परमेश्वराची मर्जी
बंधुनो! शरीर मातीचा
दिवा आहे. त्याच्या अंतर्यामी तेवत असलेली आत्म्याची ज्योत आहे. ती ज्योत स्थिरावयास
हवी. काम, क्रोध, लोभ ही त्याभोवतीची कठीण आवरणे होत. ही तिघेही सख्खे भाऊ आहेत.
ह्या तिघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही. ते वेगळे होणे खरे महत्त्वाचे आहे. भगवान
श्रीकृष्ण देव म्हणतात
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।। अ. १२/१७
जो ह्या भौतिक लाभात
हर्षित होत नाही, हानी झाल्यास दुःख
करीत नाही. जो कशाचिही इच्छा ठेवित नसून कोणत्याही भौतिक नुकसानीचा पश्चातापही करीत
नाही. शुभ व अशुभ ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याकरिता समसमान असतात. वस्तूंचा परित्याग
करीत असतो. असा खरा भक्तच मला अतिशय प्रिय आहे.
कोणे एके काळी एका
शहरात एक “नवाब” होता. त्याने गुलामांच्या बाजारात
जाऊन एक गुलाम विकत घेतला. तो गुलाम ईश्वरभक्त होता. आणि
सतत चांगले विचार, चांगले वर्तन यावर विश्वास ठेवणारा होता त्यामुळे तो गुलाम निरोगी व तेजस्वी होता. नवाबाने त्याला घरी आणले.
त्याचे सद्वर्तन पाहून नवाब त्याच्या प्रेमात पडला. गुलाम मोठा प्रभावी होता. सगळी कामं त्याने
देवाचे नाव पुटपुटत सहजरित्या केली.
सायंकाळी नवाबानं विचारलं, ‘‘तुला आयुष्यात पुढे काय करायला आवडेल?’’
तेव्हा तो गुलाम हसून म्हणाला ‘“ मला काहीच
करायला आवडणार नाही, परमात्म्याची जशी मर्जी असेल तसं होईल, आणि मी गुलाम, माझ्या असण्याला
काय अर्थ आहे? आपण जसं ठेवाल तसं राहीन.’’
नवाबानं विचारलं, तुला कोणते वस्त्र परिधान करायला आवडेल? तो म्हणाला ‘‘माझी कसली आवड? परमात्मा जसं नेसविन, तसं नेसेल, परमात्मा जसं खायला घालेल, तसं खाईन.’’
नवाबाने विचारले ‘‘तुला कुठल्या नावानं हाक मारू?’’
तो म्हणाला ‘‘परमात्म्याची मर्जी माझं कसलं नाव? दासाचं कां कुठले नाव असतं? आपण जे नाव ठेवाल ते मला मान्य आहे’’
त्याचे एखाद्या महान संतासारखे इतके तत्ववादी बोलणे एकून नवाबाच्या
मनात क्रांति झाली. त्याच्या लक्षात आले की आपण ज्यांना गुलाम म्हणून घरी आणले
ते एक संत आहेत.
त्याने लगेच त्या संताचे पाय धरले व म्हणाला, ‘‘आपण मला जगण्याचं रहस्य सांगितलंस, ज्याच्या मी शोधात होतो. माझं अन् परमात्म्याचं हेच नातं! तू माझा गुरु आहेस.’’ तेव्हापासून नवाबाने त्याचे
शिष्यत्व अंगिकरीले. व त्याचे मन हळुहळु शांत झाले. संत म्हणतात म्हणतात ‘जे लिहिलं आहे तेच होईल. तो जस करवेल, तो जस ठेवेल परमात्म्याची
मर्जी.’
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संङ्गोऽ स्त्वकर्मणि ।। अ.२/४७
हे आमचे व्यवहारसूत्र
आहे. हे सूत्रच आमचे जीवन घडवते आहे. त्याचेच आचरण आम्हास करावयाचे आहे. खऱ्या अर्थाने
सुखी व्हायचे आहे तर त्यावर एकच उपाय आहे.
परमात्म्याच्या हुकुमानुसार
त्याच्या मर्जीनुसार चालावे. आम्ही आपली मर्जी बाजूला सारावी. त्याच्या मर्जीला प्राधान्य
द्यावे. दुःख आलं तर दुःख देखील स्वीकारावे व म्हणावे ‘त्यानं दुःख दिलं आहे तर यात नक्कीच
काहीतरी रहस्य आहेच. भाल्याचा घाव काट्यावर निमानणार आहे.’
आम्ही मुळीच तक्रार
करू नये. गरीब तर गरीब. श्रीमंत तर श्रीमंत, सुखात तर सुखात, दुःखात दुःखात ही एक गोष्ट सतत मनात कायम राहावीच. ‘हे परमात्मा परमेश्वरा
! तुझा हुकुमच तर खरे माझे जीवन आहे.’ अशा भावनेमुळे अचानकच आमच्यात “शांतता” नांदायला लागण्यास वेळ लागणार नाही. जे मग लाख उपायांनी शांत
होत नाही ते केवळ त्या परमात्म्याच्या मर्जीवर सोडून देण्यात शांत होऊनच जाते. चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
पण आम्ही सर्व आपली मर्जी चालविण्याचा प्रयत्न करतो. हीच खरी चिंता आहे. त्यामुळेच खरे तर
दुःखाचे वलय पसरले आहे. आम्ही असे हीन जीवन जगत असल्यानेच खरी चिंता आहे.
जेव्हा आम्ही खुष असतो, त्या देवाच्याच मर्जीत
खुष असतो. या प्रभु परमात्म्याच्या मर्जीत चालल्यास सर्व दुःख हलकं होऊन जाते. कारण परमेश्वर शांतस्वरूप व कल्याण
स्वरूप आहे.
ईश्वर एक आहे. दुजा न कोई,
नदी जिथे घेऊन जाईल, तेच तिचे लक्ष,
जिथे पोहोचवेल तोच किनारा,
मग कशाची चिंता व कशाचे दुःख? अहंकाराचं मुळच नष्ट होते दुःख आपोआपच
नष्ट होते. जीवन साबणाचा फेस आहे. शरीराला फेसाप्रमाणे मानावयास हवे. थोड्यावेळापूर्वी
नव्हता आता आहे, लगेच नष्ट होणार
आहे. ईश्वरच शाश्वत आहे तोच सत्य आहे सत् आहे. म्हणून
सतत त्याच्या भक्तीतच स्वतःला मग्न ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आपणास त्यांच्या मर्जीची आठवण होताच अंतर्यामी हलक होऊन जाते.
कुठलीही चिंता नाही, ताण नाही.
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात.
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्दच ।
मय्यर्पित मनोबुध्दीर्मामे वैष्यस्य संशयः ।। अ. ८/७
हे अर्जुन! तुला नेहमी
माझ्याच रुपाने चिंतन केले पाहिजे, सोबत युध्द करण्याचे कर्तव्यही पूर्ण केले पाहिजेस. आपल्या कर्माला मला समर्पित
करून आपले मन व बुद्धि माझ्यात स्थिर करून तू निश्चितच मला प्राप्त करू शकशील घरातच
राहायचे परंतु हिमालयात असल्याची जाणीव व्हावयास हवी. काम, धंदा, सुरळीत ठेवावयाचा
आहे. दुकान, शेती, नोकरी करायचीच आहे. पण आठवण सतत परमात्म्याचीच ठेवायची आहे.
भगवान श्रीकृष्णाचा हाच खरा संदेश आहे. खुशी, शांती, यशस्वी जीवनाची हीच खरी गुरुकिल्ली
आहे. हाच ईश्वराचा प्रसाद आहे, आशिर्वाद आहे.
ईश्वर स्वयंभू आहे. तो भयविरहीत आहे. ‘ईश्वर' गुरुच्या कृपेचा प्रसाद आहे.
यह तन विषयी बेलरी,
गुरू अमृत की खान ।
शीश दिये, जो गुरु मिले,
तो भी सस्ता आन । संतकबीर -
“निरंतन स्मरण करा” असा भगवान श्रीकृष्णाचा आदेश आहे. परमेश्वराच्या आदेशाचे पालन करणेच खऱ्या भक्ताचे
लक्षण आहे. तेव्हाच परमेश्वराच्या मांडीत बसण्याचा अधिकार आम्ही प्राप्त करू शकतो.
‘तेरा जन एकाध है कोई”
असे कोटी कोटी लोक आहेत. मंदिरे आहेत, मशिदी आहेत. गुरुद्वारे आहेत. लोक प्रार्थना करताहेत पूजा करीत
आहेत. अर्चना करीत आहे परंतु कबीर म्हणतात - "तेरा जन एकाध है कोई” शेवटी ! परमात्म्याचीच मर्जी!”
क्षमा विरस्य भुषणम्
एकदा एक सिंह रस्त्याने
जात होता. ते लांबवरून उकीरड्यावर लोळणाऱ्या गाढवाने पाहिले. गाव जवळ होते काही लोकही
आजुबाजुला होते. गाढवाला धीर आला तो मोठमोठ्याने ओरडून सिंहाला शिव्या द्यायला लागला.
अनापशनाप बोलायला लागला. सिंह गुपचुप रस्त्याने डोलत डोलत निघाला.
जवळच असलेल्या कोल्ह्याने
हे पाहिले व सिंहाजवळ येऊन म्हणाला, 'महाराज! आपण गप्पच आहात. तो गाढव एवढा मोठमोठ्याने आपणास शिव्या देतो व आपण त्याचा
काही समाचारही घेत नाही.' तेव्हा सिंह कोल्ह्याला
म्हणाला 'अरे कोल्होबा, कुठे त्या गाढवाच्या तोंडी लागायचे. गाढव ते गाढवच! लोक काय म्हणतील 'एवढा मोठा सिंह पण गाढवाच्या नादी लागला' म्हणून त्यांच्याशी भांडण्यापेक्षा त्याला क्षमा केलेलीच बरी
'क्षमा वीरस्य भूषणम्' सिंह म्हणाला, कोणी बरोबरीचा
असता तर त्याचा समाचार घेण्यात मजा आली असती गावाचा व गावातील त्यांच्या लोकांचा त्याला
धीर आहे म्हणून तो बडबडतो बिचारा! काय आपण ते मनावर घ्यायचे व आपली मनस्थिती खराब करायची"
असे सांगून सिंह आपल्या जंगलात सिंह गर्जना करीत निघून गेला.
तात्पर्य - धीर वीर पुरुषाला
आपले कार्य करीत असता समाजातील काही अशांत, असमंजस व हिंसक प्रवृत्तीच्या लोकांकडून काहीतरी कुभांड रचून, अनाठाईच त्रास होत असतो व माघारी त्याच्या विषयी काही अनाप शनाप
बोलल्या जात असते. म्हणून त्या कार्य करणाऱ्या धीर वीर पुरुषाने अशा केवळ पोटभरू व
कुणाच्या तरी इशाऱ्यावर नाचणाऱ्या लोकांच्या नादी न लागता विरोधाला न जुमानता नेटाने
आपले कार्यकरीतच रहावे व त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल क्षमा करावी कारण 'क्षमावीरस्य भूषणम्' क्षमा करणे ही शरणागती नसून ते वीरांचे भूषण आहे. शेवटी 'मला त्रास देणारे व माझ्या कार्यात अडथळे आणणारे हे अज्ञान लोक
काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही म्हणून हे प्रभो त्यांना क्षमा कर' अशी त्यांचे विषयीही भावना असावी.
Khoob chhan aahe
ReplyDelete