अनादि काळापासून चालत आलेला महानुभाव पंथ
महानुभावपंथाचे श्रेष्ठ कवि कै. म. दामोदर मुनिंनी आपल्या या काव्यात चारी युगात हा सत्य सनातन धर्म परमेश्वराने स्थापण केला. त्या पैकी काही अवतारांची नावे सर्वज्ञांनी आपल्याला निरूपण केलेली आहेत. त्या अवतारांचे अवतार कार्य जीवोद्धरण कार्य याचे वर्णन सदर काव्यात केलेले आहे. जीवाला या भवसागरातून मुक्त होण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मार्गाचा अनुग्रह घेतल्याशिवाय जीव या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. जीवांच्या उद्धारासाठीच परमेश्वराने हा मार्ग स्थापण केलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य... या श्लोकानुसार लोप पावला की पुन्हा परमेश्वर अवतार घेऊन या मोक्षमार्गाची स्थापना करतात.
आता आपण काव्याचे रसग्रहण करू :-
महानुभाव हा पंथ सनातन चहुयुगात समान ।
मनुजा तुला कळेना जाण ।।धृ०
कृतयुगात हंस अवताराने स्थापिलेला मोक्षमार्ग :-
कृतयुगी श्रीहंसरुपाने । घेऊनिया अवतार प्रभूने ।
सनत्कुमारा या परज्ञाने । आदर्श केला बोध तयाने ।
युगायुगी पर ज्ञान पंथ हा । चालत आला महान ।।१
कृतयुगात सनकादिकांना ज्ञान देऊन त्यांना आचार्य करून हंस अवतारांनी हा लोपलेला मार्ग प्रकट केला.
त्रेतायुगात श्रीदत्तात्रेय महाराजांनी स्थापिलेला मोक्षमार्ग
त्रेतायुगी श्रीदत्तात्रेय हा । ऋषीवंशी अवतार जहाला ।
यदू अरळक आणिक सकला । ज्ञान मार्ग हा दावी आपुला ।
बंधयुक्त जीव मुक्त व्हावया नीत्य धरी अभिमान ।।२
त्रेतायुगात श्रीदत्तात्रेय महाराजांनी यदुराजा, अर्ळक, मदाळसा अशा ज्ञात अज्ञात अनेक भक्तांना ज्ञानदान दिले.
द्वापरयुगात श्रीकृष्णभगवंतांनी स्थापिलेला मोक्षमार्ग
द्वापरी श्रीकृष्ण जहाले । गीता ज्ञान हे पार्था दिधले ।
दानव दुष्टा मर्दन केले । भक्तजनाला हृदयी धरीले ।
सत्य सनातन पंथ पुनः । हा स्थापियला महान ।।३
द्वपरयुगात श्रीकृष्णभगवंतांनी अर्जुन, श्रीउद्धवदेव, भौमासुराच्या बंदीखाण्यातून सोडवलेले २२ हजार राजे, मुचकुंद, अशा अनंत भक्तांचा उद्धार केला.
कलियुगात श्रीचक्रधरप्रभूंनी महानुभाव पंथाची स्थापना केली. आणि तो लोपलेला सनातन धर्म पुन्हा प्रकट करून जीवोद्धरण कार्य आरंभिले.
कलियुगी श्रीचक्रधरांनी । यतीमुनीचा वेष धरुनी ।
परज्ञानाचा बोध करुनी । उद्धरीले बहू जड जीव प्राणी ।
नागदेव आचार्य स्थापूनी । मग केले प्रयाण ।।४
कलियुगात श्रीनागदेवाचार्य, म्हाईंभट, महादाइसा, उपाध्येबास, नाथोबा अशा अगणित भक्तांचा उद्धार केला आणि आजही ते उद्धरण कार्य सुरु आहे.
कलियुगी बघ आज नरा रे । मोक्ष मार्ग जगी हाच खरा रे ।
अन्यमार्गी ना मुक्ती जीवा रे । शास्त्र शोधूनी पाही आता रे ।
‘दामोदर’ म्हणे मता मतांचे । घालू नको थैमान ।।५
शेवटी कविवर्य श्रोत्यांना सांगतात - कलियुगासारख्या हिन युगात महानुभावपंथ हाच खरा मोक्षमार्ग होए. अन्यदेवतांच्या भक्तीने मुक्ती मिळणे कधीच शक्य नाही. म्हणून हे माणसा ! तू अनन्यभावे परमेश्वरास शरण जा. व त्याची अव्यभिचारी भक्ती कर तर तू या संसार सागरातून सुटशील!!