंडितांचे असल्यामुळे ते काव्य अप्रतिम सुंदर  झालेले आहे. 


छंद :- स्वागता

श्रोत्रयुग्म परिपूत कराया

सावधान जनमेजयराया

जो परेशरत धन्य अहो तो । 

गोष्पदोपम तया भव होतो ।।१।।

अर्थ :- हे जन्मेजय राजा आपले दोन्ही कान पवित्र करण्यासाठी पुढील कथा सादर होऊन ऐक, जो परेशरत म्हणजे श्रीकृष्ण देवाच्या श्रीचरणी ज्याचे मन रत आहे त्याला हा संसार समुद्र गुरांच्या खुरांनी तयार झालेल्या खड्ड्यासारखा उथळ असतो. 


छंद :- शिखरिणी

"प्रतिज्ञा जे केली यदुकुळवरें 'युद्ध न करी

धरी ना शस्त्रातें कदनसमयीं मी निजकरीं

घडेना हे मिथ्या जरि तरि न मी भागवत रे

 प्रतिज्ञेतें भीष्में मनिं अवथिलें या दृढतरें ।।२।।

 अर्थ :- यदु कुळवरे म्हणजे या गोकुळात सर्वश्रेष्ठ असलेल्या श्रीकृष्ण भगवंतांनी प्रतिज्ञा केली की मी हातात शस्त्र घेणार नाही “न धरी शस्त्र सांगेन गोष्टी युक्तीच्या चार।” ती प्रतिज्ञा ऐकून पितामह भीष्म म्हणतात उद्या जर मी श्रीकृष्ण देवाला शस्त्र हाती घ्यायला नाही लावले तर मी खराखुरा भागवत नाही श्रीकृष्ण देवाची प्रतिज्ञा कशी भांगेल याचा ध्यास त्यांनी मनात घेतला.


छंद :- भुजंगप्रयात

पिता शंतनू माय ज्याची नदी जे

स्वयें शुद्ध ऐशास सन्मान दीजे

तसा गर्व तोही हरावा मनाचा

मनाचा असा भाव त्या वामनाचा ।।३।।

 अर्थ :- ज्याचा पिता शांतनु राजा आणि ज्याची आई गंगा नदी असा असून स्वयम् शुद्ध ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन करणारा भीष्म त्याला सर्व सन्मान देत होते पण त्याचाही गर्व देवाने हरण केला हे आम्ही या काव्यात वर्णन करीत आहोत असे वामनपंडित म्हणतात. 


छंद :- वसंततिलका

भीष्माकडे रव भयानक दुंदुभीचा

होतां वदे तनय आनकदुंदुभीचा

दुश्चिन्ह आजि गमतें मज सव्यसाची

जाती शिवा अशिव हे अपसव्य साची ।।।।

अर्थ :- कौरवांच्या सैन्यात दुंदुभी चा आणि रणवाद्यांचा भयानक असा रवी म्हणजे आवाज ऐकून श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणाले हे सव्यसाची आज मला दुश्चिन्ह जाणवते आहे काहीतरी अपशकुनात्मक घडणार आहे! तरी तू पुढे घडणाऱ्य प्रसंगासाठी सावधान राहा!! 

श्रीकृष्ण भगवंत सर्वज्ञपणे सर्व जाणत होते की आज काय घडणार आहे म्हणून ते अर्जुनाला सावध करीत आहेत. 


गर्वोक्ति फाल्गुन वदे 'जगदेकराया

आहे असा कवण तो झगडा कराया?

म्यां काळखंज वधिले अतुलप्रतापी

पौलोमही असुर गोसुरविप्रतापी' ।।।।

 अर्थ :- पण एकदाच सांगितल्याने ऐकेल तो कसला अर्जुन तो गर्वोक्तीने श्रीकृष्ण भगवंताला म्हणतो असं काय मोठं वाईट घडणार आहे!! कौरव सैन्यामध्ये असा कोणता मोठा योद्धा आहे जो माझ्याशी युद्ध करायला येणार!! आणि मला पराभूत करण्याचा प्रयत्न करणार!! मी माझ्या पराक्रमाने मोठमोठाल्या असुरांचा योद्ध्यांचा वध केला आहे असे गर्विष्ठपणाने अर्जुन बोलला. 

पुढे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाचा रथ युद्धभूमीवर नेला आणि समोर पितामह भीष्म यांचा रथ पाहून त्यांच्यासमोर अर्जुनाचा रथ उभा केला. 

छंद :- पृथ्वी

पितामह वदे तया प्रबळ तूं पृथानंदना!

रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना

स्वयें गतवयस्क मी, सरस वीर तूं रे नवा

भिडें रणधुरंधरा! जय घडो सुखें वा न वा।।६।।

 अर्थ :- युद्धासाठी सन्मुख आलेल्या अर्जुनाला पाहून पितामह भीष्म म्हणतात हे अर्जुना तू फार प्रबळ आहेस, महायोद्धा आहेस, तू साक्षात भगवंताला भक्तीने वश करून तुझा रथ हाकण्यासाठी ठेवले आहेस. असा तुझ्यासारखा चतुर तूच आहेस. आणि मी म्हातारा माणूस आहे तर तरीही मी तुझ्याशी पूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध करेल मग माझा विजय होवो अथवा न होवो.


छंद :- वसंततिलका

पारीक्षिता! मग शरासन पांडवानें

ओढूनियां हुतवहार्पितखांडवानें

तों भीष्मदेह खचिला शरतांडवानें

ज्याच्या क्रिये सकळ पद्मभवांड वाने ।।७।।

 अर्थ :- पितामह भीष्म यांचे असे खोचक शब्द ऐकून व्याज असतो ती ऐकून अर्जुन खवळला, इरेला पेटला, खांडववन दहनाच्या वेळी अग्नि देवतेने दिलेले गांडीव धनुष्य हाती घेऊन त्याने बाणांचे अक्षरशः तांडव सुरू केले आणि पितामह भीष्मांवर बाणांचा वर्षाव सुरु केला. त्यामुळे भीष्म कासाविस झाले. 


छंद :- इंद्रवजा

गांगेय कोपा चढला कसा रे? ।

ज्या मानिती हाचि कृतान्त सारे

र्जौनियां सिंहरवें जयातें

पाहे जणों मारिल आज यातें ।।८।।

छंद :- वसंततिलका

'त्वां काय कर्म करिजे लघुलेंकराने?',

बोलोनियां मग धनू धरिलें करानें ।

तें व्यापिलें सकल सैन्य महाशरांनी

भीष्में, जसा पतित होय हुताश रानीं ।।९।।

 अर्थ :- अर्जुनाचे ते शरसंधान पाहून पितामह भीष्म ही अत्यंत क्रोधित झाले जणूकाही साक्षात मृत्यूच युद्धभूमीवर प्रकटला इतका आवेश त्यांचा होता त्यांनी त्वेषाने गर्जना केली आणि अर्जुनावर शरसंधान सुरू केले.

छंद :- इंद्रवजा

तो स्तोम येतां बहु सायकांचा

झालाचि पार्थव्यवसाय काचा

काचावला वीर पुढे धसेना

झाली नृपा! सर्व भयांध सेना ।।१०।।

अर्थ :- पितामह भीष्म यच्या बाळांचे समूहाच्या समूह अर्जुनाकडे येतांना पाहून अर्जुनाचे शरसंधान हळू झाले त्या दोघांमधील बान युद्धाची तीव्रता पाहून पांडव सेना घाबरली आज पितामह भीष्म युद्धाचा शेवटच जणू करणार असे सर्वांना वाटायला लागले

छंद :- स्वागता 

पुष्पवर्ण नटला पळसाचा

पार्थ सावध नसे पळ साचा

पाहिलें जंव निदान तयाचें

तों दिसे वदन आनत याचें ।।११।।

अर्थ :- भीष्म काही केल्या अर्जुनाला आवरेना अर्जून पराभूत होताना सर्वांना दिसत होते. अर्जुनाचा पराजय समोर दिसताना पाहून पांडव सैन्यातील रथी-महारथी चिंतित झाले.


छंद :- पृथ्वी

प्रतोद मग ठेविला उतरला रथाधःस्थळी

म्हणे, 'प्रबळ भीष्म हा जय घडे न या दुर्बळी' ।

करीं कमळनेत्र तो प्रथित चक्र तें स्वीकरी

प्रमोद यमनंदना बहु तया यशस्वी करी ।।१२।।

 अर्थ :- पण चिंता करण्याचे काहीही कारण नव्हते कारण संपूर्ण जगाचा स्वामी सर्व करता अर्जुनाच्या रथावर विराजमान होता त्या श्रीकृष्ण भगवंतांनी ते दृश्य पाहून हातातील घोडे हाकण्याचा चाबूक खाली ठेवला आणि स्वतःशीच विचार केला की हा भीष्म फार प्रबळ आहे हा असेपर्यंत पांडव जिंकणे शक्य नाही याच्या समोर पांडव दुर्बल आहेत म्हणून अत्यंत क्रोधाचा अंगीकार करून श्रीकृष्ण भगवंत रथाखाली उतरले आणि जवळच पडलेले एका मोडलेल्या रथाचे चाक उचलून पितामह भिष्मावर धावून गेले पितामह भीष्म यांचा वध करून यमंदनाला म्हणजेच राजा युधिष्ठिराला प्रसन्न करावे असे देवाच्या अंतःकरणात होते. 


छंद :- शिखरिणी

असा येतां देखे रथनिकट तो श्यामल हरी

नृपा! गांगेयाच्या हृदयिं भरल्या प्रेमलहरी

शरातें चापातें त्यजुनि वदला गद्गद रवें 

जगन्नाथे केलें मज सकळ लोकांत बरवें ।।१३।।

अर्थ :- श्रीकृष्ण भगवंतांना असे रथाचे चाक श्रीकरामध्ये घेऊन आपल्यावर धावून येताना पाहून गांगेय म्हणजे भीष्माच्या हृदय सागरात प्रेम लहरी आल्या. त्यांनी धनुष्य बाण खाली ठेवून हात जोडून गद्गदीत अशा वाचेने श्रीकृष्ण देवाला संबोधून म्हटले, “ हे जगन्नाथा श्रीकृष्ण देवा! आज माझा जन्म धन्य झाला आपण सर्व लोकांमध्ये आज मला श्रेष्ठ केले. माझ्यामुळे आपली शस्त्र हाती न धरण्याची प्रतिज्ञा भंग झाली.” 


छंद :- स्वागता

ये रथावरि झणीं यदुराया

खड्ग देइन विकोश कराया

तोडिं मस्तक पडो चरणीं या

धन्य होइन तदाच रणीं या ।।१४।।

 अर्थ :- हे यदुराया! आता आता लवकरात लवकर या मीच आपल्या हाती तलवार देतो आणि आपल्या श्रीकराने माझे मस्तक या धडावेगळे करा, ते मस्तक आपल्या श्री चरणी पडून तरच मी या रणभूमीत धन्य होईल. 


छंद :- शार्दूलविक्रीडित

मारावें मजला असेंच असलें चित्तीं तुझ्या केशवा

तैं मातें मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा!

हा मुख्यार्थ जनार्दना! मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी

कीजे, सर्व जनांत होइल मृषा हे आपुला वैखरी' ।।१५।।

अर्थ :- हे परमेश्वरा ! माझा वध करावा असे जर आपल्या मनात आले आहे तर मला स्वर्गाचा राजा देवराज इंद्र ही वाचवू शकणार नाही, या जगात कोणीही नाहि जो माझे रक्षण करू शकेल !! पण आपल्या या लीळेचा रहस्यार्थ मला उमगला तो असा की भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आपण शस्त्र घेतले आहे. 


छंद :- वसंततिलका

हे भीष्मवाक्य परिसोनि जगन्निवासे

केलें विलोकन सुस्मित पीतवासे

वेगें फिरोनि चढला मग तो रथातें

पार्थाचिया पुरविणार मनोरथातें ।।१६।।

अर्थ :- भीष्माचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण भगवंत प्रसन्न झाले. कृपा दृष्टीने अवलोकन करून सुहास्य करून वेगाने परत फिरले. आणि रथावर आरोहण करिते झाले. आता पुढे पार्थाचे सकळ मनोरथ पुर्ण करणार. ।। 


कवि :- वामन पंडित

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post