मृत्यू एक अंतिम सत्य - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता
द्युतक्रिडेत पराजय झाल्यानंतर पांडव १४ वर्षाच्या वनवासात गेले. असतांना एके दिवशी द्रौपदीसह सर्वांना खूप तहान लागली. युधिष्ठीराने सहदेवाला पाठविले की, ‘‘जा, जवळपास पाण्याचे एखादे तळे आहे का? याचा शोध घे.’’ थोडे चालत गेल्यावर सहदेवाला एक तळे दिसले. तळ्याभोवती संपूर्ण हिरवळ होती. सहदेवाला प्रसन्न वाटले. त्याने विचार केला. आपल्यालाही खुप तहान लागली आहे. आधी आपण पाणी घेऊ मग भावंडांसाठी आणि मातेसाठी पाणी नेऊ. आणि
तो हाताची ओंजळ भरुन पाणी पिणार तेवढ्यात त्या तळ्यातून आवाज आला.
‘‘हे युवक! थांब पाणी पिऊ नकोस. अगोदर माझ्या काही प्रश्नांची ऊत्तरे दे, समाधानकारक ऊत्तरे दिल्यानंतरच तुला पाणी पिता येईल. आणि जर माझे न ऐकता पाणी पिण्याचा प्रयत्न केला, तर तुझा मृत्यु होईल. ’’
ते तळे एका यक्षाचे होते. तेथे तो राखण करत होता. प्रत्येक पथिकाला पाणी पिण्याआधी तो हाच प्रश्न करत असे. सहदेवाने ते ऐकून सपशेल दुर्लक्ष केले. तहानही खुप लागली होती. आणि सहदेवाच्या मनात अहंकार असल्याने यक्षाच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो पाणी पिऊ लागला, आणि लगेच निश्चेष्ट पडला.
इकडे एका झाडाखाली बसलेले चार पांडव व द्रौपदी चिंता करू लागले. बराच वेळ झाला, सहदेव परत आला नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी युधिष्ठीराने नकुल, भीम, अर्जुन यांना क्रमाक्रमाने पाठविले. यक्षाने सर्वांना तेच म्हटले. पण कुणीही ते गांभिर्याने घेतले नाही. आणि सर्वांची तीच अवस्था झाली. शेवटी राजा युधिष्ठीर स्वतः गेले.
आपल्या चारी भावांना निश्चेष्ट पडलेले पाहून युधिष्ठीराला वाईट वाटले, दुःखही झाले. त्यालाही खुप तहान लागली होती. अगोदर थोडे पाणी पिऊन मग याचा शोध घेऊ, असा विचार करुन युधिष्ठीराने तळ्यातल्या पाण्याला स्पर्श करताच त्या तळ्यातील यक्षाचे शब्द ऐकू आले, ‘‘हे युधिष्ठीर राजा ! हे तळे माझ्या मालकीचे आहे. येथील पाण्यावर माझी सत्ता आहे. म्हणून माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावरच तुला हे पाणी पिता येईल, नाहीतर तुझी तुझ्या भावांसारखीच अवस्था होईल. तेव्हा युधिष्ठीर राजाला यक्षाच्या बोलण्याचे गांभिर्य समजले. आणि आपल्या भावांची अशी अवस्था का झाली याचेही कारण कळले. व तो नम्रपणे त्या यक्षाला म्हणाला, ‘‘महात्मन् ! आपण आपले प्रश्न विचारा. मी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.
तेव्हा यक्षाने प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्या प्रकरणालाच महाभारतातील ‘युधिष्ठीर-यक्ष संवाद’ असे म्हणतात. यक्षाने धर्मराजाला १०० प्रश्न विचारले. त्यांना यक्ष प्रश्न असे म्हणतात.
त्या सर्व प्रश्नांची धर्मराज युधिष्ठीराने समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे तो यक्ष प्रसन्न झाला. व धर्मराजाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा धर्मराजाने माझ्या भावांना पुनर्जिवित करावे असा वर मागिला. यक्षाने सर्वांना पूर्ववत् सजीव केले. पुढे हा ‘युधिष्ठिर - यक्ष संवाद’ प्रसिद्धीस पावला. त्यावर बरीच आख्यानेही लिहिली गेली.
त्या युधिष्ठिर - यक्ष संवादात एक प्रश्न आहे,
यक्षाने विचारले ‘‘हे राजा ! या जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ती कोणती?’’
त्यावर धर्मराज युधिष्ठीराने उत्तर दिले,
“अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ।।’’
(पाठांतर :- अहन्यहनि भूतानि गच्छन्ती यममन्दिरम् ।
शेषाः स्थीरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ।।)
महाभारत वनपर्व
श्लोकार्थ :- रोज असंख्य लोक यमलोकाला जातात म्हणजेच मरण पावतात. आपल्या भोवतालचे परिसरातले, आपले नातेवाईक, अशा अनेक जणांचा रोज मृत्यु होतो हे आपण नेहमी पाहतो, पण तरीही ‘आपण सुध्दा एक दिवस मरणार आहोत.’ हा विचार कोणीच करीत नाही, सर्वांना असेच वाटते की, मी अमर आहे. हीच जगातील सर्वात मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. माणूस सतत जगण्यासाठी धडपडत आहे.
नाऽकाले म्रियते जन्तुर्विध्द: शरशतैरपि ।
तृणाग्रेणऽपि संस्पृष्टो प्राप्तकालो न जीवति ॥
(महाभारत)
श्लोकार्थ :- जोपर्यंत मृत्युचा वेळ येत नाही, तो पर्यंत भिष्मासारखा शेकडो बाणांनी विध्द झाला तरी मृत्यु येत नाही, परंतु, मृत्युचा वेळ आला असता एका गवताच्या काडीचे निमित्त होऊन सुध्दा मृत्यु येतो. पाहाता पाहता, चालता बोलता माणसे आपल्यातून निघून जातात. नंतर ‘‘सकाळीच तर याच्याशी बोलणे झाले आणि गेलाही’’ अशा प्रकारचा प्रश्चाताप आपल्याला होतो. आजार, अपघात, कोराना सारखी महामारी इत्यादि अनेक प्रकारचे मृत्यूसंयोग आपल्याला येतात. त्यातून मनुष्य वाचूही शकतो. परंतु आयुष्याची घटीका भरली की मृत्यु कोणीही टाळू शकत नाही. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे.
जसं दिवा जळण्यासाठी, तेवत राहाण्यासाठी १) दिव्याची ज्योत २) दिवा ३) तेल, या तीन गोष्टी आवश्यक आहेत. दिव्यातील वात विझली तर पुन्हा लावता येते, प्रज्वलित करता येते. परंतु तेल संपले तर काहीच करता येत नाही. तसे मध्ये मध्ये येणाऱ्या आजारांपासून औषधपाणी करून वाचता येते. पण ‘अपि धन्वन्तरिर्वैद्य: किं करोति गतायुषं’ ज्याचे आयुष्य च संपले, त्याला धन्वंतरी सारखा वैद्य तरी काय करील? त्याला कुणीही वाचवू शकत नाही.
आयु: कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च ।
पञ्चैतानि हि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिन: ॥४-१॥
(चाणक्य नीति)
श्लोकार्थ :- देवता जेव्हा जीवाला मातेच्या गर्भात ठेवते. तेव्हाच त्याच्या पूर्व कर्मानुसार ५ गोष्टी निश्चित होतात.
१) आयुष्य म्ह. तो किती दिवस जगेल.
२) कर्म म्ह. तो उपजिविकेसाठी कोणते कर्म करील.
३) वित्त म्ह. त्याला किती धन मिळेल.
४) विद्या म्ह. तो कोणते शिक्षण घेईल.
५) निधन म्ह. त्याचा मृत्यू कसा व केव्हा होईल व कुठे होईल.
पूर्वजन्मात केलेल्या कर्मानुसार या ५ गोष्टी ठरतात. मग त्या ९ महिण्यांनी त्यां जीवाचा जन्म होतो. आणि त्याप्रमाणे त्याला वागावे लागते. त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्या पेक्षा काही वेगळे तो करू शकत नाही. अर्थात् आपणच केलेल्या कर्मानुसार आपल्याला मृत्यू प्राप्त होतो. मग ते कर्म या जन्माचे असो किंवा पूर्वजन्मीचे असो. त्याला आपणच जबाबदार असतो
या सर्व सृष्टीचा चालक ईश्वर आणि नियती. परमेश्वराने नेमून दिलेल्या व्यवस्थेमुळे, नियमांमुळे हे सर्व सहज घडत असते. मनुष्याची चांगली वाईट स्थिती त्याच्याच कर्माचे फळ असते, पण ते आपल्या लक्षात येत नाही, म्हणूनच ‘कर्मणा गहनो गति:’ कर्माची गती मोठी गहन आहे असे श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटले आहे.
मनुष्याच्या मृत्यूविषयी रामायणात एक श्लोक आहे.
यथा फलानां पक्वानां, नान्यत्र पतनाद् भयं ।
एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद् भयम् ॥
(रामायण अयोध्याकांड-१०५-१७)
ज्याप्रमाणे पिकलेल्या फळांना झाडावरून खाली पडण्याशिवाय दुसरे भय नाही, तसेच मनुष्याला मृत्युशिवाय, मृत्युपेक्षा दुसरे कोणतेच मोठे भय नाही. प्रत्येकाचे मरण हे अटळ आहे.
वने रणे शत्रुजलाग्निमध्ये, महार्णवे पर्वत संकटे वा ।
सुप्तं प्रमत्तं विषमस्थितं वा, रक्षंति पुण्यानि पुरा कृतानि ॥
मनुष्याला वने म्ह. घनदाट अरण्यात, रणे म्ह. रणांगणात, युद्धभुमीवर, शत्रुंच्या समुदायात, आगीत, महार्णवे म्ह. महासागरात, किंवा दुर्गम अशा पर्वतात, आणि सुप्तं म्ह. झोपलेल्याला, प्रमत्त म्ह. मोहामुळे जो अंध झाला आहे त्याला, संकटे म्ह. संकटग्रस्ताला, त्याची पूर्व जन्मी केलेली पुण्य कर्मे रक्षितात.
पण जर परमेश्वराचा अनन्यभक्त असेल तर त्याचे रक्षण परमेश्वरच करतात. मग त्याचे पुर्व पुण्य असो की नसो त्याचे रक्षण होतेच.
छंद :- शार्दूलविक्रीडित
खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणै: सन्तापितो मस्तके ।
वांच्छन् देशमनातपं विधिवशात्तालस्य मूलं गत: ।
तत्राप्यस्य महाफलेन पतता भग्नं सशब्दं शिर: ।
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रैव यान्त्यापद: ।।११०।।
भर्तृहरि नीतिशतक
मराठी अनुवाद :-
दुर्दैवे टकल्या कुणी नर शिरी सूर्यातपे तापला ।
छायेला सहजीच तालतरुच्या खाली पहा पातला ॥
मोठ्याने पडुनि महाफल तदा टाकी शिरा भंगुनी ।
दुर्दैवी जिथ जाइ तेथ बहुदा आपत्ति ये धाऊनी ॥११०॥
मराठी अर्थ :- मध्यान्हकाळी उन्हाने डोके तापल्यामुळे, कुणी एक टक्कल पडलेला मनुष्य सावलीसाठी वृक्ष शोधत होता. पण त्या रेगिस्थानात वृक्ष मिळेना. शेवटी दैववशात् त्याला एक ताडाचे झाड दिसले. तो त्या ताडाच्या झाडाखाली सावली साठी गेला. तिथे सावली मिळणे तर दुरच पण गेल्याबरोबर वरून धाडकन् मोठे ताडफळ त्याच्या डोक्यावर पडले व त्याचे डोके फुटले.
तात्पर्य :- दुर्दैवी मनुष्य, ज्याचे पुर्वजन्मीचे सुकृत नाहीतर तो जेथे जातो तेथेच बहुदा आपत्तीही धावून जातात. किंवा त्याच्या बरोबरच असतात. व त्याला दुःख जास्त प्राप्त होते. म्हणून मित्रांनो ! या जन्ममरणाच्या चक्रापासून सुटण्यासाठी परमेश्वरभक्त हाच एक उपाय आहे. वेळीच सावध असलेले बरे. आपण कायमचे इथे राहणार आहोत हे खुळ डोक्यातून काढून टाका. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण मरण येण्याआधी परमेश्वराला शरण गेले तर मृत्यूनंतर मिळणाऱ्या नरकयोनींपासून कायमची सुटका होईल. हा फार मोठा लाभ होणार आहे.
हेही वाचा 👇