ईश्वर भक्ताला सांसारिक सुखे विषारी पाण्यासारखी

ईश्वर भक्ताला सांसारिक सुखे विषारी पाण्यासारखी

ईश्वर भक्ताला सांसारिक सुखे विषारी पाण्यासारखी



       एकदा एक साधू आपल्या शिष्यासोबत तीर्थयात्रेसाठी निघाला. हजारो मैल पादाक्रांत करून ते तीर्थयात्रा करीत होते रस्त्यात त्यांना एक विशाल वाळवंट लागलं आणि त्यात ते आपला रस्ता भटकले, वाट चुकले.

       वाळवंटात भटकत भटकत नेमकी दिशा शोधण्याचा प्रयत्न त्यांना खूप तहान लागली. मग त्यांनी पाणी शोधायला सुरुवात केली. फार वेळ फिरल्यावर त्यांना एक छोटासा झरा सापडला त्यांना खूप हायसे वाटले. तिथे फक्त झराच नाहीतर झर्याच्या शेजारी पाणी पिण्यासाठी एक पात्रही होते.

       त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी देवाचे आभार मानले. देवाने पाणीच नाही, तर पाणी पिण्यासाठी एक पात्रही त्यांना दिले होते. त्या पात्रात त्यांनी झऱ्याचे पाणी भरले आणि पिण्यास सुरुवात केली तेव्हा ते पाणी खूपच कडू लागले. त्याची चवही खूपच खराब होती. त्यांच्या लक्षात आले पाणी विषारी आहे. ते दोघेही घाबरले हे पाणी जर पिले तर आपण जिवंत राहणार नाही, हा पूर्ण झराच विषारी पाण्याचा आहे असं म्हणून ते तिथून उठले दुसर्‍या झर्याच्या शोधात निघाले.

       निघताना त्यांनी ते पात्र सोबत घेतले. शोधता शोधता त्यांना दुसरा जराही सापडला. तिथेही त्यांनी पात्र पाण्याने भरले आणि पिण्यास सुरुवात केली पण तेही पाणी खूप कडु होते आणि मागील झर्याप्रमाणेच त्या पाण्याची चवही खूप खराब होती पुन्हा त्यांची निराशा झाली.

       ते घाबरले, चिंतीत झाले की आता मृत्यू निश्चित आहे. पाणी समोर असूनही आपण पिऊ शकत नाही आणि गळाही सुकत चालला आहे. तिसरा झरा शोधण्यासाठी शरीरात त्राणही उरले नाही.

       तरीही त्यांनी पुन्हा मनात कसेबसे धैर्य धारण करून तिसरा झरा शोधण्याचे ठरवले आणि निघाले काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना पुन्हा एक झरा दिसला. त्या झर्‍या जवळ एका झाडाखाली एक साधू बसलेला होता. त्यांनी त्या साधला नमस्कार केले. साधुनेही प्रतिकर्तव्य म्हणून अभिवादन केले.

       पाथसरूंनी पुन्हा पात्र पाण्यात बुडवले आणि पाण्याची चव तपासून बघीतली ते पाणीही मागील दोन झर्याप्रमाणेच कडू होते.

       त्यांनी त्या साधूला विचारले, ‘‘आम्हाला एक लक्षात येत नाहीये की या भागातले सगळेच झरे विषारी कसे काय? आतापर्यंत आम्ही तीन झरे शोधले आहेत, तिन्ही झऱ्यांचे पाणी कडू आणि खूपच खराब लागत आहे तिन्ही झर्‍यांचे पाणी विषारी आहे आपल्याला याबद्दल काही माहिती आहे का?”

       साधूने त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि त्यांना उत्तर दिले हे झरे कडू नाहीत किंवा विषारीही नाहीत, तुमच्यात पात्रातच काहीतरी गडबड असेल, तुम्ही तपासून पहा. कारण मीही याच झऱ्याचे पाणी पितो, मला तर ते पाणी गोड वाटते आणि मी जिवंत आहे याचा अर्थ ते पाणी विषारी नाही. आधी तुम्ही तुमचे पात्र स्वच्छ करा आणि मग पाणी प्या.

       त्यांनी तसेच केले, पात्र आधी स्वच्छ धुतले वाळूने घासले. मग त्यात पाणी भरले तेव्हा ते पाणी गोड आणि खूपच छान चव असलेले होते. त्यांना आपल्या निष्कारण भटकंतीचा पश्चाताप झाला. आणि हे आपल्या डोक्यात आधी का आले नाही? याचीही वाईट वाटले.

       सांगण्याचे तात्पर्य असे की, मनुष्याचेही तसेच आहे मनुष्याने आतापर्यंत आपल्या इच्छा वासनांच्या अधीन होऊन संसारिक विषारी भोगांचे सेवन केले आहे त्यामुळे त्याचे मन दुषित झालेले आहे, त्या मनात परमेश्वराचा वास कसा होणार !

       अशा विषय भोगांनी ग्रासलेल्या माणसाला देवाची महिमा धर्माची जाणीव करून दिली तर तो त्यातही दोषच पाहतो. काहीचे मन संसारिक भोगांनी  इतके विषारी झालेले आहेत की त्यांना परमेश्वराचे अस्तित्व मान्य नाही

       खा प्या मजा कराइतक्या पुरतेच त्यांचे जीवन आहे पुढे आपले काय होणार? याची यत्किंचितही जाणीव अशा माणसांना नाही.

       आपण नेहमी पाहतो की ज्याला आपण धार्मिक समजतो, धार्मिक मनुष्य असे मानतो, पण कधी कधी तो इतर मनुष्यांपेक्षा जास्त दुःखी असतो. कारण तो वरवडे जरी धार्मिकपणाचा आव आणत असला तरी त्याच्या इच्छा-आकांक्षावर त्याचे नियंत्रण नसते. त्याला धन पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे अशा नाना प्रकारच्या इच्छा आकांक्षा यांनी त्याचे मन दूषित झाले असते आणि त्यासाठी तो देवधर्मही करत असतो आणि कधीकधी तर अशा माणसाची द्विधा मनस्थिती असते त्याला देवही पाहिजे असतो आणि सांसारिक सुखेही पाहिजे असतात.

       हा फार मोठा भयंकर आजार आहे. त्याच्यापेक्षा तो सांसारिक मनुष्य बरा ज्याला धन पाहिजे, यश पाहिजे, खा प्या मजा करा अशा रीतीने जो संसार करतो त्याला तुम्ही थोडेफार सुखी पहात असता. पण जो अशा द्विधा मनस्थितीत त्याची अवस्था दुविधा में दोनो गये, माया मिली न श्याम अशी होऊन जाते.

       तो मनुष्य अशा बैलगाडीत बसलेला आहे जी दोन बैल चालवत. आहेत एक बैल एकीकडे ओढतो दुसरा बैल दुसरीकडे ओढतो अशा अवस्थेत जीवनाचा प्रवास सुखकर कधीच होणार नाही

       म्हणून मित्रांनो आधी आपल्याला मनाचे पात्र स्वच्छ करावे लागेल. किंवा ते पात्र फेकून द्यावे लागेल याचा अर्थ सांसारिक सुखांची आसक्ती सोडावी लागेल. समाधानी वृत्तीचे अनुसरण करावे लागेल. तेव्हाच अध्यात्म मार्गाचा प्रवास सुखकर होईल.

       ज्याने आपल्या अंतःकरणरूपी पत्रातला विकार विकल्पाचा मळ स्वच्छ धुतला आहे अशा स्वच्छ मनाच्या पात्रातच परमेश्वर वास करतो.

       एक दिवस आपल्या लक्षात येईल की इच्छा आकांक्षा वासना या अत्यंत विषारी आहेत. काम क्रोध लोभ यामुळेच आपल्यालाया संसार रूपी वाळवंटात भटकावे लागते आहे. त्यातही आपले मन अंतःकरणरूप पात्र वासना रूप विषाने भरलेले आहे  म्हणून आपल्याला परमेश्वराची भक्ती हेच अमृततुल्य पाणी प्राशन करता येत नाही. करावेसे वाटत नाही.

       संसारिक इच्छा-आकांक्षा  सुखाची अपेक्षा सोडल्यावरही अथवा संन्यास घेतल्यावरही मनुष्य देवाकडे काही ना काही मागत राहतो. देवाने काहीतरी द्यावे म्हणूनच भक्ती करत राहतो हेही खूप चुकीचे आहे. देवाची भक्ती जो निर्हेतुकपणे काहीही अपेक्षा न करता करतो त्यालाच परमेश्वर आपला आवडता भक्त मानतात आणि त्याच्यासाठी संकटात धावून येतात. त्याला काहीही कमी पडू देत नाही. योगक्षेमं वहाम्यहम् श्रीमद्भगवद्गीतेतील या वचनाप्रमाणे त्याची संपूर्ण जबाबदारी घेतात.

 

       अमरावती जवळ एका खेड्यात राहणारे संतराज बास नावाचे महात्मे गावातील लोकांना धर्माचे महत्व समजावून सांगत असत. ते मनाच्या निर्मळतेवर जास्त प्रवचन देत. कोणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असत. 

       एके दिवशी गावातील एका स्त्रीने त्यांना आपल्या घरी भिक्षेला येण्याचा आग्रह केला. तिने त्यांच्यासाठी जेवण बनवले. गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर केली. संतराजबास त्या बाईच्या घरी भिक्षेला गेले. त्या महिलेने विनंती केली बाबा आत या, बसासंतराज बाबांनी निराकरण करत म्हटले, ही भिक्षेची वेळ आहे, मी भिक्षा करताना घरात येणार नाही. तु जे काही निष्पन्न केलेले असेल ते मला भिक्षेत वाढून दे, मी नदीवर जाऊन जेवण करेनत्या महिलेला दुःख उत्पन्न झाले बाबा एकदा तरी माझ्या घराला पाय लावा,’ जवळच उभे असलेल्या तिच्या पतीनेही बाबांना आग्रह केला बाबा आत या देवपूजा करादेवपूजेचे कारण पुढे करताच बाबांचा नाईलाज झाला देवपूजा डावलून कसे जाणार म्हणून ते घरात आले. त्यांनी बाबांना कॉटवर बसवले बाबांनी देवपूजा केली. तेव्हा त्या संत भक्त बाईने बाबांना प्रश्न केला, “बाबा! जीवनात खरा आनंद आणि सुख शांती कशी मिळेल? आम्ही देव धर्म करतो पण मन शांत राहत नाही. सारखं "हे पाहिजे, ते पाहिजे, ते कमी आहे," यातच मन गुरफटते त्यावर संतराज बाबा म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला उद्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ.

       नंतर सद्भक्त बाईंनी बाबांना भिक्षा वाढली. पण खीर घेण्यास स्वतंत्र डब्बा किंवा वाटी नसल्याने तिने खीर वाढली नाही. बाबा तिला म्हणाले ‘‘बाई पात्रातच वाढ तसंही मी सर्व एकत्र काला करून खाणार आहेपण त्या बाईने काही ऐकले नाही. ‘‘बाबा आपल्याला संध्याकाळी माझ्या घरी जेवणाचा दंडवत तेव्हा मी आपल्यासाठी पुन्हा खीर तयार करेनबाबांनाही तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. क्षणभर विचार करुन त्यांनी तिच्या दंडवताचा स्वीकार केला निघून गेले.

       संध्याकाळी त्या भक्त बाईने बाबांसाठी पुन्हा खीर बनवली, तिने अतिशय उत्साहाने स्वयंपाक केला कारण तिला संत्राज बाबांकडून तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार होते. ती अतिशय आनंदित होती.

       सायंकाळी यजमान बाबांना बोलावण्यासाठी गेले व मोटरसायकलवर बाबांना घेऊन आले आणि बाबांचे पाय प्रक्षालन केले. बाबांनी हात सोहळे करून देवपूजा केली. तोपर्यंत यजमानांनी बाबांना बसण्यासाठी आसन टाकले.  गंध अक्षत पूजा करुन दंडवत आधी विधी झाल्यावर बाबांसाठी जेवणाचे ताट आणले गेले. बाईने खिरीचे पात्र स्वतंत्र आणले. बाबा तिला म्हणाले बाई खीर माझ्या पात्रातच वाढ मी पात्रात जेवण करेन. संतराज बाबांनी खीर घेण्यासाठी आपले पात्र पुढे केले. ती बाई खीर वाढणारच होती की तिची नजर पात्राच्या आत पडली.  तेव्हा, आणि ती दचकली तिने हात मागे घेतला व बाबांना सांगितले की बाबा आपले पात्र खूपच घाण आहे, त्यात काहीतरी कचरा आहे.

      त्यावर संतराज बास म्हणाले - ‘‘हो पात्रात कचरा आहे, पण तरी तू त्यात खीर टाक. 

       बाई म्हणाली ‘‘नाही बाबा, असं कसं? तसंच टाकलं तर खीरही खराब होईल. तुम्ही असे करा, हे पात्र मला द्या, मी ते धुवून स्वच्छ करते.  त्यावर संतराजबाबांनी विचारले की, “जोपर्यंत पात्र स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तू त्यात खीर वाढणार नाही का?”

‘‘नाही वाढणार बाबा, आधी पात्र स्वच्छ करू द्या

       तेव्हा संतराजबाबा म्हणाले की, ‘‘ताई हेच तुझ्या सकाळच्या प्रश्नाचे उत्तर आहे. तू सकाळी विचारले होते की जीवनात सुख शांती कधी मिळेल, त्याचे उत्तर हेच आहे की ज्याप्रमाणे पात्र स्वच्छ केल्याशिवाय तू त्यात खीर वाढू शकत नाही त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या मनात लोभ, क्रोध, आसक्ती, वासना, अशा वाईट विचारांची घाण आहे, तोपर्यंत आपल्याला सुख शांती लाभणार नाही. हे दोष असल्यामुळे जीवन कधीही आनंदित होऊ शकत नाही. कारण या दोषांमुळे माणूस असमाधानी असतो आणि अशा दोषांनी ग्रासलेल्या मनात परमार्थाचा उपदेश ठसत नाही. बळजबरी उपदेश केलाय तर परिणाम शुन्य असतो.’’

       म्हणून चांगला उपदेश ऐकण्यासाठी, ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन करण्यासाठी चांगल्या विचारांची जडणघडण होण्यासाठी मन शांत आणि शुद्ध असले पाहिजे.  तरच आपण ज्ञानाच्या देवाधर्माच्या गोष्टी शिकू शकतो.  शांत आणि शुद्ध मन असेल तरच खरे सुख लाभते. आणि जीवनात आपण आनंद मिळवू शकतो.

 

 

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post