पुर्वजांचा पवित्र पावन इतिहास

पुर्वजांचा पवित्र पावन इतिहास

 पुर्वजांचा पवित्र पावन इतिहास 


श्रीचक्रधरोत्तर काळात श्रीनागदेवाचार्यांनी पंथाची धुरा सांभाळली. त्यांच्यानंतर हे आचार्यत्व, घाट बोरीचे (जि. बुलढाणा) भास्करभट्ट बोरीकर उर्फ श्रीकवीश्वरव्यास यांच्याकडे आले. श्रीकवीश्वरांची पुतणी आणि शिष्या नागाइसा यांना पारीसनाथाच्या घाट शिरपूर (जि. बुलढाणा) येथे दिले होते. त्या विधवा झाल्या. गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्या आपल्या काकांकडे आल्या. वाराणशीच्या पव्ह्यासोबत निघालेल्या नागाइसांची व काकांची तिवसा गावाच्या पूर्वेस (जि. अमरावती) भेट झाली. त्यांनी अनुसरण्याची इच्छा व्यक्त केली. नागाइसाचे वैराग्य खरेच आहे काय याची परीक्षा घेण्यासाठी 'तू हे खाली पडलेले घाणेरडे कापड पांघरशील काय?' असे काकांनी विचारल्यावर नागाइसांनी लगेच खालचे फडके अंगावर गुंडाळले. त्यांच्यातील ही विकल्पशून्यता पाहून त्यांना घेऊन भास्करभट्ट श्रीनागदेवाचार्यांकडे आले. आचार्यांनी नागाइसांना कवीश्वरांच्या नावे दीक्षा दिली. म्हणून नागाइसा कवीश्वरांच्या शिष्या म्हणजेच कन्या व या नात्याने त्या आचार्यांची नात म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आचार्या श्रींकडूनच त्यांचा सर्व शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास झाला.

कालांतराने आचार्यश्रींचे देहावसान झाले. त्यांचे आचार्यपद श्रीकवीश्वरव्यासांकडे गेले. मात्र गुरुविरहाने व्याकूळ झालेले कवीश्वर अटनविजनास निघाले. नागाइसा व इतर शिष्यांनी त्यांना प्राथून आचार्यपद स्वीकारण्याची विनंती केली. कवीश्वरांनी हे आचार्यपद ज्ञान, भक्ती व वैराग्य असे त्रिदंडीयुक्त असलेल्या श्रीआनेराजव्यासांना देण्याचे सूचित केले. मात्र अनेक गुणांनी परिपूर्ण असलेल्या कवीश्वरव्यासांनाच हे आचार्यत्व देण्यात आले. श्रीबाइदेवव्यासांनी आपले ब्रह्मविद्याप्रवीण श्रीपरशरामव्यास व रामेश्वरव्यास या दोन शिष्यांनाही कवीश्वरांकडे सोपविले. कवीश्वरांना आता तीन प्रमुख शिष्य झालेत. वडील नागाइसा दुसरे परशरामव्यास आणि तिसरे रामेश्वरव्यास. त्याचबरोबर श्रीबाईदेवव्यासांनी सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीचे संबंधित विशेष पोथ्या तथा इतर आचार्यमंतास लागणारी सर्व सामग्री कवीश्वरव्यासांकडे सुपूर्द केली. बाइंदेवव्यास, आनेराजव्यासादी सर्वच वयोवृद्ध, ज्ञानवृद्धांनी त्यांचे आचार्यत्व स्वीकारले. पुढे आपल्याकडे असलेल्या अवतारसंबंधित सर्व पवित्र वस्तूंची विभागणी करून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना वाटून दिल्या. कालांतराने श्रीकवीश्वरांचे देहावसान झाले. याचे सर्वांनाच अतीव दुःख झाले. विशेषतः नागाइसा व परशरामव्यास यांच्या दुःखाला तर सीमा नव्हती.

श्रीकवीश्वरांच्या देहान्तानंतर आनेराजव्यासादी तपस्व्यांनी हे आचार्यपद नागाइसास स्वीकारण्याची विनंती केली. तथापि आपले गुरुबंधू परशरामव्यास यांना आचार्यत्व देण्यासंबंधी नागाइसांनी सर्वांना प्रार्थना केली. परशरामानी ते अत्यंत विनम्रपणे नाकारले. तथा हे पद नागाइसानाच द्यावे, म्हणून विनंती केली. दोघा बहीणभावांचे हे प्रेम पाहून हर्षान्वित झालेल्या आनेराजव्यासांनी आचार्यपदाची माळ सर्वानुमते परशरामव्यासांच्या गळ्यात घातली.

परंपरेने चालत आलेले श्रीचक्रधरस्वामीचरणांकित वंदन दोघाही बहीणभावांनी सर्वांना वाटून दिले. मात्र श्रीगोविंदप्रभूंच्या दाढेचा विशेष जवळ ठेवला. यावर कुमर रेमाइसा व मदळसा यांच्या सूचनेवरून दाढेच्या विशेषाचे सोगसेटी सोनाराकडून पाच तुकडे केले. ते नागाइसा परशरामव्यास, कुमर रेमाइसा, अनिराजव्यास व सोगसेटी सोनार या पाचांनी वाटून घेतले व झालेल्या बारीक भुग्याला अनुलेपन करून सहावा मदळसास दिला. तथा इतर अत्यंत पवित्र व वंदनीय वस्तूंची विभागणी केली. तसेच म्हाइंभटाचे लीळासंशोधन. लक्ष्मींद्रव्यासांचे लक्षण ही दोन पुस्तके परशरामांनी; तर शिशुपाळवध, एकादशस्कंद, चाळीसाख्य स्तोत्रे, रत्नमालास्तोत्र, केशिराजांचे वच्छहरण ही पाच पुस्तके नागाइसांनी घेतली.

पुढे परशरामव्यास हे निफाडास (जि. नासिक) गेले. तेथे आपल्या जवळील पवित्र वंदन तेथेच ठेवले. तर नागाइसा पाथरी (जि. जळगाव) येथे आल्या. तेथील कवीश्वरव्यासांच्या देशमुख नावाच्या शिष्यांना भेटल्या. तेथील देशपांडे हे नागाइसांचे मातुलगृह होते. तेथे आपली वंदनादी सामग्री ठेवून पुनः असतिपरिसाठी विजनात गेल्या. दरम्यान परशरामव्यास ढोरकीन गावी (जि. औरंगाबाद) जाऊन आपले देशपांडे, पाटील या गृहस्थाश्रमी शिष्यांस भेटले. आपल्या जवळील सर्व वंदनीय वस्तू व शिष्या सुंदर बोल्हाइसास ढोरकीन गावी ठेवून ते स्वतः अटनास निघून गेले.

अटन करीत असतानाच त्यांची व नागाइसांची भेट झाली. पुढे नागाइसा अटनविजन करीत नांदेडला गेल्या. नांदेड येथील श्रीमुनिव्यास देशपांडे यांची व त्यांची भेट झाली. भेटीत त्यांनी नागाइसांच्या धर्माचरणाची चौकशी केली. आमचा धर्म हा गीताश्रीत आहे व आचार एकादशस्कंधाच्या आधारे आहे असे नागाइसांनी सांगितल्यावर त्यांना या धर्माची महत्ती उगमजली. पुढे त्यांनी खेटी या गावी नागांबाजवळ दीक्षा घेतली. मुनिव्यास देशपांडे शास्त्रवेत्ते होते. त्यावर ब्रह्मविद्येचा अभ्यास नागाइसांसारख्या अधिकारी साध्वीकडून केल्यावर ते विशेष पंडित झाले.

     इकडे ढोरकीन गावी खालशांची धाड आली व सैनिकांनी ढोरकीन गावच्या बायांचे धर्म घेतले. यावेळी महंमद तुघ्लकाने देवगिरीला आपली राजधानी बनविले होते. त्याचा कालखंड शके १२४७ ते १२७३ (इ.स. १३२५ (१३५१) हा सांगितला जातो आणि मुनिव्यासांचा शके १२६० (इ.स. १३३८) हा काळ धरला तर यावेळी देवगिरीला स्थिरावलेल्या महंमद तुघ्लकाच्या राज्यात कुणाची धाड आली होती, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या धाडीमुळे घाबरलेल्या वाचासुंदर बोल्हाइसांनी म्हाइंभटाच्या लीळाचरित्र, लक्ष्मीद्रव्यासांच्या लक्षणांसह व दाढेच्या विशेषादी सर्व प्रसादवंदानांसह विहिरीत बुडून आत्मत्याग केला. हे वृत्त कळल्यावर परशरामव्यास ढोरकीनला आले. सर्व गाव ओसाड झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सर्व आडविहिरी शोधल्या; परंतु त्यांना वाचासुंदर बोल्हाइसा वा त्यांच्या जवळील पवित्रा वस्तूंचा शोध लागला नाही. तेथून ते निफाडास आले. त्यांचे परमदुःख पाहून आनेराजांनी आपल्या जवळील दाढेचा विशेष परशरामास दिला.

मुनिव्यास देशपांडे नांदेडकरांसारखे महाज्ञानी शिष्य नागाइसांस लाभले होते. त्यांचा त्रिदंडी आचार पाहून नागाइसांनी त्यांना अत्यंत प्रसन्नपूर्वक आचार्यत्व बहाल केले आणि आपल्या जवळील दाढेचा विशेष त्यांना दिला.

त्यानंतर अटनविजनाला निघालेल्या नागाइसांची व परशरामांची भेट झाली. आता आपला अंतःकाळ जवळ आला आहे, असे समजून दोन्ही भावडांनी असतिपरीचा कडक आचार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ढोऱ्या डोंगरावर डोंगरगणमार्गे (जि. नगर) जाऊन वैराग्य करण्यास परशरामव्यास गेले, तर चांदवडमार्गे सप्तशृंगपर्वतावर (जि. नासिक) नागाइसा गेल्या. तेथे त्यांनी अत्यंत कडक वैराग्य केले. त्यातच त्यांचे देहावसान झाले. ठरलेल्या दिवशी दोघेही त्र्यंबकेश्वरला भेटणार होते. ढोऱ्या डोंगरातील आपली तपस्या संपवून परशरामव्यास आलेत; परंतु नागाइसा आल्या नाहीत, हे पाहून ते सप्तशृंग पर्वतावर त्यांना भेटण्यास आले. अर्थात तेथे नागाइसांचे कलेवरच त्यांना पाहावयास मिळाले.

आपली भगिनी गेल्याचे अनावर दुःख घेऊनच विरागशील झालेले परशरामव्यास निफाडास (जि. नासिक) आले. तेथे त्यांचे शिष्य पेटे हरिबास व सोमणबास भेटले. लवकरच सोमणबासांचेही देहावसान झाले. परशरामव्यासांच्या दुःखात पुनः भर पडली. थकत चाललेले शरीर व परमार्गाची जबाबदारी पाहून आपले आचार्यत्व मुनिव्यास नांदेडकरांना देण्याची त्यांना इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यांनी मुनिव्यासांना बोलावणे पाठविले. प्रवासात, येताना ढोरकीन गावी जाऊन ज्या विहिरीत वाचासुंदर बोल्हाइसाने आत्मत्याग केला होता, त्या विहिरीत उतरून मुनिव्यासांनी त्यांचा व त्यांच्याजवळील इतर वस्तूंचा शोध घेतला. अर्थात तोपर्यंत बोल्हाइसांचा देह, पोथ्या जलमय झाल्या होत्या. दाढेचा लहानसा विशेष गवसणेही शक्य नव्हते. मात्र परशरामांनी बोल्हाइसांजवळ ठेवलेले उंबरवटाचे पात्र त्यांना सापडले. मोटेच्या धडकांनी ते काष्ठाचे पात्र ठिकठिकाणी भंगले होते. भंगलेले ते पात्र घेऊन परशरामव्यासांकडे निफाडगावी आले. आपण अति प्रयत्न करूनही आपल्याला हे पवित्र पात्र मिळाले नाही आणि मुनिव्यासांना ते अल्प प्रयत्नाने मिळाले याचा परशरामांना विशेष आनंद वाटला. ईश्वरी कृपा मुनिव्यासांवर आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ते पात्र लगेच मुनिव्यासांना प्रसन्न होऊन दिले. तसेच आपल्या अपरोक्ष मुनिव्यासच परधर्माची धुरा वाहण्यास समर्थ आहे असे समजून त्यांना आचार्यत्वही बहाल केले. वृद्धापकाळामुळे परशरामव्यास देवदर्शनास गेले. पेटे हरिबासांना अतीव दुःख झाले. आपल्या गुरुबंधुंच्या मृत्युमुळे मुनिव्यासही अधिक विरागशील बनले. विनायकव्यासांना हरिव्यासांकडे सोपवून मुनिव्यास स्वतः पाथरीस आले. सुंदर बोल्हाइसांचे उंबरवट्याचे पात्र ज्याची तोडमोड झाली होती, ते नीटनेटके केले. तसेच बेलापूरच्या निंबाचेही पात्र त्यांच्याजवळ होते. नागाइसांच्या गळ्यातील विशेष व नागाइसांकडून दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी प्रसन्नतेने दिलेला दाढेचा विशेष एवढी परम वंदनीय संपदा मुनिव्यासांजवळ होती.

       दरम्यान हरिव्यासांना अचळमुरारीव्यासांसारखे विद्वान शिष्य लाभले. मुरारीव्यासांनी आपल्या गुरूंना ब्रह्मविद्या निरुपण करावी, अशी विनंती केली, मात्र मुरारीव्यासांचा मोठा अधिकार पाहून त्यांनी आपल्या शिष्यास ब्रह्मविद्येचे अध्ययन करण्यासाठी आपले गुरुबंधू मुनिव्यासांजवळ जाण्यास सांगितले. याच काळात मुनिव्यास अटनविजन करीत निफाडास आले. तेव्हा हरिव्यासांनी मुरारीव्यासास मुनिव्यासांकडे सोपविले व यास ब्रह्मविद्या पारंगत करा, अशी प्रार्थना केली. मात्र त्याच दिवशीच्या मध्यान्ह रात्री हरिव्यासांचे देहावसान झाले. पुढे अनेक विस मुनिव्यासांच्या सान्निध्यात राहून मुरारीव्यास ब्रह्मविद्येत निष्णात झाले. पुढे त्यांनी आपले गुरूबंधू विनायकव्यास यांच्या भेटीस निफाड येथे जाण्याची अनुज्ञा घेतली. या प्रवासात मुरारीव्यासांना मालोव्यास, नारायणव्यास बहालिये, दोयेंबास हे शिष्य लाभले. त्या तीनही शिष्यांना त्यांनी श्रीमुनिव्यासांच्या सुपूर्द केले. त्यांनाही त्यांनी ब्रह्मविद्येत पारंगत केले. याच काळात दायेंबासांचे देहावसान झाले.

        मुनिव्यास देशपांडे हे मूळचे नांदेडचे. याचवेळी नांदेड शहरी यतीपंथाच्या साधूंनी वेदशास्त्रांची करून, ते खोटे कसे आहेत, हे तेथील देपाळदरणा राजास पटवून दिले होते. राजा स्वतः या यतींचा शिष्य होता. त्यामुळे नांदेड शहरात या यतीपंथीय साधूंचे मठ, आश्रम होते. तेथील वैदिक ब्राह्मणांनाही यतींना निरुत्तर करता येईना. चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणे, उपनिषदादी सर्व धर्मग्रंथांचा त्यांनी उच्छेद केला. मुनिव्यास हे पूर्वीचे वैदिक घनपाठी शास्त्री, आतातर ब्रह्मविद्येचे महापंडित झाले होते. त्यामुळे सर्व नांदेडकर ब्राह्मणांना त्यांचाच एक आधार वाटला. ते त्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानपूर्वक नांदेडला घेऊन आले. देपाळदरणा राजाही मुनिव्यासांची कीर्ती ऐकून होता. म्हणून त्याने, 'तुम्हास वीघ्न आले असे जाणा' असे आपल्या गुरूस सांगितले. पुढे मुनिव्यास व यतीसाधूंमध्ये विवाद झाला. त्यात यती पराभूत झालेत. ठरल्याप्रमाणे मुनिव्यासांना जयपत्र मिळाले. यावर राजाने आपल्या गुरूस 'तुमचे धीग धीग जीणे जन्मा येउन : वेर्थच भूमीभार केला' म्हणून धिक्कारले.

      यती जादूटोण्यातही निष्णात होते. त्यांनी मुनिव्यासांना त्यासाठी पाचारण केले. या विद्येचे अंग अर्थातच मुनिव्यासांना नव्हते. दरम्यान अचळव्यास व नारायणव्यास बहाळिये यांची रिद्धपुरास भेट झाली. रात्री त्यांना आपले श्रीगुरू संकटात सापडले आहेत, त्यांच्या मदतीला लवकर नांदेडला जावे, असे स्वप्न पडले. अचळव्यास व नारायणव्यास सत्वर नांदेडला आले. नांदेडच्या गोदानदीच्या कालिया डोहात केळीच्या पानांची आसने ठेवून एकावर यती आणि दुसऱ्यावर मुनिव्यासांनी बसावे, असे यतींनी राजास सांगितले, ज्याचे आसन बुडेल तो हरला व जिंकणाऱ्यास जयपत्र द्यावे. ठरल्याप्रमाणे दोघेही आसनावर बसले. नारायणव्यासांना जादूटोणा या विद्येची पूर्वाश्रमीची उत्तम जाण होती. त्यामुळे त्यांच्या या विद्येतील कौशल्यामुळे मुनिव्यासांचे आसन तरंगले व यतीचे आसन बुडाले. शेवटी यतींनीच मुनिव्यासांना जयपत्र लिहून दिले. याचा परिणाम वेगळा झाला. देपाळदरणा राजाने यतींचे गुरुत्व नाकारले व मुनिव्यासांचा अनुग्रह घेतला. राजाने आपल्या गुरुंची मंगलतुरे लावून शहरातून मिरवणूक काढली. नांदेडातच त्यांचा मठ बांधून दिला. हा मठ अजूनही नांदेडात आहे. राजाने अती आग्रहाने मुनिव्यासांना चातुर्मासासाठी तेथेच ठेवून घेतले. याच मुक्कामात मुनिव्यासांचे बंधू विश्वनाथ देशपांडे, त्यांने पुत्र काशिनाथ देशपांडे व त्यांचे पुत्र काकोपंत भेटीला येत. काकोपंतांचे सातव्या वर्षी मौजिबंधन झाल्यावर विश्वनाथांनी त्यास मुनिव्यासांच्या स्वाधीन केले. काकोपंत हे मुनिव्यासांचे नातू. काशिनाथांनीही मुनिव्यासांचा अनुग्रह घेतला. काकोपंतांनीही बाराव्या वर्षी उपदेश घेतला. देपाळदरणाची मुनिव्यासांवर अत्यंत श्रद्धा होती. त्याने मुनिव्यासांना पिढीचे वंदन नमस्कार करवण्याची विनंती केली त्याप्रमाणे पाथरीहून पिढीचे वंदन नांदेडला आणवले.

     याचवेळी बेदरच्या बादशहाचे दिवाण कमळाकर देशपांडे पर्वाकारणे गोदास्नानासाठी बेदरहून (कर्नाटक) नांदेडला आले होते. प्रवासात रात्री त्यांना स्वप्न पडले की गंगेच्या काठावर जे कोणी साधू भेटतील, त्यांची विनयपूर्वक भेट घ्यावी. त्याप्रमाणे कमलाकर दिवाण पहाटेच गंगेच्या काठावर आले. नदीकिनाऱ्यावर धर्मवार्ता करीत असलेले मुनिव्यास त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांचे दर्शन घेतले. चर्चा झाली. या चर्चेत, अनुसरल्याशिवाय ईश्वर नाही, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि तेथेच त्यांनी दीक्षा घेतली. कमलाकर दिवाण हे पूर्वीचेच वेदविद्याप्रवीण होते. 'मुनिबासावंसी हीरा निफजून ज्ञानसूर्ये प्रकासला' असे वृद्धान्वयकाराने त्यांचे वर्णन केले आहे. कमलाकरमुनींना अनेक शिष्य मिळाले. मुनिव्यासांच्या सन्निधानी राहून त्यांनी ब्रह्मविद्येचा पूर्ण अभ्यास केला. अटनविजन करीत ते असतिपरीचा कडक आचारधर्म पाळू लागले. त्यांच्या ज्ञान, भक्ती व वैराग्याच्या कीर्तीमुळे अनेक शिष्य मिळाले. या काळात मुनिव्यास हे नांदेडला होते.

      श्रीकमळाकरमुनींची सुरेगावची (जि. नासिक) विधवा कन्या गौराइसा, आपल्या वडलांनी दीक्षा घेतल्याचे समजल्यावरून त्यांना भेटावयास आल्या. नांदेडला आल्यावर मुनिव्यासांची भेट झाली. गौराइसांचा धर्माधिकार पाहून त्यांच्या प्रार्थनेवरून मुनिव्यासांनी कमलाकरांच्या नावे त्यांना दीक्षा दिली. तेथील मुक्कामात त्या ब्रह्मविद्या पारंगत झाल्या. कालांतराने कन्येची भेट झाल्यावर कमलाकरमुनी सुखावले.

एकदा कमलाकरमुनींच्या सोबत गौराइसा अटनविजनास आल्या. कमलाकरमुनींच्या पायात रेशमी चपला पाहून त्यांनी गुरूस म्हटले - "तुम्ही गज्यांत लक्ष्मी सोडून निघाले : तरी पायेतनात रेशमी घड्या घालीता हे काइ? का जे सुखसाधने देव न पवीजे?" हा प्रश्न ऐकताच कमलाकरमुनींनी आपल्या पायातील चपलांचा त्याग केला. मात्र आपल्या गुरूंच्या पायांना चपलांशिवाय अत्यंत त्रास होत आहे, हे पाहून त्या पुनः चपला घालण्याची विनंती केली.

इकडे अचळमुनींनाही अनेक ज्ञानी शिष्य मिळाले. अटनविजनातच त्यांची कमळाकरमुनींची भेट झाली. अचलमुनी निफाडहून आपले वंदन घेऊन पाथरीस आले. अचळमुनी आपल्या शिष्यांना आचारशास्त्र सांगत असत; परंतु विचारशास्त्र सांगत नसत. गुजर शिवव्यास हे अचळमुनींचे सर्वांत धाकटे व जिज्ञासू शिष्य. मात्र त्यांनाही विचारशास्त्र सांगत नसत. एके दिवशी अचळमुनींना ताप आला आणि तापाच्या भरातच विचारशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धान्त त्यांच्या मुखातून बाहेर पडले. शिवव्यासांनी ते भिंतीवर लिहून काढले. ते कोणी लिहिले असे अचळमुनींनी विचारल्यावर त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. शिवव्यासांवर ईश्वरी कृपा आहे, असे समजून अचळमुनींनी शिवव्यासांना ज्ञान अध्ययनार्थ कमळाकरमुनींच्या स्वाधीन केले.

श्रीमुनिव्यासांचे काकोपंत त्यांना कमळाकरमुनींच्या नावे दीक्षा दिली. त्यांचे काकोबास असे नामकरण केले. कमळाकरमुलींच्या सान्निध्यात राहून काकोबास ब्रह्मविद्यापारंगत झाले. गुर्जर शिवव्यासही प्रज्ञावंत झालेत. कमळाकरमुनींना एकूण दीडशे शिष्य झालेत.

श्रीमुनिव्यास आता थकले होते. आपले परमशिष्य श्रीकमळाकरमुनींना त्यांनी रिद्धपूरला (जि. अमरावती) घेऊन जाण्याची सूचना केली. प्रथम ते श्रीक्षेत्र मानखेडीस (जि. अमरावती) आले. आचार्यांच्या विजनस्थानाचे दर्शन घेऊन पुसद्याहून रिद्धपूरला आले. नंतर गुरुशिष्य सर्व मार्गासह करंजास आले. कमळाकरमुनी हे बेदरच्या बादशहाचे दिवाण असले, तरी ते मूळचे विदर्भातील कारंजा (जि. वर्धा) या गावचे देशपांडे. त्यांचे थोरले बंधू अंजनगाव सूर्जी (जि. अमरावती) येथील अधिकारी होते. दिनकररावांचे थोरले पुत्र रामचंद्र हेही कारंजाचे अधिकारी म्हणून काम पाहत होते. रामचंद्र अधिकारी यांनी मुनिव्यास व कमळाकरमुनींना कारंजास कायम राहण्याची विनंती केली. काही काळ मुनिव्यास तेथे राहून व कमळाकरमुनींना तेथेच ठेवून स्वतः नांदेडला गेलेत.

कारंजाला कमळाकरमुनींची धार्मिक दैनंदिनी सुरू झाली. गावाच्या वायव्य दिशेला असलेल्या सोनतळ्यावर विजनास जात. तेथे धर्मवार्ता होत असे. मुनिव्यास व कमळाकरमुनींनी दोघांनीही आपापल्या परिसरात आध्यात्मिक कीर्ती संपादन केली.

एकदा कमळाकरमुनी आपल्या गुरुंच्या दर्शनासाठी नांदेडला गेले. आपले वृद्धत्व पाहून मुनिव्यासांनी आपले आचार्यपद कमळाकरमुनींना बहाल केले. नांदेडचा देपाळदरणा राजा व दरबार शहरातील मान्यवरांच्या साक्षीने विधिवत त्यांना आचार्यपद दिले. त्यानंतर श्रीमुनिव्यास ईश्वरदर्शनास गेले. श्रीगुरूंच्या वियोगाने कमळाकरमुनी शोदग्ध झाले. नांदेडमठात कान्होबासांची नियुक्ती करून आपण इतर शिष्यांसह कारंजास आले. गुरुविरहाने व्याकूळ झालेल्या कमळाकरमुनींनी गंगातिरी स्थानदर्शन करण्यास निघाले. स्थान नमस्कार करीतच पाथरीस आले. तेथे विनायकव्यासांची भेट झाली. विनायकव्यास थकले होते. पाचसात दिवस तेथे राहून त्यांनी त्यांची सेवा केली. सोबत असलेल्या श्रीगुर्जर शिवव्यासांनी आपले गुरूबंधू विनायकव्यसांची शुश्रूषा करण्याची व तेथे राहण्याची कमळाकरमुनींना अनुज्ञा मागितली. शिवव्यासांना तेथे ठेवून कमळाकरमुनी कारंजास आले.

यानंतर कमळाकरमुनी त्याच्याकडे अनुसरलेल्या दीडशे शिष्यांपैकी तेरा शिष्यांना भद्रासन रचून त्यांना आचार्यत्वाचा बहुमान देऊन मान्यतेचे वस्त्र दिले; आणि आपल्याकडील पिढीवंदनाचे तेरा विभाग करून त्यांना वाटून दिले. आपला वृद्धपकाळ जवळ आलेला पाहून त्यांनी आपले आचार्यत्व आपली कन्याव शिष्या ब्रह्मविद्याविद् गौराइसा यांना प्रदान केले. गुरू व पित्याच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या गौराइसानी नारोव्यास, सालोव्यास यांना कारंजा मठात ठेवून आपण समग्र मार्गासमवेत गंगातिरी आल्या. गौराइसा या मार्गाच्या आचार्या झाल्याने त्यांना गौरंव्यास म्हणून संबोधले जाऊ लागले. मार्गक्रमण करीत त्या नांदेडला आल्या. नांदेडच्या मठाचे अधिकारी कान्होबास व देपाळदर्णा यांची भेट झाल्यावर गौरंव्यास कान्होबांसह कारंज्यास आले. सालोबासांचे नातू कोयाबास व त्यांचे शिष्य कृष्णराजव्यास हे वनोवीस (जि. यवतमाळ) राहत असत. गौरंव्यास आल्याचे समजताच ते कारंजाला आले व त्यांना वनोलीस चालण्याची प्रार्थना केली. वनोलीस गौरंव्यासांच्या ज्ञान व तपःकिर्तीला साजेल असे त्यांचे स्वागत केले. पुढे तेथून गौरंव्यास शिष्यांसमवेत भानखेडीला श्रीनागदेवाचार्यांच्या विजयस्थानी आले. तेथून पुसद्याला (जि. अमरावती) गेले तेथील गोविंदराज लखापती यांची भेट घेतली. तेथ पाचसात दिवस मुक्काम झाले. गोविंदराजांनी त्यांना उंची वस्त्रे व सातशे होन अर्पण करून पूजा केली. नंतर श्रीक्षेत्र रिद्धपूरमार्गे ते कारंजास आले. तेथील काही दिवसांच्या मुक्कामानंतर ते पुनः गंगातिरी आले. पैठण > डोमेग्राम (जि. नगर), > फलटण (जि. सातारा), > बीड> पांचाळेश्वर (जि. बीड) > अहेरमल (जि. जालना ) > पाथरी (जि. जळगाव) असा त्यांचा तीर्थप्रवास झाला. पाथरीला गुजर शिवव्यासांना भेटले. तेथून अटन करीत असतानाच त्यांच्या गुरुबंधूंचा देहान्त झाल्याची दुःखद वार्ता त्यांना कळली. त्याची शहानिशा करण्यासाठी शिवणी (जि. अमरावती) येथे जाऊन त्यांनी ओंकारव्यासांची भेट घेतली. ओंगारव्यासही या वार्तेबद्दल. अनभिज्ञ होते. तेथे असतानाच ओंकारमुनींना स्वप्न पडले की, 'पंडितबासांना संदेह विचारावा.' दुसरे दिवशी गौरंव्यासांना हे स्वप्न सांगताच आपला ईश्वरप्राप्तीचा काळ जवळ आला, हे त्यांनी ओळखले आणि पंडितबासांना आचार्यपद देण्याची सर्व शिष्यांना अनुज्ञा दिली.

कमळाकरमुनींनंतर गौरव्यासांकडे आचार्यत्व आले होते. मात्र आपल्या विद्यमानीच त्यांनी हा विधी सर्वांच्या उपस्थितीत केला होता. मात्र गौरव्यासांनी पंडितबासांना जेव्हा आचार्यत्व देण्याविषयी सांगितले, मात्र आपल्या हयातीत हा विधी केला नाही. त्यामुळे त्यांच्या मरणोत्तर शिष्यांनी जेव्हा पंडितबासांना आचार्यत्व देण्याचे ठरविले, तेव्हा काकोबासांनी (मुनिव्यासांचे नातू) विरोध केला आणि आपल्याला मिळावे असा आग्रह धरला. दरम्यानच्या काळात पारंपरिक पिढीचे सर्व वंदन काकोबासांजवळ गेले होते. त्यांनी ते पूजावंदन पंडितबासांना देण्यास प्रतिकूलता दर्शवली. सर्वांनी विनंती करूनही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. काकोबासांच्या शिष्यांची इच्छाही काकोबासांचे आचार्यत्व स्वीकारले, परंतु आपल्या जवळील पिढीचे चंदन शेवटपर्यंत त्यांना दिले नाही.

अशाप्रकारे पिढीचे आचार्यत्व पंडितबासांना मिळाले. मात्र काकोबासांच्या दुराग्रही वृत्तीमुळे पिढीचे वंदन मिळू शकले नाही. गौरंव्यासांचे देहावसान शिवणीस झाले होते व तेथेच पंडितव्यासांना आचार्यत्व देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काकोबासांची ही प्रतिकूल वृत्ती पाहून खिन्न झालेले पंडितबास कारंजाहून गंगातिरी आले. पैठण > डोमेग्राम > सिन्नर > पंचाळेश्वर > बीड> अहेरमल असा त्यांचा प्रवास झाला. चैत्राला अहेरमलला आल्यावर तेथे त्यांना ओंकारव्यास, सालोख्यास, बावंबास, काकोबास यांचे देहावसान झाल्याची अप्रिय वार्ता समजली. या वार्तेमुळे पंडितबासा कमालीचे अस्वस्थ झाले. याच अवस्थेत ते सिवणीस आले. तेथे जाखोबांची भेट घेऊन ते कारंजाला आले.

कमळारकरपिढीचे वंदन नमस्करून पुनः त्याच उद्विग्न मनाने पंडितबास, मयंकराज व दह्यांडेकर यांना घेऊन रिद्धपुरास आले. त्यावेळी काकोबासांचे शिष्य तेथेच होते. त्यांना भेटून त्यांना झालेल्या गुरुविरहाच्या दुःखाचे शांतवन केले. त्यांना सोबत घेऊन पुसद्याला आले. तेथे बावंबासांच्या शिष्याची भेट घेतली. तेथून नांदेडला आले. गंगातिराची पुनः यात्रा सुरू झाली. या तीर्थयात्रेत त्यांनी अनेक आचारवंत ज्ञानयोग्यांची भेट घेतली. डोमेग्रामी दायेबासांची भेट झाली. त्याच रात्री दायेंबासांना स्वप्न पडले की आता अनंतराजास संदेह पुसावे. याचा अर्थ पंडिबासांना उमगला. डोमेग्रामीच त्यांना आचार्यत्व प्रदान केले. मात्र हे आचार्यपद काकोबासांचे शिष्य कान्होबासांनाच द्यावे, असा काकोबासांच्या इतर शिष्यांनी आग्रह धरला. तथापि या आग्रहास डावलून पंडितबासांनी अनंतराजास डोमेग्रामीच आचार्यत्व प्रदान केले. काकोबासांच्या शिष्यांनी मान्यता देण्याचे कबूल केले, तरी नीतावळीची करंडी (नित्यावळीची देवपूजा) व दाढेचा विशेष देण्यास नकार दिला. पुढे डोमेग्रामीच पंडितबासांचे देहावसान झाले.

डोमेग्रामीच पंडितबासांची उत्तरक्रिया झाल्यावर अनंतराज अटन विजनासाठी निघाले असतानाच वाटेतच खालशाची धाड आली. स्त्रियांचे धर्म लुटले गेले. अनंतराजांच्या अनेक शिष्यांची पळापळ झाली. अनंतराज काही शिष्यांसमवेत निलंग्यास गेले. सारीच मार्गव्यवस्था विस्कटली. पिढीचे वंदनही विखुरले गेले. नंतर कोण कुठे गेले याची माहिती या वृद्धान्वयात पाहावयास मिळत नाही.


1 Comments

Thank you

Post a Comment
Previous Post Next Post